नीरजा

मृत्यूनंतर जे विधी आपल्याकडे केले जातात त्यातल्या अनेक विधींकडे थोडं सजगपणे पाहिलं आणि विचार केला तरी त्यातली निर्रथकता लक्षात येईल. कधी तरी काशीला गेल्यावर आणलेलं गंगाजल शिंपडल्यावर घर शुद्ध कसं काय होतं?  एखाद्याच्या मृत्यूनंतर लागलेल्या सुतकामुळं त्या घरालाच अस्पृश्य का मानण्यात येतं? ज्या वेळी घरातल्या माणसांना तुमच्या आधाराची गरज असते त्याच दिवशी मुक्काम केला तर पुढचे तेरा दिवस त्याच घरी राहावं लागतं या कल्पनेनं घाबरून मृताच्या कुटुंबाला ज्या वेळी सोबतीची गरज असते त्या दिवशी रात्री त्यांना सोडून सारे  का निघून जातात? आजही नवरा गेलेल्या बाईला सजवून नंतर तिच्या अंगावरचा सारा साज ओरबाडून काढण्यात येतो, बांगडय़ा फोडल्या जातात, ओटी भरली जाते. परंपरा पाळणारे पाळतात आणि माणसांच्या भावनांचा बाजार मांडणारे राजरोसपणे त्याचा फायदा करून घेतात..

जे हे मानत नाहीत ते ‘आऊटसायडर’ ठरतात.

माझ्या वडिलांच्या मृत्यूअगोदर दोन महिने आणि नंतर एक महिना, अशा तीन महिन्यांत आमच्या घरातील मुली-नातवंडाच्या कुटुंबात एकूण पाच मृत्यू झाले. ही सगळी मंडळी पंच्चाहत्तर ते नव्वद या वयोगटातली होती. काही आजारी होते, काही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी आजारांनी त्रस्त होते.

शारीरिक आणि मानसिक व्याधी आपल्या चुकीच्या आहारपद्धतींमुळे तसेच शरीराची व मनाचीही निगा नीट न राखल्यानं होत असतात. कधी त्यातून किंवा कधी वयपरत्वे माणूस मृत्यूच्या दारापर्यंत पोचतोच. प्रत्येक वस्तूची जशी एक ‘एक्सपायरी डेट’ असते तशीच आपलीही असतेच. ‘मरण अटळ आहे.’ असं आपण नेहमीच म्हणत असतो पण ते जवळ आल्यावर मात्र त्याचा स्वीकार करणं प्रत्येकाला जडच जातं. कारण जी माणसं मृत्यू पावतात ती आपल्या सवयीचा आणि आपल्या प्रेमाचा भाग झालेली असतात. पण तरीही मृत्यूनंतर माणसाचं या जगात काहीच राहात नाही याची खात्री असल्यानं आणि पुनर्जन्म वगैरे थोतांडावर विश्वास नसल्यानं माणसांसाठी जे काही करायचं ते तो जिवंत असतानाच असं वाटत असल्यानं आमच्या घरात माझ्या आईच्या आणि बहिणीच्या मृत्यूनंतर कोणतेही विधी न करता मर्तिकाचे विधी करणाऱ्या ब्राह्मणांच्या व्यवसायावर गदा आणण्याचं काम आम्ही केलं होतं. बाबा स्वत: निरीश्वरवादी असल्यानं त्यांच्या अंत्यविधीच्या वेळीही आम्ही ‘प्रेतावर वाहायला हार-फुलं इत्यादी आणू नये आणि अंत्यविधी हाच शेवटचा विधी असणार आहे,’ असं जाहीर केलं होतं. आमचे काही हितचिंतक त्यामुळे अस्वस्थही झाले होते. बाबा गेल्यावर एका महिन्यात आणखी दोन मृत्यू झाले. एकामागोमाग एकूण पाच मृत्यू झाल्याचे यातील काही हितचिंतकांना जेव्हा कळले तेव्हा ते साहजिकच आमच्या दु:खानं हलून गेले. हळवेही झाले. खरं तर बाबा सोडून इतर चारही जणांचे त्यांच्या-त्यांच्या घरी पुढचे तेरा दिवस सारे विधी यथासांग पार पडले होते. तरीही मृत्यूचक्र थांबलं नसल्यानं अस्वस्थ होऊन ‘तुम्ही घराची शांती करून घ्या,’ असा सल्ला आमच्या या हितचिंतकांनी दिला.

