अमोल उदगीरकर

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सिनेमांतल्या नायिकांचे बाप हे फारच प्रेडिक्टबल प्रकरण होतं. त्या काळातल्या नायिकांच्या बापांना दोनच कामं असायची. एक तर नायिकेच्या प्रेमात असलेल्या नायकाला आपल्या राजवाड्यासारख्या घरात बोलवायचं आणि त्याच्या तोंडावर ब्लँक चेक मारून ‘इसमे मन मर्जी रकम भर लो और निकल जाओ मेरी बेटी की जिंदगी से,’ असा सणसणीत डॉयलॉग मारायचा. नायिकेच्या बापाचं दुसरं आवडतं काम म्हणजे मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आपल्या मित्राच्या मुलाबरोबर नायिकेच्या लग्नाची घोषणा करायची. एवढी महत्त्वाची घोषणा करण्यापूर्वी या बापानं मुलीला आणि बायकोला आधी काही सांगितलेलंपण नसायचं हे विशेष! मग त्याच पार्टीत हिरोनं पियानोवर दर्दभरं गाणं गाण्याचे सोपस्कार व्हायचे.

chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
toxins, spices , news,
विषद्रव्यांचा हिमनग..
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
सांधा बदलताना: वैष्णव जन…
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…

वर्षानुवर्षं पडद्यावरचा मुलीचा बाप अशा सरसकटीकरणामध्ये वावरला. आपल्या चित्रपटानं मुलगा आणि वडील यांच्या नात्याचे वेगवेगळे पदर उलगडण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. ‘त्रिशूल’, ‘शक्ती’, ‘गर्दिश’, ‘अर्धसत्य’, ‘घातक’ ते अगदी अलीकडचा ‘अॅनिमल’ अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. पण मुलगी आणि वडिलांचे नातेसंबंध हा विषय आपल्या सिनेमानं जवळपास ऑप्शनला टाकला होता. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या सिनेमांचे विषय नायकप्रधान असायचे आणि चित्रपटउद्याोगाचं एकूण स्वरूपसुद्धा पुरुषप्रधान होतं.

आणखी वाचा-हवा सन्मान, हवेत अधिकार!

नायकाभोवती फिरणाऱ्या सिनेमाच्या कथानकात नायिका आणि एकूणच स्त्रीपात्रं दुय्यम असायची. त्यामुळे मुलगी आणि वडिलांच्या नात्याला पडद्यावर फारसं स्थान नसायचं. याला अपवाद म्हणता येईल असा दिग्दर्शक महेश भट्टचा ‘डॅडी’ हा चित्रपट १९८८ मध्ये आला होता. एक मुलगी समाजानं आणि तिच्या परिवारानंही दूर ढकललेल्या व्यसनाधीन गायक बापाला अनेक प्रयत्नांनी स्वत:च्या पायावर पुन्हा उभं करते, असं सिनेमाचं थोडक्यात कथानक. त्यात मुलगी आणि बापामधले अवघडलेले आणि अनेक भावनिक चढउतार असणारे संबंध फार सुंदरपणे चित्रित केले होते. १९९१ मध्ये आलेला आणि प्रचंड यशस्वी झालेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट अजूनही लोकांना लक्षात आहे. या चित्रपटात विक्रम गोखलेंनी साकारलेला बाप हा काही कारणांमुळे खलनायकी ढंगातलाच असतो. ‘माहेरची साडी’ कदाचित आज अनेकांना बुरसटलेला आणि स्त्रियांना दुय्यमत्व देणारा सिनेमा आहे असं वाटू शकतं. महेश भट्ट यांच्याच ‘दिल हैं की मानता नही’ मधला बाप आपल्या एकुलत्या एक मुलीला तिच्या आवडत्या मुलाबरोबर पळून जा, म्हणून आग्रह करणारा असतो. पण मुलगी आणि बापाच्या नात्याला नवीन ‘शिफ्ट’ देणारा चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ होता.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा अनेक अर्थांनी भारतीय सिनेमाला वेगळं वळण देणारा सिनेमा होता. या सिनेमातला नायिकेचा बाप (अमरीश पुरी) विदेशात स्थायिक होऊनही जुन्या संस्कारांना, रूढी-नियमांना कवटाळून राहणारा आहे. त्याची बायको आणि मुली या कठोर स्वभावाच्या माणसाला वचकून असतात. आपली मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली आहे हे कळताच मुलीचं लग्न आपल्या मित्राच्या मुलाबरोबर लावून देण्यासाठी तो भारतात दाखल होतो. पण आपली मुलगी ज्याच्या प्रेमात पडलीय, तो मुलगा, आपण ज्याच्याबरोबर तिचं लग्न ठरवून द्यायला निघालो आहोत, त्या मुलापेक्षा अनेक पटींनी चांगला आहे, असा साक्षात्कार त्याला होतो, तेव्हा मुलीचा घट्ट धरलेला हात सोडून ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ असं सांगून तिला आपल्या बंधनातून मुक्त करतो. हा एकूणच पडद्यावरच्या बाप आणि मुलीमधल्या नात्याला वेगळं वळण देणारा क्षण होता असं म्हणता येईल.

