|| अतुल परचुरे
‘‘माझ्या वयाची पंचविशी पूर्ण व्हायच्या आधीच माझ्या व्यावसायिक नाटकांचे बाराशेहून अधिक प्रयोग झालेले होते आणि मी ‘फुकट जाण्याच्या’ मार्गावर आपसूक पोहोचलो होतो… या नाटकांनी मला काय दिलं याचा विचार करतो तेव्हा मला माझाच हेवा वाटतो. मी न मागता सारं दान माझ्या पदरात पडत गेलं. मी नाटकांमुळे घडलो. अनेक माणसं नाटकामुळेच माझ्या आयुष्यात आली. त्यांनी मला समृद्ध के लं. माझ्या आईबाबांना माझ्यामुळे कधी खाली मान घालायला लागली नाही हे महत्त्वाचं. हे सारं काही घडलं नाटकांमुळे…’’

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर मागे वळून स्वत:च्या गद्धेपंचविशीकडे पाहाणं गंमतशीर आहे खरं…  हातातून निसटून गेलेले क्षण आणि हातात आलेले क्षण, मनातून निसटून गेलेले क्षण आणि मनात रुजलेले क्षण… सगळं कसं सभोवती फिरायला लागतं… मला माझाच हेवा वाटायला लागतो. हे सारं आपल्या आयुष्यात घडून गेलंय? असं वाटायला लागतं अनेकदा. मी न मागता हे सारं दान परमेश्वरानं माझ्या झोळीत टाकलंय…

accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
Even after the implementation of the code of conduct the board remains in APMC
नवी मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ‘एपीएमसी’त फलक कायम
Nashik, foreign state, Businessmen, Shut Shops, Dispute, Local Marathi, Business Owners,
नाशिकमध्ये मराठी विरुद्ध अमराठी, व्यावसायिकांमध्ये धुसफूस, वादात मनसेची उडी

पंचविशी गाठण्यापूर्वीच मी केलेल्या व्यावसायिक नाटकांचे बाराशेहून अधिक प्रयोग झालेले होते. दहावीची परीक्षा दिली आणि मराठीतील श्रेष्ठ लेखक, दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक-आगरकर’ या नाट्यसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नाटकात मी काम करायला लागलो. बेडेकरांनी त्या वेळी कसं दिग्दर्शन केलं होतं ते आज आठवत नाही, इतका मी लहान होतो. पण, त्या वेळी मला एक गोष्ट कळली ती म्हणजे नाटक हा अत्यंत गंभीरपणे करायचा उपक्रम आहे. खरं तर अकरावीत कॉलेजमध्ये जाणं टाळण्यासाठी मला या नाटकाच्या तालमी करायच्या होत्या. पण ते नाटक रंगभूमीवर येता येता या उपक्रमाचं महत्त्व नीटच कळलं होतं.

नाटक माझ्या रक्तात आहे. नटश्रेष्ठ गणपतराव बोडस हे माझे आईकडून सख्खे पणजोबा व ‘वाङ्निश्चय’कार  द.दि. परचुरे हे माझे बाबांकडून सख्खे आजोबा. आई छान गाते. तिनं रंगभूमी गाजवली असती, असं मला नेहमी वाटतं. माझा शिक्षणाकडे फारसा ओढा नव्हता. पण दहावीला भरपूर गुण मिळाले होते, त्यामुळे मी ‘रुपारेल’ कॉलेजला त्या काळातल्या प्रथेप्रमाणे ‘सायन्स’ला गेलो. ‘टिळक -आगरकर’ नाटकाच्या तालमींमुळे प्रॅक्टिकल्सना  दांडी झाली, पहिल्याच महिन्यात ब्लॅकलिस्टमध्ये नाव झळकलं आणि त्याच वेळी हेही लक्षात आलं, की आपल्याला विज्ञान शाखेत रस नाही. पण बारावी कशीबशी पार पडली. गणित आणि शास्त्रात मला मोजून ३५-३५ गुण मिळाले होते. नास्तिकाला आस्तिक बनवेल असा हा चमत्कार कसा घडला हे माहीत नाही. तेरावीला मी कॉमर्सला प्रवेश घेऊन विज्ञानावर उपकारच केले! तोवर मी व्यावसायिक नाटकांत स्थिरावलोही होतो. १९८५ मध्ये विनय आपटेबरोबर ‘अफलातून’ केलं, १९८७ मध्ये ‘वासूची सासू’ आलं, ‘टूरटूर’मध्ये एका भूमिकेसाठी रिप्लेसमेंट केली, त्यानंतर ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’, ‘नातीगोती’ केलं. वर म्हटल्याप्रमाणे पंचविशी गाठेपर्यंत व्यावसायिक नाटकांचे बाराशे प्रयोग झालेही होते.

