प्रत्येकाला एक जन्मदाता पिता असतोच, परंतु त्याचं भावनिकदृष्ट्या मुलींच्या आयुष्यात असणंं जास्त महत्वाचं. कारण घरात वडील आहेत, परंतु त्याचं अस्तित्व केवळ कर्तव्य, जबाबदारीपुरतं असेल तर मुलींना बाहेरच्या जगातला ‘माणूस’ समजून घेण्यात मर्यादा येते.
पितृदिना’च्या निमित्तानं ‘मुलगी आणि वडील’ यांच्याविषयी लिहायचं असेल तर आपण अनेकदा वडिलांच्या केवळ त्यागाबद्दल, कष्टांबद्दल आणि जबाबदार्यांबद्दल बोलतो; परंतु मुलीच्या भावनिक, मानसिक आणि नात्यांच्या विकासामध्ये वडिलांची जी अनन्यसाधारण भूमिका असते, त्याबद्दल तुलनेनं खूपच कमी बोललं जातं. प्रत्यक्षात, वडील हे केवळ घरातील कमावते सदस्य, शिस्त लावणारे पालक किंवा कुटुंबाचे रक्षणकर्ते नसतात, तर ते मुलीच्या मनात निर्माण होणार्या अनेक मूलभूत विश्वासांचे आद्य शिल्पकार असतात.
कधी कधी एखादी तिशी-चाळिशीतली यशस्वी स्त्री समोर बसलेली असते. उत्तम करिअर, संसार व्यवस्थित, विलक्षण बुद्धिमत्ता, पण संभाषण थोडं खोल गेलं की ती म्हणते, ‘‘माझ्या बाबांनी माझं कधीच कौतुक केलं नाही.’’ आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरारतं. तर कधी कधी एखादी तरुण मुलगी बिनधास्तपणे सांगते, ‘‘माझे बाबा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. त्यामुळे मला कुणाचीही आणि काहीही करण्याची कधीच भीती वाटत नाही.’’ या दोन्ही वाक्यांमध्ये वडिलांच्या भूमिकेचं सार दडलेलं आहे. मुलगी आयुष्यात ज्या पहिल्या पुरुषाला जवळून भेटते, ते म्हणजे तिचे वडील आणि त्या भेटीचा प्रभाव अनेकदा तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आयुष्यभर दिसत राहतो.
पुरुषांविषयीची तिची पहिली समज, स्वत:च्या स्त्रीत्वाविषयीची पहिली जाणीव, स्वत:च्या मूल्याविषयीची पहिली भावना आणि नातेसंबंधांविषयीचे अनेक मूलभूत विश्वास या नात्यातूनच आकार घेतात. ‘मी महत्त्वाची आहे.’ ( I matter ) ही भावना कुठून येते? लहान मुलीला तिच्या आत्मसन्मानाची जाणीव कशी होते? ती केवळ आरशात बघून होत नाही. ती तिच्या वडिलांच्या नजरेतून होत असते. मुलगी जेव्हा एखादं चित्र काढून बाबांना दाखवते, सायकल चालवायला शिकते, शाळेतून बक्षीस घेऊन घरी येते किंवा फक्त बाबांच्या जवळ बसून गप्पा मारते, तेव्हा ती नकळत एक प्रश्न विचारत असते, ‘‘मी तुम्हाला ‘दिसते’ आहे ना बाबा?’’ जे वडील मुलीला खरोखर ‘पाहतात’, तिला ‘ऐकतात’, तिला समजून घेतात, तिच्या यशाइतकंच तिच्या अपयशालाही स्वीकारतात, तेव्हा ते तिच्या आत्मसन्मानाचा भक्कम पाया तयार करत असतात. मानसशास्त्रात याला ‘सिक्युअर अटॅचमेंट’ असं म्हटलं आहे.
