मैत्री. नात्याचा गोफ गुंफणारा एक सुंदर शब्द. ज्यांच्या आयुष्यात हा शब्द प्रत्यक्षात येतो ते सर्वसुखी. मैत्री या शब्दातच पावित्र्य आहे.. निस्वार्थीपणा आहे, त्याग आहे.. पण त्याही पलीकडे जाऊन एकमेकांसाठी असणं आहे.. हे असणंच तुम्हाला जगायला प्रेरणा देतं.. कुणी तरी आपलं आहे आणि आपण कुणाला तरी हवे आहोत, कुठल्याही स्वार्थाशिवाय, ही भावनाच आपलं जग सुंदर करून टाकते. आयुष्यातल्या सुखाच्या क्षणी आणि दु:खाच्या क्षणीही पहिल्यांदा आठवते ती तीच व्यक्ती, ज्याच्या समोर ना काही लपवावंसं वाटतं..ना काही लपून राहतं. ज्याच्यासमोर आपण १०० टक्के आपण असतो, कुठल्याही मुखवटय़ांशिवाय! ती मैत्री..काळाच्या कसोटीवर उतरलेली.. आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असणं हे भाग्यच.. अशा भाग्यवंतांना सलाम! आणि उद्याच्या जागतिक मैत्री दिनानिमित्ताने तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येवो, अशी प्रार्थना करतानाच, तुम्ही कुणाच्या तरी आयुष्यातील अशी व्यक्ती व्हाल यासाठी शुभेच्छा!
या मैत्रीदिनानिमित्त हा खास लेख. एका मित्राचा किंवा एका मैत्रिणीचा नव्हे, तर जवळजवळ ४० वर्षे एकत्र असणाऱ्या ४० मित्रमंडळींचा.
१२ मित्रांची अभेद्य मैत्री पुढे त्यांच्या जोडीदारणींनी आणि नंतर त्यांच्या मुलांनीही अखंडपणे पुढे नेली. आज या मैत्रीच्या बेटांना उपबेटंही लाभली आहेत आणि या मैत्रीचा हा झरा अखंडपणे वहातच राहणार आहे. मैत्री टिकवण्यासाठी काय करायला हवं आणि काय नको याचा अप्रत्यक्षपणे धडा देणारी ही मैत्रीची चित्तरकथा, तुमच्याही आयुष्यात अशा मैत्रींची बेटं निर्माण करो हे सांगणारी.. उद्याच्या (४ ऑगस्ट) जागतिक मैत्री दिनानिमित्त..
अलीकडचीच गोष्ट. कसलीशी सुट्टी होती म्हणून अगदी ठरवून ‘बदलापूर ते विरार’मध्ये विखुरलेल्या त्या दहा जणी ठाण्याला दीपाच्या घरी जमल्या. नवरा, मुलं, संसार हे सगळं विसरून ती दुपार मस्त एन्जॉय करायची असं आधीच ठरलं होतं. गप्पा, गलका, चहाटळपणा यांना नुसता ऊत आला. जोडीला उदरभरण हा अनिवार्य घटक होताच. त्यांचा तो जल्लोष एकमेकींच्या गळ्यात पडणं.. सगळं असं की जणू अनेक वर्षांनी भेटलेल्या बालमैत्रिणीच. पण गंमत अशी की लग्न होईपर्यंत त्या एकमेकींना ओळखतसुद्धा नव्हत्या. सर्वाना जोडणारा फक्त एकच धागा तो म्हणजे त्यांच्या जोडीदारांची एकमेकांशी असलेली अनेक वर्षांची घट्ट मैत्री. त्याचाच आधार घेऊन यांनीही गेली जवळजवळ ४० वर्षे आपल्याही मैत्रीचा गोफ विणलाय.
