पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी बक्षिसं आणि कमी मानधन… देशासाठी पदके मिळवण्याचे स्वप्न बघताना नवोदित स्त्री खेळाडूंच्या हातात असते ती अनिश्चित आर्थिक प्राप्ती; पण निश्चित खर्चाची मोठी यादी… कठोर सराव करताना खर्चाचं पारडं जड होऊ न देणं, हे शिवधनुष्य पेलण्याएवढंच कठीण असतं! क्रीडा क्षेत्रातली ही अनिश्चितता वेळीच ओळखून स्त्री खेळाडूंना याच क्षेत्राशी निगडित जोडपर्यायाचे मार्ग शोधावेच लागतात… कधी कुणाचंं उत्पन्नाचं पारडं जड असतं, तर कधी खेळ सराव, स्पर्धांनी हे पारडं हलकं होऊन जातं; पण तरीही त्या खेळातलं आपलं नैपुण्य सिद्ध करत राहतात हे विशेष…

१९९३ मध्ये ब्रिटनमधल्या बुद्धिबळ स्पर्धांना गेले असताना घडलेली गोष्ट. स्कॉटलंड येथील एक स्पर्धा संपवून दुसर्‍या स्पर्धेसाठी आम्ही लंडनला आलो. दोन स्पर्धांमधले काही दिवस मोकळे होते. मी, माझे ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ विजेते पती रघुनंदन गोखले आणि ‘छत्रपती पुरस्कार’ विजेते खेळाडू जयंत गोखले लंडनला एका सदनिकेत भाड्याने राहात होतो.  सरावातून विरंगुळा म्हणून आम्ही फिरायला बाहेर पडलो असताना आमच्या सदनिकेत चोरी झाली आणि  आमच्याकडील सर्व रोख रक्कम चोरांनी लंपास केली. कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी आम्ही ‘शेरलॉक होम्स संग्रहालय’ बघायला गेलो होतो. त्या प्रसंगी मला प्रकर्षाने वाटलं, की त्या काल्पनिक गुप्तहेराने आत्ता अवतार घेऊन चोरांना पकडून द्यावं! पण; वास्तवातील लंडनचे सुप्रसिद्ध पोलीस ‘बॉबी’सुद्धा चोरांना पकडू शकले नाहीत. असा अचानक बसलेला मोठा आर्थिक फटका आम्हाला सोसावा लागला. मध्यंतरी स्पेनच्या सिटजेस येथील स्पर्धेदरम्यान अनेक भारतीय बुद्धिबळ खेळाडूंना चोरीच्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. सतत देशी-विदेशी स्पर्धा खेळताना खेळाडूंना अनेक प्रकारे जोखीम पत्करावी लागते. कधीकधी अगदी अपरिहार्य कारणाने स्पर्धेचं वेळापत्रक, जागा बदलते किंवा अनपेक्षित गोष्टी घडतात. या महिन्यात भारतीय बॅडमिंटनची ‘फुलराणी’ सिंधू हिला युद्धजन्य परिस्थितीमुळे एका प्रतिष्ठित स्पर्धेला मुकावं लागलं आणि दुबईतून परत भारतात यावं लागलं, हे सर्वश्रुत आहे.  या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन खेळाडूंना त्यांचं वर्षभराचं आर्थिक नियोजन करावं लागतं.

हे दिवस सरत्या आर्थिक वर्षाचा लेखा-जोखा घेण्याचे आणि येत्या आर्थिक वर्षाचे नियोजन करण्याचे असतात. येत्या आर्थिक वर्षात सिनेक्षेत्रातील व्यावसायिक कदाचित ‘वर्ल्ड कप’ विजेत्या स्त्री क्रिकेट संघावर चित्रपट काढायच्या विचारात असतील. (स्त्री खेळाडूंवरील चित्रपटांना साधारणपणे व्यावसायिक यशसुद्धा चांगलं मिळतं,  हे चाणाक्ष वाचकांनी येथे ध्यानात घ्यावं!) अनेक गोष्टीत तारेवरची कसरत करणार्‍या स्त्री खेळाडू आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू पाहून वर्षभराचं क्रीडा वेळापत्रक ठरवतात. मान्यवर खेळाडूंसाठी हे ठरवणं, म्हणजे कुठलं आईस्क्रीम घ्यावं किंवा श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी यापैकी काय निवडावं अशा स्वरूपाचा हा प्रश्न असतो. वास्तविक हे सर्व पदार्थ त्यांना वर्ज्य असतात हा भाग अलाहिदा! खरी तारेवरची कसरत असते ती नवोदित किंवा सामान्य परिस्थितीतून क्रीडा क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा असणार्‍या खेळाडूंची. कारण त्यांच्यासाठी खर्चाची यादी खूप लांब असते तर जमेची बाजू फारच तोकडी.