त्या काळात एक समजूत होती, पोरगा नाटकात गेला, म्हणजे फुकट गेला. पण पंचविशीपर्यंत मी पुढे काय करणार हे नक्की झालं होतं. मी रूढार्थाने ‘फुकट जाण्याच्या’ मार्गावर आपसूक पोहोचलो होतो. ते स्वाभाविकही होतं. चौथीत असताना माझे बाबा, मला दूरदर्शनवर ‘किलबिल’ कार्यक्रमासाठी घेऊन गेले, त्या वेळी दिवाकरांची एक नाट्यछटा मी थेट प्रक्षेपणात सादर केली होती. नंतर व्ही. शांताराम यांच्या ‘राजा रानी को चाहिये पसीना’ या चित्रपटात मी काम केलं. ‘बालमोहन’ शाळेत शिकत होतो, या शाळेच्या पोटात, विद्या पटवर्धन ही अभिनयाची एक शाळाही होती. त्यांच्यामुळे आंतरशालेय बालनाटकांत काम करायला लागलो. एका बालनाटकामुळे मला ‘बजरबट्टू’ हे पूर्ण लांबीचं व्यावसायिक बालनाटक मिळालं. त्याचे राज्यभर शंभराहून अधिक प्रयोग झाले. काही करता येत नाही म्हणून नाटकवाला न होता; मी  ‘बाय डिफॉल्ट’ नाटकवाला झालो.

कॉलेजात असताना मी व्यावसायिक नाटकं करत असल्यानं मला आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा फारशा ‘एन्जॉय’ करता आल्या नाहीत. त्या वेळी ‘एन. एम.’, ‘रुईया’, ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ ही नाट्य स्पर्धांतली दादा कॉलेजं होती. मी शिकत असताना ‘रुपारेल’ काहीसं मागे पडलं होतं. नंतर चेतन दातारनं पुन्हा त्याला वरचं स्थान मिळवून दिलं. तसं पाहिलं तर माझ्याबरोबर शिकणारी जबरदस्त कलावंत मुलं-मुली ‘रुपारेल’मध्ये होती. यतीन कार्येकर, सुमित राघवन, अश्विनी भावे, सुप्रिया सबनीस, निशिगंधा वाड हे सारे माझ्या बरोबरचेच. कॉलेजात शिकतानाच त्यांनी नाटकांत, चित्रपटांत त्या काळात नाव मिळवलं होतं. पण आम्हाला एकत्र आणणारा कोणी नव्हता हे आमचं दुर्दैव. त्या एकांकिकांत मला कधीही मध्यवर्ती भूमिका मिळाल्या नाहीत. पण अभिनयाची सर्टिफिकेटं मात्र मलाच मिळायची. यतीन मला ‘सर्टिफाइड नट’ म्हणून चिडवायचा.

मला नाटकात थोडंफार यश मिळालं, नावलौकिक मिळाला. याचसाठी बहुधा नियतीनं माझी निवड केली असावी. कारण, पंचविशीच्या आतच माझी फार मोठमोठ्या माणसांशी भेट झाली होती. मी विनय आपटेंबरोबर ‘अफलातून’ केलं. भन्नाट दिग्दर्शक! त्यानं मला काय दिलं? तर त्यानं मला शब्दांचे उच्चार कसे करायला हवेत ते शिकवलं. शब्दांवर कुठे व कसे आघात द्यावेत, अर्थवाही कसं बोलावं, ज्यामुळे नेमका अर्थ प्रेक्षकांच्या मनात कसा उमटेल, हे ध्यानी आणून दिलं. ‘अफलातून’मध्ये एक वाक्य होतं, ‘आपण फार ताणलं नाही तर…’ त्यात ताणलं जाण्याचा नेमका अनुभव देण्यासाठी ‘फाऽऽर ताणलं नाही तर’ असा उच्चार कर असं त्यानं सुचवलं. नंतरच्या काळात मी ‘आम्ही आणि आमचे बाप’ हा कार्यक्रम करायचो, त्या वेळी वाचताना, शब्दांच्या नेमक्या अर्थाचा अनुभव देण्यासाठी विनयनं केलेल्या या संस्काराचा नकळत उपयोग झाला.

