scorecardresearch

Premium

शोध आठवणीतल्या चवींचा! : मोहवणारा ‘मोह’

आंबील हादेखील आदिवासींच्या आहारातील मुख्य घटक आहे. कोसली, गुरांगा, बगाल, कोट्टू, कुटकी अशी काही वेगळी भरडधान्यं त्यांनी मला दाखवली.

article about mahua flower mahua plant in gadchiroli district
सुकत ठेवलेली मोहाची फळे (संग्रहित छायाचित्र)

शिल्पा परांडेकर

‘‘गडचिरोलीतील आदिवासींना भेटल्यावर त्यांच्या अनेक गोष्टी समजल्या. विशेषत: त्यांना जन्मापासून मृत्यूपर्यंत साथसोबत करणारा ‘मोह’. मोहाची फुले, बी, लाकूड या सगळय़ांचा वापर हे आदिवासी करतात. द्राक्षांसारख्या दिसणाऱ्या ताज्या मोहाच्या फुलांची चव मी घेतली तेव्हा ‘किक’ बसलीच, पण त्याच्या पोळय़ा, लाडू, राब, पानोऱ्या आदी पदार्थाचं महत्त्वही कळलं. याशिवाय तेथील कोसली, गुरांगा, बगाल, कोट्टू, कुटकी अशा काही वेगळय़ा भरड धान्यांचीही माहिती मिळाली.’’

sushma andhare on raj thackeray, sushma andhare toll issue, sushma andhare on health
“काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून…”, टोल मुद्द्यावरुन अंधारेंचा मनसेला टोला
Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
dhule adulterated milk, dhule 946 litre adulterated milk destroyed, Milk Adulteration in Dhule
धुळे जिल्ह्यात ९४६ लिटर भेसळयुक्त दूध नष्ट; १५ विक्रेत्यांवर कारवाई
ganesh murti
वर्धा : मोफत माती घेवून स्वतः तयार केलेली गणेश मूर्ती बसवा… पर्यावरणप्रेमी महिलांचा उपक्रम

‘काहीही झालं तरी तू तिकडे जाऊ नको. कधीही काहीही घडतं तिकडे.’ माझ्या प्रवासाची माहिती जशी व्हायची तशा अशा सूचना मला लोकांकडून येऊ लागत. कधी कळकळीनं, तर कधी चक्क आदेशही द्यायचे लोक. माझ्या तिथल्या स्थानिक ड्रायव्हरनं तर कधीच सांगून टाकलं होतं, की मी त्या भागातून गाडी नेणार नाही. एव्हाना तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे जाण्याबद्दल सांगत आहे –  गडचिरोली. हा महाराष्ट्रातला एक नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भाग समजला जातो; पण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कोण का बरं इजा पोहोचवेल, असा माझा साधा प्रश्न या काळजी करणाऱ्या लोकांना असे. यावर काहीही उत्तर मिळत नसे. मग मीही ‘‘ठीक आहे,’’ म्हणून माझी वाट धरायचे.

गडचिरोली हा आदिवासीबहुल प्रदेश. याआधी मी पालघर, ठाणे, रायगड तसंच इतरही अनेक भागांतील आदिवासींना भेटले होते. गडचिरोलीमधील आदिवासी, त्यांची संस्कृती, खाद्यपदार्थ याविषयी मी थोडंफार ऐकून होते. आता तिथे जाण्याची संधी मिळाली होती, ती मी टाळू शकत नव्हते. गडचिरोलीत फिरत असताना मोह, मोहाचे अनेक पदार्थ- पोळय़ा, लाडू, राब, पानोऱ्या, वगैरेंविषयी मी ऐकत होते. ते उन्हाळय़ाचे दिवस होते. प्रत्येकाच्या अंगणात मोह वाळत घातलेला असायचा. द्राक्षांसारखी दिसणारी ताजी मोहाची फुलं मी चव बघण्यासाठी म्हणून खाल्ली. मला त्यांची चव खूपच आवडली. त्यामुळे माझ्याकडून नकळत ती जरा जास्तच खाल्ली गेली. अर्थातच, त्याचा परिणाम म्हणजे दारू प्यायल्यानंतर जसं गरगरतं किंवा ‘किक’ बसते तसंच झालं. मोहाची दारू पितात हे ऐकून होते, मात्र फुलांच्या अतिरिक्त सेवनानंदेखील असं होईल, हे माहीत नसल्यामुळे हा प्रकार घडला.

हेही वाचा >>> मोडला नाही कणा..

