छाया दातार

देवकी जैन. ज्या काळात देशातल्या व्यापक सामाजिक धोरणांत स्त्रीच्या अस्तित्वाच्या जाणिवेचं प्रतिबिंब दिसू लागलं नव्हतं, अशा काळातल्या एक मोठय़ा अर्थतज्ज्ञ. भारतीय स्त्रीवादी अर्थशास्त्रविचारांची पायाभरणी करण्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. देवकी यांचं मराठीत अनुवादित झालेलं आत्मचरित्र वाचताना त्यांचे हे प्रयत्न प्रेरणेनं भारून टाकतात आणि त्याच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या बंडखोरीचाही जागोजागी प्रत्यय येतो.. 

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ देवकी जैन यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी लिहिलेलं आत्मचरित्र ‘दि ब्रास नोटबुक’ (अलीकडेच प्रसिद्ध झालेला मराठी अनुवाद- ‘पितळी नोंदवही’) नुकतंच वाचनात आलं. या निमित्तानं या वर्षी नव्वदीत पदार्पण केलेल्या देवकी यांच्याविषयी सगळय़ांना आणखी माहिती असायला हवी, असं मनापासून वाटलं. अतिशय बहुपेडी व्यक्तिमत्त्व त्यांना लाभलं आणि तशाच बहुपेडी संधी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांना मिळाल्या. त्या संधी न दवडता त्यातून आपली अर्थविषयक कारकीर्द तर त्यांनी फुलवलीच, पण स्त्रियांना आर्थिक विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतिशय स्तुत्य आहेत. अशा या तुलनेनं अपरिचित राहिलेल्या तपस्विनीची ही थोडक्यात ओळख!

२००६ मध्ये देवकी यांना ‘सामाजिक न्याय आणि स्त्रियांचं सक्षमीकरण’ या क्षेत्रातल्या कार्यासाठी ‘पद्मभूषण’ बहुमान मिळाला. आपल्या आत्मचरित्रात त्या त्यांचा हा ‘अर्थ’प्रवास मांडताना त्यांची शिक्षणाची ओढ, संधी आणि त्यात त्यांना गवसलेला स्त्रीवाद अतिशय समरसतेनं समोर ठेवतात. त्याच वेळी अगदी बिनधास्त आणि बंडखोर आविर्भावात, ‘ऑक्सफर्ड’मध्ये शिकत असताना तरुणपणीच्या अवखळ आसक्तीमुळे वाटलेली स्पर्शाची ओढ, घेतलेले धोकादायक अनुभव, वगैरे गोष्टींचाही प्रांजळ उल्लेख करतात.

या पुस्तकातली आणखी एक नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यांचा लक्ष्मीचंद जैन या निष्ठावान गांधीवादी विचारवंताशी झालेला विवाह. खरं म्हणजे त्यांच्यापेक्षा लक्ष्मीचंद हे वयानं खूप मोठे; देवकींचे गुरू. त्या या लग्नाचं वर्णन ‘आमचा विजोड विवाह’ असंच करतात. एका संशोधन प्रकल्पाचे ते प्रमुख आणि देवकी त्याच्या क्षेत्रभेटीसाठी नेमलेल्या चमूमधल्या एक; पण जैन यांच्या प्रेमात पडल्यावर देवकींनी मागेपुढे न पाहता त्यांचं लक्ष वेधून घेतलं. इतकं की, जैन त्यांचं ठरत असलेलं लग्न मोडण्यास प्रवृत्त झाले. देवकींनी या विचारवंताला प्रेमाचे धडे देत त्यांच्याबरोबर आयुष्याचा करार केला. हा व्रतस्थ माणूस त्याचं चारित्र्य आणि ज्ञान या दोन स्तंभांच्या आधारे स्वातंत्र्योत्तर काळातील देशउभारणीचं काम करत उच्चपदस्थ अधिकारपदं भूषवत राहिला. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सहवासात जैन सतत होते. देवकींनाही जैन यांच्या सर्जनशील सहजीवनाचा फायदा आयुष्यभर मिळाला हे त्या मान्य करतात.

