श्रीकांत साव
गडचिरोली जिल्ह्यातील धानोर्यातल्या जपतलाई आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेला तीन मुलींचा मृत्यू आपल्याला दुर्गम भारताची दैनावस्था दाखवतो आणि व्यवस्थेला प्रश्न विचारतो, ‘‘काय चूक होती या मुलींची?’’ आश्रमशाळेत असलेल्या अपुर्या सोयीसुविधा, आपत्कालीन परिस्थितीत रस्त्यांच्या दुर्दशेमुळे उपचारास झालेला विलंब, योग्य उपचारांचा अभाव, आपल्या मुलींच्या शेवटच्या घटकेलाही पोहोचू न शकलेले त्यांचे पालक यातून शासन व्यवस्थेची अनास्थाच समोर येते. आदिवासींचे प्रश्न कधी सुटणारच नाहीत का? भारताच्या तळागाळातल्या समस्यांचे गांभीर्य, विकसित भारताचं स्वप्न पाहणार्या धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचलेलंच नाही का ? हेच जळजळीत प्रश्न उभे करतो…
९ ऑगस्टला धानोर्याच्या ‘जपतलाई आदिवासी आश्रमशाळे’त ‘जागतिक आदिवासी दिना’निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदिवासी संस्कृतीचा गौरव झाला, भाषणं झाली, विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. आदिवासी समाजाच्या विकासाच्या घोषणा झाल्या. कार्यक्रम संपला. आणि तो दिवसही संपला. मुली रात्री झोपण्यासाठी शाळेच्याच हॉलमध्ये गेल्या. मात्र तिथं झोपण्यासाठी पुरेशा खाटा नसल्याने त्या खालीच चटईवरच झोपल्या. लांबवरच्या दुसर्या खोलीत गाद्या होत्या, पण पाऊस सुरू असल्याने त्या आणता आल्या नव्हत्या. एकीकडे आदिवासींच्या विकासाची स्वप्नं दाखवणारे मोठमोठे कार्यक्रम, तर दुसरीकडे आदिवासी मुलींना झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्थाही उपलब्ध नाही, यापेक्षा मोठा विरोधाभास काय असू शकतो?
रात्रीचा १ वाजून गेलेला… सगळीकडे अंधार. मुली गाढ झोपलेल्या. त्याच दरम्यान एका खिडकीतून मण्यार हा विषारी साप आत शिरला. झोपलेल्या मुलींना त्याने एकामागून एक चावा घेतला. मण्यार सापाचा दंश मुंगी चावल्यासारखा सूक्ष्म जाणवतो, त्यामुळे सुरुवातीला कुणालाही काय घडलं, हे समजलं नाही. मात्र अनु गजूराम कोरेटी या दुसरीच्या वर्गात शिकणार्या मुलीला साप चावल्याचं लक्षात आलं. तिनं इतर मुलींना सांगितलं. मुली घाबरून जाग्या झाल्या. चौकीदाराला बोलावलं गेलं आणि सुरू झाली जीव वाचवण्याची धडपड. खिडकीलगतच्या भागात विटा रचलेल्या होत्या. बाजूलाच सरपणाचं लाकूड ठेवलेलं होतं. अशी घटनास्थळ पाहणीदरम्यान माहिती मिळाली. विषारी सापाने दंश केलेल्या पाच मुली उपचाराच्या प्रतीक्षेत अस्वस्थ… एका बाजूला मध्यरात्र आणि दुसर्या बाजूला जंगल आणि दुर्गम आदिवासी परिसर. तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध आहे की नाही, याची शाश्वती नव्हती. शासकीय रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झालीच नाही. गावातून वाहनाची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला दोन मुलींना डग्यामधून आणि नंतर तीन मुलींना गावातीलच एकाच्या चारचाकी वाहनाने नेण्यात आलं.
