गद्धेपंचविशी : वेदनांचं सजग भान नि सहवेदनांच्या समृद्ध जाणिवा…

मी समृद्ध झालो. तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय.’’     

|| अविनाश नारकर

‘‘माझ्या पंचविशीत मी राहत असलेल्या परिसरातील गिरणी कामगारांच्या जगण्याच्या वेदना माझ्या अवतीभवती होत्या. मी त्या वेदना कलेच्या माध्यमातून शमवण्याचा प्रयत्न करायला शिकलो. माझी कला लोकांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फु लवेल, ते नाटकांत कसे गुंतून राहतील, हे पाहात गेलो. माझ्यासाठी नाटक हे व्यवसायाचं साधन नव्हतंच कधी. लहान मुलाला स्वाक्षरी देतानाही उठून उभे राहणारे निळूभाऊ पाहिले अन् विनम्रता शिकलो. डॉ. श्रीराम लागूंकडून आवाज, शिस्त सारंच शिकलो. भक्तीताई बर्वेंकडून रंगमंचावरील व्यक्तिरेखांतील, भावनांतील बदल कसा झपाट्यानं करायचा ते शिकलो. प्र.ल. मयेकर, वामन केंद्रे या प्रत्येकाकडून काही ना काही टिपकागदासारखं टिपलं. मी समृद्ध झालो. तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय.’’     

माझ्या लहानपणी आम्ही लोअर परळमध्ये राहत होतो. आमच्या चाळीचं नाव होतं, हंसाबाईची चाळ. त्यातच बाबांचं तंबाखूचं दुकान होतं. ‘आगे दुकान पिछे मकान’ असं सारं मिळून साडेतीनशे चौरस फुटांचं ते घर. आई, बाबा, मोठा भाऊ व त्याचं कुटुंब, नंतरचा भाऊ व त्याचं कुटुंब, तीन बहिणी, त्यातल्या एकीचं लग्न झालेलं, दुकानात काम करणारी; पण आमच्याच घरात राहणारी दोघं, असे आम्ही चौदा जण त्या घरात राहायचो. जागा छोटीशी होती, पण जगण्याचा आनंद फार मोठा होता.

ती सारी कामगार वस्ती होती. आमचा शेजार चांगला होता. माझे महाविद्यालयात शिकण्याचे दिवस सुरू झाले. १९८३- ८४ चा तो काळ. सारं सुरळीत चालू असताना, गिरणी कामगारांच्या संपात मिल बंद पडल्या आणि त्या परिसराची वाताहत सुरू झाली. संपूर्ण लालबाग-परळ परिसरात अस्वस्थता पसरू लागली. या अस्वस्थतेच्या काळात मी तरुण होत होतो. माझ्या अवतीभवतीच्या परिसरात व्यसनाधीनता वाढत होती. गँग वॉरचा जमाना होता तो. तरुणांना त्याचं आकर्षण निर्माण होत होतं. जरा काही खुट्ट झालं की मारामाऱ्या सुरू होत. आमच्या समोरच्या एका घरात एक कुटुंब राहायचं, त्यांची दररोज भांडणं होत असत. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ यांच्यात सदैव काही तरी वाद चालूच असायचे. एकदा तर रागाच्या भरात दारू पिऊन एका भावानं त्याच्या बहिणीच्या डोक्यात वरवंटा घातला होता. असं सुरू झालं, की आई मला घरात ओढून न्यायची; पण मी दाराआडून ते बघत राहायचो. मला त्यावेळी प्रश्न पडायचे, ‘हे असं का? आपलं घर कसं आनंदी आहे आणि त्या घरात ही अस्वस्थता का आहे? ती आपण दूर करू शकतो का? सर्व समाधानी कसे होतील?’ या भांडणं होत असलेल्या कुटुंबातला भाऊ काही वेळा दारू प्यायलेल्या अवस्थेत मला भेटायचा, विचारायचा, ‘‘काय अवी, काय चाललंय सध्या? नाटकबिटक करतो की नाहीस?’’ तो माझ्याशी बोलला, की मला बरं वाटायचं. मी उत्तरायचो, ‘‘हो दादा, चालू आहे ना. ये एकदा आमची एकांकिका बघायला.’’ मी असं म्हटल्यावर त्यालाही बरं वाटायचं, त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. मला वाटायचं, या हसण्यासाठी आपण काही तरी करायला हवं.

