– चिन्मयी देऊळगावकर
गेल्या काही दिवसांत आपल्या ‘अन्न व औषध प्रशासना’ने (एफडीए) घातलेल्या धाडींच्या आणि त्यातून अनेक नामांकित कंपन्या, दुकानांचे परवाने स्वच्छतेच्या अभावामुळे रद्द केल्याच्या बातम्या ऐकल्या, पाहिल्या असतील. ‘जिथं कायद्याचं उल्लंघन, तिथं दणका’असा सूर या कारवाईंमागे दिसतो आहे. झुरळं, पाली, माश्या यांचा सुखेनैव संचार आणि अस्वच्छता अनेक आजारांना निमंत्रण देते, हे आपल्याला माहीत असते, परंतु आपण घरी-दारी त्याची काळजी तेवढ्याच जाणीवपूर्वक घेतो का? हा प्रश्न यानिमित्ताने तपासून पाहायला हवा. त्यातच आता पावसाळा सुरू झाला आहे म्हणूनच आपल्या घरचं असो वा बाहेरचं, स्वयंपाकघर हे नेहमीच स्वच्छ हवं… आपल्याचसाठी.
काल एकाच्या घरी गेले होते. गप्पा मारता मारता लक्षात आलं, समोरच्या भिंतींवर दोन पालींचा लपाछपीचा खेळ सुरू झाला आहे. ‘‘ई… काय हे?’’ असं म्हणेपर्यंत समोरचे गृहस्थ म्हणाले, ‘‘अहो ताई, घाबरू नका. आमचं हे रोजचंच आहे. असं समजा, आम्ही या पाली पाळल्या आहेत.’’ एका मैत्रिणीकडे झुरळं सर्रास स्वत:चं घर असल्यासारखी स्वयंपाकघराच्या ओट्यावरून फिरत होती. ‘पेस्ट कंट्रोल’ कधी केलं विचारल्यावर म्हणाली, ‘‘व्हिनेगर स्प्रे केला की झालं ना पेस्ट कंट्रोल’’ आणि तिसर्या घरात तर बिल्डिंगमध्ये शिरतानाच दोन मोठ्या उंदरांनीच स्वागत केलं. अशी आसपासची अनेक उदाहरणं देता येतील. तुम्हीही अनुभवली असतीलच.
काही गोष्टी इतक्या नित्याच्या होतात की, त्या चुकीच्या आहेत हे जाणवतच नाही. आपण रस्त्यावरचे अनेक पदार्थ खातो. तुम्ही पाहिलं असेल एखादा पाणीपुरीवाला पुर्या देऊन झाल्या की हात न धुताच पैसे हाताळतो. त्या नोटांना अन्नाचे कण लागतात. इतक्या वेळा हाताळलेल्या नोटेवरचे जंतू, त्याच्या हातामुळे अन्नात शिरतात. तिथंच भांडी धुणं, मळक्या एकाच कपड्याने सँडविच टेबल आणि सुरी पुसणं, (कधी कधी घामही त्यालाच पुसणं), कचरा आणि कच्चा माल एकत्र ठेवणं, मांसाहारी-शाकाहारी पदार्थांसाठी एकाच भांड्याचा वापर करणं, कचरापेटी उघडी ठेवणं, तंबाखू खाऊन तिथंच थुंकणं, भांडी घाणेरड्या पाण्यात धुणं, उष्टं-खरकटं ताट अथवा भांडी पाण्याने न धुता तशीच ठेवणं, पदार्थ उघडे ठेवणं, कुत्रा-मांजर यांनी खाण्याच्या पदार्थांना तोंड लावणं, अशा अनेक गोष्टी सभोवताली घडतात. आणि सगळं ‘चालायचंच’ या सबबीखाली आपण दुर्लक्ष करायला लागतो. म्हणजेच ज्या व्यक्तीने लहानपणापासून त्याच्या घरी पाल, झुरळं, किडे, माश्या बघितल्या आहेत त्या व्यक्तीला अन्नपदार्थ बनविण्याच्या ठिकाणी असे काही दिसल्यास बहुतांशी गैर वाटत नाही. अशीच बाहेरून घरी आल्यावर आधी हात-पाय धुण्याची आपली सवय तर आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘आरोग्य हेच खरे धन’ या दोन विचारांमध्ये मानवी जीवनाच्या सुख-समृद्धीचं रहस्य दडलेलं आहे. आपल्या संस्कृतीत आणि कायद्यात स्वच्छतेला अतिशय महत्त्व आहे. पूर्वीचे घरातील सोवळे आणि आत्ताचे अन्नप्रक्रिया कारखान्यात प्रवेश करताना असलेले स्वच्छता नियम हे अन्नाला सुरक्षित ठेवण्यासाठी बनवले आहेत. व्यावसायिक अन्नप्रक्रिया कारखान्यात स्वच्छता प्रणाली कशी असावी हे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’( FSSAI) च्या अन्न सुरक्षा आणि मानके नियमन – ‘रजिस्ट्रेशन आणि लायसेन्सिंग’च्या परिशिष्ट ४ मध्ये दिले आहे. मुळात अन्न सुरक्षा प्रणालीचे तीन घटक आहेत.