पुढचा प्रश्न होता, तेथील शासकीय रुग्णालयापर्यंत जायचं कसं? जपतलाईपासून धानोर्याकडे जाणारा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता अत्यंत वाईट. पावसामुळे त्याची अवस्था अधिकच बिकट झालेली. वाहन नेणं अवघड. त्यामुळे सरळ मार्ग सोडून मोहली- सोडे- धानोरा या सुमारे ३० किलोमीटरच्या पर्यायी मार्गाने मुलींना या रुग्णालयात नेण्यात आलं. ज्या मुलींच्या शरीरात विष पसरत होतं, त्यांची प्रत्येक मिनिटाला जगण्याशी स्पर्धा चालू होती. अखेर धानोराच्या शासकीय रुग्णालयात मुलींना नेण्यात आलं. तेथील प्राथमिक उपचारांबाबतही आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण सर्पदंशावर तेथे औषध नसल्याचं कळतंय. परिणामस्वरूप इथेच सुष्मिता सरोजित मंडल आणि दीपिका एकवा लकडा या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित मुलींना गडचिरोलीला हलवण्यात आलं. धानोरा ते गडचिरोली हा प्रवासही खराब रस्त्यामुळे सोपा नव्हता. उपचार मिळेपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. अखेर अनु गजूराम कोरेटीही मृत्युमुखी पडली. दुसरी, पाचवी आणि आठवी इयत्तेत शिकणार्या या मुली. त्यांच्या हातात पेन्सिल होती, वही होती, शाळेची स्वप्नं होती. पण…
खरं तर ९ ऑगस्ट जगभरात ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा होतो. आदिवासींच्या संस्कृतीचा, परंपरेचा, अस्मितेचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस. याच दिवशी देशाच्या कानाकोपर्यात आदिवासी विकासाच्या, शिक्षणाच्या, सक्षमीकरणाच्या आणि मुख्य प्रवाहात आणण्याच्या घोषणा दिल्या जातात. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सांगितलं जातं. पण या सगळ्या दाव्यांच्या आणि घोषणांच्या पलीकडे, गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत १० ऑगस्टच्या पहाटे घडलेली ही घटना आपल्याला एका वेगळ्याच भारतासमोर उभं करते. हा भारत अजूनही खिडकीमधून आत येणार्या सापापासून आपल्याच विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवू शकत नाही. हा भारत अजूनही आपल्या आदिवासी मुलींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा देऊ शकत नाही. हा भारत अजूनही सर्पदंश झालेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी चांगला रस्ता देऊ शकत नाही आणि हा भारत अजूनही एका गरीब आदिवासी आई-वडिलांना त्यांच्या गंभीर जखमी मुलीपर्यंत वेळेवर पोहोचण्याची हमी देऊ शकत नाही.
जपतलाई येथील ‘कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था’, गडचिरोली यांच्या माध्यमातून चालवली जाणारी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा १९९२-९३ मध्ये सुरू झाली. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणार्या या शाळेची पटसंख्या २३३ आहे. घटनेच्या दिवशी ८३ विद्यार्थी आणि ४७ विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून सुमारे २३ जणांचा कर्मचारी वर्ग आहे. या आकडेवारीकडे पाहिलं, तर ही एक साधारण निवासी शाळा वाटते. पण त्या शाळेच्या भिंतींच्या आत डोकावलं की आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेचं अनेक वर्षांचं न बदलणारं वास्तव दिसू लागतं.
त्याच परिस्थितीला बळी पडलेल्या या मुली. तिन मुलींच्या मृत्यूनंतर सर्पदंश झालेल्या चौथ्या मुलीची, दीपिका बिटकरसाय मडावीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला नागपूरला हलवण्यात आलं. समृद्धी नैतामवर गडचिरोलीत उपचार सुरू ठेवण्यात आले. साप चावल्याच्या बातमीने घाबरलेल्या आणखी बारा मुलींना उलट्या सुरू झाल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. त्या सुरक्षित असल्याचं नंतर सांगण्यात आलं. पण त्या रात्री या सर्व मुलींच्या मनात निर्माण झालेली भीती कोणत्या औषधाने बरी होणार? या घटनेनंतर शाळेतील मुख्याध्यापक पी. व्ही. तारपल्लीवार, अधीक्षक बी. आर. भोयर आणि स्त्री अधीक्षक दि. बि. चिलमावार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. घटना घडली त्या वेळी ते शाळेत उपस्थित नव्हते. जवळच्या गावात आपल्या घरी असल्याची माहिती मिळाली. यावरून रात्री निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जबाबदारी कोणाची होती, याचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं आहे. पण प्रश्न केवळ तीन अधिकार्यांच्या निलंबनाने संपेल का? त्यामुळे त्या तीन मुली परत येतील का? खिडकीला जाळीने बंद केलं असतं तर? पुरेशा खाटा असत्या तर? विटा आणि सरपण योग्य वेळी हटवलं असतं तर? शाळेभोवती सुरक्षित व्यवस्था असती तर? रात्री पुरेशी देखरेख असती तर? रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर? धानोर्यापर्यंतचा रस्ता चांगला असता तर? सर्पदंशासाठी तात्काळ उपचार उपलब्ध झाले असते तर? पालकांना वेळेवर माहिती मिळाली असती तर? या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधल्याशिवाय ही घटना पूर्णपणे समजणार नाही.