हे काही तरी म्हणजे आपलं नाटक आहे, याची जाणीव मला होऊ लागली.

   मी अठरा वर्षांचा झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळूनही अवतीभवतीच्या अस्वस्थतेमुळे सुरुवातीच्या तीन-चार निवडणुकांत मतदान केलं नव्हतं. कोणताही राजकीय पक्ष कोणासाठी काहीही करत नाही, आपण त्यांना मतदान का करावं, असं वाटायचं त्या वेळी. मनाचा त्रागा होत होता. या त्राग्याला वाट फोडणारी गोष्ट होती ते माझं नाटकाचं पॅशन. जशी समज वाढत गेली तसं मी नाटकामध्ये अधिक गुंतत गेलो.

माझा मोठा भाऊ एकदा मला ‘रविकिरण’ ग्रुपकडे घेऊन गेला. समाजवादी विचारांची ती मंडळी होती. क्रांती बांदेकर, शिवराम सुखी, अनिल सावंत, अविनाश कदम, महेंद्र पवार, रमेश परब, अशोक परब, विजय टाकळे, सारे त्यात होते. ते उत्साहानं पथनाट्यं, एकांकिका करत होते. मी त्यांच्यात सामावलो गेलो. विजय टाकळेनं लिहिलेल्या ‘माणसांची गोष्ट’सारख्या एकांकिकांमधून आम्ही माणसांच्या गोष्टी सांगत होतो. मी बेभान होऊन काम करत असे. माझ्या परिसरातील माणसांच्या वेदना, त्यांचे प्रश्न रंगमंचावरून मांडताना मला समाधान मिळे.  माझं मन मला सांगत होतं, ‘हेच तुझं काम आहे, करत रहा.’ मी नाटक करत राहिलो. नाटकामागे माझा कधीही व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता, त्यामागे सामाजिक बांधिलकीचा विचार होता. त्या वेळी चित्रपटगृहात बलराज सहानी यांचे चित्रपट बघताना माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी ओघळायचं. ते लोकांच्या भावना व्यक्त करत असत, तसं मी करावं असं वाटे. कला क्षेत्रातील माणूस सामान्य लोकांचं जीवन मांडू शकतो, त्यांच्यात आनंदाचे, समाधानाचे मळे फुलवू शकतो, हे मला पटलं होतं. त्यामुळे एकांकिका करत असताना मी स्पर्धेची गणितं पाहिली नाहीत. माझा मित्र विजय टाकळे व मी चर्चा करायचो. तो लिहायचा व मी दिग्दर्शन-भूमिका करायचो. त्यामुळे ‘आठ बाय दहा’,‘व्हिक्टिम’, ‘कुकुच्कू’, ‘शेवाळ शोधतंय क्लोरोफिल’सारख्या समाजातली अस्वस्थता दाखवणाऱ्या नाट्यकृती घडत गेल्या.