‘मोह’ हा आपल्याला दारूपुरताच माहीत आहे. मात्र त्याची महती अगदी ‘मोहवून’ टाकणारी आहे. आदिवासींच्या जीवनकालात मोह जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समरस झाला आहे. बाईला तिच्या बाळंतपणानंतर मोहापासून बनवलेली ‘राब’ आणि हळद खायला देतात. यामुळे बाळंतिणीस ताकद मिळते, रक्तशुद्धी होते, असा त्यांचा विश्वास आहे. तसंच पोळी, भाकरीबरोबर तोंडी लावणं म्हणूनदेखील राब खाल्ली जाते. साधारण उसाच्या काकवीसारखी दिसणारी ही राब पूर्वी प्रत्येकाच्या घरात बाटलीत भरून ठेवली जायची. जितकी राब जुनी तितकी ती चांगली, असं सांगितलं जातं. एका गावात स्त्रियांच्या घोळक्यातल्या एकीनं मला विचारलं, ‘‘सांग बघू, मला किती मुलं असतील?’’ मला वाटलं, असतील पाच-सहा. ‘‘मला बारा मुलं आहेत. आणि याचं रहस्य ही राब!’’ त्या अगदी ठासून सांगत होत्या. त्यांचा शिडशिडीत बांधा आणि ठणठणीतपणा पाहता मला वाटतं, हे लोक सांगतात ते असेलही खरं!

सत्तरच्या दुष्काळात अन्न-पाणी मिळत नव्हतं तेव्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांनी बरबडा, आंबाडी, कोंडय़ाच्या भाकरी खाल्ल्या आणि आपली गुजराण केली, हे आपण मागील काही लेखांमध्ये वाचलंच आहे. इकडे  ‘मूठभर मोह खाऊन आम्ही जगलो,’ हे आदिवासी लोक आवर्जून सांगतात आणि आजही मोह यांच्या आहारातील मुख्य भाग आहे. मोहाची फुलं, बी, लाकूड या सर्वाचा वापर आदिवासी आपल्या जीवनात करताना दिसतात आणि त्याचमुळे या आदिवासी समाजासाठी मोहाचा वृक्ष कुण्या ‘कल्पवृक्षा’पेक्षा कमी नाही.

आदिवासींच्या आहारात अनेक प्रकारच्या जंगली प्राण्यांचा समावेश असे, हे आपण ऐकलं असेल. ही बाब खरी आहे, मात्र अलीकडे वन्यप्राणी सुरक्षिततेच्या कायद्यामुळे आणि इतर अन्नधान्याच्या सोयीमुळे हे लोक इतरही अन्नपदार्थ खाऊ लागले आहेत. मात्र ‘मुंग्यांची चटणी’ हा त्यांचा विशेष पदार्थ आजही दुर्गम पाडय़ांवर आवर्जून केला जातो. या मुंग्या म्हणजे आपल्या घरात दिसणाऱ्या मुंग्या नाहीत बरं का! या मुंग्याही मोहाच्या झाडावर असतात आणि या मुंग्या गोळा करणं मोठं जिकिरीचं काम असतं. मोहाच्या झाडाला एक जाळी बांधली जाते. मोहाच्या झाडावर असणाऱ्या या मुंग्या विशिष्ट पद्धतीनं गोळा करतात. या वेळी खूप काळजी घ्यावी लागते, कारण या मुंग्यांचा चावा खूप भयानक असतो.

हेही वाचा >>> ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’

गडचिरोलीमध्ये त्या वेळी राहण्यासारखं एकच हॉटेल होतं. त्यामुळे तिथे थांबून आजूबाजूच्या परिसरांत भटकंती करावी लागायची. घनदाट झाडी, दुर्गम भाग, त्यामुळे रोजचा प्रवास खूप छान असायचा; पण मुंग्यांच्या चटणीसारखे दुर्मीळ पदार्थ मात्र मला अद्याप मिळाले नव्हते. त्यासाठी मला आणखी अतिदुर्गम भागात जाणं आवश्यक होतं; पण इतक्या दुर्गम भागात कोणत्याही संपर्काशिवाय जाणं अशक्यच होतं. त्यात ड्रायव्हरनं तर आधीच हात वर केलेले. शिवाय अध्येमध्ये कुठेही राहण्याची सोय नाही. अशातच कुणी तरी सांगितलं, ‘तुम्ही प्रकाश आमटे यांचा हेमलकसा इथला ‘लोकबिरादरी प्रकल्प’ पाहायला का जात नाही? कदाचित काही नवी माहिती मिळेल आणि तिथे थांबताही येईल.’ ‘लोकबिरादरी’मध्ये राहता येईल की नाही, हे माहीत नव्हतं; पण प्रकल्प पाहायचा, समजून घ्यायचा हे आधीपासूनच नियोजनात होतं. त्यानुसार मी तिथे पोहोचले. संध्याकाळची वेळ होती. विद्यार्थ्यांची सामूहिक प्रार्थना सुरू होती. मला त्यांची भाषा समजत नसली तरी त्या सामूहिक प्रार्थनेतील सकारात्मक ऊर्जा मला जाणवत होतीच. त्या रात्री तिथेच मुक्काम करून सकाळी प्रकल्प पाहून जवळच्या जंगलातील पाडय़ांवर जायचं, असं ठरलं.

