ओळख आणि मैत्री

ठरावीक वेळेलाच बाळाला खेळायला बाहेर घेऊन जाणं इष्ट असतं. अशा वेळीच त्याची गाठ त्याच्याएवढय़ा मुलांशी पडते.

ठरावीक वेळेलाच बाळाला खेळायला बाहेर घेऊन जाणं इष्ट असतं. अशा वेळीच त्याची गाठ त्याच्याएवढय़ा मुलांशी पडते. भिडस्त, खेळकर, खोडकर, दंगेखोर, मारकुटय़ा अशा सगळ्या प्रकारच्या मुलांशी त्याचा संबंध येतो. आई-बाबांनी अशा वेळी प्रेक्षकाची भूमिका घ्यायची असते. एखाद्या मुलाला (मग ते तुमचं असो की दुसऱ्याचं) इजा होत नाहीये ना एवढंच पाहायचं असतं. मोठेपणी जोडल्या जाणाऱ्या घट्ट मैत्रीचं बीज बालपणी जोपासलेल्या मैत्रभावामध्ये लपलेलं असतं.
‘विहान अगदी पक्का आहे. स्वत:च्या हातातलं खेळणं सोडत नाही, पण लक्ष दुसऱ्याच्या खेळण्याकडे.’’
‘‘ईशा नको एवढी फ्रेंडली आहे. ओळखदेखील नसताना कोणालाही ‘उम्मा’ देते.’’
‘‘आमचं हे पोरगं फारच बुजरं आहे. कोणी परकं माणूस दिसलं की चिकटलंच आईला.’’
तरुण आयांच्या गप्पांमध्ये या गोष्टी नेहमीच येत असतात. बाळाच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू विकसित होण्यासाठी आधी ओळख मग मैत्री असा प्रवास बराच काळ चालू असतो. आईच्या पोटात असतानाच बाळाला ओळख असते तिच्या हृदयाच्या स्पंदनांची, श्वासोच्छ्वासाची. जन्मानंतर त्याला कळतात फक्त अंधार आणि उजेड, पण नजर स्थिर व्हायच्या आधीपासूनच त्याला ओळखायला येतात त्याचे आई-बाबा आणि घरातले इतर सारे, जे त्याच्या अवतीभोवती असतात. स्पर्श, गंध आणि आवाजाच्या माध्यमातून बाळ त्याच्या आसमंताची ओळख करून घेत असतं.
हळूहळू  ८-१० इंचांवरून आई-बाबांचा चेहरा स्पष्ट दिसू लागतो. हलणारी खेळणी, काळे-पांढरे-लाल रंग कळतात. त्यानंतर दिसतात घरातल्या वस्तू, फर्निचर, पडदे, भिंतीवरची चित्रं सगळं ओळखीचं होऊ लागतं. आई-बाबांच्या ओठांच्या हालचाली, डोळ्यातले बदलते भाव बाळाला फार लवकर समजायला लागतात. मग पाळी येते ताई, दादाची, आजी, आजोबांची, घरात वावरणाऱ्या सर्वाची. ही सगळी माणसं बाळाला ‘आपली’ वाटायला लागतात. त्यांच्या सहवासात आनंदी, सुरक्षित तर वाटतंच पण सततच उत्तेजनही मिळतं.
तीन-चार महिन्यांपासून बाळाला बाहेरचं जग खुणवायला लागतं. रंगांची दुनिया मोह घालू लागते. वाऱ्यानं हलणाऱ्या, उन्हात चमकणाऱ्या झाडांच्या फांद्या, उमललेली फुलं, घिरटय़ा घालणारे पक्षी, फुलपाखरं, भुंगे, जमिनीवरची मुंगळ्यांची रांग.. सगळं लक्ष वेधून घेणारं असतं. आजूबाजूची मांजरं-कुत्री तर बाळाला आपलेच खेळगडी वाटतात. मोठय़ा आकाराच्या कुत्र्याला फिस्स.. करणाऱ्या मांजराला बाळ घाबरतंसुद्धा, पण सवयीनं ही भीतीपण कमी होते. सुळकन् जाणाऱ्या मोटार गाडय़ा, ढुर्र्र.. आवाज करणाऱ्या बाइक्स, रोऽ रोऽ करणारे ट्रक, दूर आकाशात पांढरी रेघ उमटवणारे विमान, हे सगळं बाळाला विस्मयचकित करतं आणि खूप खूप आवडतंसुद्धा. आपल्या घराचा परिसर, नेहमी खेळायला नेतात ती बाग, ते मंदिर, भाजीवाला, किराण्याचं दुकान, आपल्या डॉक्टरांचं ऑफिस या सगळ्या गोष्टींची बाळाला हळूहळू ओळख होऊ लागते. या सर्व ओळखीच्या जागांमध्ये बाळाला सुरक्षित वाटतं. कोवळ्या आईबाबांनो, ही सुरक्षिततेची भावना आपल्या बाळामध्ये जागृत व्हावी यासाठी तुम्हीपण खूप काही करू शकता.