त्यांची अस्वस्थता, भय, कळकळ सारं समजत असलं तरी आमच्या या निर्णयामागचा विचार त्यांच्यापर्यंत पोचत का नाही, असा प्रश्न आम्हा सर्वाना पडला. पण असे प्रश्न मनात येणं म्हणजे समाजाच्या नेमून दिलेल्या चौकटीला धक्का लावण्यासारखं असतं. आणि जेव्हा तुम्ही हा धक्का लावता तेव्हा अनेकदा या चौकटीबाहेर फेकले जाता. अल्बर्ट कामू या फ्रेंच कादंबरीकारानं निर्थकवादाची मांडणी करताना ‘डेथ इज इनएव्हिटेबल,’ असं म्हटलं होतं. त्या नियमाप्रमाणे माणसाचं या जगातून निघून जाणं अपरिहार्य असतं असं या श्रद्धाळू माणसांना सांगण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याकडे अत्यंत संशयाने पाहायला लागतात. ‘कोण हा कामू?’ असा भाव चेहऱ्यावर आणत आपल्याला काही बाधा वगैरे झाली की काय असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. आणि मग एक तर आपण त्यांच्या दृष्टीनं वेडे ठरतो किंवा ‘आऊटसायडर’ होतो.

अल्बर्ट कामूची याच नावाची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. ‘स्ट्रेंजर’ आणि ‘आऊटसायडर’ अशा दोन नावांनी ती इंग्रजीत अनुवादित झाली आहे. या कादंबरीचा नायक मेरसॉ हा कामूच्या या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो. कादंबरी सुरू होते ती मेरसॉच्या आईच्या मृत्यूनं. ती बातमी कळल्यावर आलेला मेरसॉ हातातल्या कॉफीचा एक-एक घोट घेत पाहत राहतो एकटक आईच्या प्रेताकडे. ना रडणं ना अश्रूंचा महापूर. मृत्यू अटळ आहे आणि तो येत नाही तोवर निर्थकपणे आपण जगत राहायचं हे सत्य मानणारा, जगण्यातली ही असंबद्धता कोणतीही तक्रार न करता स्वीकारणारा कामूचा हा नायक त्याच्या खासगी आयुष्यात देवधर्म मानत नाही याची कल्पना समाजातील लोकांना नसते. मित्राबरोबर समुद्रावरील एके ठिकाणी सुटी घालवायला आलेला मेरसॉ त्याच्या मित्राच्या भानगडीत अडकत जातो. मित्रांच्या भांडणातून झालेल्या झटापटीत त्याच्या हातून एकावर गोळी घातली जाते. त्याच्या हातून खून झाल्यावर साहजिकच न्यायालयात खटला सुरू होतो. तिथं येणारे सामान्य लोक सुरुवातीला त्याच्या बाजूनं असतात. स्वसंरक्षणासाठी गोळी चालवली म्हणून त्याच्याविषयी वाटणारी सहानुभूती तिथं प्रकटही केली जाते. पण या खटल्यादरम्यान हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागतं की, हा माणूस धर्म मानत नाही, हा देव मानत नाही, हा आईच्या प्रेताजवळ बसून चक्क कॉफी पीत होता. त्याच्याविषयीच्या अशा एक एक गोष्टी बाहेर यायला लागल्यावर मात्र सहानुभूतीची जागा  रागाने घेतली जाते. ‘खून केला म्हणून नाही तर जो धर्म मानत नाही अशा माणसाला शिक्षा  झालीच पाहिजे,’ असा सूर लागतो आणि मेरसॉला शिक्षा होते. ‘धर्माप्रमाणे वागला तर शिक्षा कमी होईल,’ असं सांगितलं गेल्यावरही मेरसॉ त्याच्या विचारावर ठाम असतो. मेरसॉची ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते, कारण ही गोष्ट निर्थक परंपरांच्या मागे उभं न राहाता त्यांना प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात जगण्यातल्या निर्थकतेचा विचार केला गेला. ‘मृत्यू केव्हाही कसाही येऊ शकतो तर आयुष्य जगण्याची धडपड तरी कशाला करा?’ असा विचार काही लोक मांडत होते तर काही ‘मृत्यू येणार तर आहे पण तोवर जे आयुष्य जगणार आहोत ते समृद्ध जगू या,’ असाही विचार मांडत होते. पण सामान्य माणसाला हा साराच त्या काळात उदयाला आलेल्या साम्यवादाचा प्रभाव वाटत होता. तो अनेकांनी नाकारलाच पण हे समृद्ध जगणं म्हणजे काय असणार आहे याचा विचार न करता मृत्यूचं भय खांद्यावर वागवत राहिले हे लोक आणि तो जास्तीतजास्त कसा लांबवता येईल या प्रयत्नात अनेक कर्मकांडात गुंतत गेले. केवळ मृत्यूच नाही तर जगण्यातली अनिश्चितता दूर करण्याच्या प्रयत्नात अंधश्रद्धा जोपासायला लागले. त्याचा फायदा घेऊन जगणं सुसह्य़ कशानं होऊ शकतं हे सांगणारे लोक कुत्र्याच्या छत्रीसारखे सर्व जगभर आणि भारतात तर जागोजागी उगवून आले आणि माणसं त्यांच्या आहारी जायला लागली. प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांच्या याद्या माणसांच्या हाती सोपवल्या गेल्या. त्यात वेगवेगळे विधी, नवस, देवळं, पीर, दग्रे, यज्ञयाग, उपवास, व्रतवैकल्य काय काय जोडलं गेलं. लोक देवदेवतांना वेठीला धरू लागले, मंदिराच्या पायऱ्या झिजवू लागले, बाबा-बापूंच्या नादी लागले. या साऱ्या विधींतली निर्थकता लक्षात न घेता ते विधी करत राहिले.

