scorecardresearch

Premium

‘..रिश्ते का इल्जाम न दो’

हिंदी चित्रपटांतलं असं चिरकालीन उदाहरण म्हणजे ‘साहिब, बीबी और गुलाम’.

cha1 movie

अरुणा अंतरकर

स्त्री-पुरुषात रूढ अर्थानं ज्या-ज्या प्रकारचे संबंध शक्य आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातलं नातं टिपण्याचा प्रयत्न अपवादानंच बघायला मिळतो. हिंदी चित्रपटांतलं असं चिरकालीन उदाहरण म्हणजे ‘साहिब, बीबी और गुलाम’. आता काळानं सर्वच बाबतीत आधुनिकता आणि खुलेपणा आलेला असतानाही या कथेतल्यासारखं स्त्री-पुरुष मैत्र अजूनही विरळा का मानलं जातं? मनाला स्पर्श करणाऱ्या या नात्यानं या कथेला रसिकांच्या मनात जिवंत ठेवलं. या चित्रपटाला ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या निनावी, परंतु तितक्याच उत्कट नात्याविषयी.

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
wahida rehman
गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?
jigra-aliabhatt
अभिनेत्री अन् निर्माती म्हणून समोर येणार आलिया भट्ट; आगामी ‘जिगरा’ या चित्रपटाची केली घोषणा
rajamouli-made-in-india
‘भारतीय चित्रपटा’चा बायोपिक; एसएस राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा

माणसाला पशूपेक्षा वेगळं ठरवणाऱ्या गोष्टी दोनच: भाषा आणि माणसांची आपापसातली नाती. दोन्ही गोष्टी त्यानंच निर्माण केल्या आणि वाढवल्या. इतक्या, की त्यांचा पसारा बनला आणि त्याचा परिणाम म्हणून नातेसंबंधांमधली गुंतागुंत वाढत गेली.

भारतीय जीवनातल्या एकत्र कुटुंबपद्धतीनं साहित्य आणि चित्रपट यांना ढीगभर नाती पुरवली. आई-बाप अन् मुलगे, भाऊ-भाऊ, इतकंच काय, दीर अन् वहिनी आणि सर्वोच्च म्हणजे दोन पुरुषांमधली घनिष्ठ मैत्री. काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीनं नात्यांचा विस्तार आकसत गेला, सहवास आटत गेला आणि मग प्रामुख्यानं फक्त स्त्री-पुरुष नात्याची आणि मैत्रीचीच चर्चा होत राहिली, कारण त्या संबंधांना निरनिराळे पदर आणि पापुद्रे होते. मैत्री त्या मानानं साधी, सरळ. तिथे सतत एकत्र राहणं नाही,  बंधनं नाहीत आणि सहजीवनाचं भवितव्य ठरवणारे शरीरसंबंधही नाहीत. त्यामुळे ते नातं टिकाऊ ठरलं. स्त्री-पुरुष संबंध, मग ते विवाहातून जुळलेले असोत की नसोत, ते कायम शरीराशी जोडले गेले. तिथे मैत्री या कल्पनेलासुद्धा मज्जाव झाला. साहित्यातून त्यांच्या विविध नात्यांची भावुक आणि आदर्शवादाचा अतिरेक असलेली चित्रणं होत राहिली. त्याकाळात कोणत्याही नात्याचा मुखवटा घालता निखळ मैत्रीभावनेनं वागणाऱ्या स्त्री-पुरुषांचं वास्तववादी, चाकोरीबाहेरचं आणि मनोज्ञ चित्रण करणारी कादंबरी आणि चित्रपट एकच- ‘साहिब, बीबी और गुलाम’ .