खेळाडूंचा खर्च चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, स्पर्धेसाठी प्रवास, व्यायाम आणि खुराक अशा अनेक गोष्टींवर होतो. खरं म्हणजे ही यादी  खूप मोठी आहे. त्यातही साधारणपणे  स्त्री खेळाडूंंचा खर्च पुरुष खेळाडूपेक्षा थोडा जास्त असू शकतो. मुलींना बरेच पालक एकटे पाठवायला तयार नसतात. त्यामुळे त्यांच्या बरोबर आणखी एका व्यक्तीचा प्रवासाचा खर्च होतो. बरोबर येणार्‍या व्यक्तीला जर नोकरीत बिनपगारी रजा घेऊन किंवा उत्पन्नाचं साधन थोड्या काळासाठी बाजूला ठेवून यावं लागत असेल तर आणखीनच आर्थिक नुकसान सोसावं लागतं. अनुभवी स्त्री खेळाडू जरी एकट्या प्रवास करीत असल्या तरी सुरक्षिततेच्या कारणासाठी बरेच वेळा त्यांना महागड्या हॉटेलमध्ये राहावं लागतं. अशा वेळी सर्व गोष्टींचं वेळेवर नियोजन करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे बरेचदा अनावश्यक खर्चाची बचत होते. कितीही नियोजन केले तरी काही वेळा अचानक खर्च उभे ठाकतात. आयत्या वेळी एखाद्या प्रतिष्ठित स्पर्धेचं निमंत्रण येतं किंवा एखाद्या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी पात्रता आयत्या वेळी पूर्ण होऊन संधी मिळते आणि खर्चात वाढ होते.

क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द अनिश्चित स्वरूपाची असते. म्हणजे खर्च निश्चित असतो, पण जमेची बाजू शाश्वत नसते. विशेषत: नवोदित खेळाडूंना किंवा सामान्य कुटुंबातील खेळाडूंना जमेची बाजू सांभाळणे कठीण जाते. या टप्प्यावरील खेळाडूंना प्रायोजक मिळणे दुरापास्त असते. बक्षीस मिळण्याची खात्री नसते. राज्य सरकारच्या अथवा  केंद्र सरकारच्या खेळाडूंसाठी काही योजना असतात. पण त्याचे नियम सतत बदलत असतात. त्यामुळे त्यांची माहिती करून घेणं आणि या योजनांचा फायदा घेणं हे एक किचकट काम होऊन बसतं. अलीकडच्या काळात ऑनलाइन माध्यमामुळे यात थोडी सुधारणा झाली आहे, हे निश्चित! हळूहळू स्त्री खेळाडूंना मिळणार्‍या लोकप्रियतेमुळे अनेक खासगी प्रायोजकसुद्धा स्त्री खेळाडूंच्या खर्चाचा भार उचलायला तयार असतात. असं असलं तरी स्पर्धेसाठी बरोबर येणार्‍या व्यक्तीचा खर्च आणि इतर असंख्य किरकोळ खर्च स्त्री खेळाडूंना स्वत:लाच करावे लागतात. खेळात पुढे जाण्यासाठी घ्यावे लागणारे श्रम आणि त्यासाठी लागणार्‍या खर्चाची तजवीज करण्यासाठी लागणारे श्रम जर अभ्यासात घेतले तर जास्त निश्चित उत्पन्नाचं साधन मिळू शकतं, असा विचार करून अनेक मुली दहावी इयत्ता जवळ आली, की क्रीडा क्षेत्राला रामराम ठोकतात. नंतर त्यांचा खेळाशी एक छंद म्हणून संबंध उरतो किंवा कधीकधी तेवढासुद्धा उरत नाही. तुम्ही कोणता खेळ निवडता, त्यात तुम्ही कोणत्या पातळीपर्यंत पोचता यावर अर्थातच तुमची आर्थिक कमाई अवलंबून असते. जागतिक पटलावर टेनिस हा स्त्री खेळाडूंसाठी चांगले उत्पन्न मिळवून देणारा खेळ ठरला आहे. जगातील १५ सर्वोच्च आर्थिक प्राप्ती करणार्‍या स्त्री खेळाडूंचा आढावा घेतला तर त्यातील अध्र्याहून अधिक टेनिसपटू असतात.