मुलगी जेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात स्वत:बद्दल अभिमान पाहते, तेव्हा ती स्वत:कडेही तशाच नजरेनं पाहायला शिकते. तिच्या मनात एक विश्वास तयार होतो, ‘‘मी महत्त्वाची आहे. मी प्रेम करण्यास पात्र आहे, माझ्यात काही तरी विशेष आहे, मी इतरांवर विश्वास ठेवू शकते.’’ हा पाया मजबूत असेल तर पुढे आयुष्यातील अनेक वादळं ती अधिक स्थिरतेने पेलू शकते. तिचा स्वत:बद्दलचा हा विश्वासच पुढे तिच्या मैत्रीमध्ये, प्रेमसंबंधांमध्ये, विवाहामध्ये आणि अगदी तिच्या स्वत:च्या पालकत्वामध्येही दिसून येतो.
आपल्या समाजात अनेक वडील मुलींवर प्रेम तर खूप करतात, पण ते व्यक्त करण्यात कमी पडतात. विशेषत: मागच्या पिढीला भावना व्यक्त करायला कोणी शिकवलेलंच नसतं. ते शाळेची फी भरतात, तिच्या लग्नासाठी पैसे साठवतात, तिला सुरक्षित ठेवतात, पण ‘मला तुझा अभिमान आहे,’ हे चार शब्दांचं वाक्य मात्र त्यांना उच्चारता येत नसतं. समुपदेशनात अनेकदा असं दिसतं की, मुलीला वडिलांच्या प्रेमाबद्दल शंका नसते, पण त्या प्रेमाची अनुभूती मात्र तिला नसते. प्रेम आणि प्रेमाची अनुभूती यामध्ये खूप मोठा फरक आहे. ते प्रत्यक्ष जाणवायला हवं.
मुलीच्या भावनेतला ‘पुरुष’
वडील हे मुलीसाठी पुरुषत्वाचा पहिला अनुभव वा उदाहरण वा आदर्श असतात. पुरुष राग कसा व्यक्त करतात? स्त्रियांचा आदर करतात का? मतभेद कसे हाताळतात? घरातल्या जबाबदार्या घेतात का? स्वत:च्या भावना व्यक्त करू शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं सजग मुलींना त्यांच्या घरातच मिळू शकतात. मुलींना अनेकदा सांगितलं जातं, ‘चांगला मुलगा निवड.’ पण चांगला पुरुष असतो तरी कसा हे तिनं कुठे पाहिलेलं असतं? जर तिच्या आयुष्यात, घरातल्या प्रत्येकाला एक समादर ( self- esteem) देणारं, जबाबदार आणि भावनिकदृष्ट्या उपलब्ध असे वडील असतील तर तिच्या मनात नात्याचं एक आदर्श रूप तयार होतं. यामुळेच ती भविष्यात एखाद्या नात्यात अपमान, नियंत्रण, संशय किंवा मानसिक अत्याचार अनुभवत असेल तर तिला ते चुकीचं आहे, हे तुलनेनं लवकर लक्षात येतं.
पिता-कन्येच्या निरोगी नात्याचा पाया केवळ प्रेमात नसतो, तो संवादात असतो. अनेक वडिलांना मुलीसाठी खूप काही करायचं असतं, पण तिच्याशी मोकळेपणानं बोलायचं कसं हे मात्र समजत नाही. मुलीनेही वडिलांना केवळ अधिकाराचं प्रतीक न मानता एक ‘माणूस’ म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. निरोगी नात्यात मुलगी तिचा आनंद, भीती, चुका आणि शंका नि:संकोचपणे मांडू शकते, तर वडील प्रत्येक वेळी उपाय सांगण्याऐवजी प्रथम ऐकून घेतात. ‘‘तू काय म्हणते आहेस हे कळतंय मला’’, ‘‘माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे’’, ‘‘तुझे विचार मला महत्त्वाचे वाटतात’’ किंवा ‘‘चूक झाली तरी मी तुझ्या पाठीशी आहे,’’ अशी वाक्यं मुलीच्या मनात सुरक्षिततेची खोल भावना निर्माण करतात. त्याचप्रमाणे मुलीनंही वडिलांच्या प्रेमाची अभिव्यक्ती नेहमी तिच्या अपेक्षित पद्धतीनेच होईल असं गृहीत न धरता, त्यांच्या कृतींमधून व्यक्त होणारं प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जिथं संवाद मोकळा असतो, तिथं पिढ्यांमधील अंतरही सहजपणे कमी होत जातं.
