scorecardresearch

सोयरे सहचर : फ्रॉइड नावाचं विश्व!

‘‘अरे फ्रॉइड इकडे ये ना.. माझ्याजवळ बैस सोफ्यावर.. थंडी वाजणार नाही मग तुला’’

सोयरे सहचर : फ्रॉइड नावाचं विश्व!

‘‘जिमी, पिंटय़ा, लाडी आणि इतर अनेक कुत्र्यांच्या सहवासानंतर माझ्या आयुष्यात आलेला फ्रॉइड वयानं तसा लहानच, पण खूप जाणता! घरात मी कितीदा बोलवूनही ढिम्म न हलता आरामात पडून राहाणारा फ्रॉइड बाहेर फिरायला गेल्यावर दर काही पावलांनी मागे वळून मी सुखरूप आहे ना, याची खात्री करून घेतो! त्याच्याबरोबर फुलणारं मैत्र फार तर बारा-चौदा वर्षांचं असणार आहे याची मला जाणीव होते आणि त्याबरोबरच त्यातला प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे याचीही.. माझं पूर्ण विश्वच आता ‘फ्रॉइडमय’ झालंय!’’ सांगताहेत होमिओपॅथी, मानसोपचार व लैंगिक समस्याविषयक तज्ञ डॉ. ऊर्जिता कुलकर्णी.

‘‘अरे फ्रॉइड इकडे ये ना.. माझ्याजवळ बैस सोफ्यावर.. थंडी वाजणार नाही मग तुला’’
स्वयंपाकघराच्या टेबलाखालून माझ्याकडे टक लावून बघत बसलेल्या फ्रॉइडशी मी बोलतेय हा लेख लिहिताना.. तो नेहमीप्रमाणे कानांची टोकं हलवून त्याला ऐकू आलंय हे दाखवतोय. जागेवरून तसूभरही न हलता, डोकं त्याच्या दोन हातांच्या किंवा पुढच्या पायांमध्ये खुपसून शांतपणे पडून आहे..
त्याच्या मस्तकाएवढंच- त्याचं कपाळ- त्याचं काळं कुळकुळीत विदूषकाच्या गोळय़ासारखं नाक. इवलासा असलेला फ्रॉइड अचानक असा महाकाय कसा काय झाला, हा प्रश्न त्यालाच मी अनेकदा विचारते. खेळताना, चालताना, शेजारी नुसतंच बसल्यावर त्याचं तोंड हातात घेऊन त्याच्या मनसोक्त पाप्या घेताना, त्याच्या गहिऱ्या पिंगट, किरमिजी, चॉकलेटी डोळय़ांत खोलवर बघत, त्याचा म्हणून असलेला एक सुवास आपल्यात भरून घेताना, ‘‘कधी मोथी झाली तू? माझी छोटी.. कशाला मोथी झाली गं तडी!’’ असं बडबडताना फ्रॉइड मात्र एक सुस्कारा सोडत, ‘आता ही वेडी बाई वाट्टेल ते बडबडेल’ असा काहीसा विचार करत, मला चक्क वेडय़ात काढत असावा. खूप हसू येतं या सगळय़ाचं. महत्त्वाचं, फ्रॉइडच्या अस्तित्वाबद्दल अतिशय कृतज्ञ वाटत राहातं.

फ्रॉइड माझा दीड वर्षांचा जर्मन शेफर्ड कुत्रा. माझा सखा, सवंगडी, सोबती. इंग्रजीत म्हणतात तसा माझा ‘सोलमेट’! प्रश्न इतकाच पडतो, की त्यानं ही सोबत निवडायला इतका वेळ का लावला असावा?
प्राणी-पक्षी-निसर्ग यांचं वेड जन्मत:च बहुतेक प्रत्येकाला असतं. बालवाडीत जाण्याच्या आधीच्या वयापासून मलाही कुत्री, मांजरं, पक्षी, यांचा प्रचंड लळा होता आणि आहे. आम्ही राहायचो त्या ठिकाणी दोन गलेलठ्ठ जर्मन शेफर्ड कुत्री असायची ‘जिमी’ आणि ‘पिंटय़ा’. त्यांच्या अंगावर बसून राहात्या जागेला फेरफटका मारणं दोघांच्या अंगावर अंग टाकून लोळत राहाणं, पकडापकडी खेळणं, त्यांना फुलं गोळा करायला नेणं, मी इतर मित्रांशी खेळून येईपर्यंत त्यांना माझी नेहमीची बाहुली, बास्केट इत्यादींची राखण करत बसवणं आणि परत आल्यावर खूप पाप्या देऊन त्यांना कुरवाळणं, असेच दिवस संपायचे. या दोन्ही कुत्र्यांची खासीयत म्हणजे हे अतिशय तिखट, रागीट. भल्याभल्यांची नुसत्या भुंकण्यानं भीतीने गाळण उडवणारे. सगळीकडे शिकारी कुत्री म्हणून प्रसिद्ध असणारी ही जोडगोळी माझी मात्र खास दोस्त मंडळी. मी एकटीच चुकूनही त्या बंगल्याचं मोठं फाटक उघडून किंवा त्याच्या फटीतून बाहेर जायला लागले, तर माझे कपडे धरून मला परत आणून, गुपचूप इथे खेळ असं सांगत जिमी आणि पिंटय़ा आजूबाजूला उडय़ा मारत राहायचे. खरंतर ही दोन्ही कुत्री आम्ही जिथे राहायचो त्या घरमालकांची. दोस्ती मात्र माझ्याशी!