दिलीप प्रभावळकर आणि मोहन जोशी यांच्याबरोबर मला हजार, हजार प्रयोग करता आले. हे दोघं म्हणजे अभिनयाची विद्यापीठं आहेत. दिलीप प्रभावळकरांचा खोडकरपणा नाटकात दिसत नाही. पण एखादी विनोदी व्यक्तिरेखा उभी करताना प्रभावळकरांचा अनुभव मला खूप उपयोगी पडतो. मोहन जोशीचं टायमिंग अचूक असतं. ‘तरुण तुर्क’मध्ये मी एका काहीसं बायकी वागणाऱ्या मुलाचं काम केलं होतं. नाटकातील एका प्रसंगात एके ठिकाणी मोहन जोशी येत असतो आणि मी त्याच्याकडे बघतो. तो त्यावर ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघतो ते भन्नाट होतं. रंगमंचावर एकमेकांना ‘कॉम्प्लिमेंट’ करणं म्हणजे काय असतं ते तिथं शिकायला मिळालं. ‘नातीगोती’ करत असताना प्रभावळकर, मोहन आणि स्वाती (चिटणीस) यांच्या रंगमंचावर असण्याचा मला फायदा झाला. ‘नातीगोती’मधला दिव्यांग, गतिमंद मुलगा कसा साकारला जाईल याविषयी कोणालाच फारसा अंदाज बांधता येत नव्हता. त्या वेळी मी ‘अवेकनिंग’, ‘माय लेफ्ट फूट’सारखे अनेक चित्रपट पाहिले. दिव्यांग मुलांच्या शाळांमध्ये गेलो, त्यांना भेटलो. अभ्यास करून मग मी तो मुलगा साकार केला. त्यातला मी करत असलेल्या पात्राच्या वाढदिवसाच्या केकच्या प्रसंगासारखे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या अंगावर येत असत. पण ते करत असताना मला फारसा त्रास झाला नाही, याचं कारण प्रभावळकर, स्वाती, मोहन यांच्याबरोबर असलेला माझा ‘कम्फर्ट झोन’. मी जेव्हा ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ केलं, त्या वेळी मधुकर तोरडमलांची भूमिका रंगमंचावर अनुभवताना फार मजा यायची. त्यातील तोरडमलांची भूमिका विसरभोळ्या प्राध्यापकाची. ते सतत शब्द विसरत असतात आणि शब्द आठवला नाही की त्याऐवजी ‘ह,’ ‘हा,’ ‘हि,’ ‘ही’ची भाषा वापरतात. ही भूमिका अश्लील होण्याचा सर्वाधिक धोका होता. त्यात तोरडमल दिसायला एकदम करारी, कठोर. पण त्यांचं त्या भूमिकेबद्दलचं ‘कन्व्हिक्शन’ असं काही जबरदस्त होतं की पहिल्या पाच मिनिटांत प्रेक्षकाला कळायचं की या माणसाला खरंच शब्द सापडत नाहीयेत आणि त्याला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागायची, त्या पात्राचा निरागसपणा प्रेक्षकांना भावायचा आणि तोरडमलांची भूमिका यशस्वी व्हायची. मी हे  ‘कन्व्हिक्शन’ आणि निरागसपणा त्यांच्याकडून पाहात पाहात शिकलो. नंतर ‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’ मध्ये भूमिका करताना मला या गोष्टीचा खूप उपयोग झाला. परकाया प्रवेश असं जे म्हणतात, ते मी येथे शिकलो. ‘कन्व्हिक्शन’ असल्याशिवाय तो करता येत नाही. ‘कार्टी काळजात घुसली’मध्ये मोहन जोशीचा एक फोनवर बोलण्याचा प्रसंग होता. त्या वेळी

एका क्षणात त्याचा आवाज बदलत असे, हा आवाज कसा लावायचा, तो परिणाम कसा द्यायचा हे मोहननं दाखवलं. असे सहकलाकारांबरोबरचे माझे अनेक अनुभव मला खूप काही शिकवून गेले.

