स्नेहा अवसरीकर
तरी भीतीला चिकटून दु:ख येतं अन् भीती भयाण होते. प्रेम, माया, स्वप्न, मेहनत, आनंद, उत्साह, उमेद सगळं अनुभवत असतानाही माणूस खचत जातो. सुरक्षित जगण्यातली ही भीती कुणाला दिसत नाही, सांगता येत नाही आणि त्यावर उपायही करता येत नाही.
भीती तशी जगण्याला चिकटूनच आलेली असते. मानवी जगण्यातली ही अत्यंत आदिम भावना. आयुष्याच्या इथवरच्या टप्प्यावर अर्थात मलाही अनेकदा भीती वाटली होती. वाटत राहते, पण भीती जोपर्यंत वाटत असते तोपर्यंतच ती अद्भुत, थरारक असते, तिचा अनुभव फार सीमित असतो.
गेली अनेक वर्षं मला जी भीती वाटत होती ती पुस्तकातून वाचलेल्या, कल्पनेत वसलेल्या गोष्टींची. मन भीतीनं निथळून जावं इतकी गडद भीतीही वाटली अनेकदा. बाईपणातून येणारी असुरक्षित असण्याची भीती तर प्रत्येकीच्या वाट्याला आलेली असतेच. भुता-खेताची, हडळी, नाग, सापांची, घनदाट जंगलांची, उंचीवरून धबाधबा कोसळणाऱ्या पाण्याची… भीती खूप वेळा वाटली. यातून तोपर्यंत एक गोष्ट ठळकपणे जाणवली होती, की निरतिशय सुंदर, देखण्या, अद्भुत गोष्टी बघताना आनंदाचे रोमांच उठतात अन् बरोबर भीतीही निर्माण करतात. जोपर्यंत भीतीला दु:ख लगडून येत नाही तोपर्यंत भीतीही आकर्षक, रोमँटिक ठरते. काळानुरूप तिची तीव्रता कमी होते. काही वेळा तिचं स्वरूपही अगदी तात्कालिक असतं. मात्र कधी कधी भीतीला चिकटून दु:ख येतं अन् भीती भयाण होते…
तुमच्या सुरक्षित जगण्यात एखाद्या हिंस्रा श्वापदासारखी ही भीती सळसळत राहाते. दिसत नाही कुणालाच. सांगताही येत नाही. त्यावर उपायही करता येत नाही. ती आतून आतून तुमच्या निश्चिंत श्वासांवर दबाव आणते. अनिश्चिततेचा!
२००४ मध्ये, एका पावसाळ्यात एका मासिकाच्या कार्यालयातून दूचाकीने घरी परतत होते. छान पाऊस सुरू होता. मला पावसात फिरायला फार आवडायचं. तशीच भिजत निघाले. रस्त्यावर तुरळक गर्दी. पावसाचं पाणी साचत चाललं होतं. पुणे विद्यापीठाच्या रस्त्याच्या बाजूला आले तसा पाऊस थोडा वाढला. मस्त वाटत होतं खरं तर. पावसाच्या गाण्यांनी मन भिजून गेलं होतं. अन् अचानक एके ठिकाणी पाणी साठलेल्या खड्ड्यात गाडी घसरली. मीही पडले. उठताच येईना. नेमकं कुठं लागलंय कळत नव्हतं. आसपासच्या दोन-तीन माणसांच्या मदतीनं कशीबशी रिक्षात बसले. गाडी कुणीतरी तिथंच लावली अन् किल्ली हातात दिली तेव्हा जाणवलं उजवा हात अतोनात दुखतोय. खांदा हलवता येत नाहीए. आणि अंग ठणकायला लागलं आहे. त्याच अवस्थेत ‘हर्डीकर रुग्णालय’ गाठलं. डॉक्टरांनी तपासलं आणि लगेच ‘पेन किलर’चं इंजेक्शन दिलं. पण फरक पडत नव्हता. मस्तकात कळ जाईल इतका दुखत होता हात. त्यांनी थेट शस्त्रक्रियाच करायला सांगितली. खांद्याजवळचं हाड मोडलं होतं. मग सरळ डेक्कनला एका दवाखान्यात गेले. तिथल्या डॉक्टरांना दाखवलं. ते म्हणाले, ‘‘तू सहन करणार असशील तर ऑपरेशनशिवाय हाड जुळेल का ते बघू या, प्रयत्न करू.’’ मी होतेच तेव्हा शूर. त्यामुळे म्हटलं, ‘‘ठीक आहे, करा तुम्ही.’’ त्यांनी अर्धा तास ते सगळे सोपस्कार केले. आणि मी त्या वेदना सहन करत राहिले.