त्यानंतरच्या शालेय आयुष्यात लपवून मांजरांना घरात घेणं, त्यांच्या पिल्लांना वेगवेगळय़ा रिबिनी बांधणं, बाबांकडून हट्टानं माळय़ावरचं कशाचं तरी खोकं खाली काढून घेऊन त्यात त्यांच्यासाठी सुंदर, आरामदायक, मऊसूत घर बनवणं, हे माझे आवडीचे उद्योग. तशीच गंमत कोंबडीच्या ‘चू-चू’ करत दोन घरांच्या मधल्या जागेतून आडव्यातिडव्या पळणाऱ्या पिल्लांची. कोंबडी काही पिल्लांच्या जवळ फारशी येऊ देत नसे. लगेच कांगावा करत, पंख फडफडवत मागे येई. तिला चुकवून, भल्या थोरल्या टोपल्याखालून पिल्लं काढून, ती मांडीवर घेऊन बसणं म्हणजे सुख असायचं. कोंबडीबाईंची चाहूल लागली, की गडबडीत टोपलीखाली ती पिल्लं पुन्हा ठेवायच्या धावपळीत सगळीच पिल्लं बाहेर येऊन सैरावैरा धावत सुटायची!

एकदा आमच्या अतिशय छोटय़ाशा घरात एक पोपट चुकून उडून आला. बहुतेक कोणीतरी पाळलेला असावा. त्याला धड उडता येत नव्हतं. त्याची शुश्रूषा करताना एक लक्षात आलं, की पक्ष्यांना कधीच पिंजऱ्यात ठेवून पाळायचं नाही. त्यामुळे मोठय़ा सामायिक गच्चीत येणारे अनेक पक्षी पाळल्यासारखेच वाटायला लागले. त्यांना ठरवीक वेळेत दाणे, धान्य असं ठेवताना मी त्यांची वाट बघत बसायची. ते आले, की हळूच पाण्याचं भांडं पुढे नेऊन ठेवायचं. तेवढाच मला त्यांना कधीतरी हात लावता यायचा. मावशीकडच्या म्हशी, गाई, बैलजोडी यांचा सहवाससुद्धा उबदार असायचा. पुढे कितीतरी ठिकाणी कुत्री, मांजरी सखे-सोबती झाले. त्यांपैकी लाडी ही एक कुत्री अनेक र्वष सख्खी सोबतीण होती. लाडी संपूर्ण सोसायटीची राखणदार. पण आम्ही तिथे राहायला लागल्यापासून ती केवळ आमच्या घरापाशी रेंगाळायला लागली. त्याचं साधं कारण, तिला दोन वेळेस मिळणारी गरमागरम भाकरी आणि भरपूर लाड! लाडी त्या वेळेस कदाचित ४-५ वर्षांची असावी. मी शाळकरी किशोरवयात. शाळेतून परत येताना मी कितीही लांबवर असले तरीही लाडी पळत येऊन सायकल गाठायची. सायकलीबरोबर हळूहळू पळत यायची. अनेकदा लाडीच्या अंगावरचे किडे, गोमाशा, गोचीड मी काढत असे. त्याची घाण, किळस असं कधीच वाटलं नाही. आजच्या भाषेत ती ‘स्ट्रे-डॉग’च. त्यामुळे तिला कुणीच घरात घ्यायचं नाही. अपवाद आमच्या घराचा. आमचं शहर लातूर. किल्लारीचा फार मोठा भूकंप झाला त्या रात्री लाडीनं घराभोवती फेऱ्या मारायला, मोठय़ा आवाजात रडायला सुरुवात केली. कुत्र्याचं रडणं म्हणजे काहीतरी अशुभ, असं मानणाऱ्या कितीतरी लोकांनी तिला हाकललं. मग ती आमच्या घराच्या व्हरांडय़ात बसून राहिली. मध्यरात्री मोठा भूकंप झाला, तेव्हा लाडी टक्क जागी. आम्ही घरातले सर्वजण सुखरूप बाहेर आलो तेव्हा तिला कोण आनंद झाला होता! तेव्हा आई म्हणाली, ‘‘हिला काळजी वाटत होती, म्हणूनच ओरडत होती बिचारी. शहाणी गं लाडी!’’ आईनं तिला कुरवाळलं तेव्हाचे लाडीचे डोळे आजही आठवतात.