मी ‘टूरटूर’ नाटकाच्या एका दौऱ्यात ‘रिप्लेसमेंट’वर काम केलं होतं. लक्ष्मीकांत बेर्डे समोर होता. त्यानं मला विचारलं, ‘‘तुझं नाटक किती पाठ झालंय?’’ मी त्याला कुठपर्यंत पाठ झालंय हे सांगितलं. तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. काही काळजी करू नकोस. मी सांभाळून नेईन.’’ त्याच्यासारख्या सीनिअर कलाकारानं त्या काळात असं सांगणं ही मोठी गोष्ट आहे. मी त्याचं हे ऋण कधीही विसरू शकत नाही. नंतर एकदा असं झालं, की नाना पाटेकर अध्यक्ष असलेल्या, नाशिकच्या नाट्य संमेलनात, पु.लं.च्या लेखनावर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली’चा ‘सेलिब्रिटी प्रयोग’ करायचा होता. (पु.लं.समोर खुद्द त्यांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलेला मी एकमेव अभिनेता आहे.) त्यात लक्ष्मीकांत बेर्डे नाथा कामतची भूमिका करणार होता. बेर्डे खूप बिझी कलाकार होता. नाथाच्या तोंडी एक वाक्य होतं, ‘मी शित्या सरमळकराच्या दुकानात गेलो होतो. तिथं यदृच्छया शरयू प्रधान उभी होती.’ लक्ष्मीकांत मला प्रामाणिकपणे म्हणाला, ‘अरे, हे असलं मराठी बोलण्याची मला सवय नाही आणि पाठांतराला वेळही नाही.’ मला ‘टूरटूर’च्या वेळचं त्याचं वाक्य आठवलं, ‘तुझं किती पाठ आहे ते म्हण, बाकी मी सांभाळून घेतो.’ आणि तो प्रयोग पार पडला.

या काळाच्या थोडंसं आधी म्हणजे १९८४ च्या दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट आम्हा सर्व मित्रांच्या आयुष्यात घडली, तिचे दूरगामी परिणाम सर्वांवर झाले, ती म्हणजे ‘आंतरनाट्य’ या संस्थेची उभारणी व तिचं काम. त्या वेळी आम्ही ‘अनाहत’ हे राजीव नाईकचं नाटक केलं. राजीवला मी माझा नाटकातला गुरू मानतो. अजित भुरे हा त्याचा दिग्दर्शक होता. राजीवचा मोठा भाऊ अरुण नाईक, विजय केंकरे, संजय मोने, मी असे सारे एकत्र आलो होतो. विजयचे वडील, थोर दिग्दर्शक दामू केंकरे आमच्याबरोबर असायचे. त्यांच्या वडीलपणाचा आम्हाला कधीही धाक वाटला नाही. नाटकातले, साहित्यातले प्रश्न आम्हाला पडले, की ते ‘आंतरनाट्य’मध्ये सुटायचेच, अशी तगडी मंडळी त्यात होती. आम्ही सारे रोज संध्याकाळी भेटायचोच. टाइमपासबरोबरच नवनव्या विचारांचं आवर्त घेऊन आम्ही घरी परतायचो. आजही दररोज सकाळी आठ वाजता एका ठरावीक ठिकाणी मी, धनंजय गोरे, संजय मोने, विजय केंकरे, अजित भुरे, प्रदीप सुळे असे सारे चहासाठी एकत्र जमतोच. यातला धनंजय गोरे हा प्रत्येक क्षण आनंदात कसं जगावं याचा मंत्र देणारा. म्हणूनच मला शूटिंग असलं तरीही मी तेथे चहा पिऊन मग दिवसाला सुरुवात करतो.

संजय मोने हा आता निवळलाय, पण त्या काळात संजयचं वागणं, बोलणं वगैरे सारं दडपण आणणारं होतं. त्याची भीतीच वाटायची. पंचविशीत असताना मला सर्वांत जास्त त्रास दिलाय दोन संजयांनी- संजय मोने आणि संजय नार्वेकर. त्या वेळी ‘आम्ही जगतो बेफाम’ हे नाटक मी करत होतो. त्यात हे दोन्ही दैत्य होते. मला छळणं हा त्यांच्या आनंदाचा भाग होता. आमच्या त्या नाटकात एक सहकलाकार होता, त्याला तोंडाने तंबोरा वाजवायची सवय होती.  प्रवासात मी झोपलो की हे दोघेही त्या सहकलाकाराला माझ्या कानाशी तंबोऱ्याचा आवाज काढायला सांगायचे. किंवा सकाळी उठलो की नार्वेकर माझ्या मागे मागे करत राहायचा… काय दिवस होते…