माझं भाग्य म्हणजे विशीच्या आसपास मला विनायक पडवळ गुरू म्हणून लाभले. ते अनेक स्पर्धांना परीक्षक असत. एका स्पर्धेनंतर ते मला म्हणाले, ‘‘तुझ्यात काय बारूद आहे ते तुला माहितीय का? तू काम करताना तुझ्या पायाच्या बोटांकडेही लक्ष जातं, पण तुझ्या ते लक्षात येत नाही.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘सर, तुम्ही आमच्या एकांकिका बसवा, मला शिकवा.’’ सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत गेलो. कोंस्टांटिन स्तानिस्लाव्सकी, ब्रेख्त यांचा परिचय होत गेला. क्रांती बांदेकर यांच्याबरोबर पथनाट्यं करताना त्यांच्या नाटकांचा उपयोग होत होता. मी मात्र या थिअरीजशी स्वत:ला बांधून घेतलं नाही. कथानकाला अनुसरून भावना व्यक्त करणं मला महत्त्वाचं वाटतं. प्रेक्षक माझं नाटक बघत आहेत ना, ते बघताना त्यांची डोळ्याची पापणीही लवता कामा नये, इतके  ते गुंगून गेले पाहिजेत, असं मला वाटायचं, त्यातून माझी शैली घडली. प्रेक्षकांनी मला दाद दिली पाहिजे, एकांकिकेनंतर, नाटकानंतर नाटकाबद्दल, माझ्या भूमिके बद्दल येऊन सांगितलं पाहिजे, असं मला आजही वाटतं.

माझं नाटकाचं पॅशन पाहून माझे मामा वडिलांना म्हणाले होते, ‘‘याला आपण एन.एस.डी.ला पाठवू या.’’ बाबांनी मला विचारलं, ‘‘बघ, मामा काय म्हणतो ते.’’       मी नकार दिला.  मी घरातलं शेंडेफळ होतो, पण मला जबाबदाऱ्यांचं भान होतं. तीन वर्षं दिल्लीत राहायचं, त्यासाठी वडिलांनी खर्च करायचा हे मला पटत नव्हतं. मी बारावीपासूनच नोकरी करत होतो. तुम्हाला जर समाजकार्य करायचं असेल तर, ते आधी घरापासून करायला हवं, म्हणून माझ्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर समाधान आणणं हे माझं पहिलं काम होतं. मी ते करत होतो. आई-बाबांवर माझं प्रचंड प्रेम आहे. दरमहा मिळणारे तीन-साडेतीन हजार रुपये मी घरात आणून देत असे. मी कधीही हट्ट केले नाहीत. वर्षाला दोन पँट्स, तीन शर्ट मिळत असत. ते घालायचे, खांद्याला झोळी, खिशात लाला लजपतराय कॉलेजात जाण्यासाठी रेल्वेचा पास आणि पाच रुपये असा अवतार. बाबा सकाळी साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत दुकानात काम करत असायचे, तरीही ते तजेलदारच दिसायचे. त्यांचं बघून मी तसंच वागायचा प्रयत्न करायचो. सकाळी कॉलेज, दिवसभर नोकरी, संध्याकाळी उशिरापर्यंत एकांकिकांच्या तालमी असा दिनक्रम. चालताना, प्रवासात असताना माझ्या डोक्यात सतत एकांकिकेचे संवाद सुरू असायचे, ती तालीमच म्हणायला हवी.

कॉलेजात असताना ‘आय.एन.टी.’, यूथ फेस्टिव्हल, इप्टा आणि इतर नाट्यस्पर्धांत आम्ही भाग घ्यायचो. अभिनयाची भरपूर बक्षिसं मिळत होती. अभ्यासात मी हुशार होतो, पण पहिल्या नंबरचा हव्यास नव्हता. डिस्टिंक्शन मिळवलं की झालं. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि काही दिवसांत बाबांचं निधन झालं. मला धक्का बसला. नाटकात करिअर झालेलं त्यांना दाखवायचं होतं, पण ते राहिलं.

मला बँकेत नोकरी करायची होती. जयवंत वाडकर, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, रमेश पवार, शिवाजी साटम, रीमा, विवेक लागू, सुहास पळशीकर असे अनेक जण बँकेत नोकरी करायचे. आपलं नाटकाचं वेड आणि नोकरी हे दोन्ही इथंच पुरं होईल असं वाटत होतं. प्रयत्नही के ला होता; पण ज्यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळणार होती ते गृहस्थ नेमके  निवृत्त झाले. मग मी ‘बी.ई.एस.टी.’ची परीक्षा दिली व तिथं नोकरीला लागलो. ‘बेस्ट’मध्ये प्र.ल. मयेकर भेटले आणि आयुष्याचं सोनं झालं.