पुढे ते घर सुटलं. तरी दरवर्षी एखादी चक्कर लातूरला होत असे. मग मी त्या भागात जाऊन तिला जोरात हाक मारत असे, ‘लाडी..!’ ती असेल तिथून धावत येत असे. ती गेल्याचं कळलं तेव्हा अर्थातच प्रचंड वाईट वाटलं. मग मी माझ्या सायकलचं नाव लाडी ठेवलं. ते घर सोडताना तिनं आमच्याबरोबर यावं म्हणून मी तिला खूप विनवलं होतं. मात्र ती शहाण्या मुलीसारखी सामानानं भरलेल्या ट्रककडे पाहात, निरोप द्यायला थांबून राहिली होती.
आपल्याकडे सोबतीला कुत्रं पाहिजेच असं तेव्हापासून वाटायचं. जानेवारी २०२१ मध्ये छोटूसा फ्रॉइड घरी आला. तेव्हाही माझ्या मनात जिमी-पिंटय़ा, लाडी, काळू, जिमी-ज्युनिअर असे माझे सगळे दोस्त होते. जिमी-पिंटय़ाच्या आधीच्या सहवासामुळे आपण जर्मन शेफर्ड पाळायचा, हे कधीच ठरलं होतं. फ्रॉइड घरी आला तेव्हा त्याला कसं शिकवायचं, शिस्त कशी लावायची, थोडक्यात ‘ट्रेन’ कसं करायचं हे काहीही ठाऊक नव्हतं. तिथेच या पाळीव प्राण्यांच्या बाबतीतलं मोठं उद्योगजगतही समोर आलं. विविध प्रकारचे ट्रेनर्स, त्यांचं खाणं, त्यांना लागणाऱ्या इतर बाबी, सगळय़ांच्याच उत्तम सुविधा! काही ठिकाणी प्रचंड बाजारीकरण. भांबावून गेले. मग कित्येक ‘डॉग-पॅरेंट’- अर्थात ‘पशू-पालकत्व’ स्वीकारलेले मित्रमैत्रिणी पुढे आले. यातून एक झालं, की हळूहळू फ्रॉइड आणि मी एकमेकांना शिकवू, समजावून घेऊ, हा विश्वास निर्माण झाला. हे सगळंच आव्हान जणू मजा आहे असंच स्वीकारलं. महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्यग्र वेळापत्रकात त्याचं सगळं करणं जमेल ना, तो घरात एकटा कसा राहील, इत्यादी शंकाही मनात यायच्या.

त्याच्या आणि माझ्याही ट्रेनिंगचे सुरुवातीचे दिवस म्हणजे प्रचंड खेळ काम, संयम आणि महत्त्वाचं म्हणजे न संपणारं प्रेम यांनी बांधलेले. प्रत्येक कुत्र्याला काही ठरवीक बाबी शिकवणं गरजेचं असतं. त्याला ‘ओबीडीअन्स’ म्हणतात. त्यात कुत्र्यानं काही आज्ञा पाळणं महत्त्वाचं. जसं की, ‘सिट डाऊन’, ‘वॉक’, ‘स्टे’, ‘कम’- इत्यादी. त्यावर काम करत असताना त्याच्यासाठीच्या खास शिक्षकालाही बोलावलं. फ्रॉइड आणि माझं एकमेकांशी जमलेलं सूत बघून त्यानं आनंदानं सांगितलं, ‘‘डॉक्टर तुम्ही उत्तम शिकवताय. माणसांबरोबर तुम्हाला बहुतेक प्राण्यांची मनंही कळतायत वाटतं! तुम्हीच शिकवा.’’ ते कदाचित काही अंशी खरंही असावं. फ्रॉइडचं निरीक्षण करत, त्याला नेमकं काय सांगायचं, म्हणायचं असेल, त्याला काय हवंय, तो कशाला घाबरतोय का, त्याला कशाचा ताण आलाय का, कंटाळा आलाय की आता चिडलाय, आता मस्तीखोर मूडमध्ये आहे की उगाच छळतोय हे हळूहळू समजायला लागलं. आता आमच्या दोघांचंच एक जग आहे. त्यात इतर अनेकजण येऊन-जाऊन असतात.

