अभिराम भडकमकर

‘‘नोकरीधंद्यापेक्षा काही वेगळं करत जगता येतं, हे समजू लागण्याचा काळ हा ‘गद्धेपंचविशी’आधीचा. कोल्हापूरनं शालेय पुस्तकबाह्य़ शिक्षणाची खूप सोय केली होती, पण तरीही एक प्रयोजनहीन जगणं सुरू होतं. प्रयोजन नसल्याचा फायदा हा, की काहीही वर्ज्य  नव्हतं आणि हीच कोरी पाटी ऐन पंचविशीत उपयोगी पडली. म्हणूनच अभिनिवेशरहित मोकळ्या मनानं जगता आलं. गद्धेपंचविशीपासून वाटेवर कोल्हापूर- पुणे- दिल्ली- आणि मुंबई अशी स्थलांतरं घडली आणि वाटेत ‘हसतखेळत’, ‘देहभान’, ‘सलाब’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘बालगंधर्व’, ‘आम्ही असू लाडके’, ‘पछाडलेला’, ‘इन्शाअल्लाह’.. अशी वळणं लागत गेली. गद्धेपंचविशीतलं संचित असं आयुष्य घडवत गेलं..’’   

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच

‘गद्धेपंचविशी’सुटी वेगळी करून पाहता येत नाही. तिच्या पायाभरणीचा काळ महत्त्वाचा. यात मला काय काय दिसतं? वाचनाची प्रचंड आवड असलेली आई. पुरेसं शिकायला मिळालं नाही ही कमतरता तिनं भरून काढली वाचनानं. पसे साठवून घेतलेल्या मराठी आणि हिंदी लेखकांच्या पुस्तकांनी घर भरलेलं. दोन दोन वाचनालयांची ती वर्गणीदार. शाळेत भरत लाटकर सर नाटक बसवायचे. भाषा शिकवायला मंदाकिनी खांडेकर (वि. स. खांडेकरांच्या कन्या), कुमुदताई देशपांडे. आनंद महाडेश्वर सर वक्तृत्वासाठी पुस्तकं वाचून घेणारे. शाळेत राबता लेखक-विचारवंतांचा. कोल्हापूरला गणेशोत्सवाच्या काळात मेळे व्हायचे. ते बघायलाही आम्ही जायचो आणि संधी मिळाली तर दोन-पाच मिनिटं नकला वगरेही करायचो. समोर तुडुंब प्रेक्षक. जे सादर करतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं. प्रेक्षकाभिमुख होणं इथेच शिकलो असेन मी.

असे रस्त्यावर होणारे मेळे आणि नंतर ‘केशवराव भोसले नाटय़गृहा’त केलेली नाटकं, यातून नाटकाची मौज कळली आणि जादूही. कोल्हापूरात स्टुडिओत शूटिंग पाहायला जायचा छंद लागला. दादा कोंडके, अनंत माने, भालजी पेंढारकर अशा कित्येक दिग्गजांना काम करताना पाहिलं. नोकरीधंद्यापेक्षा काही वेगळं करत जगता येतं, हे समजू लागण्याचा हा काळ. आपला पिंड नेमका काय, याचा अंदाज येण्याचाही काळ. पाय नाटकाकडे, साहित्याकडे वळले, ते याच भारावलेल्या वातावरणामुळे.