देवकी यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज् ट्रस्ट, नवी दिल्ली’ स्थापन केली. १९७५ मध्ये त्यांनी ‘इंडियन विमेन’ हे पुस्तक संपादित केलं. ते वर्ष संयुक्त राष्ट्रांनी ‘स्त्री वर्ष’ म्हणून जाहीर केलं होतं. त्यानिमित्तानं भारतातही शासनाच्या वतीनं ‘टूवर्डस् इक्वालिटी’ हा अहवाल जाहीर झाला होता. सर्वप्रथमच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं प्रमाण, पुरुषांशी तुलनात्मकदृष्टय़ा किती आहे हे तपासलं गेलं होतं. देवकी जैन याही या अभ्यासात सहभागी होत्या. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या जीवनावर आणि अभ्यासावर चांगलाच प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये समानता, लोकशाही विकेंद्रीकरण, जनताकेंद्री विकास आणि स्त्रियांचे अधिकार, अशा विषयांचा परामर्श घेतलेला आढळतो.

देवकी जगभरातल्या अनेक नेटवर्क्‍स आणि फोरम्समध्ये सहभागी होत्या. संयुक्त राष्ट्रांमधल्या आशिया-पॅसिफिक सेंटरसाठी सल्लागार समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. ज्युलियस न्यरेरे या ‘युनो’च्या अध्यक्षांबरोबर त्यांनी आफ्रिकी देशांतील अनेक पुढाऱ्यांबरोबर चर्चा करून मुख्यत: स्त्रियांच्या प्रश्नांवर त्यांना मार्गदर्शन केलं. १९९७ मध्ये ‘युनो’च्या ‘ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट ऑन पॉव्हर्टी’ या विषयाबाबत स्थापन केलेल्या समितीत देवकी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. १९७५ मध्ये जाहीर झालेल्या स्त्री वर्षांनंतर दर दहा वर्षांनी जागतिक पातळीवर स्त्रियांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परिषद घेतली जाईल असं ठरलं होतं. याचा फायदा घेऊन १९८५ मध्ये नैरोबी येथे होणाऱ्या परिषदेत मांडणी करण्याच्या उद्देशानं तिसऱ्या जगातल्या स्त्रियांनी एकत्र येऊन आपल्या जगातील स्त्रियांसाठी कोणत्या प्रकारची धोरणं योग्य होतील याचा विचार करावा, म्हणून देवकींनी काही स्त्रियांसह बंगळूरु इथे एक बैठक बोलावली. त्यातून पुढे, ‘नव्या युगाच्या स्त्रीसाठी विकास पर्याय’ (‘डॉन’- डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज् विथ विमेन फॉर ए न्यू ईरा) हे व्यासपीठ तयार झालं. या ‘डॉन’नं नैरोबी इथे पाच पॅनेल्स सादर केली. एका बाजूला गरीब स्त्रियांची परिस्थिती आणि दुसरीकडे त्यांच्या देशातली ढोबळ आर्थिक आणि राजकीय चौकट ही कशी यासाठी कारणीभूत आहे, तसंच अन्न, कर्ज, सैनिकीकरण, धार्मिक मूलतत्त्ववाद याविषयीच्या समस्यांचे स्त्रियांवर होणारे परिणाम त्यांनी विशद केले. या सुमारास जागतिकीकरणाचं वारं जोरात वाहत होतं. त्यातल्या त्रुटींना विरोध करण्यासाठी ‘डॉन’ या व्यासपीठाचा चांगला उपयोग झाला. 