१२ ऑगस्टला मी जेव्हा जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा या प्रश्नांची तीव्रता आणखीच जाणवली. गडचिरोलीपासून धानोर्यापर्यंतचा रस्ता खराब. धानोर्यापासून आश्रमशाळेपर्यंतचा १० किमी रस्ता तर त्याहूनही बिकट. या रस्त्यावरून एखाद्या रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणं म्हणजे आजाराशीच नव्हे तर रस्त्याशीही लढाई. सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत ही लढाई किती जीवघेणी ठरू शकते, हे तीन मृत्यूंनी दाखवून दिलं. शरमेची बाब म्हणजे घटना उघडकीस येताच रस्त्यावर ताबडतोब माती आणि गट्टी टाकण्यात आली.
पण ही डागडुजी मुलींचा मृत्यू झाकू शकली नाही. आश्रमशाळेतून पुढे मुरुमगावपासून ११ किलोमीटर घनदाट जंगलात असलेल्या, सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या अनुच्या केहकावाही गावाकडे गेलो. गावाकडे जाण्यासाठी पांढर्या गिट्टीचा रस्ता आहे, पण त्याची अवस्था इतकी वाईट आहे की वाहन नेणं कठीण. रस्त्याच्या बाजूने गावकर्यांनी स्वत:ची पायवाट तयार केली आहे. त्या पायवाटेने गावात जावं लागतं. हे वास्तव डोळ्यात खुपतं. केहकावाहीमध्ये शेती हा रोजगाराचा प्रमुख आधार. तीही अल्पभूधारकांची. पानतोडणी, मोहाची फुलं वेचणं असे हंगामी रोजगार. गावात मूलभूत सुविधांचा अभाव. घरकुलांचा अभाव. मातीची, बारीक कौलारू, कच्ची घरं. विकासाच्या मोठमोठ्या योजनांची चर्चा कागदावर असताना गावातील जीवन अजूनही प्राथमिक गरजांभोवती फिरतं. याच गावात अनुचे वडील भेटले. त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यांची मुलगी याच शाळेत शिकत होती. कदाचित तिच्यासाठी त्यांची स्वप्नं मोठी होती. पण आता सगळं संपलं होतं. त्यांना घटनेची माहिती सकाळी ११ वाजता मिळाली. ते गडचिरोलीकडे निघाले. दुसरीकडे दीपिका मडावीचे आई-वडील त्याच गावात राहत असूनही त्यांना घटनेची माहिती संध्याकाळी चार वाजता मिळाली. तोपर्यंत त्यांच्या मुलीला नागपूरला नेण्यात आलं होतं. दीपिका नागपूरमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना तिचे आजोबा तिच्याजवळ होते. आई-वडील मात्र नागपूरला गेले नव्हते. ते शेतीच्या कामात होते. ‘‘तुम्ही नागपूरला का गेला नाहीत?’’ असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मन सुन्न करणारं होतं, ‘‘आम्हाला बाहेरचं जग माहीतच नाही, त्यामुळे आम्ही गेलो नाही.’’ हे वाक्य केवळ एका वडिलांचं नाही. हे त्या भारताचं वाक्य आहे ज्याच्याकडे आजही महानगरातील रुग्णालयापर्यंत पोहोचण्याइतकी सामाजिक, आर्थिक आणि माहितीची उपलब्धता नाही. आपल्या मुलीच्या उपचारासाठी देशाच्या एका टोकापासून दुसर्या शहरात धाव घेणं ही ज्यांच्यासाठी सहज बाब नाही, त्या कुटुंबांना आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहे असं कसं म्हणायचं? या भागातील पालक आपल्या मुलांना आश्रमशाळेत का पाठवतात, याचं उत्तरही या वास्तवातच दडलेलं आहे. शिक्षणाची सोय, राहण्याची सोय, दोन वेळच्या अन्नाची सोय, शासकीय कागदपत्रं जसं की आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, जातवैधता, अधिवास हे शिक्षक काढून देतात म्हणून. शिक्षक ही कागदपत्रं का काढून देतात तर त्यांना प्रवेश हवे असतात.