प्र.ल. मयेकर मला आधीपासून ओळखत होते. एका नाट्यस्पर्धेत ते परीक्षक होते त्या वेळी त्यांनी मला अभिनयाचं पारितोषिक दिलं होतं. एकदा ते म्हणाले, ‘‘तू अरुण नलावडेला ओळखतोस का?’’ मी म्हणालो, ‘‘हो, कसला अभिनय करतात ते, डिक्शन जबरदस्त आहे त्यांचं.’’ प्र.ल. म्हणाले,‘‘त्याच्यासारखं करायचं आहे तुला.’’ ही गोष्ट १९८३ ची.  ‘बेस्ट’मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी ‘काळोखाच्या सावल्या’ करायला बोलावलं. त्यात अरुण नलावडे व मी. वयाच्या २२-२३ व्या वर्षी प्र.लं.नी मला ६५-७० वर्षांच्या माणसाची भूमिका करायला दिली. भन्नाट भूमिका होती. कर्तृत्ववान, दरारा असलेला बाप, वाया गेलेली मुलं आणि नंतर होत जाणारं त्या बापाचं अध:पतन असा त्या भूमिकेचा ‘ग्राफ’  होता. ‘बेस्ट’साठी केलेल्या या नाटकासाठी मला रौप्य पदक मिळालं. नंतर ‘संगीत मत्स्यगंधा’ या संगीत नाटकात मी भीष्माची- देवव्रताची भूमिका केली, त्यात गद्य नटासाठीचं रौप्य पदक मिळालं. मयेकरांनी त्यानंतर मला ‘तो अनंत अवशिष्ट’ हे नाटक करायला सांगितलं.  ‘स्वामी समर्थ’ संस्थेनं ते राज्य नाट्य स्पर्धेसाठी आणि कामगार नाट्य स्पर्धेसाठी केलं. या भूमिकेसाठी दोन्ही स्पर्धांत मला अभिनयाचं रौप्य पदक मिळालं. १९८९ ते ९३ या काळात मला अभिनयासाठी तेरा-चौदा रौप्य पदकं मिळाली.

 सारा भारावलेला काळ होता तो. १९९२ मध्ये मी डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर ‘चाणक्य विष्णुगुप्त’ नाटक केलं. मी त्यात चंद्रगुप्त करायचो. ती भूमिका करताना फार मोठं शिक्षण मिळालं. काही दृश्यांमध्ये डॉक्टर वरच्या लेव्हलवर उभे असायचे आणि खालच्या लेव्हलवर, त्यांच्या पोटाजवळ मी उभा असायचो. त्यांचे संवाद ऐकताना त्यांच्या पोटातून जो आवाज यायचा तो मंदिराच्या गाभाऱ्यातून येणारा आवाज वाटायचा. हा आवाज कसा येतो, त्याचा सारा प्रवास कसा असतो, डॉक्टर लागू तो आवाज कसा प्रोजेक्ट करतात व तो आवाज ऐकणाऱ्याला कसा मंत्रावून टाकतो याचा प्रत्यक्ष अनुभव मिळत होता. मी तो शोषून घेत होतो.

१९९३ मध्ये मी पहिलं व्यावसायिक नाटक केलं. ‘गंध निशिगंधाचा’. या नाटकानं माझ्या आयुष्यात निशिगंध फुलवला, असं मी गमतीनं म्हणतो, कारण या नाटकाच्या निमित्तानं मला पल्लवी आठल्ये भेटली, जी नंतर माझी बायको, ऐश्वर्या नारकर झाली. प्रभाकर पणशीकर, रेखाताई, शरद पोंक्षे, जनार्दन सोहोनी, एकनाथ शिंदे आदी कलाकार त्यात होते. त्यानंतर मी ‘चंद्रलेखा’साठी अविनाश मसुरेकर यांची रिप्लेसमेंट म्हणून ‘रंग माझा वेगळा’ केलं. त्यात भक्ती बर्वे होत्या. मयेकर त्या वेळी मला म्हणाले, ‘‘रिप्लेसमेंट वगैरेचा विचार करू नकोस. भक्ती बर्वे म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ आहे. तिच्याबरोबर काम करताना शिकून घे.’’ आणि मी खरंच समृद्ध होत गेलो…

