‘‘मला वाटले होते की ‘हे माझ्या समस्या दूर करतील, मला सल्ला देतील.’ पण तसे नव्हते. मीच उभा राहिलो पाहिजे आणि मीच प्रयत्न करायला पाहिजे हे ‘प्राजित’ने शिकवले. डॉक्टर याला स्व-मदत गट का म्हणतात ते त्या वेळेस लक्षात आले.’’ मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अभिजीत यांनी स्व-मदत गटाच्या माध्यमातून स्वत:ला बाहेर कसे काढले याविषयाची आणि प्राजितची माहिती.
मी अभिजीत, मानसिक समस्येने ग्रस्त आहे, माझे स्वत:चे प्रयत्न आणि ‘प्राजित’ स्व-मदत गटाची मदत यांच्या बळावर आपल्यापुढे उभा आहे. ‘प्राजित’मध्ये येऊन दोन वर्षे होत आली. माझी बायको साधना आधीपासून ‘प्राजित’ला येत होती. ‘तू ग्रुपला ये’ असे ती मला बरेच वेळा म्हणाली होती. मी ते हवेत उडवायचो. तिच्याकडून कधी नीट कळण्याची वेळच आली नाही. पण लग्नातंनर मला ‘प्राजित’मध्ये यावे लागले. अगदी आठ-नऊ महिन्यांत आम्ही आलो. गुरुवारची सभा हा काय प्रकार असतो माहीत नव्हतं. सभेला संध्याकाळी गेलो. सगळा हॉल भरला होता. भिंतीला लागून खुच्र्या टाकल्या होत्या. मध्ये मोकळी जागा होती.
मला समोर बसलेल्या गृहस्थाने बोलण्यास सांगितले, ‘‘तुला हवं ते बोल, पण थोडक्यात.’’ मी धीर धरत आधी आभार मानले आणि म्हणालो, ‘‘बाबा वारलेत. लग्नानंतर आठ महिन्यांनी वारले आणि आमच्यातही थोडं वाजलं आहे. त्या संदर्भात इथे आलो आहे.’’ वाजलं म्हटल्यानंतर त्यांनी काहीतरी नोंद केली आणि ‘‘छान बोललास. आपण ग्रुप संपल्यानंतर भेटू’’ असे सांगितले. ग्रुप संपल्यानंतर सहा-सात मंडळी आमच्याभोवती बसली. त्यांनी मला व बायकोला बोलायला सांगितले. दोघांनाही शब्द कसाबसा फुटत होता. सोमवारी मीटिंग घेण्याचे ठरवले. आपल्याला नक्की काय बोलायचे आहे याची लिस्ट करून आणायला सांगितली. ज्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी कधी इच्छित नव्हतो तोच ग्रुप काहीतरी आधार देतो आहे असे वाटले. स्वत:हून सगळी यादी करून सोमवारी गेलो. परत एकदा गोल करून बसलो. आधी मी सुरुवात केली. मग साधना बोलली. एकमेकांच्या लग्नाबद्दलच्या आशाअपेक्षा कुठल्या थरापर्यंत पूर्ण झाल्या नाहीत हे अक्षरश: रडून रडून सांगत होतो. एकमेकांबद्दलचा कडूपणा दोघांनी मिळून त्यांच्यासमोर मांडला. लग्नानंतर बाबा आजारी पडले. मग त्याने मला वेळ दिला नाही, मला तिने साथ दिली नाही इ. यादीच्या यादी मांडली. त्यावर त्यांचे उत्तर आले, ‘‘तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे.’’
ते कळवळीने की आणखी कशाच्या पायावर असे म्हणाले हे आज कळते आहे. अपेक्षा जर काल्पनिक असतील तर दु:ख होते. वास्तवातल्या बायकोवर प्रेम करा हे लक्षात यायला दोन वर्षे लागली. त्या आधी मानसिक समस्येने मी किती ग्रस्त आहे याची जाणीव मला व्हायला हवी होती. सर्व गोष्टींमध्ये सतत नकारार्थ शोधणे, इतर स्त्रियांच्या बाबतीत काल्पनिक स्वप्ने रंगविणे व त्यातच राहणे. खरे जग काय असते आणि कसे चालते याची चिमूटभरसुद्धा जाणीव नव्हती.