 या चित्रपटाच्या निमित्तानं मीनाकुमारी आणि गुरुदत्त पहिल्यांदाच एकत्र आले होते, पण नायक-नायिका म्हणून नाही. या चित्रपटात फक्त नायिकांनाच गाणी होती आणि यात  नायक-नायिकांचं एकही रोमॅन्टिक गाणं नव्हतं. सर्वात मोठा धक्का म्हणजे चित्रपट जिच्याभोवती गुंफलेला आहे, ती ‘छोटी बहू’ चित्रपट सुरू झाला तरी तब्बल तासभर पडद्यावर दिसतच नाही. ५१व्या मिनिटाला तिचं पडद्यावर आगमन होतं. त्यानंतरही जवळपास पाच मिनिटं तिचं दर्शन होत नाही, कारण पहिल्यांदाच तिला भेटायला आलेला भूतनाथ इतका दबून जातो, की तिच्याकडे मान वर करून बघण्याचं धैर्य त्याला होत नाही. हे दृश्य कॅमेरा भूतनाथच्या नजरेतून टिपतो. म्हणून छोटी बहू त्याला दिसत नाही अन् प्रेक्षकांनाही दिसत नाही!

छोटी बहूचा पती या नात्यानं ‘छोटे बाबू’ ऊर्फ ‘साहिब’ हा या चित्रपटाचा नायक असायला हवा. म्हटलं तर तो तसा आहेही, पण इथे तो प्रणयत्रिकोणाचा एक कोन नाही. रंगेल, खुशालचेंडू वगैरे असूनही साहिब हा खलनायक नाही. एका परीनं गुलाम हा नायक आहे, कारण चित्रपट सुरू होतो आणि संपतो, त्या दोन्ही दृश्यांत भूतनाथच दिसतो. संपूर्ण चित्रपटात साहिबला फक्त आठ ते दहा दृश्यं आहेत आणि तेवढय़ातही रहमान स्वत:ची छाप उठवून जातो असा एकाहून एक वैशिष्टय़ांनी संपन्न अशा ‘साहिब, बीबी और गुलाम’चं वेगळेपण साठच्या दशकातल्या प्रेक्षकाला पचलं नाही आणि रुचलंही नाही. त्यानं पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाकडे पाठ फिरवली. परिणामी ‘साहिब, बीबी और गुलाम’ फ्लॉप झाला आणि तोही असातसा नाही, तर ‘सपशेल आपटला’ असं चित्रपंडितांनी घोषित केलं. मात्र आज सर्वागसुंदर चित्रपट, परिपूर्ण चित्रपट म्हणून ‘साहिब, बीबी और गुलाम’ची गणना अभिजात चित्रपटांमध्ये होते. तरीही, व्यावसायिक चौकटीत राहूनही तथाकथित रोमॅन्टिक नायक-नायिकांच्या प्रतिमेला छेद देऊन त्यांनी स्त्री-पुरुषांतल्या अशारीर, तरीही अतूट, उत्कट मैत्रीचं दर्शन घडवणाऱ्या व्यक्तिरेखा दाखवल्या, या फार महत्त्वाच्या पैलूचा कुणी उल्लेख केला नाही याचं सखेदाश्चर्य वाटतं.

‘साहिब, बीबी..’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला यंदा साठ वर्ष पूर्ण झाली. कादंबरी त्याआधी सात-आठ वर्ष लिहिली गेली आणि कादंबरीची पार्श्वभूमी स्वातंत्र्यपूर्व भारतातली. हे लक्षात घेता, या कादंबरीतल्या व्यक्तिरेखा जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या जगातल्या म्हणाव्या लागतील. स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता हे विषय दूरच राहिले. नीती-अनीतीच्या कल्पनांमुळे जेव्हा पती-पत्नीदेखील एकमेकांशी फारसं बोलत नव्हते, त्या काळात स्त्री-पुरुष मैत्रीचं असं दर्शन घडावं, हे खरं धैर्य आहे. या कादंबरीवरून निघालेला त्याच नावाचा हा चित्रपट म्हणजे दीर्घकाव्यच!

