निर्भयता

'खरा विश्वास पानिपतावरच गेला' अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजे खरा विश्वास ठेवण्यालायक जगात कोणीच राहिले नाही, असे आपल्याला म्हणायचे असते. म्हणजे, हे म्हणत असताना आपणही कोणाच्या तरी विश्वासाला कधी तरी तडा दिला आहे याची मनोमन खात्री पटलेली असते. …

‘खरा विश्वास पानिपतावरच गेला’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजे खरा विश्वास ठेवण्यालायक जगात कोणीच राहिले नाही, असे आपल्याला म्हणायचे असते. म्हणजे, हे म्हणत असताना आपणही कोणाच्या तरी विश्वासाला कधी तरी तडा दिला आहे याची मनोमन खात्री पटलेली असते. मात्र लहान मूल केवळ विश्वासावर आपले आयुष्य जगते. आईवर असलेल्या विश्वासाने लहान बाळ पूर्ण निर्भय होते, कारण आई फसवेल ही शंकाच कधी त्याला शिवत नाही. आपण फक्त संदेहातच जगतो. आज बँक बुडेल का, नातेवाईक फसवतील का, रिपोर्ट नक्की नॉर्मल येतील का? एक ना अनेक शंकांनी, भयांनी मन पूर्ण व्यापून टाकलेले असते. संदेहातून निर्भयता कधीच निर्माण होत नाही. यातून फक्त निर्माण होते ती असुरक्षित भावना आणि अभिनिवेश! स्वत:ला परमेश्वरी निर्मितीचाच एक भाग म्हणून कल्पिले तरच भय, शंका निघून जातील, असे आमचे ज्येष्ठ साधक सुरेश सहस्रबुद्धे म्हणतात. वैराग्यास कशाचेच भय राहात नाही.
अर्ध पवनमुक्तासन
आज आपण सुलभ अर्ध पवनमुक्तासन करू या. शयनस्थितीत विश्रांती घ्या. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या बाजूला घ्या. आता एक पाय गुडघ्यात दुमडून गुडघा छातीवर घ्या. हलकेच मान वर उचलून हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. श्वास रोखू नका. चार ते पाच श्वासांनंतर पाय सरळ करा. आता विरुद्ध पायाने हीच कृती करा. मानेचे दुखणे असल्यास मान वर उचलू नका.

संगणकाशी मैत्री : पीडीएफ फाइल कशी तयार करावी ?
आजी, आजोबा आज आपण पीडीएफ फाइल म्हणजे काय? आणि या पीडीएफ फाइलचा नेमका कशासाठी वापर केला जातो त्याची माहिती घेणार आहोत. पीडीएफ म्हणजे Portable Document Format यामुळे कोणतेही डॉक्युमेंट हे इमेजमध्ये बदलले (convert) जाते. कोणतेही महत्त्वाचे डॉक्युमेंट हे पीडीएफमध्ये बदलले की समोरची व्यक्ती त्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करू शकत नाही. तसेच इंग्रजीव्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषेतील लिपी कोणत्याही संगणकावर पीडीएफ फाइलमुळे सहज दिसू शकते.
आता प्रश्न आहे, की पीडीएफ फाइल कशी तयारी करायची आणि कोणत्या प्रकारच्या डॉक्युमेंटचे पीडीएफ करता येऊ शकते. कोणत्याही प्रकारची टाइप केलेली माहिती ही पीडीएफमध्ये बदलता येते. पीडीएफ करण्यासाठी ‘अडोब’ या सॉफ्टवेअरचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. हे सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते, परंतु तात्कालिक वापरा करता तुम्ही संगणकावरून इंटरनेटच्या मदतीने हे सॉफ्टवेअर मोफत डाऊनलोड करू शकता. ‘अडोब’ व्यतिरिक्त इतरही अनेक कंपन्यांनी पीडीएफ कन्व्हर्टर सॉफ्टवेअर बाजारात आणलेली आहेत.
जर तुम्हाला पीडीएफ फाइल फक्त वाचायची असेल तरीही तुमच्या संगणकामध्ये पीडीएफ सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील डॉक्युमेंट ओपन करता येत नाहीत.
पुढच्या भागात आपण पीडीएफ सॉफ्टवेअर कसे डाऊनलोड करावे आणि त्याचा कसा वापर करावा हे शिकणार आहोत.    
संकलन- गीतांजली राणे
rane.geet@gmail.com