गद्धेपंचविशीच्या काळात आम्ही स्कूटरवरून फिरायचो. त्या काळात मी, विजय केंकरे, संजय मोने व नार्वेकर -आम्ही जेवढी स्कूटर चालवली त्यात पृथ्वीप्रदक्षिणा नक्की झाली असती! एकदा हाजी अलीच्या चौकातून स्कूटर नेत असताना मागच्या सीटवर बसलेल्या संजयनं (नार्वेकर) माझे दोन्ही डोळे त्याच्या दोन्ही तळहातांनी बंद केले नि म्हणाला, ‘आता चालव स्कूटर.’ इतकं च नाही, आणखी एक गंमत आहे. आमची स्कूटर सिग्नलला थांबली रे थांबली की बरोबर त्याच वेळी माझ्या स्कूटरसमोर भिकारी यायचे. तसं कसं व्हायचं हे मला कळत नव्हतं कित्येक दिवस. पण एकदा एका सिग्नलला स्कूटर थांबली व बोलण्यासाठी म्हणून मी मागे पाहिलं तर संजय भिकाऱ्यांना खूण करून सांगत होता, ‘याच्याकडून पैसे मागा.’

या कलावंत मंडळींबरोबरच आज ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’चा अध्यक्ष असलेल्या माझ्या मित्राचा, विक्रम लिमयेचा उल्लेख केलाच पाहिजे. हा एक अद्भुत माणूस. आम्ही शिवाजी पार्कला टेनिस खेळायचो. ‘खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदा बंदे से खुद पुछे बता तेरी रजा क्या हैं’ या प्रकारची ताकद बाळगणारा. मला त्याने बी.कॉम.ला असताना अकाउंट्स शिकवलं. त्यानं त्याच वेळी मनाशी पक्कं ठरवलं होतं, ‘मी बी.कॉम.ला प्रथम श्रेणी मिळवीन, पहिल्या प्रयत्नात सी.ए. होईन, एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीन, ‘वॉर्टन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये ‘एम.बी.ए.’ करीन, अमेरिकेत चाळिशीपर्यंत नोकरी करीन आणि नंतर भारतात परत येऊन इथं योगदान देईन.’ आमच्या पंचविशीत असताना तो जी स्वप्नं बघायचा ती त्यानं जशीच्या तशी खरी केली. मला काही प्रश्न पडले तर आजही मी त्याला बेलाशकपणे फोन करून ते विचारतो, तो त्याच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे सल्ला देतो.

या काळात भेटलेला दुसरा अवलिया म्हणजे राज ठाकरे. तो रुपारेलला येत असे. त्या काळातले त्याचे विचार, त्याची स्वप्नं तो बोलून दाखवत असे. त्या वेळी असं वाटे, हा काय बोलतोय?, त्यातलं काय खरं होणार आहे?, पण त्यानं त्यातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात करून  दाखवल्या. शिवाय वॉल्ट डिस्ने त्याचा लाडका, त्याची कार्टून्स, त्याची अ‍ॅनिमेशन्स त्याला आवडायची, त्याची गाण्यांची आवड, त्याचा सुरेल आवाज, त्याचं अमिताभ बच्चनप्रेम हे मला माहिती आहे. तो बसल्या बसल्या व्यंगचित्रं काढत असतो. माझी किती तरी व्यंगचित्रं त्यानं केली आहेत. आम्हाला दोघांनाही लता मंगेशकर, किशोर कुमार आवडतात, हा आमच्या मैत्रीतला समान धागा. एक अभिनेता मित्र म्हणून त्यानं मला सतत फॉलो केलंय. मित्रांच्या बाबतीत राज अतिशय ‘पझेसिव्ह’ आहे. मी काय करतोय, कुठलं नाटक करतोय, कोणते चित्रपट करतोय हे त्याला माहिती असतं व तो वेळ काढून ते चित्रपट, नाटकं पाहतो. पंचविशीत मिळालेल्या आयुष्यातली ही मैत्री, हे एक सोनेरी पान आहे.

मी भरपूर वाचतो. पु.लं.चं लेखन हे माझं पहिलं प्रेम. पंचविशी गाठायच्या आधी पु.ल. देशपांडे यांच्या लेखनाबरोबरच माझ्या वाचनात ‘क्रिकेटवेध’ हे पुस्तक आलं आणि त्या लेखकाच्या मी प्रेमात पडलो. ते लेखक म्हणजे शिरीष कणेकर. त्यांच्या पुस्तकांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्याबरोबर मैत्रीही झाली. त्यांनी खांद्यावर हात ठेवल्याचं भाग्य मला लाभलंय. आजही दररोज संध्याकाळी शिवाजी पार्कवर आम्ही भेटत असतो.