विशेषत: मुलगी मोठी होत असताना या संवादाचं स्वरूप बदलणं आवश्यक असतं. लहानपणी सूचना देणारे आणि निर्णय घेणारे वडील, तिच्या तारुण्यात आणि प्रौढ वयात संवाद साधणारे, मत विचारणारे आणि तिच्या स्वातंत्र्याचा आदर करणारे सहप्रवासी होणं गरजेचं असतं. अनेक नात्यांमध्ये संघर्ष हा प्रेमाच्या अभावामुळे नसतो, तर एकमेकांना समजून घेण्याच्या अभावामुळे असतो. त्यासाठी मुलीनेही तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांविषयी वडिलांशी संवाद ठेवणं आणि वडिलांनी प्रत्येक मतभेदाला अवज्ञा समजण्याऐवजी तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा भाग म्हणून स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. जेव्हा वडील मुलीचा आवाज ‘ऐकतात’ आणि मुलगी वडिलांच्या अनुभवांचा आदर करते, तेव्हा त्या नात्यात भीतीपेक्षा विश्वास, नियंत्रणापेक्षा आदर आणि अंतरापेक्षा जवळीक अधिक वाढते. आणि कदाचित हाच कोणत्याही निरोगी पिता-कन्या नात्याचा सर्वात सुंदर पाया असतो.
‘मुलगी आणि तिचं स्त्रीत्व’ हा विषय आपण सहसा टाळतो. पण मुलीला ‘स्त्री’ म्हणून स्वत:कडे कसं पाहायचं हे शिकवण्यात वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. लहानपणी बाबांनी तिला फक्त तिच्या दिसण्याचं कौतुक केलं की तिच्या प्रयत्नांचंही कौतुक केलं? तिच्या बुद्धिमत्तेबद्दल आदर व्यक्त केला का? तिच्या मतांना महत्त्व दिलं का? तिला फक्त ‘सुंदर’ म्हटलं की ‘समजूतदार’, ‘विचारी’, ‘संवेदनशील’, ‘संयमी’, ‘हुशार’ असंही म्हटलं? या अनेकदा छोट्या गोष्टी वाटतात. पण मुलीच्या स्व प्रतिमा ( self- image) आणि स्वाभिमान ( self- esteem) यामध्ये त्याचा सातत्याने संचय होत असतो. ज्या मुलीला तिच्या वडिलांकडून प्रोत्साहन आणि आदर मिळतो, तिला पुढे आयुष्यात पती, दीर, सासू, सासरे, अधिकारीवर्ग, सहकारी यांच्याकडून आदराची अपेक्षा ठेवणं सोपं जातं. अशा मुली आत्मविश्वासाने नवीन गोष्टी शिकतात, नेतृत्व स्वीकारतात आणि अपयशाची भीती कमी बाळगतात.
एक न दिसणारी जखम
काही वेळा वडील घरात असतात, पण भावनिकदृष्ट्या अनुपस्थित असतात. ते सतत व्यग्र असतात. कधी व्यसनी किंवा व्यासंगी असतात किंवा कायम टीका करणारे असतात. अशा वेळी मानसशास्त्रामध्ये ज्याला ‘फादर वुंड’ (Father Wound) म्हणतात, अशी एक मानसिक जखम तयार होऊ शकते. ही जखम सतत दिसत नाही. ती कधी कधी इतरांकडून मान्यता (validation)शोधण्यात दिसते. कधी कधी चुकीच्या नात्यांमध्ये वारंवार अडकण्यात दिसते. कधी कधी ‘कोणी सोडून जाईल’ या खोल भीतीमध्ये दिसते. कधी पुरुषांवर विश्वास ठेवण्याच्या असमर्थतेत दिसते. अर्थात हे सर्व केवळ वडील नसल्यामुळेच घडतं असं नाही. व्यक्तिमत्त्व अनेक घटकांनी बनतं, पण वडिलांशी असलेल्या नात्याचा प्रभाव व परिणाम नक्कीच खूप महत्त्वाचा असतो.