विवाहानंतर काही काळ देवकी यांनी मिरांडा कॉलेजमध्ये नोकरी केली. मुलं लहान होती आणि विशिष्ट पद्धतीनंच त्यांना वाढवण्याचा देवकींचा आग्रह होता. त्यापायी त्यांनी घरी बसणं पसंत केलं; परंतु पूर्णवेळ गृहिणी राहणं त्यांना जमण्याजोगं नव्हतं. नंतर त्यांची फिरती सुरू झाली. ‘माझ्या पायाला चाकं आहेत, असंच सर्व जण लहानपणापासून म्हणत असत,’ असं देवकी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात. याचं एक कारण म्हैसूर संस्थानात त्यांचे वडील अतिशय उच्च दर्जाच्या अधिकारपदावर होते. वडिलांना प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी बग्गीमधून फिरावं लागे. लहान देवकीही त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह धरत. हीच आवड त्यांना पुढेही उपयोगी पडली. देवकी यांनी इतर काही सहकाऱ्यांबरोबर स्त्रिया काय काय आणि कोणत्या प्रकारची कामं करतात याचा शोध भारतभर वेगवेगळय़ा व्यवसायांत काम करणाऱ्या स्त्रियांना भेटून, क्वचित वेळा त्या ठिकाणी राहूनसुद्धा घेतला आणि एक महत्त्वाचा सिद्धांत त्यांना मांडता आला. आतापर्यंत कोणतंही शासकीय कार्यक्रम, धोरणं ही कुटुंब हे एकेरी- ‘एकात्मक एकक’ आहे या गृहीत तत्त्वावर अवलंबून असत. त्यामध्ये धोका असा होता, की कुटुंबांतर्गत कामं सर्व जण समानतेनं करतात आणि त्यांना समान पद्धतीनं अन्नाचं वाटप होतं असं गृहीत होतं; पण अन्नाचं दुर्भिक्ष जिथे आहे, तिथे अन्नाचं वाटप क्रमानं होतं. पुरुष आणि मुलग्यांना ते प्राधान्यानं वाढलं जातं. त्यानंतर घरातल्या स्त्रिया आणि मुलींचा क्रम लागतो. कधी कधी तर मुलींना अन्नच उरत नसे. घरातल्या बाया या त्यांचे पती, मुलगे, भाऊ यांच्या तुलनेत कायमच अर्धपोटी, कुपोषित राहतात असं दिसून आलं. असमानतेत अधिक असमानता, अन्यायामध्ये अन्याय आणि दारिद्रय़ातील खोलवरचं दारिद्रय़, असं त्याचं स्वरूप होतं.

या संशोधनाचा फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर कौटुंबिक पातळीवरील अन्नसुरक्षेचं पर्यायी सूत्रीकरण अन्नसुरक्षेच्या परिभाषेत केलं जावं, अशी विनंती करता आली. यातला प्रमुख वाटा देवकी यांचा. यामुळे ‘स्त्रीवादी अर्थशास्त्रज्ञ’ असा शिक्का त्यांच्यावर बसला. माझी वैयक्तिक ओळख देवकी जैन यांच्याशी झाली, ती १९८६ ते १९८८ या दोन वर्षांत मी त्यांनी स्थापन केलेल्या ‘आय.एस.एस.टी.’ (इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज ट्रस्ट) या संस्थेसाठी महाराष्ट्रातल्या रोजगार हमी योजनेचा अभ्यास केला, त्या वेळी अभ्यासाचा ‘फोकस’ होता ‘रोजगार हमी योजनेतून होणारं स्त्रियांचं सक्षमीकरण’. मी १९७४-७५ च्या दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागात जाऊन फारसं काम केलेलं नव्हतं; परंतु त्यानंतर झालेला हा परिशीलनाचा अभ्यास मला बरंच काही शिकवून गेला. रोजगार हमी योजनेच्या कामावर स्त्रियांची संख्या जास्त असते असं दिसून येत होतं. पुरुष मंडळी शहराकडे जाऊन काम मिळवू शकत होती, पण स्त्रियांना ते शक्य नसे. चार पैसे हातात खेळवता येणं आता शक्य झालं होतं. हे काम गटानं करता येत असे, त्यासाठी जोडप्याची गरज नसे. त्यामुळे विधवा, परित्यक्ता स्त्रियांनाही काम मिळू शके. एक गोष्ट मात्र दिसून आली, की सर्वाना- स्त्री-पुरुषांना समान वेतन हे या कामाचं वैशिष्टय़ सांगितलं जायचं, ते मात्र घडत नव्हतं. खणण्याचं काम पुरुष करत असे आणि खणलेली माती, दगड डोक्यावरून वाहून नेण्याचं काम स्त्रिया करत. वेतनवाटप करताना खणलेल्या खड्डय़ाचं मोजमाप घेऊन गटाला पैसे दिले जात. बहुधा पुरुषाच्या हाती पैसे येत आणि खणण्याचे पैसे कापून उरलेले स्त्रियांमध्ये वाटले जात. तिथला कारकून मात्र एकूण वाटप झालेला पैसा त्या गटातल्या कामगारांच्या संख्येनं भागून प्रत्येकाच्या नावापुढे लिहीत असे आणि बाई न बघता सही करत असे. त्यामुळे कागदपत्रांवर समान वेतन दिसलं, तरी प्रत्यक्ष स्त्री व पुरुषाच्या हातामध्ये आलेलं वेतन वेगवेगळं असे. अर्थात हे स्त्रियाही चालवून घेत असत. पुरुषाच्या दंडशक्तीला महत्त्व दिलं जाई. बाईच्या मान मोडून आणि कंबर कसून केलेल्या कामाला कमी लेखणं संस्कृतीनं शिकवलेलं होतंच. देवकी जैन यांनी या माझ्या अहवालाचं कौतुक केलं होतं.

 त्याच काळात देवकी यांनी काही संशोधकांना बरोबर घेऊन ग्रामीण भागातल्या कुटुंबांमध्ये एकूण किती तास काम केलं जातं याचा हिशोब काढायचा प्रयत्न चालवला होता. शहरातल्या गृहिणीचं काम हे बिनमोबदल्याचं असतं आणि म्हणून तिची किंमत समाजाच्या दृष्टीनं कमी असते. दोन्ही अर्थानी- आर्थिक आणि मानसिकरीत्याही; पण ग्रामीण भागात केवळ स्वयंपाक आणि कपडे धुणं एवढंच काम स्त्री करत नसून लाकूडफाटा गोळा करणं, गाईसाठी चारा आणणं, दूध काढणं, पिण्याचं पाणी लांबून आणणं, हे एका अर्थानं उत्पादक काम असतं, तेही तिला करावं लागतं. शेतकऱ्याच्या शेतात कौटुंबिक मजूर म्हणूनही ती काम करते. या कामाचं मूल्य पैशांच्या स्वरूपात करता येणं शक्य आहे असं संशोधकांच्या लक्षात येत होतं. त्यांनी त्या वेळी दर दिवशी किती तास कोणतं काम कुणी केलं याचे हिशोब काढायला सुरुवात केली आणि दाखवून दिलं, की स्त्रीच्या कामाचे तास पुरुषाच्या कामाच्या तासांपेक्षा किती तरी जास्त आहेत. मुलंही काही तास काम करतात. यावरून प्रत्येक प्रकारच्या कामाला किती उष्मांक (कॅलरीज) खर्च होतात याचाही हिशोब काढता येतो आणि मग पुरुषाला वेतन जास्त, कारण त्याच्या कामात जास्त उष्मांक खर्च होतात हे नेहमीचं गृहीत प्रश्नांकित करावं लागतं. स्त्रियांचे दिवसभराचे तास जास्त खर्च होतात आणि त्यात विविध प्रकारच्या कामांसाठी खर्च केलेल्या उष्मांकांची बेरीज केली, तर ती पुरुषानं खर्च केलेल्या उष्मांकांपेक्षा निश्चित जास्त भरते. असं असून तिला मात्र वेतन कमी दिलं जातं. रोजगार हमी योजनेचं वेतन ठरवण्यासाठी नवरा, बायको आणि तीन मुलं अशा पाच माणसांच्या कुटुंबाला लागणाऱ्या उष्मांकाचा हिशोब करून त्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची किंमत काढली जाते आणि तेवढं रोजी वेतन निश्चित केलं जातं. या प्रकारची धोरणं ठरवताना किती सूक्ष्म विचार करायला हवा आणि तो अभ्यासपूर्ण रीतीनं केला जाऊ शकतो, याची ओळख देवकी यांनी सुरू केलेल्या कामातून देशाला पटली.        

देवकी सांगतात, की ग्लोरिया स्टायनॅम या अमेरिकी स्त्रीवादी कार्यकर्तीशी त्यांची ओळख झाली होती १९५८ मध्ये. १९७१ मध्ये ‘टाइम’ मासिकाच्या कव्हरवर ग्लोरिया यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता आणि त्यावर ‘मिस’ (ट२.) असं लिहिलेलं होतं. ही कल्पना वाऱ्यासारखी पसरली. त्याचा अर्थ होता, की स्त्रीच्या अस्तित्वाचा उद्घोष हा स्वत:च्या संदर्भात असेल. पुरुष किंवा विवाहाच्या संदर्भात नव्हे. ग्लोरियांनी त्या वेळी ‘ ट२’ मासिक चालू केलं होतं. त्यानंतरची एक अभूतपूर्व आठवण देवकी करून देतात. पुन्हा एकदा त्या न्यूयॉर्कला गेल्या होत्या, त्या वेळी ‘द कलर पर्पल’ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित नाटकाचा प्रयोग तिथे होता. या पुस्तकाची लेखिका अ‍ॅलिस वॉकर, ग्लोरिया स्टायनॅम आणि ऑप्रा विन्फ्रे यांच्याबरोबर देवकींना तो प्रयोग पाहण्याची संधी मिळाली होती. (‘द कलर पर्पल’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर पाहायला मिळतो. ‘एका कृष्णवर्णीय स्त्रीचं आत्मचरित्रात्मक पुस्तक’ अशी या पुस्तकाची ओळख आहे.) ही आठवण देवकी आपुलकीनं आपल्या जीवनपटात नोंदवतात.

देवकी यांच्या आत्मचरित्राला नोबेलप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची प्रस्तावना लाभली आहे; पण म्हणून हे आत्मचरित्र केवळ अर्थशास्त्राचे सिद्धान्त मांडत असेल, असा समज करून घ्यायची गरज नाही. अर्थशास्त्राची आवड असल्यामुळे देवकीला इंग्लंडला कसं जायला मिळालं, तिथल्या मोकळय़ा वातावरणामुळे तारुण्यात कुतूहल असणारे विविध प्रकारचे पुरुषी स्पर्श अनुभवताना त्या कशा सामोऱ्या गेल्या, याचं वर्णन त्या न बुजता करतात. विशेषत: जुन्या वळणाच्या तमिळी ब्राह्मण कुटुंबात वाढलेल्या असताना हे सर्व त्यांना कसं नवं होतं, हवंहवंसं वाटणारं होतं, हे आवर्जून सांगतात. अलका गरुड यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘पितळी नोंदवही’ (प्रकाशक- ग्रंथाली) या पुस्तकामध्ये याचं शीर्षकही ‘स्पर्श’ असंच आहे. त्यातली दोन छोटी प्रकरणं ‘छुपे धोके, गुप्त सुखे’ आणि ‘अलिखित निर्बंध मोडताना’ अशी आहेत. या बुद्धिमान स्त्रीनं आयुष्याला अनेक परिमाणं असतात याचं भान ठेवून महत्त्वाचे टप्पे सांगताना याही टप्प्यावरच्या घटना वेधकपणे सांगण्याचं धारिष्टय़ कसं दाखवलं हे मला महत्त्वाचं वाटतं.

भारतीय स्त्रीवादी अर्थशास्त्र विचारांची पायाभरणी करणाऱ्या देवकी जैन यांचं कार्य या सर्वच गोष्टींसाठी महत्त्वाचं आणि प्रेरणादायीच!