फ्रॉइडसाठी म्हणून मी घरात काही बदलही करून घेतले. त्याला वरच्या मजल्यावरून खाली जाता यावं यासाठी खास व्यवस्था केली, खेळण्यासाठी जागा तयार करून घेतली. माझ्या घरून बाहेर पडण्याच्या, घरी परतण्याच्या वेळाही बदलल्या. त्याला खूप जास्त स्वातंत्र्य मिळावं (म्हणजे देणारे आपण कोण म्हणा! तरीही बंधनात टाकायला नको) हे तत्त्व सुरुवातीपासून पाळलं. त्यामुळे घरात आणि परिसरात अनभिषिक्त सम्राटासारखा त्याचा वावर असतो. अध्र्या तासापासून सुरुवात करत हळूहळू पाच-सहा तास किंवा क्वचित त्याहीपेक्षा जास्त तो एकटा राहू शकेल अशी सवय केली. फ्रॉइडनं माझे सगळे मित्रमैत्रिणी अक्षरश: चोरलेत! तो माझ्याबरोबर अनेक ठिकाणी येतो. सगळय़ांशी खेळतो. एखाद्या कॅफेत बसून मी कुणाशीतरी कामाचं बोलतेय, तिथे फ्रॉइड निवांत दोन तास झोपलाय, बसलाय किंवा खेळतोय असं चित्र असतं. जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यांना ‘वर्किंग ब्रीड’ म्हटलं जातं. त्यांच्या अंगातली रग जिरेल असे व्यायाम, खेळ, चालणं इत्यादी करावंच लागतं. त्याशिवाय त्यांना मानसिक उत्तेजना मिळेल असे खेळ, व्यायाम तयार करावे लागतात, करून घ्यावे लागतात. त्यातून त्यांची आवश्यक ती सकारात्मक दमणूक होते. त्यासाठी स्वत:ला शिस्त लावून घेणं महत्त्वाचं असतं. आमच्या दिवसाची सुरुवात दोनेक तास भरपूर खेळणं, चालणं यानं होते. तसंच संध्याकाळीसुद्धा. शिवाय लपाछपी, हे शोध-ते शोध, असलं काहीही आम्ही खेळत राहातो. प्रत्येक कुत्र्याच्या स्वभावाप्रमाणे ‘युअर डॉग, युअर होम- युअर रूल’ हे पाळावं लागतं. हे सगळं कितीही नेटानं करत असू, तरीही त्यांचं आजारी पडणं, छोटे-मोठे अपघात, यासाठीसुद्धा तयारी ठेवावी लागते. आमच्याच जवळपासच्या रस्त्यावरच्या दोन-तीन कुत्र्यांनी फ्रॉइड पिल्लू असताना त्याच्यावर दबा धरून हल्ला केला. दोनदा ती चावलीही. त्यामुळे त्याला रस्त्यावरच्या कुत्र्यांची भीती बसली. हे जसं लक्षात आलं, तसं त्याच्याबरोबर फिरायला जाणं अवघड झालं. सुरुवातीपासून इतर पाळीव कुत्र्यांबरोबर त्याला मोकळं सोडणं, योग्य पद्धतीनं मैत्री करवून देणं, हे सूत्र पाळलं होतंच. आता सगळीच रस्त्यावरची कुत्री वाईट नाहीत हे दाखवणं गरजेचं होतं. आता त्याचाच मोठा मित्रमैत्रिणींचा कळप तयार झालाय. सगळे रस्त्यावरचेच. शिरो, पीपी, ब्राउनी, लिओ, इत्यादी. फ्रॉइड या सगळय़ांशी रोज मनसोक्त खेळतो. अनेकांना आश्चर्य आणि काळजी वाटते. पण रस्त्यावरचं कुत्रं आणि घरचं कुत्रं हे सारखेच ना! अनेकदा ही कुत्री खायला, पाणी प्यायलाही येतात.