मध्यस्थ म्हणून मला भेटलेल्या दोघांशी माझी थेट ओळख नव्हती. त्यातच मी जेव्हा त्यांना सांगितलं, की मला आत जंगलातल्या गावांत जायचे आहे, तेव्हा ‘ठीक आहे’ म्हणून ते दोघे गोंड-माडिया भाषेत काही तरी एकमेकांशी  बोलले आणि ‘चला’ म्हणाले. त्यांच्याबरोबर माझा प्रवास सुरू झाला. इथून पुढचा अनुभव खूप भन्नाट आहे. आता सांगताना मजा वाटते; पण त्या वेळी काही क्षण थोडी भीतीदेखील वाटली होती. दोन अनोळखी पुरुषांबरोबर अठरा किलोमीटर दूर आत जंगलात त्यांच्या गाडीवरून जाणं, आजूबाजूला घनदाट जंगलाशिवाय काहीच नसताना आणि आत जंगलातील पाडय़ावर गेल्यानंतर तर समोरच्या हालचाली पाहून छातीत धस्स झाले. ‘शक्ती’ चित्रपटातील नरसिम्हा (नाना पाटेकर) आणि त्याचे साथीदार यांचा प्रारंभीचा प्रसंग माझ्या डोळय़ासमोरून तरळून गेला. मी जशी-जशी समोरच्या एका घराकडे जात होते, तशी-तशी हातातील धान्याची पोती खाली ठेवत ठेवत तिथले पुरुष माझ्याकडे एकटक पाहू लागले. यामुळे थोडी अधिक भीती वाटली. आजूबाजूला एकही बाई दिसत नव्हती. तरीही त्या घराच्या अंगणात जाऊन बसले. आतून एक बाई पाणी आणि आंबील घेऊन आली. त्या पाण्यापेक्षा मला तिला पाहूनच अधिक आनंद वाटला. थोडय़ाच वेळात मला समजलं, की शहरातून कुणी आलं तर हे लोक बावरतात, घाबरतात. स्त्रिया तर पटकन कुणासमोर येतही नाहीत. त्यामुळे ते लोक माझ्याकडे असे बघत होते. बाकी मी शंभर टक्के सुरक्षित होते.

हेही वाचा >>> ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’

आंबील हादेखील आदिवासींच्या आहारातील मुख्य घटक आहे. कोसली, गुरांगा, बगाल, कोट्टू, कुटकी अशी काही वेगळी भरडधान्यं त्यांनी मला दाखवली. आदिवासींच्या संस्कृतीतील अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली, की आदिवासी शक्यतो कशाचाही संग्रह करत नाही. आपण जसं वर्षभरासाठी धान्य साठवून ठेवतो तसं आदिवासी ठेवत नाहीत. जंगल, निसर्ग त्यांच्यासाठी देव आहे. निसर्गातील गोष्ट निसर्गाकडेच ठेवायची आणि आपल्याला गरज असेल तेव्हाच ती आणायची, अशी त्यांची धारणा आहे. आता शहरीकरण आणि रेशन वगैरेंच्या उपलब्धतेमुळे त्यांच्या प्राकृतिक आहारात बदल झाले असले, तरी आजही गडचिरोलीतील असे अनेक पाडे आहेत, जे आपली पारंपरिक जीवनशैली आणि आहार यांनाच महत्त्वपूर्ण मानतात.

तिथे कुणालाच मराठी भाषा येत नव्हती; पण टकमक बघत, जमेल तसं मध्येच हसत ते माझ्या आणि मध्यस्थांच्या संभाषणात सहभागी होत होते. कदाचित त्याचमुळे इतका वेळ बाजूला एका खांबाला रेलून, कुतूहल नजरेनं बघणारा भीमा यातूनच काही तरी समजला आणि पटकन जाऊन त्यानं पळसाच्या पानांच्या वाटीतून एक पांढरंशुभ्र द्रव्य आणून माझ्यासमोर ठेवलं आणि पुन्हा तसाच टकमक बघत उभा राहिला. ‘आमच्याकडील स्वागताची ही पद्धत,’ त्या मध्यस्थानं मला सांगितलं. गोरखा/गोरगा हे ते ताडीसदृश एक मद्य.

‘काही होणार नाही. तुम्ही बिनधास्त प्या,’ असं मला आश्वासित केल्यानंतर मी तिचा एकच घोट घेतला. चव खरंच खूप छान होती.  ते मद्य आहे, त्याची नशा चढते वगैरे हे सर्व अलाहिदा; पण योग्य प्रमाणात घेतल्यास पोटाचे विकार, उष्णतेचे विकार यात गोरगा औषधी असल्याचं मानलं जातं.

(क्रमश:)

parandekar.shilpa@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Food of adivasi mahua flower mahua plant in tribal area of gadchiroli district zws

First published on: 30-09-2023 at 01:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×