देशाच्या बदलत्या राजकीय आणि आर्थिक धोरणांचे सखोल परिणाम जितके समाजावर होत असतात, तितकेच सिनेमावरही होत असतात. आपण स्वीकारलेल्या खासगीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे असेच परिणाम विविध अंगांनी झाले. आर्थिक उदारीकरणानंतर देशात खासगी क्षेत्राचं प्रस्थ वाढायला लागलं. देशांतर्गत स्थलांतरं मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला. याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या कुटुंबसंस्थेवरही झाला. आपल्याकडे यापूर्वी जास्त प्रमाणात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यात घरात अनेक मुलं असायची. त्यात मुलगी आणि वडिलांचं नातं फुलायला वाव नव्हता. आर्थिक उदारीकरणानंतर आजच्या समाजाचं व्यवच्छेदक लक्षण असणाऱ्या ‘न्युक्लियर फॅमिली’ उदयाला यायला लागल्या. कुठलीही जुनी ओझी न बाळगणाऱ्या या छोट्या कुटुंबातल्या नात्यात तुलनेनं जास्त मोकळेपणा होता.

आणखी वाचा-‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे

२००० सालानंतर आलेले अनेक लेखक-दिग्दर्शक हे अशा न्युक्लियर कुटुंबांमधून आलेले होते. एक मुलगी आणि वडिलांच्या नात्याला अनेक कंगोरे असू शकतात याची जाणीव असलेली ही पिढी. स्क्रीनवरचा बाप- जो ‘दैवतीकरण’ आणि ‘राक्षसीकरण’ अशा दोन टोकांत अडकला होता. त्याला हाडामांसाचा आणि मर्त्य गुणदोष असणारा माणूस बनवायचं श्रेय या न्युक्लियर परिवारातल्या कलाकारांना द्यावं लागतं. शुजित सरकार या दिग्दर्शकाचा ‘पिकू’ हा चित्रपट मुलगी आणि बापाच्या नात्यातले विविध ताणेबाणे फार सुंदररीत्या गुंफतो. बद्धकोष्ठाचा त्रास असणारा बाप (अमिताभ बच्चन) आपल्या पंख पसरून उडायला उत्सुक असणाऱ्या मुलीला (दीपिका पदुकोण) स्वत:शी बांधून ठेवायचा अट्टहास करत असतो. बाप आणि पोरीमध्ये प्रत्येक गोष्टीत मतभेद असतात आणि त्यातून घरात सतत ठिणग्या उडत असतात. एकमेकांबरोबर राहून दोघंही टोकदार स्वभावाचे बनले आहेत. एका अवचित क्षणी त्यांच्या आयुष्यात दोन सुंदर गोष्टी घडतात. एक रोड ट्रिप आणि त्या ट्रिपच्या निमित्तानं त्यांच्या आयुष्यात शिरलेला इरफान खान. या प्रवासाच्या शेवटी बाप आणि मुलगी अनेक अर्थांनी ‘मुक्त’ होतात. बाप आणि मुलीच्या नात्यावरचा ‘पिकू’ हा आपल्या चित्रपटांतला बहुतेक सगळ्यांत सुंदर कवडसा असावा.

‘थप्पड’ या अनुभव सिन्हाच्या चित्रपटात जगाच्या दृष्टीनं क्षुल्लक असणाऱ्या, पण मुलीसाठी आत्मसन्मानाच्या असलेल्या मुद्द्यावरून घटस्फोट घ्यायला निघालेल्या तिच्या मागे ठामपणे उभा राहणारा बाप दिसतो. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून माहेरी आलेल्या मुलीच्या मागे ठामपणे उभे असणारे अनेक बाप तुम्हाला आजूबाजूलाही दिसतील. ‘थप्पड’मधला बाप या सगळ्या बाप-माणसांचा प्रतिनिधी आहे. ‘क्वीन’ सिनेमात लग्नाच्या आदल्या दिवशी मुलगा लग्नाला नकार देतो. भावविश्व उद्ध्वस्त झालेली मुलगी (कंगना राणावत) एकटीनंच हनीमूनला पॅरिसला जायचा निर्णय घेते. एकट्यानं आजवर काहीही न केलेल्या आणि सतत कुणावर तरी अवलंबून राहणाऱ्या आपल्या लाडक्या मुलीच्या निर्णयामागे ठामपणे उभा राहतो तिचा बाप. शेवटी या प्रवासात व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण कायापालट झालेली मुलगी घरी आलेली बघून बापाच्या एका डोळ्यात अश्रू असतात, तर एका डोळ्यात उतू जाणारा अभिमान.