अगदी मृत्यूनंतर जे विधी केले जातात त्यातल्या अनेक विधींकडे थोडं सजगपणे पाहिलं आणि विचार केला तरी त्यातली निर्थकता लक्षात येईल. माणूस गेल्यावर त्याच्या शरीराचं रूपांतर प्रेतात होतं आणि काही रसायनं, जीवजंतू त्याच्या शरीरातून बाहेर पडतात. घरात होम केल्यानं व नंतर गोमूत्र शिंपडल्यानं जीवजंतू मरत असतील तर मग आपण घर शुद्ध करण्यासाठी तेरा दिवस का थांबतो? कोणत्याही मूत्रानं घर पवित्र कसं काय होतं? कधी तरी काशीला गेल्यावर आणलेलं आणि वर्षांनुवर्ष बाटलीत भरून ठेवलेलं गंगाजल शिंपडल्यावर घर शुद्ध कसं होतं? एखाद्याच्या मृत्यूनंतर लागलेल्या सुतकामुळं त्या घरालाच अस्पृश्य का मानण्यात येतं? देवाशिवाय पान न हलणारे लोक देवाला तेरा दिवस बाजूला का बरं लोटून देतात? ज्या वेळी घरातल्या माणसांना तुमच्या आधाराची गरज असते त्याच दिवशी मुक्काम केला तर पुढचे तेरा दिवस त्याच घरी राहावं लागतं या कल्पनेनं घाबरून मृताच्या कुटुंबाला ज्या वेळी सोबतीची गरज असते त्या दिवशी रात्री त्यांना सोडून सारे गणगोत, अगदी सख्ख्या मुलीही का निघून जातात? ती सगळी दहाव्या-बाराव्या दिवशी आवर्जून का येतात? जन्मभर मृत माणसाच्या इच्छा पुरवताना मागे येणारे हात दहाव्याच्या दिवशी गोडाधोडाच्या पदार्थानी का भरले जातात? आजही नवरा गेलेल्या बाईला नव्या साडीनं, फुलांनी सजवून, बांगडय़ा घालून नंतर तिच्या अंगावरचा सारा साज ओरबाडून काढण्यात येतो, बांगडय़ा फोडल्या जातात, ओटी भरली जाते. पुन्हा हे तिला करायला मिळणार नाही म्हणून ‘शेवटचं सजून घे बाई,’ असं अगदी कळवळून तिच्या आजूबाजूच्या स्त्रियाच तिला सांगतात आणि पुढच्या आयुष्यात सौभाग्याशी निगडित समारंभांतून तिला कायमचं का बाद करतात? हे सर्व करताना त्या नेमकी कोणती परंपरा पाळत असतात? आज काही अपवादात्मक कुटुंबांतून या परंपरा बाद झाल्या असल्या तरी बहुसंख्य घरामध्ये मात्र त्या पाळल्या जातात. त्याचा फायदा माणसांच्या भावनांचा बाजार मांडणारे राजरोसपणे करून घेताहेत.