व्यावसायिक रंगभूमीवर येण्याआधी मला वामन केंद्रेबरोबर पु.ल. महोत्सवासाठी ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक करायला मिळालं. तो एक जबरदस्त अनुभव होता. त्याला अंकुशदादाच्या भूमिकेसाठी योग्य नट हवा होता. त्यातल्या कु णी तरी माझं ‘तक्षकयाग’ पाहिलं होतं. त्यानं माझं नाव सुचवलं. वामन नुकताच ‘एन.एस.डी.’मधून आला होता. आम्ही सकाळी १० च्या सुमारास ऑडिशनसाठी बसलो. एकच वाक्य तो वेगवेगळ्या प्रकारे माझ्याकडून म्हणवून घेत होता. तीन-चार वाजेपर्यंत ते सुरू होतं. मग वामन म्हणाला, ‘‘तुझ्याकडे पेशन्स आहेत. आपण तीन पैशाचा तमाशा करतोय.’’ त्यानंतर मी त्याच्याबरोबर सहा नाटकं केली. आमची टीम छान जमली होती.

अनेकदा मला प्रश्न विचारला जातो, ‘तुम्ही हिंदीत फार काम केलं नाही.’ तर त्याचं उत्तर, हो, ते खरं आहे. मला मराठीत खूप काम करायला मिळालं. हिंदीत जाण्याची एक मोठी संधी मिळाली होती, पण, हुकली. ‘दूरदर्शन’वर माझी एक एकांकिका सुरू होती, ‘ढोल वाजतोय’. त्यातली भूमिका बघून धरमवीर वर्मा यांनी मला भेटायला बोलावलं. ते ‘नासीर हुसेन प्रॉडक्शन’साठी काम करत. ते माझ्यावर खूप प्रेम करत. मला वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात बोलावून घेत, बोलत, हिंदी कसं सुधारायला हवं त्याच्या सूचना देत. एकदा ते मला म्हणाले, ‘‘नासीर हुसेनजी एक चित्रपट करत आहेत, त्यात तुझ्यासाठी छान रोल आहे. मी तुझी व त्यांची भेट घडवून देतो.’’ असे  चार-सहा महिने गेले आणि अचानक त्यांचा फोन येणं थांबलं. शेवटी एक दिवस मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा कळलं, धरमवीरजी काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निवर्तले होते. काही दिवसांनी ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाचा शुभारंभ झाला. धरमवीरजींनी मला राज झुत्शीनं केलेली भूमिका देऊ केली होती; पण त्यांच्या निधनामुळे माझी ती संधी हुकली. अन्यथा माझी कारकीर्द वेगळीच झाली असती; पण आज मागे वळून पाहता, त्याचं दु:ख होत नाही. जे घडतं ते चांगल्यासाठीच!

त्यानंतर एकदा ‘रण दोघांचे’ या नाटकाच्या प्रयोगाला प्रसिद्ध लेखक सागर सरहदी हे निळूभाऊ फुले यांना भेटायला आले होते. त्यांनी माझ्या भूमिकेचं खूप कौतुक केलं व नंतर खूप काळ मला त्यांचा सहवास लाभला. त्यांनी माझ्याकडून उर्दूमिश्रित हिंदीची छान तयारी करून घेतली. त्यामुळे मला पुढे कार्टून मालिकांमधील कॅरिकेचर्सचे संवाद म्हणताना खूप फायदा झाला. मी ‘अल्लाउद्दीन’मधल्या यागोसाठी, ‘बाँकर्स’मधल्या बाँकरसाठी, ‘बेबीज डे आऊट’मधल्या तीन चोरांपैकी एक चोर यांसाठी डबिंग केलं. यातून बऱ्यापैकी अर्थार्जन होत होतं. ते पैसे मी माझ्या होणाऱ्या सासूबाईंना सांगून बँकेत वेगळे ठेवत असे, कारण मला माझं लग्न जोरदार पद्धतीनं करायचं होतं. तसं के लंही. माझी पंचविशी अशी भन्नाट वेगानं गेली.

