scorecardresearch

Premium

खुदी को कर बुलंद इतना..

इच्छा तिथे मार्ग असतोच, मात्र त्यासाठी स्वत:ला सामर्थ्यवान बनवायला हवं- ‘खुदी को कर बुलंद इतना की हर तक़दीर से पहले, खुदा बंदेसे खुद पुछे बता तेरी रज़ा क्या हैं।’ हे बेहिस्ता खैरुद्दीननं खरं करून दाखवून दिलं आहे.

cha2 Behista Khairuddin
बेहिस्ता खैरुद्दीन

सायली परांजपे

तालिबानी सत्तेच्या भयात राहून जगणं अफगाणी स्त्रियांसाठी किती कुचंबणेचं ठरत असेल, याचे दाखले त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या नवनव्या बंधनांमधून दिसून येतात. पण मुलींच्या शिक्षणावर आणि अर्थातच त्यामुळे प्रगतीवरही बंदी घालणाऱ्या तालिबान्यांना एका २६ वर्षांच्या मुलीनं शह दिला, तो ऑनलाईन माध्यमातून पदव्युत्तर पदवी घेऊन! यात तिला तिचे कुटुंबीय आणि भारतातील ‘आयआयटी मद्रास’ यांचं भक्कम पाठबळ मिळालं असलं, तरी तिचं हे धाडस सर्वानाच प्रेरणा देणारं. इच्छा तिथे मार्ग असतोच, मात्र त्यासाठी स्वत:ला सामर्थ्यवान बनवायला हवं- ‘खुदी को कर बुलंद इतना की हर तक़दीर से पहले, खुदा बंदेसे खुद पुछे बता तेरी रज़ा क्या हैं।’ हे बेहिस्ता खैरुद्दीननं खरं करून दाखवून दिलं आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांनी पुन्हा एकदा बळकावल्याच्या बातम्या सुमारे दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगानं वाचल्या, बघितल्या. १९९० च्या दशकातील तालिबानी राजवटीहून ही राजवट वेगळी असेल, असे दावेही त्या वेळी तालिबानी नेत्यांकडून केले जात होते. मात्र, स्त्रियांबाबतची तालिबानची धोरणं १९९० च्या दशकातील सत्तेदरम्यान होती, तेवढीच पुराणमतवादी आणि अन्यायकारक असल्याचं लवकरच स्पष्ट झालं. पण त्यालाही शह देणारी घटना नुकतीच घडली आहे, तीही एका २६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीकडून.     

  सध्याचं अफगाणिस्तानमधलं चित्र स्त्रियांच्या दृष्टीनं निराशाजनक आहे. स्त्रियांना माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांतून शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली आहे, सार्वजनिक क्षेत्रातल्या त्यांच्या वावरावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत, पोशाखाचे नियम कडक करण्यात आले आहेत, स्त्रियांच्या प्रवासावर निर्बंध आले आहेत, त्यांना नोकऱ्यांतून काढून टाकण्यात आलं आहे, त्यांच्या पगाराचा काही भाग घरबसल्या त्यांना मिळेल, पण बाहेर पडू नये, असा नियम करण्यात आला आहे..    

  अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता हटवली गेल्यानंतरच्या वीस वर्षांत स्त्री शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि एकंदर लिंगसमानतेबाबत जी काही प्रगती साध्य झाली होती, ती पुसून टाकण्याचं काम गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं चाललं आहे. अर्थात, त्यामुळे कितीही कडक नियम केले, तरी स्त्रियांच्या मनातलं शिक्षणाचं, प्रगतीचं स्फुिल्लग विझवून टाकणं मात्र तालिबानला शक्य होणार नाही. स्त्रियांना शिक्षणाचा, कामाचा अधिकार मिळावा, अशी मागणी तर अफगाणिस्तानमध्ये जोर धरून आहेच, पण तालिबानी राजवटीचे नियम झुगारून दूरस्थ पद्धतीनं शिक्षण पूर्ण करण्याची अजोड जिद्द एका २६ वर्षांच्या तरुणीनं दाखवली आहे. या मुलीचं नाव आहे बेहिस्ता खैरुद्दीन.

 भारतातल्या ‘आयआयटी-मद्रास’मधून (चेन्नई) बेहिस्तानं नुकतीच ‘केमिकल इंजिनीअिरग’ची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तालिबानी राजवटीनं स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी आणण्यासाठी कितीही प्रयत्न केले, तरी स्त्रियांच्या मनात जागी असलेली शिक्षणाची आस या प्रयत्नांना पुरून उरू शकते, हे बेहिस्ताच्या उदाहरणातून स्पष्ट दिसून आलं.

