उद्याच्या ‘फादर्स डे’निमित्त २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या लाडक्या पित्याच्या, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत, दिव्या साळसकर-पिंपळे आणि वैशाली ओंबळे
‘‘आजवर घडून गेलेल्या घटनांचा, आपल्या वडिलांच्या वागण्या-बोलण्याचा दिव्या नव्याने विचार करते तेव्हा तिच्या मनातली वडिलांची प्रतिमा अधिकच उंचावते. ते नेहमी म्हणत असत, ‘‘मी ‘ट्रिगर फ्रेंडली’ नाही. गोळय़ा चालवणं, त्यांचा शो करणं मला मनापासून आवडत नाही. मी अत्यंत साधासुधा माणूस आहे. पण दहशतवाद्यांना, गुंडांना कंठस्नान घालणं ही काळाची गरज आहे. देशासाठी हे करणं माझं कर्तव्य आहे. तर ते मी करणारच!’’

‘मी मोठी झाले, मला समज आली तोवर डॅड ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ म्हणून प्रसिद्ध झाले होते. सुरुवातीला त्यांच्या एन्काऊंटर्सविषयी पेपरमधून कळायचं तेव्हा मला भीती वाटायची. पण प्रत्येक वेळी ते सहीसलामत परत यायचे. मग पुढे पुढे वाटायला लागलं, वाईटात वाईट काय घडेल? त्यांच्या खांद्याला, हाताला एखादी गोळी चाटून जाईल. बस्स! पण एक दिवस ते येणारच नाहीत, असं मला कधीच वाटलं नाही, पण तो एक दिवस उजाडलाच, २६ नोव्हेंबर २००८! ते रोज रात्री बारानंतर घरी यायचे. त्या दिवशी ते पहिल्यांदा लवकर घरी आले. मी आश्चर्याने त्यांना म्हटलं, ‘डॅड, तुम्ही आणि आता या वेळी घरी?’ ते म्हणाले, ‘होय. मी तुला सरप्राइज द्यायला आलोय.’ मी आनंदाने म्हटलं, ‘‘लवकर आलाच आहात तर आपण लाँग ड्राइव्हवर जाऊ या का?’’ ते चटकन म्हणाले, ‘‘हो जाऊ या की!’’ मी म्हटलं, ‘‘आधी तुम्ही जेवून घ्या. मग आपण निघू. तोवर मी माझ्या खोलीत कॉम्प्युटरवर माझं काम करत बसते.’’ असं म्हणून मी आत गेले. माझं काम आटोपून साडेदहाच्या सुमारास मी खोलीतून बाहेर आले. डॅड कुठे दिसेनात. म्हणून आईला म्हटलं, ‘अगं डॅड कुठे गेले?’’ ती म्हणाली, ‘ते डय़ुटीवर!’ टी.व्ही.वर मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या येत होत्या पण असेल गँगवॉर नेहमीप्रमाणे, असं म्हणून आम्ही टीव्ही बंद केला आणि गेलो झोपायला. रात्री एक वाजता आईचा मोबाइल वाजला. तिची मैत्रीण म्हणाली, ‘स्मिता टीव्ही लाव.’ तेवढय़ात माझाही फोन वाजला. आम्ही टीव्ही लावला आणि टीव्हीवर स्ट्रीप आली. ‘‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर डाइज इन टेरेरिस्ट अॅटॅक!’’ (पुढचे तीन महिने दिवस-रात्र ही स्ट्रीप माझ्या डोळय़ांसमोर सरकत होती.) तोवर आमच्या इमारतीखाली लोक जमा झाले होते. ते घरांत आले तरी माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. मी सतत त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क करत होते. अगदी त्यांची बॉडी घरी येईपर्यंत! आणि मोबाइलवर संदेश येत होता, ‘आपण ज्यांच्याशी संपर्क करू इच्छिता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.’ असं कसं होऊ शकतं? मला घेऊन ‘लाँग ड्राइव्ह’वर निघालेले डॅड एकटेच इतके लांब कसे जाऊ शकतात? अगदी संपर्क क्षेत्राच्याही बाहेर?..