  तेव्हापासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं इंधन मला आजही ऊर्जा देतंय. आपण आपल्यातली ‘इंटेन्सिटी’ सोडता कामा नये. जाऊ दे, मरू दे, होईल कसं तरी, या गोष्टी पंचविशीनं टाळायला शिकवल्या. जे करायचं ते समर्पित भावनेनं करायचं. माझ्या घरातले, आजूबाजूचे लोक, सहकलाकार, रसिक, सारे समाधानी असावेत, समाजातली जीवघेणी अस्वस्थता दूर करून लोकांना आनंद द्यावा, त्यांच्यावर प्रेम करावं, हे मला त्या पंचविशीतल्या भवतालानं शिकवलं. त्या पंचविशीनं मला स्वत:ला समजून घ्यायला शिकवलं. तुमच्यात किती बारूद आहे, याचा शोध तुम्हालाच घेता आला पाहिजे. एक नट म्हणून तुम्हाला स्वत:चा विकास स्वत:च घडवला पाहिजे. मी मोनॉलॉगपासून स्वत:ला तपासून घ्यायला प्रारंभ केला. एकपात्रीमधून मी प्रेक्षकांना आठ-दहा मिनिटं खिळवून ठेवू शकतो का, नंतर एकांकिकेमधून मी तीस-चाळीस मिनिटं त्यांना थांबवून ठेवू शकतो का, हे नंतर मोठ्या नाटकांतून तपासून घेतलं. तुमच्यातल्या शक्ती, तुमच्यातल्या क्षमता तुम्ही अशा टप्प्याटप्प्यानं वाढवत गेलात तर तुम्हाला जीवन चांगलं आकळतं, आपली वाढ होत जाते. प्रत्येक नव्या नाटकाआधी दिग्दर्शकासमवेत चर्चा करायला बसताना मी माझी पाटी कोरी ठेवतो. अर्थात माझ्याजवळ अनुभवानं आलेल्या गोष्टी कायम असतातच, त्यात भर पडत जाते दिग्दर्शकानं दिलेल्या गोष्टींची. अक्षर अधिक वळणदार होत जातं. जगण्याच्या ज्या खूप साऱ्या गोष्टी पंचविशीत असताना कळत गेल्या त्या आज प्रौढपणीही उपयुक्त ठरतात.

  जगण्याच्या वेदना त्या काळात अवतीभवती होत्या. ज्याला जगण्याच्या वेदना कळतात, त्याला आयुष्य अधिक चांगलं कळतं. मी त्या वेदना कलेच्या माध्यमातून शमवण्याचा प्रयत्न करायला शिकलो. पंचविशीत लहान मुलाला स्वाक्षरी देतानाही उठून ऊभे राहणारे निळूभाऊ पाहिले व विनम्रता शिकलो. डॉ. श्रीराम लागूंकडून आवाज, शिस्त असं सारंच शिकलो. भक्तीताईंकडून रंगमंचावरील व्यक्तिरेखांतील, भावनांतील बदल कसा झपाट्यानं करायचा ते शिकलो. प्रत्येक सहकलाकारानं काही ना काही चांगलं दिलं, ते टिपकागदासारखं टिपलं.

माझ्या पंचविशीनं मला सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं असेल तर वेदनांचं सजग भान… संवेदनांची भरगच्च पोतडी … आणि सहवेदनांच्या समृद्ध जाणिवा…

avinashnarkar@ymail.com

शब्दांकन – डॉ. नितीन आरेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gaddhepanchvishi author avinash narkar article awareness pain and rich awareness sympathy akp