१. स्वच्छतेचे नियम ( Good Hygiene Practices)
२. अन्न उत्पादनाचे नियम (Good Manufacturing Practices)
३. धोका विश्लेषण व नियंत्रण बिंदू ( Hazard Analysis Critical Control Point )
स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी जेव्हा काटेकोरपणे पाळल्या जातात, तेव्हाच आपण अन्न सुरक्षा प्रणालीची अंमलबजावणी केली आहे, असं म्हणू शकतो.
स्वच्छता हा अन्न सुरक्षिततेचा पाया आहे. कायद्यात कारखाना कुठे असावा, त्याची रचना आणि मांडणी, बांधकाम कसं असावं, कामगार संख्येनुसार किती स्वच्छतागृहं असावीत, भिंती, दरवाजे, खिडक्या, छत, जमीन, हवा, तापमान, प्रकाश किती व कसा असावा इथपासून पिण्याचं पाणी, जलवाहिनी, ॲप्रन-टोपी कशा स्वच्छ ठेवायच्या, कामगारांची किती वेळा कुठल्या आजारांसाठी आरोग्य तपासणी करायची, त्यांची राहण्याची जागा, अन्नपदार्थ बनवणारी भांडी, वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कचरा व्यवस्थापन, कीटक आणि उंदीर नियंत्रण, नखं आणि दागिने किती असावेत अशा अनेक बाबींविषयीचे हे नियम आहेत. प्रत्येक उद्योजकाला परवाना तेव्हाच मिळतो ज्या वेळी तो हे नियम पाळण्याचं प्रतिज्ञापत्र लिहितो. तरीही त्याचं उल्लंघन कसं होतं ते आपण सध्या होत असलेल्या ‘अन्न व औषध प्रशासना’ने ( Food and Drug Administration- FDA) घातलेल्या धाडीच्या अनेक व्हिडीओमध्ये पाहतो आहोत. ‘जिथं कायद्याचं उल्लंघन, तिथं दणका’असा सूर या कारवाईंमागे दिसतो आहे. नागरिकांना अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेबाबत तक्रार करता यावी, यासाठी ‘एफडीए’ने ‘महाराष्ट्र FDA’ ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू केलं असून १८००-२२२-३६५ या विनामूल्य संपर्क क्रमांकावर ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकतात.