या चित्रपटात छोटी बहूचा पती आणि दीर यांच्या रूपानं अरेरावी सरंजामशाही दिसते आणि भूतनाथच्या रूपानं रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेला, सुशिक्षित, तरीही दबलेला तरुण दिसतो. त्याला ‘मोहिनी सिंदूर’ कारखान्यात नोकरी मिळते. सुखरूप, सद्गुणी पत्नी असूनही रंगेलपणातच मर्दुमकी मानणारा छोटे बाबूसारखा खुशालचेंडूही यात दिसतो. घरातल्या स्त्रियांनी चार भिंतीआड राहून सोंगटय़ा खेळण्यात आणि दागिने मोडण्या-घडवण्यात वेळ घालवून स्त्रीधर्म पाळावा अशी अपेक्षा करणारेही दिसतात. याच पार्श्वभूमीवर या सधन व गर्भश्रीमंत घरांमध्ये वावरणाऱ्या जबा आणि छोटी बहू यांच्यासारख्या आचारविचारांनी स्वतंत्र, मानी आणि स्वावलंबी असणाऱ्या स्त्रियाही आढळतात. या दोन्ही स्त्रिया भूतनाथच्या जीवनात येतात आणि त्यावर प्रभाव टाकतात. जबा ही त्याच्या नोकरीदात्याची मुलगी आणि त्याची भावी पत्नी. उच्च व सुधारक घरातली ही तरुणी सुशिक्षित आहे. ती घर तर उत्तम चालवतेच, पण वडिलांच्या अनुपस्थितीत ‘मोहिनी सिंदूर’चं कामही करते. काहीशी फटकळ आहे. पुरुषांसमोर वावरताना बिचकत नाही. गरीब स्वभावाच्या भूतनाथला तर ती नेहमीच धारेवर धरते. पण बालपणी त्याच्याशीच आपला विवाह झाला होता, हे समजल्यावर तो संबंध पुन्हा जुळवण्यात पुढाकार घेते.

छोटी बहूला जबाप्रमाणे स्वातंत्र्य नाही. ती बडय़ा घरची सून आहे, पत्नी आहे. तिच्या हातात काडीची सत्ता नाही आणि पतीच्या जीवनात तिचं महत्त्व नाही, जागा नाही. ‘चाँद में भी दाग हैं, लेकिन छोटी बहू में नहीं’ अशी तिच्या सौंदर्याची कीर्ती आहे. तिलाही आपल्या घरंदाज, निष्कलंक सौंदर्याची जाणीव आहे, पण त्याचा तोरा अथवा गर्व नाही. उलट हे ऐश्वर्य जवळ असूनही पतीचा सहवास, प्रेम लाभत नाही, याची तिला खंत आहे आणि चीडदेखील. एरवी ती अतिशय शांत, सालस असली, तरी वेळ येताच तीही ज्योती ज्वाला बनते. स्त्रीसुलभ चातुर्यानं ती ‘पत्नीला वेळ देणं हे पतीचं कर्तव्य आहे’ याची हळुवार स्वरात आठवण देत राहते. घराण्याची मानमर्यादा सांभाळत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती प्रथम ‘मोहिनी सिंदूर’ या वशीकरण साधनाची मदत घेते. तो इलाज निष्फळ ठरताच ती पतीला सरळच विचारते, ‘तू बाहेर जाऊ नकोस म्हणून मी काय करू सांग. मी वाटेल ते करायला तयार आहे!’ आणि त्याची मर्जी राखण्यासाठी ती त्याच्याबरोबर दारू प्यायलाही तयार होते. ‘मोहिनी सिंदूर’ आणि मदिरेपैकी एकही गोष्ट मिळवण्यासाठी ती घराचा उंबरा ओलांडायला मात्र मोकळी नाही.ती ‘मोहिनी सिंदूर’च्या कारखान्यात काम करणाऱ्या भूतनाथला बोलवून घेते. शंभर वर्षांपूर्वी, एका अपरिचित पुरुषाला आपल्या अंत:पुरात आणि तेही रात्रीच्या वेळी बोलावून घेणं हा खरं तर आगीशीच खेळ म्हणायचा. पण तोही ती करते. त्यात त्याच्याकडे तो सिंदूर मागणं, म्हणजे आपल्या मोडक्या संसाराची लाज चव्हाटय़ावर मांडणं! पण हेही ती चतुराईनं जमवते. ही पहिली मुलाखत दोघांसाठीही खडतर असते. परस्त्री आणि त्यातूनही एखाद्या श्रीमंत घरातल्या स्त्रीकडे जाताना तोही दडपून जातो. प्रत्यक्षात मात्र भलतंच घडतं. ती एकाच वाक्यात त्याचं मन, त्याचा विश्वास जिंकते. ‘भूतनाथ’ हे त्याचं विचित्र नाव ऐकताच माणसं हसतात, हा त्याचा नेहमीचा अनुभव. छोटी बहू मात्र म्हणते, ‘भूतनाथ.. किती सुंदर नाव! मी याच नावानं तुला हाक मारीन. हे तर देवाचं नाव आहे.’ तिच्या नजरेतल्या आणि स्वरातल्या चांदण्यात तो भिजून जातो. त्याचा संकोच मावळतो. भूतनाथ छोटी बहूला जबाबद्दल सारं काही सांगून टाकतो. तिचं तिखट बोलणं, टोमणे, तरीही ती त्याला आवडणं.. सगळं काही! आणि मग खजिल होऊन म्हणतो, ‘मला भानच राहिलं नाही. तुमच्याशी जुनी ओळख असल्यासारखं मी बडबडत सुटलो!’ तिलाही त्याचा भाबडेपणा भावतो. छोटी बहू आणि भूतनाथ यांच्या मनाच्या तारा जुळाव्यात असा काहीच समान धागा त्यांच्यात नाही. आर्थिक, सामाजिक असं मोठं अंतर आहे. तरीही त्यांच्यात जवळीक निर्माण होते. पतीला रिझवण्यासाठी जेव्हा तिला दारूची गरज पडते, तेव्हा खालच्या मानेनं ती त्याची मदत घेते. अगदी शेवटी आजारी पतीकरता एका साधूचा अंगारा आणण्यासाठी अपरात्री बाहेर जावं लागतं, तेव्हाही छोटी बहू भूतनाथची सोबत घेते. ज्या पतीचं प्रेम मिळवण्याकरिता ती जीव टाकत असते, त्याच्याबरोबर तिच्या जीवनाची अखेर होत नाही. ती होते भूतनाथच्या संगतीत! दोघांमधली जवळीक वाढते, तेव्हा ती दोघं भांडूही लागतात. पतीचं प्रेम मिळवण्यासाठी तिच्या ओठांना लागलेला ‘एकच प्याला’ काळमिठी ठरतो. तिच्या नकळत ती व्यसनाधीन होते. हे बघणारा, म्हणजे न बघवणारा भूतनाथ तिला फैलावर घेताना तिची लाज काढायला कमी करत नाही. तेव्हा तीही आवाज चढवून त्याला विचारते, ‘तू कोण लागून गेलास रे? मी पिणारच. बघू तू काय करतोस!’