दिव्या! विजय साळसकरांची लेक! काही क्षण स्तब्ध होते. क्षणात स्वत:ला सावरते आणि अत्यंत संयमित सुरात पुन्हा बोलू लागते.. ‘‘ही घटना घडल्यानंतर एकदा कॉलेजमध्ये ट्रान्सस्क्रिप्ट्स घ्यायला गेले होते. तर पैसे कमी पडले. सवयीने मी डॅडचा नंबर फिरवला. बरेच वेळा फिरवला आणि वैतागून म्हटलं, ‘काय हा सतत अनअॅव्हेलेबल येतोय!..’ आणि मग आता ते आयुष्यभर ‘अनअॅव्हेलेबल’ असणार आहेत हे वास्तव तिने स्वीकारलं. आता तर ती आपल्या या बहादूर वडिलांच्या असंख्य स्मृतींचा खजिना तिच्या मनाच्या तळघरांत आहे, त्यांना शब्दबद्ध करतेय. त्यांच्या जन्म दिनी हे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा तिचा मानस आहे. त्यातल्या काही आठवणींना तिने दिलेला उजाळा..
‘विजय साळसकर या एका साध्यासुध्या माणसातून एक बहादूर पोलीस अधिकारी जन्माला आला, त्यासाठी कारणीभूत ठरली एक साधीशी घटना.. एकदा बससाठी काही लहान मुलं एका थांब्यावर उभी होती. बस येताच एका गुंडाने त्या मुलांना ढकलाढकली केली. जवळच उभ्या असलेल्या विजय साळसकरांना ते पाहावलं नाही. त्यांनी त्या गुंडाला बेदम चोप दिला. पुढे त्यांना त्याबद्दल थोडा त्रासच सहन करावा लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, गैरगोष्टींसाठी शासन करण्याचा अधिकार सामान्य नागरिकांपेक्षा पोलिसांना अधिक आहे. तेव्हा समाजात बदल घडवायचा असेल, गैरगोष्टींना पायबंद घालायचा असेल तर ‘गणवेश’ महत्त्वाचा! पैसा, पॉवर, पोझिशनसाठी नव्हे तर ‘पॅशन’ म्हणून पोलीस खात्याचं क्षेत्र त्यांनी निवडलं आणि देशासाठी, दहशतवाद्यांशी मुकाबला करत असताना हौतात्म्य पत्करलं.
गुन्हेगारांसाठी ‘वज्रादपि कठोराणि’ असलेले विजय साळसकर आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीसाठी मात्र ‘मृदूनि कुसुमादपि’ होते. आपल्या वडिलांच्या आठवणी जागवताना दिव्या ते क्षण पुन्हा जगते. तिच्या चेहऱ्यावर बालसुलभ आनंद पसरतो. ती म्हणते, ‘माझे डॅड आणि मी मित्रच होतो. मी कितीही मस्ती केली तरी हात उचलणं सोडा, साधं ओरडणं-रागावणंसुद्धा नाही. आम्हा दोघांना वाचनाची खूप आवड! अर्थात ते मराठी वाचायचे तर मी इंग्रजी! मी लहानपणापासून त्यांना माझ्या आयुष्यातल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीसुद्धा सांगायची. म्हणजे मैत्रिणीशी झालेल्या भांडणापासून ते अगदी मला आवडलेल्या शाळेतल्या एखाद्या मुलापर्यंत! हे सगळं ऐकून डॅडना काय वाटेल, ते काय म्हणतील हा विचारसुद्धा माझ्या मनात यायचा नाही. ते कधीही त्यांची मतं माझ्यावर लादायचे नाहीत. उलट म्हणायचे, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार दूरदृष्टीने केला पाहिजे. आजही कोणतीही गोष्ट करताना मी स्वत:ला पहिला प्रश्न विचारते, ‘‘मी जे करतेय ते त्यांना पटलं असतं? आवडलं असतं? जेव्हा ‘नाही’ हे उत्तर येतं तेव्हा मी ती गोष्ट कधीही करत नाही.’’