मी माझ्या ‘फूड ऑडिटिंग’ (अन्न सुरक्षा, गुणवत्ता आणि मानकांची तपासणी करण्याची पद्धतशीर आणि स्वतंत्र प्रक्रिया)च्या व्यवसायात अगदी लहानातल्या लहान ते बहुराष्ट्रीय अशा हजारो कंपनीचं ‘ऑडिट’ केलं आहे. त्यातला बहुधा ५० टक्के अहवाल हा अस्वच्छतेवर असायचा. कधी कर्मचार्यांना योग्य प्रशिक्षण न दिल्याने, कधी उत्पादकाचा दबाव तर कधी निष्काळजीपणा. अशी त्यामागे कारणं असायची. एका नामांकित तांदळाच्या उद्योग कारखान्यात तांदळावर मांजर सुखेनैव विहार करताना बघितलं, तर दुसर्या कंपनीत अर्धनग्न कामगार पदार्थ हाताळताना दिसले. एका बेकरीमध्ये कच्चा माल उतरवतात तिथं कर्मचारी अंघोळ करत होते. एके ठिकाणी पाण्याच्या टाकीत शेवाळ, चप्पल होती. माळ्यावर भरमसाट कचरा, फुटके बल्ब, काही ठिकाणी उसाबरोबर भरडले जाणारे साप, तर काही ठिकाणी साबणाचा खर्च दिला नसल्यामुळे आठवडाभर न धुतलेले मळकट कपडे घालून वावरणारे कामगार पाहिले. एके ठिकाणी उत्पादकांचा दबाव असल्यामुळे जलवाहिनी वा पाइपलाइन सफाई पाच टप्प्यांऐवजी तीन टप्प्यातच उरकायचे, किंवा वेळच्या वेळी सफाई करतच नव्हते (पण नोंद होती.) पिण्याच्या पाण्याची वाहिनी सांडपाण्याच्या बाजूला, किडे-उंदीर यांनी भरलेली गोदामे, तुंबलेली गटारे, अगदी स्वच्छतेचा ‘स्व’सुद्धा दिसायचा नाही. उंदीर संसर्गजन्य रोगांचा वाहक आहे. लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis), प्लेग, साल्मोनेला संसर्ग यांसारखे आजार त्याच्यामुळे होऊ शकतात. तर झुरळं, माश्या या गटारे, कचर्याचे ढीग आणि इतर असंख्य अस्वच्छ ठिकाणी फिरतात. त्यांच्या शरीरावर आणि विष्ठेमध्ये अनेक जंतू असू शकतात. अन्नावर बसल्यामुळे ते अन्न दूषित होते. अतिसार, अन्नविषबाधा, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका त्यामुळे वाढतो.
ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळावं आणि खाद्य व्यवसायांनी स्वच्छतेचे उच्च मानदंड पाळावेत यासाठी ‘एफएसएसएआय’ने ‘हायजीन रेटिंग प्रणाली’ सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कॅन्टीन, बेकरी, मिठाई दुकानं, फूड कोर्ट्स आणि इतर खाद्य व्यवसायांच्या स्वच्छता व अन्न सुरक्षा पद्धतींचे परीक्षण केलं जातं. मूल्यांकनानंतर संबंधित संस्थेला ‘स्टार रेटिंग’ (गुणांकन) दिलं जातं. जर ग्राहकांनी जेवणासाठी किंवा खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी ठिकाण निवडताना स्वच्छतेच्या गुणांकनाकडे (हायजीन रेटिंग)कडे लक्ष दिलं, तर इतर व्यवसायांनाही सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल.
सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात तर स्वच्छतेची फारच काळजी घ्यावी लागते. अस्वच्छतेमुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरतात. दूषित पाणी, अवतीभोवतीचं चिखल-मातीचं साम्राज्य आणि अस्वच्छ अन्न यांमुळे अतिसार, टायफॉईड, कॉलरा, कावीळ, लिस्टेरियोसिस आणि इतर अनेक रोग उद्भवू शकतात. त्यामुळे स्वच्छता ही रोगांवरील उपचार नसून रोगांपासून बचाव करण्याचं प्रभावी साधन आहे. पिण्याचं पाणी उकळणं (अथवा पाणी शुद्ध करणारं यंत्र वापरणं), उघड्यावरचे पदार्थ न खाणं, परिसरात पाणी साचू न देणं, जेवणापूर्वी साबणाने हात धुणं, शिजवलेलं अन्न खाणं हे लहानपणापासून आपण शिकलो आहे.