‘दंगल’ हा प्रचंड यशस्वी झालेला चित्रपट म्हणजे दिग्दर्शक नितेश तिवारी आणि मुख्य भूमिकेत आमिर खान, हा पुन्हा बाप आणि मुलीच्या नात्यावरचा वेगळा टेक आहे. मला व्यक्तिश: या चित्रपटात काही समस्या जाणवतात. चित्रपटातल्या बापाची काही अपुरी स्वप्नं असतात, ती स्वप्नं तो आपल्या मुलींवर लादतो. मुलींची कुस्तीगीर होण्याची इच्छा नसतानाही तो त्यांना मारूनमुटकून घोड्यावर बसवतो. आपली अधुरी स्वप्नं आणि वेगळ्या आयुष्याच्या इच्छा आपल्या मुलांमार्फत जगण्याचा प्रयत्न करणारा पालकांचा एक वर्ग ‘रिअॅलिटी शो’च्या काळात उदयाला आला आहे. या पालकांना मुलांच्या इच्छेशी आणि त्यांना आयुष्यात काय करायचं आहे, या त्यांच्या आकांक्षांशी काही देणंघेणं असतं का, असा प्रश्न पडतो. ‘दंगल’ चित्रपटाला खास भारतीय सिनेमाचं व्यवच्छेदक लक्षण असणारं ‘हॅपी एंडिंग’ असलं आणि शेवटी सगळं गोड गोड होत असलं, तरी ‘दंगल’ बघून विचार करणाऱ्या माणसांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. यापेक्षा आमिर खानचीच निर्मिती असणारा ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट जास्त थेट मुद्द्याला हात घालणारा आहे. यातला बाप आपल्या मुलीच्या गायिका होण्याच्या स्वप्नाला तिची गिटार, लॅपटॉप हिंसकपणे तोडूनमोडून प्रतिक्रिया देतो. मग मुलगी आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारते, ते एका वेगळ्या पद्धतीनं.

आणखी वाचा-धूम्रपानातही स्त्रीपुरुष भेद!

नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ चित्रपट याच नात्यातली वेगळी बाजू दाखवतो. आर्चीच्या बापाचा पंचक्रोशीत दबदबा असतो, पण मुलीशी त्याचं नातं एकदम खेळीमेळीचं. ‘आता गं बया का बावरलं ’ या गाण्यात एक छोटा, पण महत्त्वाचा क्षण आहे. आर्ची हसता हसता बापाच्या डोक्यावर हलकेच टपली मारते आणि अख्खा तालुका ज्याला घाबरत असतो तो बापपण त्यावर हसतो. पण मुलीनं जातीबाहेर लग्न केल्यावर हाच मुलीवर जिवापाड प्रेम करणारा बाप तिच्याबाबतीत अतिशय क्रूर निर्णय घेतो. ‘ऑनर किलिंग’ हे आपल्या समाजाचं अस्वस्थ करणारं वास्तव ‘सैराट’ दाखवतो.या यादीत ‘राझी’ चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करायला हवा. आपल्या लाडक्या मुलीला शत्रुराष्ट्रात गुप्तहेर म्हणून पाठवायचा निर्णय काळजावर दगड ठेवून घेणारा बाप यात आहे.

गाणी हा सिनेमाचा फार महत्त्वाचा घटक आहे. गाण्यांतून व्यक्तींपर्यंत अनेक भावना फार परिणामकारकपणे पोहोचवता येतात. मुलं आपल्या आईवडिलांबद्दल गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करतात, तेव्हा त्या गाण्यांना लोकप्रियता मिळण्याची शक्यता हमखास असते. ‘तारे जमीन पर’मधला इशान बोर्डिंग स्कूलमध्ये जातो आणि पार्श्वभूमीला शंकर महादेवनचं ‘माँ’ हे गाणं सुरू होतं, तेव्हा डोळे भरून येत नाहीत असा कुणी असेलसं वाटत नाही. तसंच ‘अॅनिमल’ चित्रपटातलं ‘सारी दुनिया जला देंगे’ हे गाणं आहे! मुलाच्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करणारं. ‘हम ना समझे थे बात इतनी सी’ हे ‘गर्दिश’मधलं गाणं याच जातकुळीतलं. मुलीच्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना सूरबद्ध करणारं एक अप्रतिम गाणं ‘राझी’नं लोकांना दिलं आहे . शंकर- एहसान- लॉयनं स्वरबद्ध केलेलं ‘उंगली पकड के तूने, चलना सिखाया था ना’… या गाण्यानं जणू देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या भावनांना शब्द आणि सुरांचं देणं दिलं!