वरच्या स्तरावरील जागतिक तसेच भारतीय स्त्री खेळाडूंच्या कमाईतील बहुतांश वाटा मानधन किंवा बक्षिसं यांचा नसून, प्रायोजकत्व आणि जाहिरातींमधून आलेला असतो. काही वर्षांपूर्वी बॅडमिंटनची फुलराणी पी. व्ही. सिंधू हिचा समावेश अमेरिकी ‘फोर्ब्स’ या मासिकाने जगातील काही सर्वोच्च वार्षिक आर्थिक कमाई केलेल्या स्त्री खेळाडूंमध्ये केला होता. अर्थात नुकत्याच जिंकलेल्या ‘वर्ल्ड कप’ मुळे स्त्री क्रिकेट खेळाडूंच्या मिळकतीत खूप भर पडेल अशी अपेक्षा आहे.  विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी दिल्या जाणार्‍या महाराष्ट्रातील ‘छत्रपती’ पुरस्कारात  तीन लाख रुपये तर केंद्र सरकारच्या ‘अर्जुन’ पुरस्कारात पंधरा लाख रुपये दिले जातात. (यात भरघोस वाढ व्हावी अशी आशा आहे.) 

 जवळपास प्रत्येक खेळात पुरुषांना जे मानधन दिलं जातं ते स्त्री खेळाडूंच्या तुलनेत जास्त असते. तसेच सर्वच खेळात पुरुषांच्या स्पर्धांची बक्षिसं स्त्रियांच्या बक्षिसांच्या तुलनेत जास्त असतात. जगातील सर्वोच्च उत्पन्न असणार्‍या १०० खेळाडूंची यादी पाहिली तर त्यात स्त्री खेळाडू क्वचितच बघायला मिळतात. टेनिसमध्ये २००७ पासून सर्व ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धांमध्ये स्त्री व पुरुष खेळाडूंना समान बक्षिसं दिली जाऊ लागली. पण ‘ग्रँड स्लॅम’ सोडल्या तर बाकीच्या टेनिस स्पर्धांमध्ये अजूनही बक्षिसांच्या बाबतीत विषमता कायम आहे. जी कथा बक्षिसाची, तीच कथा खेळाडूंच्या मानधनाचीसुद्धा आहे. भारतात क्रिकेटसारख्या राजमान्य आणि लोकमान्य खेळातही स्त्री खेळाडूंना पुरुष खेळाडूंच्या तुलनेत सर्व पातळीवर कमी मानधन दिलं जातं. बहुसंख्य क्रीडा संघटना आपला संघ पाठविताना, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षिसं देताना आणि इतरही अनेक बाबींमध्ये पुरुष खेळाडूंना स्त्री खेळाडूंच्या तुलनेत झुकतं माप देताना दिसतात.