या पायाभरणीला कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे आणीबाणी! ते भयपर्व संपलं आणि निवडणुका जाहीर झाल्या. या काळात राजकीयदृष्टय़ा सजग असलेल्या कोल्हापुरात कोण येऊन गेलं नाही? चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी, पु.ल. देशपांडे, तारकेश्वरी सिन्हा, इंदिरा गांधी, प्रमोद महाजन, यशवंतराव चव्हाण! या सगळ्यांच्या भाषणांनी मिशी फुटायच्या आतच मतं फुटू लागली होती. बरं, शिक्षकही हटके. चरणसिंगांचं भाषण ऐकायचंय, पण ते दुपारी ११ वाजता होतं. सर म्हणाले, ‘‘शाळेत उशिरा या. चालेल. त्या सभेतही शिकायलाच मिळणारे तुम्हाला.’’ या सगळ्याचा पहिला संस्कार म्हणजे शालेय पुस्तकाबाहेरही शिकण्याच्या खूप जागा असतात. कोल्हापूरनं अशा पुस्तकबाह्य़ शिक्षणाची खूप सोय केली. फक्त नाटकच करावंसं वाटत होतं; पण म्हणजे काय करायचं? ते पोटापाण्याचं साधन होऊ शकत नाही, असं कानावर येतच होतं; पण सगळं पोटापाण्याभोवतीच फिरलं पाहिजे का? पोट महत्त्वाचं; पण किती? भूक असतेच; पण किती? मग आपली नेमकी भूक काय? याचा नकळत शोध घेऊ लागलो. ‘पुढारी पाहिजे’ या पु. ल. देशपांडेंनी लिहिलेल्या नाटकाच्या तालमी शाळेत सुरू झाल्या होत्या. तिथे जाणवू लागलं होतं, हा आपला आनंद. ही आपली जगण्यातली खरी मौज! हेच आपलं आयुष्य होईल का? ‘पुढारी पाहिजे’ हे नाटक करणं सोपं गेलं, कारण १९७७ च्या निवडणुकीत ऐकलेल्या भाषणांतून वेगवेगळ्या ‘इझम्स’शी तोंडओळख झाली होती. आजूबाजूला या वेगवेगळ्या इझम्ससाठी पोट बाजूला सारून आयुष्य झोकून देणारी माणसं दिसली होती. मला ‘इझम’पेक्षा त्या विचारासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या माणसांचंच अप्रूप होतं. त्यांचे इझम दुय्यम होते. असं कशासाठी तरी आयुष्य भिरकावून देणारे माझे हिरो होते. मी कशासाठी असं आयुष्य झोकून देणार आहे? नाटकात सापडलेल्या आनंदासाठी? त्या जादूई मौजेसाठी? ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं मीही म्हणतो, पण कारण हे, की असे प्रश्न निर्माण झाले आणि मला छळतही राहिले.

शालेय शिक्षणाचा उपचार सुरू असताना बाकी भटकंती होतीच. खेळ- म्हणजे गोटय़ा, पतंग, भोवरे आणि पाकिटं (सिगारेटच्या पाकिटांचा ‘नक्का, दुव्वा, तिय्या, पोगा’ हा खेळ खेळलेल्यांना त्यातली मजा कळेल), खणीत मासे पकडणं. मिळेल ती भाषणं ऐकायची, नकला बघायच्या, जादूचे प्रयोग, तंबूतला सिनेमा.. गणपती उत्सवात रस्त्यात बसून सिनेमे आणि मोहरमला पेटत्या खाईत मारलेल्या उडय़ा पाहणं. जैन बस्तीतली किंवा ‘चिन्मय मिशन’ची प्रवचनं असोत, मेळ्यातली नाटकं, खासबागेतल्या कुस्त्या, अंगात आलेल्यांचं घुमणं, गारुडी, भावगीतं.. आसपासच्या परिसरात जे जे होतं, त्याचे प्रेक्षक होणं हेच आयुष्य होतं. वेळ घालवण्याची ही साधनं होती; पण वेळ वाया जात नव्हता हे तेव्हा कळत नव्हतं.

लिखाणातलं आशयद्रव्य यातूनच येणार असतं हे कुठे माहीत होतं तेव्हा? गाडगेबाबांवरच्या भाषणमालेतून, चार्वाकावरील व्याख्यानातून मनावर गोंदलं गेलेलं काही तरी, नंतर माझ्या ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकातल्या ‘भास्कर’मधून आणि ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीतल्या ‘रफिक’मधून उमटणार होतं.  एक प्रयोजनहीन जगणं सुरू होतं. प्रयोजन नसल्याचा फायदा हा, की काहीही वर्ज्य  नव्हतं. जे जे समोर येईल ते ते पाहणं. मनात साठवण्याचंही प्रयोजन नाही; पण ते आपोआप साठत जातं, हेही माहीत नव्हतं. विविध सामाजिक, आर्थिक स्तर, स्वभाव, जगण्याच्या, विचार करायच्या पद्धती, गंड, दृष्टिकोन, मर्यादा आणि बलस्थानं असलेली माणसं भेटत गेली आणि एका अपार कुतूहलाच्या नजरेनं त्यांच्याकडे पाहणं हा स्वभाव होऊन गेला. तेव्हा हेमिंग्वे (अर्नेस्ट हेमिंग्वे) आयुष्यात आला नव्हता; पण तो सांगतो लेखकानं न्याय करू नये. तसं न्याय न करता बघणं आणि नकळत समजून घेणं! म्हणूनच ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकात मला पराकोटीचा नास्तिक भास्करही कळतो आणि देवभोळी निर्मलाही. यामागे त्यावेळचं कोरी पाटी, कोरं मन घेऊन वावरणं असावं.