भेटीच्या पहिल्या आवेगाचा थोडा निचरा झाल्यावर जुने फोटो बघण्याची टूम निघाली. दीपाच्या नवऱ्याला फोटोग्राफीची प्रचंड आवड असल्याने आपल्या मैत्रीच्या इतिहासातील अनेक क्षण त्याने जतन करून ठेवलेत हे सर्वानाच माहीत होतं. फोटो पाहताना आठवणींच्या घंटा वाजायला लागल्या. बरेचसे फोटो ग्रुप पिकनिकचे. फोटोत रबर बँडने केसांचे छोटे छोटे ‘बो’ बांधून बसलेल्या पुरुषांची रांग बघून स्वाती म्हणाली, ‘‘मला तर वाटलं होतं, एका मिनिटात नवऱ्याच्या केसांचे जास्तीत जास्त बो बांधण्याच्या त्या स्पर्धेत दीपाच जिंकणार.. तिच्या अहोंचे केस कुरळे आहेत ना. रबर बँड नुसता टाकला तरी अडकणार! पण नवलंच घडलं नै! डोक्यावर अर्धचंद्र मिरवणाऱ्या खाडिलकरच्या स्वातीने पटापट होते नव्हते ते केस बांधून बाजी मारली. ‘‘पण नंतर ते केस सोडवताना अर्धचंद्राचा पूर्णचंद्र होतो की काय या भीतीने गर्भगळित झाले होते, माहितीए ना!’’ स्वातीच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ.. आठवणींतून अनेक वर्षांपूर्वीचे ते प्रसंग पुन्हा जिवंत होत होते..
फोटोतून अजरामर झालेले सर्व खेळ अनुजाच्या सुपीक डोक्यातून निघालेले. उदा. दिलेल्या वेळात पुरुषांनी साडी, कानातलं, गळ्यातलं, बांगडय़ा असा जामानिमा करणं तर बायकांनी शर्टपॅण्ट चढवून ‘टाय’ बांधणं, झालंयच तर एकेका जोडीने आलेल्या चिठ्ठीप्रमाणे प्रपोज, एंगेजमेंट, लग्न, घटस्फोट.. असे प्रसंग हावभावांनी दाखवणे इ. इ. (खरं सांगायचं तर होममिनिस्टरच्या क्रिएटिव्ह टीने टय़ूशन लावावी इतकी सामग्री तिच्यापाशी आहे.)
खाणं आणि बोलणं हा जन्मसिद्ध हक्क पुरेपूर बजावल्यानंतर निरोप घेताना पुढच्या भेटीचा वायदा ठरला. परतीच्या वाटेवर मनाला दिवसभराच्या गप्पांच्या गोडव्याची सोबत होतीच..
आज चहुअंगांनी बहरलेल्या या मैत्रीच्या वृक्षाचं बी रुजलं तो दिवस होता ५ जुलै १९७५. अकरावी शालान्तच्या शेवटच्या बॅचचे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले १२ विद्यार्थी याच दिवशी माटुंग्याला ‘व्ही.जे.टी.आय.’ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या निमित्ताने एकमेकांना भेटले आणि हळूहळू त्यांचा ग्रुप बनला. त्या वेळी या मुलांना कल्पनाही नव्हती की हे नातं पुढे इतकं जिवापलीकडचं
होणार आहे म्हणून. त्या दिवसापासून थोडीथोडकी नव्हे, तर तिचे गणगोत पार पुढच्या पिढीपर्यंत पसरलं. संजय खाडिलकर, प्रदीप नाईक, प्रदीप तेंडुलकर, प्रदीप खोत, अरुण राजगुरू, दीपक पाटील, प्रमोद वागळे, वसंत जाधव, चंद्रहास लाड, चंद्रकांत भोगले, सुनील साने व विनय महाडेश्वर हे ते १२ जण.