खा आनंदाने! :  वैशाखातील गारवा..
‘या वर्षी उन्हाळा जास्तच कडक आहे ना?’ हे दरवर्षीचे वाक्य ऐकायला मिळाले आणि लक्षात आले, बघता बघता चैत्र महिना संपलासुद्धा! उन्हाच्या झळा जाणवू लागल्या म्हणजे वैशाख सुरू झाला की! वैशाख हा मराठी महिन्यांप्रमाणे वर्षांतील दुसरा महिना. घामाच्या धाराच लागतात. जसजसा सूर्य डोक्यावर येऊ लागतो तसतशी तहान तहान होते. आजी-आजोबांचा आहार वयाप्रमाणे आधीच कमी झालेला आणि त्यात उकाडा वाढल्यावर पाणी जास्त लागते, भूक अजून कमी होते आणि मग अशक्तपणा ठरलेलाच. हृदयरोग / किडनीविकारासारखे आजार असतील तर पाण्याचे प्रमाणसुद्धा ठरलेले मग आली का पंचाईत! तर उन्हाळ्याशी मुकाबला करत आपली तब्येत आजी-आजोबांनी कशी सांभाळायची ते समजून घ्यायला हवे. मी लेखांमध्ये जे लिहिते ती सर्वसामान्य आहार माहिती आहे. प्रत्येकाची तब्येत वेगळी असते, त्यामुळे लिहिलेले अमलात आणण्याआधी आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
अशक्तपणा, डोकेदुखी, पायात गोळे येणे, मळमळणे असे त्रास उन्हाळ्यामुळे होऊ  शकतात.
उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहार टीप-
शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे खूप जरुरीचे असते. त्याचबरोबर पाण्यामध्ये तुळस-पुदिनाची पाने / अख्खे जिरे-धने / वाळा / खडीसाखर-चिमूटभर मीठ वगैरे टाकून ठेवू शकतो जे घोट घोट पाणी दिवसभरात पिता येते. चहा / कॉफी / कोल्ड ड्रिंक्ससारखी पेये शरीरातील पाण्याचे प्रमाण अजून कमी करतात.
उन्हाळ्यातील पेये- कोकम सरबत / सोलकढी / पन्हे, गुलाबपाणी / सब्जा किंवा गुलकंद घातलेले थंड दूध / सैंधव-जिरा पावडर घातलेले पातळ ताक / नारळपाणी / एलेक्ट्रॉल पाणी (साखर-लिंबू-मीठ  युक्त)
दिवसभरातील आहार-नमुना –
सकाळी : दुधीचा रस किंवा धने-जिरे पाणी
न्याहारी- १ चमचा गुलकंद + १ कप थंड / कोमट दूध + राजगिरा लाह्या / दलिया शिरा
मधल्या वेळी – १ फळ + वर दिल्यापैकी कोणतेही सरबत + भिजवलेला सुकामेवा – मूठभर
जेवण : किसलेली काकडी + ज्वारी-नाचणी-तांदळाची भाकरी (सातूचे पीठ घालून) + मुगाचे वरण + कमी मसल्याची कोणतीही फळ भाजी + ताक
संध्याकाळी : १ फळ + गूळ घालून केलेले सातूचे पाणी (पानकमसारखे) + साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या ( मेतकूट घालून)
रात्री : लापशी-मूग-भाजी घालून केलेली खिचडी किंवा उकड
झोपताना : सब्जा / गुलाब रस घातलेले दूध
वैदेही अमोघ नवाथे (  आहारतज्ज्ञ)

धडपडे आजी-आजोबा : ९१व्या वर्षी वेटलिफ्टिंगचा विक्रम
से पेर्लिस आजोबांनी वयाच्या ९१व्या वर्षी वेटलिफ्टिंगचा विक्रम केलेला आहे. मुळात वेटलिफ्टिंगसारखा व्यायामाचा क्रीडा प्रकार जिथे तरुणांना करतानाही अत्यंत अवघड समजला जातो, तिथे या ९१ वर्षांच्या आजोबांनी मात्र तो लीलया पेलला आहे. अरिझोना येथे राहणारे हे आजोबा दुसऱ्या महायुद्धाच्या लढाईत सहभागी झाले होते. फिनिक्स येथे झालेल्या राष्ट्रीय बेंच पुश-पुल प्रेस आणि डिड लिफ्ट चॅम्पिअनशिपच्या स्पध्रेत १८७.०२ पौंड इतके वजन उचलून या आजोबांनी हा विक्रम केलेला आहे.
२००५ मध्ये सुद्धा पेर्लिस आजोबांनी १३५ पौंड वजन उचलण्याचा विक्रम केलेला आहे. विशेष म्हणजे वेटलििफ्टग या अवघड अशा क्रीडा प्रकाराची सुरुवात पेर्लिस आजोबांनी वयाच्या ६०व्या वर्षी सुरू  केली. त्यांच्या मते वेटलिफ्टिंगसारख्या अवघड आणि फक्त तरुणांसाठी म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकाराने त्यांना स्वत:ला आजमावण्याची संधी दिली. ज्यामुळे त्यांचा जगण्याचा आत्मविश्वास वाढला आणि आता तर या आजोबांनी स्वत:चाच विक्रम मोडीत काढण्याचा पण केला आहे. बेस्ट ऑफ लक पेर्लिस आजोबा!    