फ्रॉइडसह सहलीला जाण्यात भारी मजा असते. आम्ही एकदा नाशिकजवळ एका रिसॉर्टला सात-आठ दिवसांसाठी राहायला गेलो, तो तर फ्रॉइडसाठी जणू स्वर्गच. जवळपास नदी, धरण, पळायला चिक्कार जागा, भरपूर शेतं, अर्ध जंगल आणि राहायला आम्हा दोघांसाठीही उत्तम असलेलं कॉटेज! धरणाइतका मोठा जलाशय त्याच्यासाठी संपूर्ण नवीन. आम्ही तिथे पोहायला गेलो तेव्हा तो गोंधळून गेला. मात्र मी पाण्यात उडी टाकायचा अवकाश, त्यानंही लगेच उडी टाकली. माझ्याजवळ येऊन, माझे कपडे धरून मला बाहेर काढण्याच्या मागे लागला. त्याला समजावून सांगितलं, की मी बुडत नाहीये, मला धोका नाही, आपण मिळून मज्जा करू. मग आम्ही तासभर मजेत पोहून घेतलं.

वाटा लक्षात ठेवणं, पाणवठे शोधणं, यात फ्रॉइडचा हातखंडा. तिथल्या नदीवर तोच मला घेऊन गेला. त्याशिवाय जवळपासच्या टेकडय़ांवरही त्याला वाटा शोधात जाणं आवडतं. मात्र प्रत्येक २-३ फुटांवरून वळून मागे माझ्याकडे पाहाणं किंवा एका हाकेत परत येणं, हे तो बाहेर असताना कटाक्षानं पाळतो. घरी असताना दहादा हाक मारली तरी न येणारा फ्रॉइड बाहेर गेल्यावर इतका कसा आज्ञाधारक, हे कोडंच. त्याला कारण सोबत्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा कुत्र्यांचा उपजत स्वभाव. एखादी नवीन जागा सुरक्षित आहे ना हे पाहाण्याची धडपड. इथे एकमेकांवर असणारा प्रगाढ विश्वास महत्त्वाचा. काही घडलंच, तर त्यातून आपण सुखरूप बाहेर पडू हा विश्वास. आपण सुरक्षित आहोत या भावनेवरचा विश्वास. हे विश्वासाचं नातं तयार आणि घट्ट होत जातं. आपल्या दिनचर्येत हे पाळीव प्राणी अगदी मिसळून जातात. घरी असताना सतत बॉल घेऊन मागे येणारा फ्रॉइड मी आजारी असताना किंवा काहीतरी बिनसलंय हे कळलं की शांतपणे शेजारी येऊन बसतो, येऊन चाटत राहतो. जणू सांगतो, की सगळं छान होईल! हे असं कुणीतरी जिवापासचं असणं, त्यानं अशी काळजी वाहाणं हे शब्दातीत आहे. मला एकदा एक मानसोपचारतज्ञ म्हणाले होते, ‘‘तुझ्या कुत्र्याचं नाव फ्रॉइड. इतका राग आहे का तुला सिग्मंड फ्रॉइडचा?’’ मी म्हणाले, ‘‘नाही, माझं इतकं प्रेम सिग्मंड फ्रॉइडवर म्हणून!’’

हे मैत्र, फ्रॉइडचं हे अस्तित्व फार तर बारा-चौदा वर्षांचं असणार. त्यात त्यानं ऊठ म्हटलं की उठावं, बस म्हटलं की बसावं ही अपेक्षा का करायची? ही सगळी र्वष त्याचं असणारं आयुष्य सर्वार्थानं उत्तमोत्तम अनुभवांनी समृद्ध करता आलं तर?.. याच विचारानं त्याच्याबरोबरचा प्रत्येक क्षण किती अमूल्य आहे हे जाणवत राहातं. आता फ्रॉइड दोन वर्षांचा होईल. म्हणजे अजून जाणता होईल. मला मात्र अनेकदा त्याचं ते पिल्लू असतानाचं मागे मागे येणं, पायाशी घोटाळणं, काहीतरी फाडल्यानंतर चूक झालीये हे कळल्यावर लपून बसणं, असं सगळं आठवतं. तेव्हा वाटतं त्याच्याचबरोबर राहून आलेलं शहाणपण जर त्या वेळेस असतं, तर हे नातं अधिक घट्ट झालं असतं का?

रोज घरी परतल्यावर फ्रॉइड त्याचे कान मागे करून, हसऱ्या डोळय़ांनी, झेप घेत प्रेमाचा वर्षांव करतो, तेव्हा यापेक्षा इतर काहीच महत्त्वाचं नाही, इतकं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही, हे जाणवतं. पुन्हा मन आणि जग ‘फ्रॉइडमय’ होऊन जातं!
urjita.kulkarni@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या