बेहिस्तानं अफगाणिस्तानमधल्या जावझान विद्यापीठातून ‘बी-टेक’ पदवी संपादन केली होती. त्यानंतर तिनं ‘आयआयटी मद्रास’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुलाखत दिली होती आणि ती उत्तीर्णही झाली होती. मात्र त्याच दरम्यान अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यामुळे बेहिस्ता उत्तर अफगाणिस्तानमधल्या तिच्या घरातच अडकून पडली. तिच्या शिक्षणावर तर बंदी आली होतीच, शिवाय हालचालींवर, प्रवासावर सर्वच बाबींवर मर्यादा आल्या होत्या. ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद’ अर्थात ‘आयसीसीआर’कडून काही मदत मिळू शकेल, अशी आशा बेहिस्ताला वाटत होती. ही परिषद अफगाणिस्तानमधल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरवते. बेहिस्तालाही या परिषदेची शिष्यवृत्ती मिळणार होती. मात्र, अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे भारत आणि अफगाणिस्तानचे राजनैतिक संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. ‘आयसीसीआर’च्या पोर्टलवरचं बेहिस्ताचं खातंही त्यामुळे निष्क्रिय करण्यात आलं होतं. तरीही तिनं हार मानली नाही. ‘आयआयटी-मद्रास’मधल्या केमिकल इंजिनीअिरग विभागातले प्राध्यापक रघुनाथन रंगास्वामी यांच्याशी तिनं ई-मेलद्वारे संपर्क साधला. आपण प्रवेशासाठी मुलाखत देऊन त्यात उत्तीर्ण झाल्याचं, पण आता शिक्षणात अडथळा निर्माण झाल्याचं त्यांना कळवलं. ‘आयआयटी-मद्रास’तर्फे बेहिस्ताच्या ई-मेलची दखल घेण्यात आली आणि तिला ‘एम-टेक’ अभ्यासक्रमाला प्रवेश आणि शिष्यवृत्तीही देण्यात आली.

अर्थात अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला असला, तरी अध्ययनाची प्रक्रिया निश्चितच सोपी नव्हती. ‘आयआयटी-मद्रास’पासून हजारो किलोमीटर अंतरावर राहून शिकणं बेहिस्ताला भाग होतं. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय भासणारी ही गोष्ट अलीकडच्या काळात ऑनलाइन अध्ययनाच्या सुविधेमुळे शक्य झाली असली, तरी प्रत्यक्ष अध्ययनाच्या तुलनेत शिकण्याच्या या माध्यमाच्याच अनेक अडचणी आहेत. बेहिस्ताला इंटरनेटची सुविधा उपलब्ध असली, तरी ती ज्या भागात राहात होती, त्या भागात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी अस्थिर होती. ‘आयआयटी-मद्रास’मधली तिच्या अभ्यासक्रमाची अध्यापन सत्रं बघण्यासाठी तिला पूर्णवेळ कॉम्प्युटरला चिकटून राहावं लागत होतं. जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, तेव्हा तिचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. केवळ चार-पाच तास झोप घेऊन तिनं हे शिवधनुष्य पेललं. पहिली दोन सेमिस्टर्स तर फारच कठीण गेल्याचं बेहिस्ता माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये म्हणते. मात्र, पुढील दोन सेमिस्टर्समध्ये तिला सूर गवसला आणि तिनं केमिकल इंजिनीअिरगमधला हा एम-टेक अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.

 त्यातही बेहिस्ताच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा, प्रयोगांचा भाग मोठा होता. केवळ वाचन किंवा अमूर्त स्तरावर संकल्पना समजून घेणं पुरेसं नव्हतं. प्रत्यक्ष प्रयोग करावे लागत होते. ‘आयआयटी-मद्रास’मधील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून तसंच इंटरनेटवरील या विषयाशी निगडित साहित्याचा अभ्यास करून बेहिस्तानं घरातच प्रयोगशाळा तयार केली आणि ती अभ्यासक्रमांतल्या विषयांचे प्रयोग या प्रयोगशाळेत करून बघू लागली. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य जमवण्यासाठीही बेहिस्ताला बरेच सायास करावे लागले. मात्र, कुटुंबीयांच्या सहकार्यानं तिनं प्रयोगशाळा स्थापन केली. तिनं घरातल्या ओव्हनसारख्या उपकरणांचा वापर तर प्रयोगांसाठी केलाच, पण स्वत:च्या घरातली आणि शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून उसनी आणलेली काचेची भांडीही तिनं प्रयोगांसाठी वापरली.    