चौथीत असताना दिव्याने पहिली कविता आपल्या वडिलांवर केली होती. कारण तिला व्यवस्थित समजलेली, माहीत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे डॅड! त्याच काळांतली ही एक घटना. ‘‘त्या काळात अमर नाईकचं एन्काऊंटर झालं होतं. त्यानंतर आमच्या घरी, गाडीत सुरक्षा वाढवली गेली. आईने शाळेत सक्त सूचना दिली होती की दिव्याला मैदानावरसुद्धा खेळायला पाठवायचं नाही. मी वर्गात एकटी बसून राहायची तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. एकदा मी डॅडना विचारलंच की सगळे खेळतात. मग मीच का नाही जायचं खेळायला? त्यांनी मला जवळ घेतलं आणि शांतपणे म्हटलं, ‘बाळा, थोडे दिवस थांब. सगळं ठीक होईल!’ मी एकदम शांत झाले. डॅड म्हणतात सगळं ठीक होईल म्हणजे नक्कीच तसं होईल! माझ्या बालमनाला तेव्हा विश्वास वाटला आणि वेळोवेळी तो त्यांनी सार्थ ठरवला.’
दिव्याने त्यांचा नंबर ‘कंट्रोल रूम’ या नावावर सेव्ह केला होता. ती कधीही अगदी छोटय़ाशा अडचणीत सापडली तरी लगेच त्यांना फोन करायची आणि ते कामाच्या कितीही व्यापात असले तरी तिचा फोन घ्यायचे. तिला धीर द्यायचे. हा भक्कम विश्वास हीच दिव्याची ताकद होती आणि तिची सुरक्षितता याला विजयजींच्या आयुष्यातला अग्रक्रम होता. आपल्या कामावर किती आणि कसं अलोट प्रेम करावं ते दिव्या त्यांच्याकडून शिकली. तिच्या लहानपणी ते कधी सुट्टीच घेत नसत. अपवाद एकच! दिव्याला बरं नसलं की ते घरी राहत. हळूहळू दिव्या जाणती झाली आणि वडिलांवर रागावू लागली. (पान ३ वरून) रविवारी तुम्ही मला हवेतच, या तिच्या बालहट्टापायी ते घरी राहत व ते सगळे मिळून हॉटेलिंग, एखादा पिक्चर बघायला जात.. दिव्या मनापासून हसते. ‘‘अहो, पिक्चर सुरू झाला की आम्ही थिएटरमध्ये आणि हे बाहेर फोनवर. पिक्चर सुटला की म्हणायचे, ‘दिव्या, पिक्चर काय मस्त होता ना!’’ मी म्हणायची, ‘‘अहो, पण तुम्ही कुठे बघितला पिक्चर!’’ ते फक्त हसायचे. पण कुठल्या बकवास पिक्चरला मला घेऊन आलीस, असं त्यांच्या तोंडून कधीही आलं नाही. मला वाटतं, चित्रपटापेक्षा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं त्यांना अधिक आवडत असावं आणि मला त्यांच्या सहवासात असणं अधिक भावायचं. ते मनाने तरुण आणि उत्साही होते. मी कॉलेजात जायला लागल्यावर आम्ही बापलेक ‘डेट’वर जायचो. मी मोकळी झाल्यावर त्यांना फोन करायची. ते जिथे असतील तिथून यायचे. आम्ही दोघं नव्या नव्या जॉइन्ट्सवर जाऊन मस्त खायचो-प्यायचो. आज मला जाणवतंय, माझं मन राखण्यासाठी त्यांना किती कसरत करावी लागत असेल!’’