महानगरांमध्ये तर अलीकडे दहावं-बारावं करताना जे विधी करायला लागतात त्याची पॅकेजेस दिली जातात. जवळ पुरेसा पसा नसलेले आणि असलेले लोक ही पॅकेजेस न विचारता स्वीकारतात. कारण ‘मृत्यूनंतर हिशेब कसला पाहायचा?’ ही भावना असते. माझ्या ओळखीतल्या एकाला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तर डेथ सर्टिफिकेट घेण्यापासून ते पुढचे अंत्यसंस्कार आणि दहावं-बाराव्याचे संस्कार करण्यासाठी लागणारा भटजी आणण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वीस-पंचवीसेक हजारांचं पॅकेजचं दिल्याचं मी अलीकडेच पाहिलंय. मृतदेह घरी आणणाऱ्या अँब्युलन्सवाल्यानंच हे पॅकेज त्याला दिलं होतं.

दुसऱ्या एका मित्राच्या आईनं तर त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतरच्या यज्ञयाग आणि विधींसाठी ब्राह्मणाच्या सांगण्यावरून तीन-चार लाख खर्च केले. ‘उत्पन्नाचं साधन म्हणून या अशा विधींचं स्तोम माजवणाऱ्या पंडिताला पैसे देण्यापेक्षा बाबांनी आयुष्यभर ज्या गोरगरिबांसाठी काम केलं त्यांच्यासाठी खर्च कर,’ असं त्यानं त्याच्या आईला सांगितलं तेव्हा त्याचा त्या पशावर डोळा असल्याचा आरोप करून त्याच्या आईनं त्याचं तोंड बंद करून टाकलं. आपला त्या पशावर डोळा नाही हे सिद्ध करण्यासाठी शेवटी ही अशी कर्मकांडं त्याला सहन करावी लागली. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक घटना महत्त्वाची असतेच. त्याचा जन्म असो, लग्न असो, मृत्यू असो की त्याच्यावर येणारी विविध संकटं असोत. आज जन्म-मृत्यूदरम्यान येणारे सारे सणसमारंभ, पूजाअर्चा, विवाहविधी, त्यानंतरची डोहाळजेवणापासून बारसं, वाढदिवस अशा वेगवेगळ्या विधी, कार्यक्रम करण्याची पॅकेजेस अलीकडे उपलब्ध आहेत. हा व्यवसाय इतका तेजीत आहे, की ब्राह्मणेतर मुलंही याचं प्रशिक्षण घ्यायला लागलीत. माझ्या ओळखीतल्या एका पोळ्या करणाऱ्या बाईंनी त्यांच्या मुलाला कष्टानं इंजिनीअर केलं, पण त्यातून पुरेशा पगाराची नोकरी मिळेना तेव्हा त्यानं पौराहित्याचा कोर्स केला. पाच-सहा वर्षांतच चाळीत राहणाऱ्या त्या मुलानं स्वत:चा फ्लॅट, मोटारसायकलही घेतली आहे.  ग्राहकाची मानसिकता पाहून ज्याप्रमाणे एखादं उत्पादन खपवलं जातं त्याचप्रमाणे त्याचा ‘भावनिक इन्डेक्स’ काढून हा व्यवसायही केला जातो. माणसाच्या मनात जोवर हे भय, ही असुरक्षितता आहे तोवर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पत्रिका, सुतक, नारायण नागबळीसारखा विधी हे सगळंच असणार आहे आणि त्याचा फायदा करून घेणारे लोकही असणार आहेत. तिरुपती, साईबाबा, सिद्धिविनायकांच्या समोरच्या दानपेटय़ाच नाहीत तर कोणत्याही रस्त्यावर अचानक उभ्या राहिलेल्या मंदिरात ठेवलेल्या कटोऱ्यातही सोनंनाणं पडणार आहे. त्या-त्या देवळांचे विश्वस्त नाही तर छोटय़ा देवळांचे मालक श्रीमंत होत राहणार आणि हा भयग्रस्त माणूस अनिश्चिततेच्या रस्त्यावरून वणवण करत फिरणार आहे. जो एखादा याच्याविरोधात बोलेल, जो या निर्थक कर्मकांडाविरोधात आवाज उठवेल, जो हे सारं नाकारेल तो

डॉ. दाभोलकरांसारखा मारला जाणार आहे किंवा कामूच्या मेरसॉसारखा या जगात ‘आऊटसायडर’ होणार आहे.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com