बाळाला तुम्ही जितक्या गोष्टी दाखवाल, जितका संवाद साधाल, तितक्या या ओळखी वाढत जातील. बाहेरच्या व्यक्तींशी बोलताना, व्यवहार करताना बाळालाही त्याचा एक हिस्सा बनवा. त्याचा हात हलवून स्वत: नमस्ते, बाय बाय, टाटा म्हणा. म्हणजे ही माणसं आपल्याच जगातली आहेत, आई-बाबांना आपली वाटणारी आहेत हे बाळाला समजेल. डॉक्टरच्या दवाखान्यात पाऊल टाकण्यापूर्वीच भोकाड पसरणारी बाळं ही डॉक्टरांना नाही तर त्यांची भीती दाखवणाऱ्या आई-बाबांनाच रडून दाखवत असतात. ‘दंगा करू नको नाही तर डॉक्टरकाका टुच करतील’ हे वाक्य कधीच उच्चारू नका.
सहा महिन्यांपर्यंत बाळाला फारसा आपपरभाव नसतो. त्याच्याशी हसून बोलणाऱ्या परक्या माणसालाही ते हसून प्रतिसाद देतं. त्यानंतर मात्र अनोळखी माणसाला बाळ तेवढं पटकन् स्वीकारत नाही. काही बाळं तर चक्क बावरतात, रडकुंडीला येतात. आईला घट्ट चिकटतात. याला ‘स्ट्रेंजर एन्क्झायटी’ म्हटलं जातं. आईने एकीकडे बाळाला जवळ घेऊन कुरवाळावं, एकीकडे शांत मैत्रीपूर्ण आवाजात त्या परक्याशी बोलणं चालू ठेवावं. हळूहळू बाळही रिलॅक्स होईल. मोठय़ा माणसांनीसुद्धा दिसेल त्या बाळाला एकदम उचलून घेणं योग्य नाही. ते त्या बाळावरचं अतिक्रमणच होतं.
स्वत:च्या शरीराची ओळख हीसुद्धा बाळासाठी तेवढीच महत्त्वाची. आरशात आपलं प्रतिबिंब बघितलं की, बाळाला खुद्कन हसू येतं. स्वत:चे फोटोसुद्धा त्याला ओळखायला येतात. स्वप्रतिमा तयार होते आणि तिच्यावर बाळाचं प्रेमही असतं. ‘डोकं कुठंय?’, ‘नाक कुठंय,’ ‘दात दाखव’ असले खेळ त्याला आवडतात. बाही अडकवताना हात दे म्हटलं की हात पुढे येतो. बाहेर जायच्या वेळी बूटमोजे घालताना पटापट पावलं पुढे केली जातात. ‘अरंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी’ सारखे खेळ किंवा ‘लिटल थंबकिन व्हेअर आर यू?’ सारखं बडबडगीत बाळाला त्याच्याच हाताची, बोटांची ओळख करून देतं.
७-८ महिन्यांच्या बाळाला सर्वात काय आवडत असेल तर इतर छोटय़ांना बघायला. त्यांच्यामध्ये घुसून खेळण्याइतकं  ते मोठं नसतं पण त्यांच्याकडे बघत बसायला त्याला खूपच आवडतं. अंगणात, मैदानात किंवा पार्कमध्ये मनसोक्त खेळणारी, झोके घेणारी, घसरगुंडीवरून जोरात खाली येणारी, ट्रिंग ट्रिंग वाजवत सायकल चालवणारी, बॅट-बॉलनी खेळणारी मोठी मुलं थोडी जरी जवळ आली तरी बाळाचा चेहरा फुलून येतो.
बाळ रांगायला किंवा धरून चालायला लागलं की ते अशा मोठय़ा मुलांच्यात जायला बघतं. त्यांच्या मागे मागे फिरतं. हालचालींवर नियंत्रण नसल्यानं वरचेवर पडतंसुद्धा. एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीला सर्व वयाची मुलं जमून खेळायला लागली की छोटय़ांचा चेहरा बघावा. त्याच्याही नकळत ते मुलांची एकमेकांशी चाललेली मस्ती निरखून पाहत असतं.