वडील नसतील तर आयुष्य अपूर्ण राहतं का? अजिबात नाही! समुपदेशनाच्या माझ्या कामात मला अनेकदा अशा ्त्रिरया भेटल्या आहेत, ज्यांनी लहानपणी वडील गमावले किंवा वडिलांपासून दूर वाढल्या. तरीही त्यांनी अतिशय संतुलित, समृद्ध आणि सुंदर आयुष्य घडवलं. हे कसं काय? कारण त्यांच्या आयुष्यात इतर कोणी तरी होतं. कधी आजोबा, काका, मामा, मोठा भाऊ, शिक्षक, एखादा मार्गदर्शक (मेन्टॉर) किंवा प्रशिक्षक (कोच ) होते. मानवी मनाला एक विश्वासार्ह, प्रेमळ, समजूतदार आणि सातत्यपूर्ण अशा नात्यांची नक्कीच गरज असते. ते नातं केवळ जन्मदात्या वडिलांशीच असलं पाहिजे असं नाही. ही पोकळी कधी कधी राहू शकते, पण ती पोकळी आयुष्यभराचं नुकसान करणारी ठरावी असं मात्र आवश्यक नाही.
मुलगी वडिलांना काय शिकवते?
उद्याच्या पितृदिनाच्या(फादर्स डे) च्या निमित्तानं हाही प्रश्न विचारणंही महत्त्वाचं आहे. आपण नेहमी विचारतो, वडील मुलीसाठी काय करतात? पण मुलगी वडिलांसाठी काय करते? हेसुद्धा महत्त्वाचं आहे. माझ्या अनुभवात, मुलगी पुरुषाच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात कोमल, संवेदनशील, हळवा कोपरा जागृत करते. ती त्याला संयम शिकवते. ती त्याला ‘ऐकायला’ शिकवते. ती त्याला शिकवते की ताकद म्हणजे केवळ कठोरपणा किंवा कर्मठपणा नाही. कधी कधी ताकद म्हणजे आपल्या मुलीच्या भीती, चिंता, आशंका मन:पूर्वक ऐकून घेणं असतं. तिच्या अपयशाच्या दिवशी तिच्याबरोबर राहणं असतं. तिला तिच्या पंखांची जाणीव करून देणं असतं.
प्रत्येक वडिलांसाठी महत्त्वाचं असं काही… तुमची मुलगी लहान असेल तर तिच्याबरोबर भरपूर खेळा. ती किशोरवयीन असेल तर तिच्याशी संवाद कधीही तोडू नका, सतत बोलत राहा. ती त्याहीपेक्षा मोठी झाली असेल तर तिच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी तिच्यावर विश्वास ठेवा. तिला सल्ले कमी द्या, ऐकून अधिक घ्या. तिच्या चुका दुरुस्त करण्यापेक्षा तिच्या धैर्याचं कौतुक करा. तिच्यासाठी ‘हिरो’ होण्याचा प्रयत्न करू नका. तिच्यासाठी ‘सुरक्षित व्यक्ती’ बना. कारण शेवटी मुलींना परिपूर्ण वडील नको असतात. त्यांची उपस्थिती हवी असते. त्यांचं ऐकून घेणारे, त्यांच्या सहवासात असणारे बाबा हवे असतात.
पितृदिनाच्या निमित्तानं मला एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते. आपण मुलांसाठी घर, शिक्षण, पैसा आणि सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी खूप धडपडतो. पण मुलीला तिच्या वडिलांकडून मिळणारी सर्वात मोठी भेट म्हणजे एक अंतर्गत भावना. ‘मी प्रेमास पात्र आहे’, ‘मी आदरास पात्र आहे’, ‘माझं मत महत्त्वाचं आहे’, ‘मी जशी आहे तशी पुरेशी आहे’ ही भावना ज्या मुलीला तिच्या वडिलांकडून मिळते, ती भावना आयुष्यभर तिच्यासोबत राहते आणि कदाचित म्हणूनच, मुलीच्या आयुष्यातील वडील ही केवळ एक व्यक्ती नसते. तो तिच्या मनात आयुष्यभर जपला गेलेला एक खोल अनुभव, एक जाणीव असते.
rajanbhonsle@gmail.com