यातील शेवटचे दोघे परदेशी स्थायिक झाल्याने शरीराने लांब आहेत एवढंच. पण इथले दहा, त्यांच्या बायका, मुलं मिळून लहानमोठय़ा ४० जणांचा ग्रुप म्हणजे मैत्रीचे एक अनन्यसाधारण प्रतीक आहे. या सर्व मित्रांचा कॉमन वीक पॉइंट म्हणजे व्ही.जे.टी.आय.च्या आठवणी.
प्रवेश घेतला तेव्हा या बारांपैकी तिघे होते मुंबईबाहेरचे. साहजिकच त्यांनी कॉलेजबरोबर हॉस्टेललाही प्रवेश घेतला होता. त्यांच्या खोल्यातच बाकी सर्व पडीक असायचे. टेबल टेनिस, कॅरम, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, एन. सी. सी., कॉलेजचं गॅदरिंग.. सर्वच ठिकाणी यांची मक्तेदारी. (खरं तर दादागिरीच). अभ्यासाची पण यांची एक
खास पद्धत होती. प्रत्येकाने एकेकच चॅप्टर तयार करायचा आणि शॉर्टकट्स बाकीच्यांना सांगायचे अशा सहकार पद्धतीमुळे अभ्यासाचंही टेन्शन नसायचं.
कॉलेजच्या दिवसात जवळ पैसे नसतानाही कशी मज्जा केली ते सांगताना प्रमोद वागळे म्हणाला, ‘आमच्या खिशात तेव्हा जेमतेम दोन नाहीतर तीन रुपये असायचे. पण सगळ्यांना ट्रेकिंगची जबरदस्त क्रेझ. मग एका शनिवारी ठरवून शेवटच्या गाडीने नेरळला गेलो, अर्थात विदाउट तिकीट. स्टेशनवर चहा आणि बनपाव खाऊन माथेरानचा डोंगर चढायला सुरुवात केली. भरपूर तंगडतोड झाल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले. तितक्यात समोर ‘माणिक लॉज’ ही पाटी दिसली. त्या हॉटेलच्या मालकाला आम्ही असा काही पटवला की त्याने आम्हा सर्वाची राहण्या-खाण्याची चकटफू व्यवस्था तर केलीच, शिवाय त्या जिंदादिल माणसाच्या कृपेने पुढचे कित्येक शनिवार-रविवारसुद्धा आम्हा डझनभर मित्रांचा पत्ता, ‘माणिक लॉज, मु. पो. माथेरान हाच होता. तिथल्या तुपात भिजलेल्या पुरणपोळ्यांच्या आठवणीने आजही जीभ हळहुळते.’
या बारातील चारजण गिरगावकर, फडकेवाडीतील गणपतीवर त्यांची प्रचंड श्रद्धा. या गणेशभक्तांनी कॉलेजच्या पहिल्याच वर्षी बाकीच्या मित्रांना घेऊन ‘टिटवाळ्याच्या गणपतीला’ जायचं ठरवलं. ही या मित्रांची पहिलीवहिली ग्रुप पिकनिक. विघ्नहर्त्यांने आशीर्वाद दिला आणि नंतर हे नाते अधिकच गहिरं होत गेलं. त्या वर्षांपासून म्हणजे १९७५ पासून दरवर्षी एकतरी एकत्रित सहल करायची हा नेम सुरू झाला. त्यात गेल्या ३८ वर्षांत एकदाही खंड पडलेला नाही. निघायची तारीखही फिक्स. २५ डिसेंबर!