हातावर ‘प्लास्टर’चं ओझं वागवत घरी फोन केला, सगळं सांगितलं आणि रिक्षा करून घरी गेले. दोन दिवस झाल्यावर वेदना काहीशा कमी झाल्या. ‘प्लास्टर’ दीड महिना असणार होतं. मला थोडा त्रास होत होता, पण भीतीचा लवलेश नव्हता. नेमक्या त्या काळात माझ्या सासूबाई आजारी होत्या. मला बघायला माझे आई-बाबा आले आणि त्यांनी घरातली सगळी जबाबदारी घेतली. सगळं मार्गी लागल्यावर थोड्या दिवसांनी बाबा परत निघाले. त्यानंतर दीड महिना सरला. मी पुन्हा डॉक्टरकडे गेले. त्यांनी प्लास्टर काढलं, हातात एक स्लिंग घालून देत म्हणाले, ‘‘सगळं एकदम ठीक आहे. थोडे दिवस व्यायाम कर. बाकी काही गरज नाही.’’ माझा हात मोकळा झाला. त्याच क्षणी बाबांना फोन केला. सगळं सांगितलं. ते म्हणाले, ‘‘आपण बोलू, मी रात्री नऊपर्यंत घरी आलो की.’’ म्हटलं, ‘‘बरं’’.
तेव्हा साधारण सकाळचे १० वाजत आले असतील. मी घरी आले. मोकळा हात केवळ एका स्लिंगने गळ्यात होता. बारीक बारीक काम करत होते. कळत नव्हतं का, पण मन कशातही लागत नव्हतं. एक अनामिक अस्वस्थता दाटून आली होती. साधारण साडेबारा-एकच्या सुमारास सोलापूरहून फोन आला की, बाबांचा अपघात झालाय. मला वाटलं, जसा मला झाला तसाच असणार, पण नंतर खूप फोन सुरू झाले. काय चालू आहे तेच कळेनासं झालं. आई माझ्याकडे होती. तिला घेऊन ये, असा निरोप आला. नवरा ऑफिसमधून घरी आला. गाडी ठरवली. सोलापूरच्या रस्त्याला लागलो तेव्हा प्रचंड पाऊस सुरू झाला होता. अंधारून आल्यासारखं वाटलं. किती काळ… केव्हापासून असाच पडत असावा, इतका सलग मुसळधार पाऊस… त्याची गर्द, गार लय अन् पुढे काय बघावं लागणार याची खोल भीती… प्रवास संपला, गाडी घरासमोर अन् भोवती प्रचंड गर्दी …समजलं होतं, सगळं अशुभ, पण मनापर्यंत पोचत नव्हतं. मी आत गेले तेव्हा नेमके रात्रीचे नऊ वाजले होते. समोर वडील निष्प्राण… पण इतक्या मुसळधार पावसात डोळ्यातून एक थेंबही खाली सरकत नव्हता. घसा कोरडा पडला होता… सुन्नता!
दुसऱ्या दिवशी सकाळीही पाऊस थोडा होताच. अंगणात वडिलांची सायकल होती. सकाळी जाताना घाईघाईनं त्यांनी त्यावर त्यांचे कपडे वाळत घातले होते, ते पूर्ण भिजले होते. माझा चेहराही पावसानं भिजला होता….मला ग्रेस यांची कविता आता कळत होती, ‘दु:खाचा उडला पारा या नितळ उतरणीवरती…’
मला जसा अपघात झाला तसाच त्यांना झाला. खांद्याला लागलं, पण ते गेलेच तत्क्षणी. मला अपघात झाला तेव्हा माझ्या गाडीपासून १०-१५ फुटांवर एक टेम्पो थांबला होता ब्रेक मारत. मी वाचले. हे सगळं जितकं दु:ख देणारं होतं तितकं भीतीदायक होतं… त्यानंतर बरोबर १७व्या दिवशी सासूबाई गेल्या. परत तेच व्यवहार…त्याच रिती… दु:खाची एक थोडी पातळ पाती मन कापत गेली…
दीड एक महिन्यानंतर रेडिओत रात्रीच्या ड्यूटीसाठी गेले. स्टुडिओतला थंड एकांत… रात्री ‘बेला के फूल’ला नकळत गाणं लावलं गेलं, ‘जी चाहे जब हमको आवाज दो…हम है यही …हम है जहा… जीना यहा, मरना यहा, इसके सीवा जाना कहा…’ चार मिनिटं गाण्यात वाहून गेली… बाबांचं आवडतं गाणं…मला पुढची अनाउन्समेंट देता आली नाही… गाणं ‘क्रॉसफेड’ केलं, सलग दुसरं गाणं लावलं… सुटका झाली…
रात्री पावणेबाराच्या सुमारास घराचा जीना चढताना एकदम भीती दाटून आली… अचानक समोर सासूबाई दिसल्या… बापरे! घनघोर भीतीमुळे दु:ख पाठीमागं सरकलं. अंधारातल्या जिन्याच्या ३६ पायऱ्या चढून वर आले. बिछान्यावर पडले. झोप लागेल म्हणेपर्यंत अचानक ‘मॉर्निंग ड्युटी’साठी फोन आला. तशीच पुन्हा स्टुडिओत गेले. सगळं प्रसारण नीट पार पडलं. साडेदहाला बाहेर पडले. ‘लोकमंगल’च्या चौकातून ‘जंगली महाराज रोड’कडे आले. अगदी घराजवळ. रात्री, पहाटे खूप पाऊस पडून गेला होता आणि आता अगदी कोवळं ऊन होतं. तर समोर अचानक एक बेडूक मरून पडलेला दिसला. पावसात कुणाच्या तरी गाडीखाली आला होता. अगदी चेमटून उलटा झाला होता. मला एकदम बाबा आठवले. त्यांना गाडीने धडक दिली होती, खांद्याला म्हणे. ‘तिथलं रक्त वाहून तो भाग असाच उघडा पडला असेल का? कुणीतरी बघेपर्यंत ते निष्प्राण असेच एकटे असतील का?’ भीतीचा शहारा शरीरभर फिरला…
आणि हे सगळं घडत होतं तेव्हा पुण्यात २५० किलोमीटर अंतरावर पुन:पुन्हा एका अनामिक अस्वस्थेने मी ग्रासले होते.आताही मी काय करत होते. मला काहीच कळलं नाही… मला प्रचंड भीती वाटली. रक्त साकळून जावं अशी भीती. सभोवार गाड्या धावत होत्या. त्यांची चाकं मला पाहता येत नव्हती. गरगरत होतं. आपणही असेच अचानक जाऊ शकतो. कुणीही. कुणाचं असणं असं काही खरं नाही. एका क्षणात काहीही होऊ शकतं. ३६०च्या कोनात आयुष्य बदलू शकतं. आणि हे सगळं इतकं असुरक्षित असताना आपण कसे स्वस्थ, निर्धास्त राहू शकतो?…मनात त्या क्षणी आतोनात भीतीनं घर केलं, त्या भीतीचं काय करायचं हे आजही समजलं नाही. आपली माणसं आणि आपणही कुणाचीच जगण्याची काही शाश्वती नाही.
लहानपणी वाटणाऱ्या कितीतरी भीतिदायक प्रसंगांची नंतर गोष्ट होते, ती कुणाकुणाला सांगता येते. तो रोमांच, थरार परत परत अनुभवता येतो. मात्र दु:ख चिकटलेली भीती कुणालाच नीट सांगता येत नाही. ती आपली आपल्यालाच नेमकी कळत नाही. नुसतीच धुमसत राहाते. प्रेम, माया, स्वप्न, मेहनत, आनंद, उत्साह, उमेद सगळं सगळं अनुभवत असतानाही खचत जातो आपण. नकळता अनिश्चिततेची एक खोल दरी भिववत राहाते. मी हतबल असते. या भीतीच्या पायऱ्या ओलांडून थकत जाते. कुठं जायचं असतं सगळं मिळूनही… हीच भावना तुम्हाला सगळ्यापासून दूर नेत राहाते. मग ‘पाडस’मधला ज्योडी आठवतो, त्याच्या शब्दांसह… ‘आयुष्य सुंदर आहे, पण ते सुरळीत मात्र नाही.’
snehhaavasarikkar1@gmail.com