अशा कोऱ्या पाटीसह मला पुण्याला शिकायला यायची संधी मिळाली, तेव्हा खऱ्या अर्थानं वयाची ‘गद्धेपंचविशी’ सुरू झाली होती. राजाभाऊ नातूंनी नाटकवाल्यांना बागडायला ‘पुरुषोत्तम करंडक’ नावाची प्रयोगशाळा उघडून ठेवलेली. ‘ड्रॉपर्स’सारखी नाटय़संस्था. नाटक हा गंभीर कला प्रकार आहे हे रुजवणारी. या सगळ्यातून एक स्पष्ट झालं, की नाटकच करायचं. ती आता आपली फक्त आवड नाही, हौस नाही. या संस्थेत नाटक म्हणजे फक्त तालमी आणि प्रयोग नव्हतं. त्या अनुषंगानं ‘हे वाचलं का?’, ‘ते पाहिलं का?’ अशा चर्चा घडायच्या आणि नवीन नाव ऐकलं की टिपून घ्यायचं आणि ग्रंथालयातून घरी आणायचं. आता नव्या जाणिवेचं नाटक खेचून घेत होतं.

वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र फिरायला मिळाला. विविध स्पर्धकांच्या सहवासात नवं जग कळू लागलं. स्पर्धातली बक्षिसंही हवी असायची, कारण पुण्यात राहाताना नाटकं बसवायला आणि या छंदासाठी पसे लागायचे. ते घरी मागायला संकोच वाटायचा. ती कमाई यातून व्हायची; पण त्या स्पर्धाच्या निमित्तानं चांगलं ऐकायची गोडी लागली. मग ग. प्र. प्रधान, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, शरद जोशी, बापू केंदूरकर, विद्या बाळ, नरहर कुरुंदकर, सदाशिवराव देवधर, अहिल्याताई रांगणेकर, हुसेन जमादार, प्र. ल. गावडे आणि  असंख्य.. परस्परविरोधी विचारसरणींची ही विद्वान माणसं. त्यांनी  विचारविश्वाचं भरणपोषण केलं. एकेक विचारसरणी म्हणजे जणू जगातल्या समस्यांवरचा एकमेव उपाय. किंबहुना अंतिम सत्यच. गोंधळही  व्हायचा. याच वेळी जी. ए. कुलकर्णी हातात पडले. त्यांच्या ‘यात्रिक’ कथेनं गोंधळ दूर केला. दहावी-अकरावीत ‘जी.ए.’ वाचून काही कळत नाही, असं म्हणत भाव खायची फॅशन होतीच; पण जी.ए. कळत नाहीत असं कधी वाटलं नाही. उलट विचारांची कवाडं खुलताहेत आणि उत्तर आपल्याला शोधायचंय हेच जाणवलं. या सगळ्यांची भाषणं ऐकून ही कवाडं उघडली जात होती आणि ते आहे तसं स्वीकारण्याऐवजी या सगळ्यावर आपला एक विचार, एक म्हणणं आहे, हे जाणवत राहिलं. एकेका विचारधारेवर श्रद्धा ठेवून जगत राहणं टवाळी करावी इतकं सोपं, स्वस्त नाही, हे जाणवत होतं. त्यातले काही तर त्या विचारासाठी घरदार, ‘सेटल’ होणं नाकारून काम करताना दिसत होते. ही माणसं, या सर्व विचारसरणी एक भान देऊन गेल्या.. झापड लावून नाही! ‘मी पोथीनिष्ठता नाकारतो. मग ती पोथी दासबोधाची असो वा ‘दास कॅपिटल’ची’ या पुलंच्या स्वरात मी स्वर मिसळवू लागलो. कदाचित म्हणूनच ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीतल्या नसीमा मॅडम गद्धेपंचविशीतल्या झुल्फीला सल्ला देतात, ‘सब पढो. गांधी, सावरकर, आंबेडकर..’ हे असं सगळं घेऊन मी दिल्लीला ‘एन.एस.डी.’त आलो. एक विश्वरूपदर्शनच होतं ते. ‘नाटक असं असतं राजा!’पासून ‘नाटक असंही असू शकतं?’पर्यंतचं. किती किती शक्यता दिसू लागल्या व्यक्त होण्याच्या. देहबोलीतून, शब्दांतून, नि:शब्दतेतूनही.. माणसांतून, बाहुल्यांतून.. रंग, मुखवटे, स्वरांतून.. शून्यातूनही.. दुबेजींनी (सत्यदेव दुबे) दरडावलं, ‘रोज एक नाटक पढेबिना सोना मत!’ मी इमानेइतबारे हे पाळलं; पण ‘मी खूप वाचलं’ असं म्हणता येणार नाही, असं आणि इतकं वाचणारी माणसं समोर होती. उंच माणसांत राहायचा हा फायदा. खोली वाढते; पण या वाचनानं खूप काही दिलं.