‘एफएसएसएआय’ यल्लो बुक – शाळेतील सकस व सुरक्षित आहार याविषयीची ही मार्गदर्शक पुस्तिका आहे. वेगवेगळ्या वयोगटांसाठी तीन पातळींवर ही पुस्तिका लिहिण्यात आली आहे. पहिली पातळी ४ ते ७ वर्षं, दुसरी पातळी ८ ते १२ वर्षं, तिसरी पातळी १३ ते १७ वर्षं (अशी या पुस्तिकेची विभागणी करण्यात आली आहे. त्यात वयोगटानुसार खेळ, उपक्रम, कथा, पोस्टर्स, प्रश्नोत्तरं आणि कृती-आधारित शिक्षणाचा समावेश आहे. पुस्तकातील प्रमुख विषय सुरक्षित अन्न, पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता, अन्नाची स्वच्छ हाताळणी, अन्नभेसळ, पदार्थांवरील लेबल वाचणं, (शारीरिक आणि हालचाल.) हे पुस्तक त्यांच्या संकेतस्थळावरून मोफत डाऊनलोड करू करता येतं. जरी हे ‘यल्लो बुक’ विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं असलं तरी त्यातील अनेक तत्त्वं अन्न उद्योगांसाठीही तितकीच महत्त्वाची आहेत. अन्नापासून होणार्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता आणि त्याचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छता आणि आरोग्य या केवळ मूलभूत मानवी गरजा नाहीत; तर त्या उत्तम आरोग्य, रोग प्रतिबंध आणि समाजाच्या कल्याणाचा पाया आहेत. स्वच्छतेचा संबंध मानसिक आरोग्याशीदेखील आहे. स्वच्छ आणि नीटनेटकं वातावरण मनाला प्रसन्न ठेवतं, तणाव कमी करतं आणि कार्यक्षमता वाढवतं.
खाद्यपदार्थ किंवा एखादी सेवा, उत्पादन खरेदी करताना ग्राहक हा केवळ खरेदीदार नसतो, तर तो गुणवत्ता आणि स्वच्छतेसाठी आग्रही अपेक्षा ठेवणारा सजग नागरिक असावा लागतो. स्वच्छतेची मागणी करणारा हा ग्राहक समाजात सकारात्मक बदल आणतो. ग्राहकांनी खरेदी करत असलेल्या उत्पादनांवरील लेबल, उत्पादनाची तारीख, साठवणूक पद्धती आणि स्वच्छतेशी संबंधित माहिती तपासणं आवश्यक आहे. अन्नपदार्थांच्या बाबतीत स्वच्छ ‘पॅकेजिंग’, सुरक्षित हाताळणी आणि स्वच्छ उत्पादन प्रक्रिया याबाबत प्रश्न विचारणं ही ग्राहकांची जबाबदारी आहे.
आज समाजमाध्यमे आणि डिजिटल माध्यमांमुळे ग्राहकांचा आवाज अधिक प्रभावी झाला आहे. अस्वच्छता आढळल्यास ग्राहक तक्रार नोंदवू शकतात, अभिप्राय देऊ शकतात आणि संबंधित अधिकार्यांचं लक्ष वेधू शकतात. या भीतीमुळे संस्था आणि काही व्यवसाय स्वच्छतेच्या नियमांचे अधिक काटेकोरपणे पालन करतात. पण ग्राहकांनी केवळ तक्रारी करण्यापुरतं मर्यादित न राहता स्वच्छतेला प्रोत्साहन देणार्या व्यवसायांना पाठिंबा देणंही गरजेचे आहे. ‘जागरूक ग्राहक म्हणजे स्वच्छ आणि निरोगी समाजाचा पाया’ हे लक्षात ठेवून प्रत्येकाने स्वच्छतेसाठी आपला आवाज बुलंद करणं आवश्यक आहे. शेवटी इतकंच, ‘‘स्वच्छता ही केवळ सवय नसून आरोग्य, संस्कार आणि सभ्यतेचं प्रतिबिंब आहे.’’
cdeulgaonkar@gmail.com
