श्रीकांत साव लिखित ‘जपतलाईची काळरात्र’ (२२ ऑगस्ट) हा लेख वाचला आणि मन अक्षरश: विदीर्ण झालं. लेखकाने जपतलाईच्या अंधार्‍या वास्तवावर खोलवर टाकलेला प्रकाश हा अंतर्मुख करणारा आहे. ते वाचताना दु:खाबरोबरच एक अनावर संतापही मनात उसळला. खेडी जगली, शेतकरी सुखी झाला तरच देश खर्‍या अर्थाने प्रगत होईल, हा साधा विचारच आपण मागे टाकला. हे मान्यच आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, अर्थकारण अशा अनेक आघाड्यांवर आपण मोठी झेप घेतली आहे. प्रगती झालीच आहे. पण ही प्रगती कोणासाठी? शहरापासून अतिदुर्गम आदिवासी पाड्यापर्यंतच्या माणसाच्या जगण्याकडे कोणत्याही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी, आदिवासी विकासाकरिता, दुर्गम भागासाठी कोट्यवधींच्या तरतुदी जाहीर होतात. अभ्यासपूर्ण आकडेवारी मांडली जाते, पण ती गंगाजळी प्रत्यक्षात पोहोचते कुठे? हा प्रश्न कधीच विचारला जात नाही. ना त्याचे उत्तर शोधले जात. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की प्राथमिक गरजांशिवाय तिथली माणसे केवळ जीव मुठीत धरून जगत आहेत. याला कारण एकच कणाकणात भिनलेला भ्रष्टाचार. तो आता व्यवस्थेचा अपवाद राहिला नसून नियम झाला आहे. आपली मनेही आता निबर झाली आहेत. दुर्गम भागातील इस्पितळात उपकरणे नाहीत, औषधे नाहीत, कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. फक्त कमालीची उदासीनता आहे. तेच चित्र अनुदानित शाळांचं. शिक्षण क्षेत्रातील हा सावळागोंधळ तर सर्वांनाच माहीत आहे. निदान शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य सुविधा येथे तरी निर्मळ मनाने काम करणारी यंत्रणा हवी एवढी माफक अपेक्षा आहे.

– सुलभा आरोसकर, ठाणे</strong>

भारत ‘विश्वगुरू’ होणार?

‘जपतलाईची काळरात्र’ (२२ ऑगस्ट) शीर्षकाचा लेख वाचला आणि मन सुन्न, नि:शब्द झालं. लेखकाने म्हटले आहे, त्याप्रमाणे भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची आकांक्षा कुठल्या पायावर उभी आहे? असा प्रश्न पडतो. लेखात बरेच तपशील आले आहेतच. कुंभमेळे, राष्ट्रकुल खेळ, ऑलिम्पिक स्पर्धा आणि अशा किती तरी ‘महा’ प्रसंगांचे आयोजन करण्यापूर्वी या प्राथमिक गोष्टी आपल्याच नागरिकांना मिळणं जरुरी आहे, असा साधा विचार कोणीच करताना दिसत नाही असं वाटतं. त्या मुलींनी तिथे जन्म घेतला हाच त्यांचा दोष आहे का? ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करून झाल्यावर त्यांच्यावर व त्यांच्या पालकांवर अशी ‘दीन’ अवस्था येऊन आदळावी यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही.

– शोभा श्रीयान

विकासाच्या गप्पा नकोत!

‘जपतलाईची काळरात्र’ हा लेख वाचताना जणू शब्द शब्द डंख मारत गेला. आमचे सर्व आजीमाजी राज्यकर्ते, आणि आपण सर्व सुखलोलुप नागरिक या सर्व भीषण वास्तवापासून किती दूर आहोत याची खंत खरोखर काळीज कुरतडू लागली. आदिवासी समाज, तिथले असहाय मातापिता आणि त्यांची लेकरे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ८० वर्षांनंतरही किती घनघोर अंधारात कसेबसे जगतायत हे वाचून स्वत:च्या सुखासीनतेच्या कल्पनांचीही लाज वाटायला लागली. जोपर्यंत या देशातील शेवटचा माणूस मुक्त श्वास घेऊ आणि स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही तोपर्यंत विकासाच्या गप्पा कुणीही करू नयेत.–

– सुबोध गद्रे, कोल्हापूर</strong>

सरकारची कृपादृष्टी व्हावी

‘जपतलाईची काळरात्र’ हा लेख आदिवासी आश्रमशाळेच्या दैनावस्थेचे दर्शन घडवते. आश्रमशाळेतील मुले-मुली मुठीत जीव घेऊन जगत आहेत. त्यांच्या सुविधांकडे, सुरक्षेकडे कुणाचेही लक्ष नाही. गडचिरोली जिल्ह्यातील धानोर्‍यातल्या जपतलाई आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन मुलींचा मृत्यू झाला. त्या मुलींना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यास विलंब झाला. मृत्यू झालेल्या मुलींच्या शेवटच्या घटकेला पोहोचू न शकलेल्या पालकांना काय वाटले असेल ते आपण शब्दात लिहू शकत नाही. जिथे आश्रमशाळा आहेत. तिथे सरकारने मूलभूत सोयी, रस्ते, रुग्णालय, वीज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आपल्या अनेक आदिवासी आश्रमशाळेची अशीच अवस्था आहे. या लेखनामुळे सरकारची कृपादृष्टी अशा दुर्गम भागात असलेल्या आश्रमशाळेवर व्हावी

– नामदेव गणपत राव, पनवेल

आयुष्यातील गुंता सुटेल

‘टॅग’ नाही, ‘वाइब’ महत्त्वाची!’ हा अनुराग जाधव यांचा आणि ‘मित्रमैत्रीचा अवकाश’ हा मानसी महेंद्र (८ ऑगस्ट) यांचा लेख वाचला. बदलत्या जीवन पद्धतीत, तरुणाई पूर्णच बदलून गेल्याचे चित्र, भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली विकासाला वृद्धिंगत करणारे ठरावे. ‘फ्रेंड्स रील्स’मुळे या मुलांचे भाव विश्वच बदलून गेले आहे.

ट्रेकला जाणे असो वा एखादा उद्योग उभारण्याचा संकल्प असो अथवा कॅफेत बसून गप्पांचा फड रंगविणे असो, कुठलेही अंदाज न करता ‘नॉन-जज्मेन्टल झोन’ कल्पनेचा स्वीकार केल्याने मानसिक शांती मिळविणे, सामंजस्य प्रस्थापित करणे, ना रुसवे ना फुगवे असल्याने मोकळ्या मनाने वाढत चाललेली ही ‘जेन झी’ पिढी नात्यांचे नैसर्गिक पद्धतीने होणारे संरक्षण आणि सुरक्षिततेची जाणीव स्वत:च करून घेत आहे. त्यामुळे आयुष्यातील गुंता सोडवून घेण्यात ही मंडळी सर्वात पुढेच असतील.

– डॉ. नूतनकुमार सी.