अनेक आश्रमशाळा असल्याने आपल्याच शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, पर्यायाने आपली नोकरी टिकावी, या उद्देशाने शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतात. या मुलांच्या आयुष्यात आश्रमशाळा म्हणजे केवळ शाळा नाही. ती त्यांच्यासाठी घरापासून दूर असलेलं दुसरं घर आहे. म्हणूनच त्या घराची सुरक्षा मजबूत असायला हवी होती.
सुष्मिता मंडल ही मेंढरी गावची. दीपिका लकडा ही जवेली गावची. दोन्ही गावं एटापल्ली तालुक्यातील. एवढ्या दूरवरून मुली शिक्षणासाठी जपतलाईला येतात. त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ‘‘मुलगी शाळेत आहे, सुरक्षित आहे, शिकत आहे,’’ या विश्वासावर त्यांनी आपल्या लेकरांना घरापासून दूर पाठवलं. त्या विश्वासाचं काय झालं? या घटनेनंतर बहुतांश विद्यार्थी घरी परत गेले. आश्रमशाळा जवळपास रिकामी झाली. केवळ तीन मुली आणि तीन मुलगे शाळेत उपस्थित आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांना घरी न्यायला पालक आले नव्हते. शिक्षक स्वत: चिंतेत आहेत. शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता व्यक्त झाल्याने त्यांच्या भवितव्याचीही चिंता आहे. पण सर्वात मोठी चिंता वाटते ती त्या तीन कुटुंबांच्या घरातील शांततेची, जिथं आता त्यांच्या मुली कधीच परतणार नाहीत.
भारत आज कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा करतो. भारत डिजिटल अर्थव्यवस्थेची चर्चा करतो. भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्नं पाहतो. भारत विश्वगुरू होण्याची आकांक्षा व्यक्त करतो. त्याच्या बरोबर विरुद्ध चित्र इथं बघायला मिळतं. कारण माणसाच्या प्राथमिक गरजा इथं पूर्ण होत नाही. देशाच्या विकासाचा मापदंड आपण कसा मोजणार? आदिवासी विकासाचा खरा अर्थ ९ ऑगस्टला, जागतिक आदिवासी दिनी केलेल्या घोषणांमध्ये नाही, तो १० ऑगस्टच्या पहाटे त्या मुलींच्या जगण्यासाठी उभ्या असलेल्या सक्षम व्यवस्थेत दिसायला हवा होता. जपतलाईच्या या तीन मुली, अनु, सुष्मिता आणि दीपिका ही तीन नावं आता केवळ एका दुर्घटनेची नावं राहू नयेत. ती आपल्या विकासाच्या आदर्श आराखड्यावर उभे राहिलेले तीन प्रश्न बनावेत.
आपण खरंच विकसित होण्याच्या मार्गावर आहोत का? ज्या दिवशी देशातील शेवटच्या आदिवासी पाड्यावर राहणार्या आईला आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची चिंता राहणार नाही, ज्या दिवशी त्या गावापर्यंत रस्ता असेल, रुग्णवाहिका वेळेवर पोहोचेल, शाळेतील मुलांना सुरक्षित निवास मिळेल आणि संकटाच्या वेळी पालकांना ‘आम्हाला बाहेरचं जग माहीत नाही,’ असं म्हणावं लागणार नाही त्या दिवशी आपण खर्या अर्थाने विकसित झालेले असू.
तोपर्यंत जपतलाईची काळरात्र आपल्याला सतत आठवण करून देत राहील, मुलांच्या जिवापेक्षा मोठी कोणत्याही महासत्तेची स्वप्नं असूच शकत नाहीत.
shrikantsao123@gmail.com