विजय साळसकरांचे शिवाजी महाराज दैवत! त्यांनी शिवचरित्र किती तरी वेळा वाचलेले!’ ‘जाणता राजा’चा प्रयोग लागला की ते तिथे हजर! त्यांनी स्वत: महाराष्ट्रातले गडकिल्ले पालथे घातले होते. ‘आडवाटेवरचा महाराष्ट्र’ ही त्यांची गीता होती. ते गडकिल्ल्यांवर जाताना लहानपणापासून दिव्याला बरोबर नेत. आजूबाजूची अनेक प्रेक्षणीय स्थळं आणि समुद्रकिनारे त्यांनी तिला दाखवले. त्यांनी स्वत: विसाव्या वर्षांपासून मुंबई-औरंगाबाद, मुंबई-गोवा, मुंबई-दिल्ली-मुंबई अशा अनेक मोहिमा सायकलवरून केलेल्या होत्या. अशा मोहिमांमध्ये रोज रात्री ते रोजनिशी लिहीत. हे सर्व त्यांनी दिव्याला आवर्जून वाचायला दिलं आणि भोवतालचा परिसर वेगळय़ा प्रकारे पाहण्याची दृष्टी तिला दिली. नकाशावरून नव्या नव्या जागा हुडकून काढण्यात ते पटाईत! महाराष्ट्राच्या अतिदुर्गम जागी नेऊन तिथली वैशिष्टय़ं, निसर्ग मंदिरांचं, राजवाडय़ांचं स्थापत्य याविषयी खूप माहिती ते तिला देत. दिव्याकडे अशा माहितीचं भांडार आहे.
‘‘विशेष म्हणजे त्यांनी मला मार्काचं दडपण कधीच येऊ दिलं नाही. शिक्षणाखेरीज अवांतर गोष्टीत अधिक रस घ्यायला लावला. परदेशी भाषा शिकायला लावल्या. ते नेहमी म्हणत, ‘दिव्या आयुष्य सुंदर आहे. ते खऱ्या अर्थाने जगायचं असतं. स्वत:चं व्यक्तिमत्त्व फुलवायचं असतं. एकीकडे ते दुष्टांचा कर्दनकाळ होते, तर त्याच वेळी ते अत्यंत प्रेमळ पिता होते!
आयुष्यभर त्यांनी एक पथ्य कसोशीने पाळलं. गुन्हे, गुन्हेगार, पोलीस खातं याविषयी त्यांनी आम्हाला कधी अवाक्षर सांगितलं नाही. इतरांप्रमाणे आम्हीसुद्धा त्यांच्या एन्काऊंटर्सविषयी वृत्तपत्रांमधूनच वाचत असू. नेहमी नेहमी असं त्याच्याविषयी वाचून एकदा मी हट्टाने म्हटलं, ‘आज तुम्ही खरं काय ते मला सांगा.’ ते अत्यंत शांतपणे म्हणाले, ‘दिव्या, बाळा तुला वाटतं मी कोणाला मारू शकतो?’ त्यांच्या शांत स्वराने मला आश्वस्त वाटलं, पण त्याच वेळी खूप भय वाटलं. कारण त्यांच्या मनांत नेमकं काय चाललंय हे आम्हाला कधी कळायचंच नाही. असं असलं तरी ते आम्हाला मात्र पूर्ण स्वातंत्र्य देत असत. एकदा मी आणि माझी मैत्रीण ‘बरिस्ता’मध्ये समोरासमोर बसलो होतो. अचानक ती म्हणाली, ‘दिव्या एक माणूस तुला सतत बघतोय,’ मी मागे वळून पाहिलं आणि जोरात ओरडले, ‘हाय डॅड!’ मी त्यांच्याकडे धावले. मैत्रीण गोंधळली. ते हसत म्हणाले, ‘चालू दे तुझं!’ आणि माझं बिल देऊन ते निघून गेले. सार्वजनिक ठिकाणी माझं खासगीपण जपणं त्यांना महत्त्वाचं वाटलं आणि मी मात्र हक्काने त्यांच्यावर, त्यांच्या वेळावर अतिक्रमण करत असे!’’