‘बरेली की बर्फी’ हा अश्विनी अय्यर तिवारी या वेगळे विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शिकेचा उत्तम सिनेमा आहे. देशातल्या आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असणाऱ्या नितेश तिवारीची पत्नी, एवढीच तिची ओळख नाहीये. लेखिका-दिग्दर्शिका म्हणून अश्विनीनं स्वत:चा वेगळा असा ठसा उमटवला आहे. नितेश तिवारीनं जी चूक ‘दंगल’ चित्रपटात केली, ती अश्विनी यांनी आपल्या सिनेमात होऊ दिली नाही. यात तिचं स्वत: स्त्री असणं महत्त्वाचं असेल कदाचित. ‘बरेली की बर्फी’मधली नायिका ‘बोल्ड’, ‘मूंहफट्’ आणि बंडखोर विचारांची आहे. बरेलीसारख्या छोट्या शहराला ती झेपणारी नाहीये, त्यामुळे तिचं लग्न जुळायला खूप अडचणी येताहेत. पण नायिकेचा पेशानं हलवाई असणारा बाप (पंकज त्रिपाठी) आपल्या मुलीबाबत आश्वस्थ आहे. आपली मुलगी या भवतालात ‘मिसफिट’ आहे हे त्यानं शांतपणे स्वीकारलं आहे. एका प्रसंगात तर तो चक्क आपल्याबरोबर मुलीलाही सिगरेट पेटवून देतो! आपल्या ‘जगावेगळ्या’ मुलींना मनापासून स्वीकारणाऱ्या बापांचा प्रतिनिधी म्हणजे पंकज त्रिपाठींनी साकारलेला हा बाप. असाच पायलट होऊ इच्छिणाऱ्या आपल्या मुलीमागे ठामपणे उभा राहणारा बाप पंकज यांनी ‘गुंजन सक्सेना’मध्ये साकारला होता.

आणखी वाचा-एका मनात होती: शोकाकुल एकटेपणा

‘चिनी कम’ हा दिग्दर्शक आर. बाल्कीचा, वयात खूप अंतर असणाऱ्या प्रेमी जोडप्याची कथा सांगणारा चित्रपट. यात आपली मुलगी तिच्यापेक्षा वयानं खूप मोठ्या असणाऱ्या (आपल्यापेक्षाही वयस्कर!) पुरुषाच्या प्रेमात पडलीय, हे कळल्यावर झालेली बापाची घालमेल परेश रावल यांनी फार उत्तम दाखवली आहे. मुलीच्या पसंतीला या बापाचा मनातून विरोध आहे, पण त्याचा स्वभाव मुलीवर बळजबरी करण्याचाही नाहीये. एका क्षणी मुलीच्या प्रेमाची जाणीव होताच तिच्या निर्णयामागे तो उभा राहतो. ‘चाची ४२०’ चित्रपटात घटस्फोटानंतर मुलीचा विरह असह्य होऊन नायक (कमल हसन) आपल्या माजी बायकोच्या घरात केअरटेकर म्हणून स्त्रीवेषात दाखल होतो. मुलीच्या सहवासाची आणि तिचे लाड पुरवण्याची हौस भागवण्यासाठी नायक हा आगळावेगळा मार्ग पत्करतो. मूळच्या इंग्लिश चित्रपटावरून घेतलेला हा चित्रपट विनोदी ढंगाचा असला, तरी एका बापाची तगमग आणि मुलीबद्दलचं प्रेम कमल हसन परिणामकारकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. ‘अंग्रेजी मीडियम’मधला मुलीला विदेशात शिकायला पाठवण्यासाठी नाना सायास करणारा इरफान खान यांनी साकारलेला बाप आणि विशाल भारद्वाजच्या ‘पटाखा’ चित्रपटातल्या एकमेकींशी सतत भांडणाऱ्या मुलींचा वैतागलेला, पण सबुरीनं घेणारा ‘बेचारा बापू’ विजय राज हेपण उल्लेखनीय.

नव्वदच्या दशकानंतर आपल्या चित्रपटांनी एकूणच बाप आणि मुलगी यांच्या नातेसंबंधांचं चित्रण करण्याच्या बाबतीत खूप लांबचा पल्ला गाठला. सिनेमाला त्याचं श्रेय दिलं पाहिजे. पण हेही तितकंच खरं आहे, की या प्रवासात दलित, अल्पसंख्य, आदिवासी आणि इतर दुर्लक्षित समाजघटकांची तितकीशी दखल घेतली गेलेली नाहीये. त्यामुळे या प्रवासाबद्दल समाधानी असणं ठीक, पण संतुष्ट राहू नये!


amoludgirkar@gmail.com