 पुन्हा ती त्याला अशाच अवस्थेत भेटते, तेव्हा तो तिला खडसावतो, ‘मी आता तुला एक थेंब पिऊ देणार नाही!’ आणि बोलता बोलता तो तिच्या हातातला ग्लास काढून घ्यायला पाहतो. अभावितपणे त्या क्षणी त्याच्या हाताचा पुसटसा स्पर्श तिच्या हाताला होतो आणि ती बिजलीसारखी कडाडते, ‘तुझी ही हिम्मत?, तू मला, एका परस्त्रीला शिवलास? आताच्या आता चालता हो!’ नशेच्या धुंदीतही तिचं पावित्र्याचं भान कायम असतं. तिचा पती काही दिवसांच्या सहवासानंतर पुन्हा ‘त्या’ ठिकाणी जातो, तेव्हा त्याच्यावरही ती चवताळलेल्या वाघिणीसारखी तुटून पडते.

 भूतनाथचे आणि छोटी बहूचे छोटे-मोठे झगडे होतच राहतात, पण दोघांपैकी कोणीच ते मनात ठेवत नाही. जबावर भूतनाथचं मनापासून प्रेम आहे. पण त्याचा जीव तुटतो छोटी बहूसाठी हे जबाला टोचत राहतं. तिच्या छोटय़ा छोटय़ा तक्रारींतून भूतनाथचं छोटी बहूवरचं अपरंपार प्रेम जाणवत राहतं.