कदाचित आपल्या कार्यपद्धतीमुळे आपल्याला जीव की प्राण असणाऱ्या लेकीचा जीव एक प्रकारे आपण धोक्यात घालतोय की काय, अशा अज्ञात भीतीपोटी ते तिचं मन मोडू नये याचा कसोशीने प्रयत्न करत. त्याचंच हे बोलकं उदाहरण!
दिव्या असाच एक अनुभव सांगते, ‘‘माझे फ्रेंच क्लासेस बांद्रय़ाला असत. कॉलेज साडेचारला सुटलं की लगेच पाच वाजता मी क्लासला जाई. मधल्या अध्र्या तासात मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून रोज वेगवेगळा नाश्ता ते मागवत तो खाऊन क्लासला पळे. त्यांची फक्त एक सक्त ताकीद होती की येण्यापूर्वी तू मला फोन करायचा. त्याप्रमाणे मी रोज फोन करून जायची. एक दिवस खूप वेळा फोन करूनही त्यांनी घेतला नाही म्हणून मी थेट त्यांच्या कार्यालयात थडकले. ते क्राइम ब्रँचच्या स्पेशल विभागाचं कार्यालय होते. तिथले ते प्रमुख होते. मी पोहोचले तर मोठा लोखंडी दरवाजा बंद! सुरक्षारक्षक नेमका नवीन! मला दरडावून विचारलं, ‘‘कोण पाहिजे तुला?’’ म्हटलं, ‘‘माझे वडील विजय साळसकर!’’ त्याने पटकन मोठ्ठं गेट उघडलं. मी आत पाऊल टाकलं आणि भांबावले. त्या आवारात जवळजवळ शंभर माणसं होती. बुरखा घेतलेल्या मुस्लीम स्त्रियाही होत्या. काही खतरनाक गुंड! मी झटकन दार ढकलून त्यांच्या केबिनमध्ये घुसले. तर तिथे त्यांचं पूर्ण स्क्वाड बसलं होतं. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, पण तरीही त्यांनी खूण केली. पूर्ण केबिन रिकामी झाली. मला म्हणाले, ‘अगं तू आज फोन न करता कशी आलीस?’ म्हटलं, ‘अहो, मी तुम्हाला किती तरी फोन केले.’ त्यांनी मोबाइल पाहिला. ‘सात मिस कॉल! सॉरी! व्हेरी सॉरी!’ मला पोटभर खाऊ-पिऊ घातलं. मी लगेच निघाले. बाहेर आले तर आवारात कोणीही नाही. पूर्ण निर्मनुष्य! आता माझ्या लक्षात येतंय, तिथे सगळे गुंड-गुन्हेगार लोक येत असतील, दिवसभर ते त्यांचं कर्तव्य बजावत असणार! पण तेवढा अर्धा तास ते माझ्यासाठी राखून ठेवत. मोठ्ठा दरवाजा उघडा ठेवून मला आत घेत. पण अशा ठिकाणी तू येऊ नकोस. गुंडांच्या नजरेस पडू नकोस, असं म्हणून त्यांनी मला कधीही अडवलं नाही. पण अशा प्रसंगांमुळे हळूहळू मला त्यांच्या कामाचं खरं स्वरूप कळू लागलं. त्यांचा खूप अभिमान वाटू लागला. माझं एकच शल्य आहे, त्यांनी कुटुंबासाठी फार कमी वेळ दिला. मी त्यांना अफाट काम करताना पाहिलंय. विश्रांती मुळी नाहीच. ते व्यायामाचे कट्टर भोक्ते! एकदा मला म्हणाले, ‘‘गाडीत तुझे चालण्याचे बूट ठेव. अगं, वेळ मिळेल तिथे चालावं माणसाने!’