इंजिनीअर होऊन मार्गस्थ झाल्यावर एकाचे दोन, दोनाचे तीन असा ग्रुप वाढायला लागला. त्या ५-६ वर्षांच्या संक्रमण काळात काही बॅचलर होते तर काही लेकुरवाळे. पण या गोष्टींचा ना त्या मित्रांना फरक पडला, ना त्यांच्या बायकांना. सुरुवातीला नव्या नोकऱ्या, वाढत्या जबाबदाऱ्या त्यामुळे खिशात जास्त पैसे नसत. त्यावेळी या मंडळींनी एस. टी. ने किंवा रेल्वेच्या सर्वसामान्य डब्यातून प्रवास केला. साध्याशा हॉटेलात मुक्काम केला. अगदी दोनच खोल्या मिळाल्या तेव्हा एकात पुरुष तर दुसऱ्यात बायका व मुलं अशी विभागणी केली, पण एकत्रित फिरणं काही सोडलं नाही. आता परिस्थितीने कूस पालटलीय. प्रत्येकाजवळ स्वत:ची गाडी आहे. विमानाने उडणंही शक्य आहे आणि पूर्वीची गळामिठी तशीच शाबूत आहे.
ग्रुपमध्ये फाटाफूट होण्याचं कारण बरेचदा पैसा हेच असतं. तसे होऊ नये म्हणून त्यांनी सुरवातीपासूनच एक नियम केलाय आणि तो कसोशीने पाळलाय. तो असा, ट्रीपचा संपूर्ण खर्च कुणा एकाने करायचा आणि बाकीच्यांनी फक्त ‘किती द्यायचे’ एवढाच प्रश्न विचारायचा. अनेकदा मिश्र ग्रुपमध्ये जे दृश्य दिसते ते म्हणजे पुरुषांचा पत्त्याचा अड्डा बसलाय आणि बायका शॉपिंगमध्ये नाहीतर गॉसिपिंगमध्ये बुडाल्यात यावर इथे सपशेल फुली आहे. जी काही धमाल करायची ती सर्वानी मिळून. म्हणून तर पुढच्या पिढीचाही यांच्याबरोबर जाण्यातला इंटरेस्ट टिकून राहिलाय. नुकताच साउंड इंजिनीयर झालेला रोहन नाईक म्हणाला, ‘‘वयाने मोठे म्हणून यांना काकाकाकू म्हणायचं, पण खरं तर बाबांचा ग्रुप म्हणजे आमच्याच ग्रुपचं एक्स्टेन्शन वाटतं.’’
मैत्रीचा हा संस्कार पुढच्या पिढीतही उतरलाय. नोकरीनिमित्त पुण्यात राहणाऱ्या नितीश राजगुरूने तिथेही आपला स्वतंत्र ग्रुप करून एकत्रित भटकणं सुरू केलंय. १२वीत शिकणाऱ्या स्वप्निल पाटीलचाही २२ मित्रांचा ग्रुप आहे आणि रोज एकदा तरी कट्टय़ावर भेटल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मुख्य बेटातून मैत्रीची अशी नवी नवी उपबेटं तयार होऊ लागलीत.
जवळजवळ चार दशकांच्या मैत्रीच्या कालखंडात हृदयाशी गाठ मारून ठेवावेत असे अनेक प्रसंग घडलेत. अगदी सुरुवातीच्या काळातील एक अनुभव सुषमाने सांगितला. ती म्हणाली, ‘‘माझा सिद्धेश तेव्हा जेमतेम ९/१० महिन्यांचा होता. आम्ही कर्जतच्या आसपास कुठेतरी गेलो होतो. त्या रात्री तो किंचाळून, किंचाळून रडायला लागला. काही केल्या थांबेना. त्याला काय होतंय ते कोणालाच कळेना. त्याचं ते रडणं ऐकूण सगळेच कासावीस झाले. जवळपास कसलीही सोय नव्हती. इतक्यात आमचं काळजीवाहू सरकार दीपक पाटील याने आपल्या पाऊचमधून पुदिनहरा काढली आणि म्हणाला, ‘ही फोडून आतला रस चाटव त्याला.’ काय आश्चर्य तसं केल्यावर थोडय़ाच वेळात गॅस जाऊन माझं बाळ हसायला लागलं. आज तो ९ वीत आहे पण तेव्हापासून त्याला ‘पुदिनहरा’ हेच नाव पडलंय.’’