एकीकडे वास्तववादी शैलीतलं नाटक करायचं, तर लगेच ‘नोह’ शैलीतलं जपानी पारंपरिक नाटक. आपले भास, कालिदास, तर तिकडले चेकॉव्ह, स्टीनबर्ग. या सगळ्यांसाठी मनानं आणि शरीरानं लवचीक होणं गरजेचं. पुन्हा तेच. काहीही वर्ज्य नाही, की ‘हे दुय्यम, ते उच्च’ असा भाव नाही. रामलीला, पारसी थिएटर, सगळ्याचं सादरीकरण व्हायचं. तेव्हाच लक्षात आलं, ही सगळी नाटकं म्हणजे व्यक्ततेसाठी त्या त्या काळात शोधून काढलेले मार्ग आहेत.

फ्रीटझ् बेनेवीटझ् सारखे उत्तुंग शिक्षक भेटले. त्यांच्याशी गप्पा हे शिक्षणच होतं. सहज एकदा मी म्हटलं, ‘‘भारतीय, विशेषत: मराठी नाटक खूप समकालीन असतं.’’ ते पटकन म्हणाले, ‘‘मूलभूतही असायला हवं! शेक्सपीयर किंवा महाभारत मूलभूत मांडणी करतात, म्हणून कायमच समकालीन राहातात.’’ वीज कडाडून आसमंत लख्ख उजळावा, तसं आत काही तरी उजळलं. आजही विचार करताना जाणवतं, समकालीन होण्याच्या नादात मूलभूततेकडे दुर्लक्ष होतं का? समकालीन प्रवाह, विचार आणि समकालीन बंडखोरीचीही चौकट होते का? आणि ती मूलभूत चिंतनापासून दूर नेते का? साचेबद्ध बंडखोरीत सामील होणं कदाचित तात्कालिक टाळ्या घेणारं असू शकतं. एका तंबूत ओढून घेत सुरक्षाही देतं ते; पण फ्रिटझ् वेगळंच काही पेरून गेले होते.

‘इन्शाअल्लाह’ लिहिताना सर आठवत राहिले. कारण एखाद्या अभिनिवेशाचा चष्मा लावून लिहिणं टाळताना, सर्व प्रकारच्या कट्टरतेला, ध्रुवीकरणाला नकार देताना होणारी ससेहोलपट त्यांना जाणवली असती. पुरोगामित्वाची तीव्र गरज आहे, हे मांडताना आजच्या पुरोगामित्वाची कठोर चिकित्सा किंवा चिरफाड करत पठडीबाज बंडखोरीला छेद देणं त्यांना आवडलं असतं आणि अशा माणसांच्या वाटय़ाला येणारं उपरेपण आणि अनुल्लेखाचा धोका पत्करणंही. अर्थात सोशल मीडियाचे पन्नास तोटे असूनही त्यानं आता अनुल्लेखाचं हत्यारच काढून घेतलंय हे मान्य करावं लागेल. समकालीन प्रवाहाला शरण न जाणं, ही गद्धेपंचविशीत फ्रिटझ् सरांनी दिलेली दृष्टी आहे.