बेहिस्ताला इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान असल्यामुळे ती हे सर्व प्रयत्न करू शकली. हे ज्ञानही तिनं स्वत:हून ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून मिळवलं आहे. तिचं संपूर्ण शिक्षण दरी आणि पश्तो या अफगाण भाषांमधून झालं आहे. बेहिस्ताला हे सर्व करताना कमालीची गुप्तता बाळगावी लागली असणार हे तर अध्याहृतच आहे. मुलींना माध्यमिक शिक्षण घेण्यासही बंदी करणाऱ्या मूलतत्त्ववादी, टोकाचे मागासलेले विचार बाळगणाऱ्या  सत्ताधाऱ्यांना तिच्या या प्रयत्नांबद्दल कळू देऊन चालणारच नव्हतं. अफगाणिस्तानातच राहून सत्ताधाऱ्यांचे अन्यायकारक नियम झुगारत हवं ते शिक्षण घेण्याचं धाडस बेहिस्तानं दाखवलं.

बेहिस्ताच्या कुटुंबात शिक्षणाची परंपरा आहे. तिचे वडील सामाजिक शास्त्रातले पदवीधर आहेत, तर आई डॉक्टर आहे. तिची मोठी बहीण ‘आयआयटी’तून ‘पीएच.डी.’ करत होती, पण तालिबानी राजवटीमुळे तीही अफगाणिस्तानात अडकून पडली आहे. तिच्या दुसऱ्या बहिणीनं कायद्याचं शिक्षण घेतलं आहे, तर भावानं सामाजिक शास्त्रांचं शिक्षण घेतलं आहे. कुटुंबात शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिलं गेलं. त्यात बेहिस्ता सर्वात लहान असल्यामुळे मोठय़ांचे अनुभव तिला उपयोगी पडले. मात्र कुटुंबाच्या प्रोत्साहनाच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधाचं आव्हान अधिक कडवं होतं आणि बेहिस्तानं त्यावर मात केली हे विसरून चालणार नाही.   

बेहिस्ताच्या या यशाबद्दल ‘आयआयटी-मद्रास’मधल्या प्राध्यापकांनी तिची खूप प्रशंसा केली आहे. सुरुवातीला करोना साथीमुळे सर्वच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सत्रं घेतली जात होती. पुढच्या वर्षी अन्य विद्यार्थी कॅम्पसमध्ये जाऊ शकत होते, तेव्हा तालिबान सरकारच्या नियमांमुळे बेहिस्ता प्रत्यक्ष अध्ययनासाठी जाऊ शकली नाही. मात्र, तिची सकारात्मक वृत्ती आणि शिकण्याची ओढ यांमुळे प्राध्यापकांनी तिला ऑनलाइन मार्गानी शक्य ती सर्व मदत केली. सुरुवातीला ऑनलाइन शिक्षण कठीण जात होतं, तेव्हाही प्राध्यापक तिला प्रोत्साहन देत राहिले.  भारतातल्या शिक्षणाचा दर्जा खूपच चांगला असल्याचं बेहिस्तानं अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितलं. अफगाणिस्तानातल्या विद्यापीठात घेतलेलं शिक्षण आणि ‘आयआयटी-मद्रास’मधलं दोन वर्षांचं ऑनलाइन शिक्षण, यांत दर्जाचा मोठा फरक असल्याचं तिनं नमूद केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये या दर्जाचं शिक्षण आलं पाहिजे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. केमिकल इंजिनीअिरगमध्ये एम-टेक केल्यानंतर तिला औद्योगिक क्षेत्रात करिअर करायचं आहे. पण त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही योगदान देण्याचा तिचा मानस आहे.

अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या तालिबानी राजवटीनं पुराणमतवादी व प्रतिगामी धोरणांच्या सहाय्यानं स्त्रियांच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांना दाबून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यावर मात करण्याचं सामथ्र्य अफगाणिस्तानातल्या स्त्रियांमध्ये आहे हे बेहिस्ताच्या दोन वर्षांच्या प्रवासातून दिसून आलं. मूलतत्त्ववादी राजवटीचे नियम झुगारून देण्यात अफगाणिस्तानातल्या जनतेला केव्हा यश मिळेल हे सांगणं कठीण आहे. या प्रश्नाला अनेक राजकीय, सामाजिक पदर आहेत. मात्र, अफगाणिस्तानातच राहून तंत्रज्ञानाच्या मदतीनं, तालिबानी राजवटीचे नियम धाब्यावर बसवत शिक्षण घेण्याचं धाडस बेहिस्तानं दाखवलं आहे. तिचं उदाहरण अनेक अफगाणी तरुणींसाठी प्रेरणादायी नक्की ठरेल.

स्त्रियांचं दमन करणं तालिबान्यांना १९९० च्या दशकात सहज शक्य झालं असलं, तरी आता ते तेवढं सोपं उरलेलं नाही हेही बेहिस्ता खैरुद्दीननं दाखवलेल्या धैर्यामुळे, जिद्दीमुळे स्पष्ट झालं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fear of taliban power live afghani women behista khairuddin education chaturang article ysh

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×