काही आणि कसे का असेना मी गुरुवारच्या सभांना हजर राहात गेलो. प्रत्येकाला बोलायची संधी मिळत होती. कोणाला मुलाचा त्रास, कोणाला मुलीचा, कोणाला बायकोचा तर कोणाला स्वत:चाच, असे सर्व लोक दर गुरुवारी येऊन बोलायचे. मी मला काय वाटते आणि मला किती मानसिक त्रास होत आहे ते सांगितले. नंतरच्या सभेत ते म्हणाले, ‘‘त्रास होतोय. पुढे काय प्रयत्न केलेस ते सांग?’’ माझ्याजवळ उत्तर नव्हते. ‘‘याच्यावर काय प्रयत्न? हे तर माझं नशीब आहे’’ (हा:हा:हा:) असे माझ्या मनात उमटले.
गुरुवारनंतर दर रविवारी डॉ. लुकतुके भाषण देतात. त्याला विवेचन म्हणतात. मग मी तिकडे रविवारी गेलो. काहीतरी अध्यात्म आणि मानसशास्त्र यावर ते बोलतात असे समजले होते. जेव्हा मी त्याला जायला लागलो तेव्हा मला लागू पडेल असे काहीतरी दर रविवारी मला मिळू लागले. मी स्वत:हून विवेचने वाचली, विवेचनांत, दासबोधातील ओवी म्हणजे रोज प्रत्यक्षात जगण्याचा फॉम्र्यूला आहे हे हळूहळू समजायला लागले. विवेचनानंतर स्वाध्याय केले. एवढय़ात गुरुवारची सभा आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट चालूच होती. घरी मला बायकोविषयीचा त्रास आणि बाबांच्या आठवणी सतावतच होत्या. मी रडायचे, भांडायचो, गोंधळून जायचो. पण ग्रुप, माझी आई आणि माझी बायको समर्थपणे माझ्या पाठीशी होत्या. मला थोडी जाण येऊन यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे हे ‘प्राजित’मध्ये कळले. मला वाटले होते की ‘हे माझ्या समस्या दूर करतील, मला सल्ला देतील.’ पण तसे नव्हते. मीच उभा राहिलो पाहिजे आणि मीच प्रयत्न करायला पाहिजे हे ‘प्राजित’ने शिकवले. डॉक्टर याला स्व-मदत गट का म्हणतात ते त्या वेळेस लक्षात आले.
खिन्नता, अपेक्षाभंग, काळजी, वारंवार तोच विचार करण्याचे चक्र यांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न असतात हे मी आता येथे शिकलो आहे. येथे सांगितलेल्या पद्धती वापरतो आणि त्यांना चिकटून आहे (चिकटून म्हणजे काय हे प्राजितला आल्यावरच कळेल.) आजही विचारांचा गोंधळ काही थांबला नाहीये. पण आज मी त्यांना हाताळू शकतो, त्यामधूनही शांत चित्ताने जगू शकतो. उदासी, हिरमोड, मानसिक त्रास इत्यादी सगळी न जगण्याची निमित्ते आहेत. पण त्यावर मात करून प्रयत्न करीत राहणे हे खरे जगण्याचे कारण आहे.
प्राजित स्वमदत गट- आयुष्यात प्रत्येकाच्या मनात-  
* अमुक वेळी मी असे वागायला नको होते. * राग आवरायला हवा होता. * बाकीच्यांना पण समस्या येत असतील ते अशा प्रश्नांमधूून कसे मार्ग काढतात. * संतांच्या आयुष्यातही अनेक प्रश्न होते. त्यांनी कसा मार्ग काढला. असे अनेक  प्रश्न वारंवार येतच राहातात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करतो. पण ते विचार योग मार्गाने जातील असे सांगता येत नाही.
आता आहोत या अवस्थेतून निरोगी मनाकडे वाटचाल करता यावी या हेतूने डॉ. उल्हास लुकतुके यांनी १४ वर्षांपूर्वी प्राजित स्व-मदत गटाची स्थापना केली. प्राजितचा अर्थ-अजित- जिंकला न गेलेला. विशेषरीत्या सतत जिंकत आलेला किंवा कधीही हार न मानलेला, कायमचा अपराजित.