राम गोपाल बजाज सरांच्या तासाचा पहिला एक्सरसाइज- ‘एक्सपान्शन काँट्रॅक्शन’. शरीर जमेल तितकं आकसून घ्यायचं.. आकुंचन आणि मग ते पसरवायचं, चवडय़ावर उभं राहून हात आकाशाकडे.. प्रसरण! शरीराबरोबर मनाचंही आकुंचन-प्रसरण पावण्याचा एक अभ्यास. शारीरिक आणि मानसिकही. साधाच वाटला; पण असं विस्तार पावता पावता ध्यान लागल्यासारखं होई आणि आपण शरीरमनानं क्षुद्र बिंदूइतके होतो आणि हळूहळू आभाळाइतके. एकाग्रता, कल्पना आणि देहबोलीचा हा एकत्रित व्यायाम प्रकार. आता लक्षात येतं, ‘अणुरेणिया थोकडा, तुका आकाशाएवढा’ असं म्हटलं जातं, ते हेच होतं!

अडीच वर्ष अशी एका नादात सरली; पण मग घेरलं ते एका असुरक्षिततेनं. आता सहा महिन्यांत कोर्स संपणार! समोर होती अनिश्चितता. हे क्षेत्र निवडल्यामुळे ही अनिश्चितता कायमच जगण्याचाच एक भाग असणारे, हे कळत होतं; वळत नव्हतं. अनिश्चिततेसकट जगण्याचं कसलंच प्रशिक्षण नव्हतं. त्यात ‘बाहेरच्या जगात आल्यावर काय करायचं?’पेक्षा ‘काय करायचं नाही?’ याचाच गलबला फार होता. प्रायोगिक नाटक म्हणजे अंतिम. पवित्र. त्याला सामाजिक बांधिलकीची जोड असली तर मग काय, महानच! बाकी मालिका-सिनेमे करताना अपराधीभावच आणि व्यावसायिक नाटक म्हणजे ‘कलेशी प्रतारणाच’. या सगळ्या गलबल्याच्या प्रभावातून स्वत:ची वाट काढायची होती. आपला पिंड आणि आपली पेस शोधायची होती. शांत डोक्यानं विचार केला. शेवटी कला-साहित्य काय आहे? सत्याच्या शोधाची धडपडच ना? भारतीय तत्त्वज्ञान मोकळं, खुलं आहे. ते सांगतं, ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति..’ सत्य एकच आहे, विद्वान ते वेगवेगळ्या रूपांत पाहतात. मग कसले भेदाभेद घेऊन बसतो आपण? स्वभावात प्रयोगशीलता हवी बस्स! बाकी सर्व शैली, सर्व माध्यमं आपापल्या परीनं सत्यशोधनाचाच मार्ग आहेत. आपल्याच मार्गाला सत्य मानण्याचा अभिनिवेश कशाला? किंबहुना अभिनिवेशच कशाला? म्हणजे पुन्हा अभिनिवेशरहित मोकळ्या मनानं सुरुवात.

‘गद्धेपंचविशी’त कोल्हापूर- टू पुणे- टू दिल्ली- आणि मुंबई अशी स्थलांतरं घडवली. तेव्हा माहीत नव्हतं, वाटेत ‘हसतखेळत’, ‘देहभान’, ‘सलाब’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘बालगंधर्व’, ‘आम्ही असू लाडके’, ‘इन्शाअल्लाह’ आणि अगदी ‘पछाडलेला’सुद्धा.. अशी वळणं लागणारेत. अर्थात आयुष्याच्या अगदी उत्तरार्धात ‘झाला तो सगळाच गाढवपणा होता’ असं वाटलं, तरी ते स्वीकारण्याची तयारी आहे.

काही महिन्यांपूर्वी आई म्हणत होती, ‘या गद्धय़ाला सरळ कसं चालताच येत नाही.’ आज खरोखर मागे वळून पाहताना जाणवतं, वेडंवाकडं, वाट फुटेल तसं भटकत राहण्याची मौज कळणं आणि त्यासाठी बळ मिळणं, हेच माझ्या ‘गद्धेपंचविशी’चं संचित आहे!

abhiram.db@gmail.com