घरी पाहुण्या आलेल्या मोठय़ांपेक्षा छोटय़ा मुलांकडे बाळ सहज आकर्षित होतं. अशा प्रसंगांतून बाळाला मैत्री, समाजात वावरणं समजायला सुरुवात होते. आपली खेळणी पाहुण्या मुलांनी हाताळलेली बऱ्याच बाळांना आवडत नाही. त्यांचा चेहरा गोरामोरा होतो. अशा वेळी आईनं चतुराईनं दुसरं खेळणं पुढं केलं पाहिजे. त्यानं भोकाड पसरायच्या आत बाबांनी त्याची आवडती वस्तू दाखवायला त्याला नेलं पाहिजे. ९ महिने ते वर्ष बाळाला बोलता येत नसलं तरी आईचं बोलणं बऱ्याच अंशी समजतं. ‘मला दे तुझी बाहुली’, ‘तो बॉल टाक माझ्याकडे’ अशी सवय आधीपासून असेल तर बाळ दुसऱ्याला खेळणी देताना एवढं नाराज होणार नाही.
ठरावीक वेळेला बाळाला खेळायला बाहेर घेऊन जाणं इष्ट असते. अशा वेळीच त्याची गाठ त्याच्याएवढय़ा मुलांशी पडते. भिडस्त, खेळकर, खोडकर, दंगेखोर, मारकुटय़ा अशा सगळ्या प्रकारच्या मुलांशी त्याचा संबंध येतो. आई-बाबांनी अशा वेळी प्रेक्षकाची भूमिका घ्यायची असते. एखाद्या मुलाला (मग ते तुमचं असो की दुसऱ्याचं) इजा होत नाहीये ना एवढंच पाहायचं असतं. मोठेपणी जोडल्या जाणाऱ्या घट्ट मैत्रीचं बीज बालपणी जोपासलेल्या मैत्रभावामध्ये लपलेलं असतं.
पाळणाघरातल्या मुलांना आपोआपच ही मित्रत्वाची भावना लवकर निर्माण होते. दिवस दिवस ज्यांच्या संगतीत घालवायचे त्यांच्याविषयी साहजिकच ममत्व वाटू लागतं. पाळणाघराला सुट्टी असेल तर एकमेकांवाचून करमत नाही. वेगवेगळी पाश्र्वभूमी असलेल्या, वेगळ्या भाषा बोलणाऱ्या घरातल्या बाळांचं एकत्र येणं हे त्यांचं व्यक्तिमत्त्व अधिक फुलवतं, अधिक समृद्ध करतं, अशी बाळं न शिकवता बहुभाषक झाल्याचं दिसून येतं.
काही बाळं स्वभावत:च अंतर्मुख असतात. पार्टी, पिकनिक यातून घरी गेल्याखेरीज त्यांना चैन पडत नाही. गर्दीतला कोलाहल त्यांना मानवत नाही. एकेकटय़ाने शांतपणे खेळत बसणं त्यांना मनापासून आवडतं. एकांतात रमण्याच्या या स्वभावधर्माचा आई-बाबांनीही आदर केला पाहिजे. त्याला त्याच्या स्वत:साठी खास वेळ घेण्याची संधी दिली पाहिजे. अंतर्मुख बुजरं मूल गर्दीला घाबरतं, बुद्धीने जड असतं, समाजात वावरायला सक्षम नसतं असं समजू नका. अशी मुलं जास्त एकाग्रतेने काम करू शकतात, संगीत, गणित, मूलभूत संकल्पना विकसित करण्यात जास्त यशस्वी होतात असं दिसून आलं आहे. त्यांच्यावर जबरदस्तीने गर्दी लादू नका. त्यांना स्वत:ला ठरवू दे कुणाच्या सहवासात त्यांना चांगलं वाटतं, कुणाचा स्पर्श त्यांना हवासा वाटतो. मोजकेच पण अगदी जवळचे मित्र करण्याची कुवत अशाच बाळांमध्ये असते.
मित्रभाव ही माणसामाणसांमधली सर्वात सुंदर भावना आहे. आपुलकी, विश्वास, प्रेम आणि सुरक्षितता जागवणारी. छोटय़ा बाळाला मोठय़ांच्या जगाशी जुळवून घ्यायला समर्थ बनवणारी. कोवळ्या आई-बाबांनो, आपल्या बाळाला असे अनुभव द्या की हा मित्रभाव आपल्या बाळातही जागृत होईल.    
drlilyjoshi@gmail.com
(या अंकात पूर्वनियोजित ‘कळसाआधी पाया’ या सदराऐवजी ‘कोवळ्या आई-बाबांसाठी’हे सदर प्रसिद्ध करत आहोत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For small childrens mom and dad

ताज्या बातम्या