आजवर घडून गेलेल्या घटनांचा, आपल्या वडिलांच्या वागण्या-बोलण्याचा दिव्या नव्याने विचार करते तेव्हा तिच्या मनांतली वडिलांची प्रतिमा अधिकच उंचावते. ते नेहमी म्हणत असत, ‘‘मी ‘ट्रिगर फ्रेंडली’ नाही. गोळय़ा चालवणं, त्यांचा शो करणं मला मनापासून आवडत नाही. मी अत्यंत साधासुधा माणूस आहे, पण दहशतवाद्यांना, गुंडांना कंठस्नान घालणं ही काळाची गरज आहे. देशासाठी हे करणं माझं कर्तव्य आहे. तर ते मी करणारच!’’
दिव्या म्हणते, ‘‘अनेकदा मला प्रश्न पडतो, डॅडने मला प्रेम, आपुलकी, विश्वास सुरक्षा सगळं काही दिलं. पण मी डॅडना काय दिलं? आज मला वाटतं, देशासाठी कर्तव्य बजावत असताना ते अत्यंत तणावपूर्ण आयुष्य जगत होते, बाहेर असं जगत असताना घरी आले की मात्र मी कितीही मोठी झाले तरी ते मला जवळ घेऊन बसत. खेळत. गप्पागोष्टी करत. मला वाटतं, त्यांच्या तणावग्रस्त मनाला त्यामुळे शांती, आनंद आणि उमेद मिळत असावी! कदाचित म्हणूनच त्यांच्या आयुष्यात माझं स्थान फार मोलाचं होतं.’’
तिच्या मनातला हा विश्वास तिला ‘खूप काही तरी हरवलंय’ या भावनेपेक्षा ‘आपल्याला खूप काही तरी गवसलंय’ या सकारात्मक विचारांच्या दिशेने घेऊन जातो. त्या दिशेने जात असताना अंतर्मुख होत ती भूतकाळातील घटनांचा वेध घेते..
‘‘डॅडना मी सर्वात जास्त’ मिस केलं ते माझ्या लग्नात! माझं लग्न हा त्यांचा सर्वात नावडता विषय होता. तरीही त्यांनी माझं लग्न ‘खास’ केलं असतं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण फिरायला जाऊ, पिक्चरला जाऊ म्हणत अख्खा दिवस मला त्यांच्या आजूबाजूला ठेवलं असतं.’’ आपल्या पित्याचं वेगळेपण जपत दिव्या एक प्रसंग सांगते, ‘‘मी एम.बी.ए. करावं अशी डॅडची इच्छा होती. त्यांच्याच आशीर्वादाने लंडन इथल्या वेस्ट मिनिस्टर विद्यापीठात मला स्कॉलरशिप मिळाली. त्या वेळी मी पदवीदान समारंभासाठी लंडनला गेले होते आणि एका चौकांत माझा मोबाइल फोन चोरीला गेला. आपल्या नंबरचा गैरवापर होऊ नये म्हणून मी तक्रार नोंदवायला स्थानिक पोलीस स्टेशनला गेले. तर तिथला अधिकारी म्हणाला, ‘तुझ्या मोबाइलचा आयएमआय नंबर दे. तरच मी तक्रार नोंदवीन. मी म्हटलं, ‘माझ्याकडे असा नंबर नाही.’ तो म्हणाला, ‘सॉरी. मी तक्रार नोंदवून घेऊ शकत नही. बराच वेळ आर्जव-विनंत्या करूनही तो ऐकेना म्हणून मी उठले. तेवढय़ात तो म्हणाला, ‘तू कुठून आलीस?’
म्हटलं, ‘मुंबईहून!’
‘ओह! अलीकडेच तिथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तू कुठे होतीस? खरंच काय घडलं तिथे!’ मी त्याला सगळं सांगितलं. म्हटलं त्या हल्ल्यात माझे वडील शहीद झालेत. तो ब्रिटिश अधिकारी ताडकन उठला. म्हणाला, ‘सॉरी, मला तुला मदत करायलाच पाहिजे.’ आणि खरंच त्याने मला सर्व प्रकारची मदत केली. आता मला वाटतं, डॅड माझे एकटीचे नाहीत, देशांतल्या अनेक दिव्यांचे पिता आहेत आणि त्यांचा मला अभिमानच वाटतो.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…