आनंदाची निवृत्ती : रंगीबेरंगी रिबन्सची फुलबाग
हेमा कळके
आज माझे वय ७१ आहे. गेल्या वर्षीपर्यंत मी ३० वर्षे शिवणाचे क्लास घेत असे. शिवण हा माझा आवडता छंद! क्लासेस घेऊन हजारो मुलींना मी शिवणकलेचा वसा दिला. दोन्ही डोळय़ांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्याने डोळय़ांना कमी श्रम होतील, असा काही तरी उद्योग मी शोधत असतानाच माझ्या मैत्रिणीने मला रिबनवर्क केलेला एक ड्रेस दाखविला. त्या भरतकामाचे एखादे पुस्तक मी शोधत असतानाच माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीकडे ‘डू इट युवर सेल्फ’ म्हणजे ‘वाचा आणि शिका’ पद्धतीची रिबनवर्कची पुस्तके होती. ती तिने आणून दिली. त्यातील सूचनांनुसार मी काही नमुने करून पाहिले. पहिल्या प्रयत्नातच छान जमले. माझ्या बहिणीची साठी जवळ येत होती. मी ठरविले की रिबनवर्कची छानशी फ्रेम करून तिला आश्चर्यचकित करायचे. आजपर्यंत मी अनेक कलाकुसरीच्या गोष्टी करते हे सर्वानाच माहीत होते, पण त्यात रिबनचा उल्लेखही नव्हता.
  योगायोगाची गोष्ट म्हणजे माझ्या एका विद्यार्थिनीने रिबनवर्कसाठी खूप रिबन्स घेऊन ठेवल्या होत्या, पण काही कारणाने तिने त्यांचा उपयोगच केला नव्हता. त्या सर्व रिबन्स तिने मला देऊन टाकल्या. रिबनवर्कसाठी लागणाऱ्या सुयाही मला मिळाल्या. रिबनवर्कच्या पुस्तकात एक छानशी फुलांच्या ताटव्याची फ्रेम होती. तीच करायची ठरविली. ‘चुका आणि शिका’ पद्धतीने करत गेले आणि हळूहळू फुलांचा ताटवा साकार झाला. फ्रेम करून बहिणीला दिला आणि सगळय़ांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
आणखी पुस्तके जमवली. वेगवेगळे टाके घालून पाहण्याचा, वेगवेगळय़ा कार्डावर डिझाइन काढण्याचा छंद लागला. मैत्रिणीची पंचाहत्तरी झाली तिला फ्रेम भेट दिली. ज्या बाईंनी मला शिवणकला शिकवली त्यांना एक फ्रेम भेट दिली. भाचीचे लग्न ठरले तिला, भाच्याची पन्नाशी पूर्ण झाली त्याला. अशा भेटी देत गेले. प्रत्येक वेळी टाके वेगळे, रंगसंगती वेगळी, डिझाइन्स वेगळी त्यामुळे रंगांची एक दुनियाच माझ्यासमोर उलगडली. त्यात भर म्हणून कुणीतरी गुगल सर्च करायला सांगितलं. मुलीकडून कॉम्प्युटरचे जुजबी ज्ञान करून घेऊन यू टय़ूबवर १०-१० मिनिटांची प्रात्यक्षिके पाहायला शिकले. त्यामुळे ज्ञानात भर पडली. छोटय़ा-छोटय़ा सूचनांमुळे कामात सफाई आली. तरीही अजून रोज वापरायच्या ड्रेसवर रिबनवर्क केले नव्हते.
एकीचा रिबनवर्क केलेला, खूप वापरलेला ड्रेस पाहण्यात आला. खूपदा धुऊनही रिबन्स फारशा खराब झालेल्या नाहीत हे लक्षात आले. म्हणून मुलीसाठी लगेच काळय़ा कापडावर लाल रिबनचे गुलाब, हिरवी पाने व पांढऱ्या रंगाची कलाकुसर करून सुरेख डिझाइन तयार झाले. तो ड्रेस घातल्यावर तिला हमखास दाद मिळते. त्यामुळे आता ड्रेसवरही रिबनवर्क सुरू झाले. ‘आम्हाला पण करून दे’ अशा फर्माइशीही सुरू आहेत. कमी कष्टामध्ये जास्त आनंद देणाऱ्या या छंदाने माझ्या आयुष्यात रंगीबेरंगी रिबन्सची फुलबागच फुलली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आनंद साधना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fearlessness

Next Story
फिल्मवेडे मॅनोल
ताज्या बातम्या