खचले तरी परत उभारी धरणारे मन. ते खचते, चुकते पण परत उठते, सुधारते, सुधारणेकडे वाटचाल करत स्वत:ला सावरायला शिकते हा अर्थ घेऊ या.
सुरुवातीला ‘प्राजित’ नैराश्येतून सुटका यासाठी काम करत होता. त्यानंतर मानसिक आरोग्याकडे हा गट वळला. मानसिक आरोग्यासाठी- अल्बर्ट एलिस- (आर.ई.टी) एरन टी बेक, गोलमन (इमोशनल इंटिलिजन्स), आशेचे मानसशास्त्र (स्पायडर), मार्टिन सेलिग्मन (आनंदाचे मानसशास्त्र), जॉन गॉटमन (विवाहाचे मानसशास्त्र) हेही शिकून झाले.
मनाचा खोलवरचा व्यापार शिकण्यासाठी खूप अभ्यास केला तेव्हा लक्षात आले अजून समाधान होत नाही. अजून मनाच्या आत खोलवर जायला हवे. पाश्चात्त्य मानसशास्त्र इथे अपुरे पडते हे लक्षात आले तेव्हा गट आपल्या संतांकडे वळला. माणसाचे मन फसते, पडते याचा मूलभूत विचार संतांनी केला आहे, असे लक्षात आल्यावर प्रथम मनोबोध नंतर दासबोध याचा अभ्यास चालू केला. जे निर्मळ मन परमेश्वराने जन्मत:च प्रत्येकाला दिले त्यावर साचलेली धूळ झटकून परत निर्मळतेकडे कसे जाता येईल याचे सखोल धडे सोप्या भाषेत रामदासांनी दिले आहेत. येथील सभांमध्ये चर्चा सर्व रोगांची होते. पण कुठल्याही एका विशिष्ट रोगासाठी हा ग्रुप नाही. अनेक गोष्टींची (अगदी दारूपासून चहा, कॉफीपर्यंत.) व्यसने हा ग्रुप सोडवतोच सोडवतो. तसाच तो विचारांना लागलेली व्यसने सोडवण्याचा प्रयत्न करतो.
अशाच एका विचारांनी खचलेल्या क्षणी मी या ग्रुपमध्ये येऊन पोहोचलो. जीवनात घडलेल्या अनेक नकारात्मक घटनांनी मन पूर्ण निराश झालेले, आता जगणे पण व्यर्थ असे विचार मनात घोळत असताना डॉक्टारांच्या विवेचनांनी दिशा दाखवली माझ्या लक्षात आले,  माझ्या छोटय़ा प्रश्नाचा मी मोठा बाऊ करून घेतला होता. माझ्यासारखे दु:खी अनेक आहेत. विचारांची योग्य दिशा घेऊन ते आनंदी जीवन जगत आहेत. मग योग्य ते प्रयत्न आणि गटातील शुभार्थीची मदत यामुळे मी आज आनंदी जीवन जगत आहे. डॉक्टरांनी सांगितलेले ‘टिकशील तर निर्मळतेकडे वाटचाल करू शकशील’ हे वाक्य मी स्वत: जगलो आहे. खरोखरच जे टिकले ते जीवनातला शुभ अर्थ घेत घेत जगले. गटाचे सर्व काम विनामूल्य
चालते. वर्गणी ऐच्छिक आहे. सर्वाना प्रवेश. फक्त गटाची प्रार्थना व शपथ मान्य असायला हवी.
गटामध्ये मार्गदर्शन केले जाते. वैद्यकीय इलाज केले जात नाहीत.  

प्राजितच्या सर्व सभांचे ठिकाण- निवारा वृद्धाश्रमाचा सभा कक्ष, पत्रकार भवनाजवळ, एस.एम. जोशी सभागृहासमोर, नवी पेठ, पुणे ४११०३०.  सभांची वेळ आणि दिवस- रविवार मुख्य सभा, सकाळी १० ते १२.३०.
संपर्क- अभिजीत कुलकर्णी ९९२२८६२२९६, अरविंद ९८२२७५९३३५