एकदा इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात भूतनाथ जखमी होतो आणि बरेच दिवस बेशुद्ध असतो. त्या अवस्थेत तो सतत छोटी बहूचं नाव घेत राहतो. ते नंतर त्याला सांगून अस्वस्थ सुरात जबा त्याला विचारत राहते, ‘कोण आहे ही छोटी बहू? ती तुझी कोण लागते?’ आणि स्त्रीसुलभ असूयेनं जबा विचारते, ‘ती सुंदर आहे का?’ तेव्हा तिला काय वाटेल याची पर्वा न करता भूतनाथ प्रांजळपणे सांगतो, ‘हाँ.. सुंदर चीज की कल्पना की जा सकती हैं, पर हमारी छोटी बहू उससेभी परे हैं..’

‘मोहिनी सिंदूर’चा छोटी बहूला उपयोग झाला नाही, हे कळताच भूतनाथ ती नोकरी सोडून देतो. त्याच्याजवळ थोडेफार पैसे साठतात, तेही सांभाळण्याची जबाबदारी तो छोटी बहूवर सोपवतो. तिच्या व्यसनात त्या पैशांची वाट लागते त्याबद्दल तो अक्षरानं विचारत नाही. छोटी बहूदेखील तो जखमी होतो तेव्हा धोका पत्करून त्याला आपल्या अंत:पुरामधल्या गुप्त खोलीत ठेवून त्याच्यावर उपचार करवते. शेवटी, छोटी बहू भूतनाथबरोबर साधूचा अंगारा आणायला जाते, ती जिवंत परत येत नाही.  तिचं काय झालं हे कुणालाही कळत नाही. पुढे आर्किटेक्ट झालेला भूतनाथ पडझड झालेल्या त्या भग्न हवेलीची पुन्हा बांधणी करायला येतो, तेव्हा एका जागी खोदताना मजुरांना एक सांगाडा सापडतो. तो छोटी बहूचा आहे, हे भूतनाथ त्या सांगाडय़ाच्या हातातल्या कडय़ावरून ओळखतो. कुणालाही न दिसलेली छोटी बहू या अवस्थेत का होईना, पण भूतनाथलाच दिसते, ही गोष्ट महत्त्वाची. त्यांच्यातल्या अकृत्रिम व निर्मळ प्रेमानं दिलेली देणगी म्हणजे हे अखेरचं दर्शन!

भूतनाथ आणि छोटी बहू यांच्यातला हा विलक्षण ऋणानुबंध आपण प्रेक्षक म्हणून डोळय़ांत साठवतो. भूतनाथ व जबा यांच्यातल्या तरुण प्रेमाचं दर्शन आल्हाददायक, पण भूतनाथ व छोटी बहू यांच्यातल्या स्नेहाचं दर्शन उदात्त आहे.

या प्रेमाला आणि न्यायाला काय म्हणायचं? ते शब्दात पकडता येत नाही. हातून निसटतं. त्या दोघांची भेट होते, तेव्हा तेव्हा छोटी बहू ही दोनच वाक्यं आळीपाळीनं म्हणते, ‘तू मला समजून घेतोस, तसं कुणालाही जमत नाही.’ आणि ‘माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे.’  गर्भश्रीमंत घराण्यातली ती सौंदर्यशालिनी ही वाक्यं आपल्या साताजन्मांच्या जोडीदारालाही म्हणत नाही. त्याच्यावर नितांत प्रेम असून! मग एका खेडवळ माणसाला ती हे का म्हणते? गडगंज श्रीमंत पती ती गळय़ातला दागिना म्हणून जपत होती, पण तिच्या डोळय़ातले अश्रू मात्र याच्याच खांद्यावर वाहात होते का? शेवटच्या भेटीत ती त्याला टेकून बसल्यासारखी वाटते. आपल्या सर्व वेदना, दु:ख, गुपितं यांचा भार तिनं हक्कानं त्याच्या अंगावर टाकला होता का?

आणि यालाच प्रेम म्हणायचं का?..

कोण जाणे! याचं उत्तर म्हटलं तर गुलजारनं केव्हाच देऊन ठेवलं आहे-

 ‘प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम ना दो

हाथ से छूके इसे रिश्ते का इल्जाम न दो’

फक्त प्रेम म्हणजे काय, असा प्रश्न पडला, की छोटी बहू आणि भूतनाथ यांचं नाव घ्यावं, इतकंच..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Female man relationships hindi film the sahib biwi aur gulam ysh

First published on: 24-12-2022 at 00:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×