पूजानेही आठवणीचा कप्पा उघडला.. सांगू लागली. ‘‘चार वर्षांपूर्वी माझे सासरे १० दिवस व्हेंटिलेटरवर होते. आमचे तर हातपाय पार गळून गेले होते. त्या वेळी हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेल्या प्रदीप नाईक व दीपक पाटील या आमच्या मित्रांनी घरच्या सगळ्यांना एकत्र करून जो धीर दिला त्या शब्दांची आजही ऊब वाटते..’’
प्रत्येकाजवळच आठवणींचा खजिना होता. अनुजा राजगुरू म्हणाली, ‘‘एका सहलीत खेळता खेळता आमच्या यांना अचानक घेरी आली. खेळ थांबला. वातावरण बदललं. लगेच पॅकअप करावं लागलं. पण सगळे पाठिशी उभे राहिले. अशा प्रसंगात तर अशा आधाराची गरज असते.’’ हे सांगतानादेखील तिला भरून आलं होतं.
हे सगळं ऐकत बाजूला बसलेल्या हर्षदालाही राहावलं नाही. म्हणाली, ‘‘गेल्याच वर्षीची गोष्ट. मला कॅम्पस इंटरव्ह्य़ूमधून इन्फोसिसमध्ये नोकरी मिळाली आणि कंपनीने लगेचच बंगलोरला ट्रेनिंगसाठी पाठवलं. आणि नेमका इथे आई-बाबांच्या लग्नाचा २५वा वाढदिवस. मी बुके व भेटवस्तू पाठवली इथून, पण आपण तिथे असायला पाहिजे होतं ही जाणीव चैन पडू देत नव्हती. पण गंमत म्हणजे त्या दिवशी बाबांचं सगळं मित्रमंडळ न सांगता-सवरता अकस्मात घरी आलं आणि माझी गैरहजेरी त्यांनी भरून काढली. त्या आनंदाच्या क्षणांची भरपाई होऊच शकत नाही.’ इतक्या वर्षांत काही मतभेद..निदान किरकोळीत तरी.. या प्रश्नावर डोकं खाजवूनसुद्धा कोणालाच काही आठवेना, तेव्हा तर या मंडळींची मीठ-मोहऱ्यांनी दृष्टच काढावीशी वाटली.
आज हे सर्व मित्र पन्नाशीच्या तळ्यात-मळ्यात आहेत. त्यामुळे सेलिब्रेशनसाठी नवं निमित्त मिळालंय. शिवाय दरवर्षी नाईकांच्या घरच्या पाच दिवसांच्या गणपतीतील एक दिवस या मित्रमंडळासाठी राखलेला असतो. त्या दिवसाची महाआरती व महाप्रसाद कोणी चुकवत नाही.
‘‘आमची मैत्री इतकी वर्षे अबाधित राहण्याचं श्रेय आमच्या बायकांचं ..’’ सर्व पुरुष वर्गाचं यावर एकमत आहे. यावर स्त्री वर्ग म्हणतो, ‘‘हे सगळे जेव्हा एकत्र बसून गप्पा मारताना एकमेकांत इतके विरघळतात की आम्हाला त्यांचा हेवाच वाटतो.’’ पण खरंच समस्त महिला वर्गाचं एकमेकींशी अगदी गुळपीठ आहे. सुरुवातीच्या किश्श्याप्रमाणे त्या स्वतंत्रपणेही मजा करतात. वैशाली म्हणाली की, माझा नवरा तर कामानिमित्ताने सतत बाहेर असतो, पण मी निर्धास्त असते. कारण हाक मारल्याक्षणी कोणी कृष्णसखा नाही तर सखी धावत येणार याची मला आणि त्याला पक्की खात्री असते, आहे.
आयुष्यात असं सख्य जपणाऱ्या व्यक्ती आपल्यापाशी असणं हेच तर मैत्रीचं फलित असतं!

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप