ह्य़ांना, सासुबाईंना काय वाटेल? जावेची समजूत कशी घालू? म्हणून दु:खाचे कढ आतल्या आत दाबत होते, गिळत, जिरवत होते. असं वाटायचं, मला आता वेड लागेल. मरण येईल तर बरे. धरणीने खरंच पोटात घ्यावं आता. या नि अशा नकारात्मक विचारांनी अक्षरश: पछाडले होते मी. पण माझ्याही आयुष्यात एक टर्निग पॉइंट आला..  
ती  माझ्या गळ्यात पडून स्फुंदून स्फुंदून रडत होती. म्हणाली, ‘तुम्ही नसता भेटलात तर मी वेडी तरी झाले असते, नाहीतर जिवाचे काही बरे-वाईट तरी करून घेतले असते. आता मी शांत झाली आहे.’ कृतज्ञता, समाधान तिच्या डोळ्यातून ओसंडत होतं. तिच्या अशा वागण्या-बोलण्यामुळे मन नकळतपणे आठवांच्या झुल्याने भूतकाळात उतरले.. फार दूर नाही, बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा तिच्या जागी मी होते, अगदी अशाच मन:स्थितीत कृतज्ञ होऊन आनंदाश्रू ढाळणारी..
माझ्या माहेरच्या तुलनेत सासरचं कुटुंब लहानच होतं. हे मिळून तिघे भाऊ  नि सासुसासरे. सासू, सासरे नि एक दीर एकत्र एका गावी राहत होते, तर लहान दीर नि आम्ही दुसऱ्या गावी एकत्र आपापल्या पोटापाण्याच्या उद्योगाच्या निमित्ताने स्थिरावलेलो होतो. सगळेच आपापल्या कामात, व्यवसायात उत्तम रीतीने स्थिरस्थावर. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंब. समाजात आदर्श नि कौतुकास पात्र ठरत होतो. पण अचानक एक वादळ आलं आणि सगळी उलथापालथ झाली. दिरांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते गेले. ते नात्याने जरी माझे दीर होते तरी त्यापेक्षाही ते माझे खूप छान मित्र होते. गप्पागोष्टी, चर्चा, हास्यविनोदही खूप चालायचा आमच्यात. आमचे हे खूप संतापी, त्यामुळे काही मागायचे असल्यास दीर पाठीशी उभे राहायचे. जाऊ  माझ्याहून लहान. तिला समजवायचे तरी काय अन् कसे?
दीर नागरी अभियंता असल्याने त्यांचे व्यवहार तोंडी किंवा साध्या वहीवर लिहिलेले. आजपर्यंत कधी कुणाकडे काहीही न मागणारे माझे पती आणि दुसरे दीर वहीवरच्या नोंदीनुसार हिशेबाच्या देवाणघेवाणीसाठी घरोघर जात होते. पण अनेकांनी हात झटकले. मतलबी जगाशी ओळख झाली. तरुण विधवा सून डोळ्यापुढे पाहून सासऱ्यांनी हाय खाल्ली. अवघ्या आठ महिन्यांतच माझे पितृतुल्य सासरेही गेले. घरात हे सर्वात मोठे. त्यामुळे जबाबदारीच्या ओझ्याने नि पाठोपाठ कोसळलेल्या दु:खामुळे यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. कधीही दु:खाशी ओळख नसलेल्या मला जणू दु:खाच्या खाईत कुणी लोटून दिले होते. ह्य़ांना, सासुबाईंना काय वाटेल? जावेची समजूत कशी घालू? म्हणून दु:खाचे कढ आतल्या आत दाबत होते, गिळत- जिरवत होते. असं वाटायचं, मला आता वेड लागेल. हे मतलबी जग खोटं, फसवं आहे. नको या असल्या फसव्या दुनियेत राहणं. मरण येईल तर बरे. धरणीने खरंच पोटात घ्यावं आता. या नि अशा  विचारांनी अक्षरश: पछाडले होते मी. त्या बिकट काळात माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाखातर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा कोर्स केला..
अन् माझं आयुष्य खरंच बदलून गेलं. विशेषत: सुदर्शन क्रिया. त्याचा अनुभव वेगळाच होता. कल्पनातीत होता. हळूहळू मला शांतता मिळत गेली. मन एकाग्र व्हायला लागलं. हृदयात एक अनाम शांती आणि आनंदाचा उत्सव अगदी एकाच वेळी उचंबळत होते. नकारात्मकतेतून मी सकारात्मकतेत कधी शिरले हे माझे मलाच कळलं नाही. त्यामुळेच मी जेव्हा ध्यानातून जागृत अवस्थेत आले तेव्हाच मनाशी ठरवून टाकलं, की ही ‘सुदर्शन क्रिया’ मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला हवी. जगात खूप लोक दु:खी-कष्टी आहेत, त्यांना सावरायला हवं. सुदर्शन क्रिया मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वत:च मग ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची शिक्षिका झाले. आनंद पेरण्याचा वसा मी घेतलाय. श्री श्री रविशंकर यांच्या सुदर्शन क्रियेद्वारा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये जीवनाला दिशा मिळाली. जीवन जगायचं ध्येय सापडलं.
 ‘..हं! ही नवी सुरुवात आहे आयुष्याची. आता थांबायचं नाही. निडरपणे आणि हिमतीने अगदी हसतहसत जीवनाला सामोरं जायचं..’ मी तिला थोपटत सांगत होते आणि माझ्या गुरूंबद्दल, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये आणणाऱ्या मैत्रिणीबद्दल, या मार्गात मला भेटलेल्या प्रत्येकाबद्दल आणि हे सुंदर जीवन देणाऱ्या नियतीबद्दल आणखी आणखी कृतकृत्य होत होते, कृतज्ञ होत होते.