    या ‘आर्थिक’ नाण्याच्या दोन बाजू दिसतात. एका बाजूला सर्वप्रथम असते स्त्री-पुरुष समानतेचं सामाजिक तत्त्व जे क्रीडा क्षेत्रातसुद्धा आचरणात आलं पाहिजे. आर्थिक प्रोत्साहन  सुधारल्यामुळे क्रीडा क्षेत्रात स्त्रियांसाठी जास्त संधी, मोठे प्रायोजकत्व, अधिक प्रसिद्धी असे एक सकारात्मक चक्र निर्माण होईल. स्त्री खेळाडू घेत असलेल्या परिश्रमांचं आणि त्यांच्या कामगिरीचं चीज होईल. दुसरी बाजू जास्त करून नफ्याचे तत्त्व, बाजारमूल्य यासारख्या गोष्टींवर आधारित आहे. बरेच वेळा पुरुषांच्या स्पर्धांमधून दूरचित्रवाणीचे हक्क, मोठे प्रायोजकत्व, तिकिटांचा जास्त खप याद्वारे जास्त प्रमाणात नफा मिळतो. यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून पुरुष खेळाडूंना मिळणारी जास्त बक्षिसे व मानधन याला पुष्टी दिली जाते. काही खेळांमध्ये शारीरिक भिन्नतेमुळे पुरुषांना जास्त कठीण स्वरूपात खेळ खेळावा लागतो. जसे टेनिसचे जास्त ‘सेट’,  वेटलिफ्टिंगमध्ये जास्त वजन उचलणं इत्यादी यामुळेसुद्धा काही वेळा पुरुष खेळाडूंच्या जास्त बक्षिसांचं व मानधनाचं समर्थन केलं जातं. या पार्श्वभूमीवर बुद्धिबळातील एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. गेल्या वर्षी झालेल्या ‘राष्ट्रीय अजिंक्यपद’ स्पर्धांमध्ये स्त्रियांच्या स्पर्धेचं बक्षीस पुरुषांच्या बक्षिसापेक्षा जास्त होतं. अशा प्रकारे जर सर्व खेळांमध्ये, सर्व पातळींवर आर्थिक चक्र फिरलं, तर कदाचित लवकरच पुरुष खेळाडूंना आर्थिक समानतेसाठी झगडावं लागेल का असा विचार मनात येतो.

 माझ्या बुद्धिबळ कारकीर्दीत खेळाडू म्हणून ‘भारत पेट्रोलियम’ या कंपनीत नोकरी मिळेपर्यंत मला प्रायोजकत्व मिळालं नव्हतं. त्यामुळे बर्‍याच संधींवर मला पाणी सोडावं लागलं. आता बर्‍याच सरकारी उपक्रमांद्वारे किंवा काही खासगी कंपन्यांद्वारे उगवत्या खेळाडूंना शिष्यवृत्ती अथवा  प्रायोजकत्व दिलं जातं. गेल्या काही वर्षांत, आपल्या मिळकतीतील काही हिस्सा व्यवसायात गुंतवून अनेक स्त्री खेळाडू यशस्वी व्यावसायिकसुद्धा बनल्या आहेत. बुद्धिबळपटू अमृता मोकल ‘चेसबेस इंडिया’ या भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सबकुछ असणार्‍या कंपनीची संयुक्त संस्थापक आहे. काही स्त्री खेळाडूंनी खेळातील कारकीर्द संपल्यावर खेळाशी निगडित राहण्याचे मानसिक समाधान मिळवत आणि त्याचवेळी  अर्थार्जनसुद्धा करण्याचे वेगवेगळे पर्याय निवडले आहेत.

 प्रशिक्षणाचं क्षेत्र त्यात प्रामुख्याने येतं. अनेक स्त्री खेळाडू यशस्वी प्रशिक्षक झालेल्या आपल्याला दिसून येतात. नेमबाज सुमा शिरूरने खेळाडू म्हणून ‘अर्जुन’ पुरस्कार तर मिळवलाच, पण उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारावरसुद्धा आपले नाव कोरले आहे. बुद्धिबळ ‘ऑलिम्पियाड’मधील सांघिक सुवर्णपदक विजेती तानिया सचदेव किंवा मातबर क्रिकेटपटू मिथाली राज क्रीडा समालोचन करताना आपल्याला दिसतात. तरुण बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय महिला मास्टर सलोनी साबळेने क्रीडा मानसशास्त्राचे शिक्षण घेऊन त्यात काम सुरू केले आहे. क्रीडा क्षेत्रात उत्पन्नाची आणि यशस्वितेची अनिश्चितता असल्यामुळे स्त्री खेळाडू म्हणून कारकीर्द करत असतानाच एकीकडे आणखी एखाद्या उत्पन्नाच्या पर्यायाचा विचार करून त्यातही लक्ष ठेवणे श्रेयस्कर ठरते.

अर्थात खेळाच्या मैदानात व खेळाच्या अनुषंगाने येणारे विविध अनुभव, जोडली जाणारी माणसं आणि आवडत्या क्षेत्रात काम करण्याचं समाधान हे आर्थिक तराजूत तोलण्याच्या पलीकडले असतात हे निश्चित!