गद्धेपंचविशीत असतानाच काय, पण आजही माझ्यात विचार करण्याची किती कुवत आहे याची मला शंकाच आहे. माझं मन सतत दोलायमन असायचं आणि आजही असतं. मला क्षणात हे बरोबर वाटतं, क्षणात ते बरोबर वाटतं. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जी जी लोकं येत गेली त्यांनी माझ्यावर संस्कार केले. आजही मला कधी प्रश्न पडले, की माझ्या मुलीला- सखील हिला समोर बसवतो. ती मला उत्तर देते. तिच्या तरुण खांद्यांवर अतिशय समतोल विचार करणारं डोकं आहे, हे पाहून मी स्तिमित होतो, चोविसाव्या वर्षी या  मुलीला जी समज आहे ती आपल्याला त्या वयात कशी नव्हती? असं वाटू लागतं. बायको, सोनिया ही अत्यंत निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व असलेली स्त्री आहे. आम्ही लग्न करायचं हा निर्णय तिनं घेतला आहे. मला पत्नी म्हणून माझ्याच व्यवसायातली मुलगी नको होती, पण मला ती आवडतही होती. सोनियाला नाटकांत अनेक पारितोषिकं मिळाली होती. पण तिनं निर्णय घेतला, मी नाटकात नाही, पण नृत्यात करिअर करीन. तिनं तिची देदीप्यमान करिअर घडवली आहे, मला अभिमान वाटतो. मी पंचविशीत असताना नोकरीला लागलो होतो. आणि एकापाठोपाठ एक चांगली नाटकं समोर येत होती. नाटकासाठी नोकरी सोडायची का, हा अनेक मध्यमवर्गीयांसाठी गुंतागुतीचा प्रश्न असतो. मी सोनियाला फोन करून विचारलं, ‘‘मी नोकरी सोडू का?’’ तिनं क्षणार्धात सांगितलं, ‘‘सोडून दे. नाही तरी तुला नाटकच करायचं आहे. तेच कर. बघू कसं जमतंय ते.’’ अशी आहे ती. तिच्यावर तिच्या वडिलांचा-तात्यांचा, प्राध्यापक गुरुनाथ मुळे यांचा मोठा प्रभाव आहे. तात्यांचं व माझं खूप जुळत असे. आणि माझी आई! लहानपणापासून माझ्या अनेक गोष्टींचा मापदंड आहे ती. मी नाटक करणार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया वर गेल्या होत्या. आजूबाजूची, नातेवाईकांची मुलं कोणी डॉक्टर, कोणी इंजिनीअर अशी होत होती आणि मी नाटक करणार होतो! त्या वेळी आई माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. तिनं विश्वास दिला. आज मला जे काही थोडंफार यश मिळालं आहे, ते पाहून तिला नक्की आनंद होत असणार. माझ्या आयुष्यातल्या या तीन स्त्रियांनी माझं निर्णयविश्व सांभाळलं आहे.

नाटकात करिअर करण्याचा माझा निर्णय होता, त्यावरून एक गोष्ट आठवली. माझे मावस आजोबा म्हणजे ‘प्रकाश माक्याचे तेल’ कंपनीचे सर्वेसर्वा नानासाहेब बेडेकर. ते कर्जतला राहात. शनिवारी शाळेतून घरी आलो, की त्यांच्या मोटारीतून मी कर्जतला जाई व सोमवारी त्यांच्याबरोबर परत येई. माझा नाटकाचा निर्णय त्यांना अजिबात आवडला नव्हता. तसं ते बोलून दाखवत नसत, पण त्यांच्या वागण्यावरून ते कळत असे. नंतर, मी १९९९ मध्ये जेव्हा दादरला स्वत:चं घर घेतलं त्यानंतर एकदा ते आमच्याकडे आले, मला म्हणाले, ‘‘तू नाटकात गेलास, ते मला आवडलं नव्हतं. आपण पहिल्या रांगेत बसून तिकीट काढून नाटक बघायचं, तर तू तोंडाला रंग फासून रंगमंचावर गेलास. पण आज तू स्वत:ला सिद्ध केलंस, माझा अंदाज चुकवलास. मला खूप बरं वाटलं.’’ आमच्या घरातल्या सर्व ज्येष्ठांना, माझ्या आईबाबांना मान खाली घालावी लागली नाही.

माझ्या नाटकानं मला हे दिलं!

atulparchure@gmail.com

शब्दांकन: डॉ. नितीन आरेकर