मनोज जोशी

‘‘चित्रकला की नाटक?, माझ्या विशीच्या सुरुवातीस माझ्या मनात उभ्या असलेल्या द्वंद्वाचं उत्तर मिळवण्याच्या काळात मी अनेक प्रयोग केले. अनेक नोकऱ्या बदलल्या, फसलोही. ‘कमर्शियल आर्ट’चा अभ्यासक्रम करून कामं करू लागलो; पण नाटक मनातून जाईना. ही कोंडी फोडली ‘चाणक्य’ने. आमचं हे नाटक प्रचंड लोकप्रिय झालं. आणि तिथेच, ऐन ‘गद्धेपंचविशी’त मला उमगलं, ‘आता जगायचं ते अभिनयासाठीच!’’

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

आयुष्य कसं वेगात धावत असतं कळतच नाही. काल-परवा मी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं असंच आठवतंय; पण या लेखाच्या निमित्तानं मागे वळून पाहतोय तेव्हा लक्षात येतंय, की पंचेचाळीस वर्षांपूर्वी गालावर जो नाटकाचा रंग चढला तो आजही उतरलेला नाही. उलट तो अधिकाधिक गहिरा होत चाललाय. तो जितका गहिरा होतोय तितकी त्याची खोलीही जाणवू लागलीय. आपल्याला जगायचंय ते या रंगांच्या सान्निध्यातच याची निश्चित जाणीव मला झाली ती साधारणपणे वयाच्या चोविसाव्या वर्षी. त्या वेळी माझ्यासमोर एक द्वंद्व उभं होतं. ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये जाऊन कागदावर रंगांना आवाहन करायचं, की रंगमंचावर मानवी मनाच्या रंगांना आवाहन करत त्यांना साक्षात साकार करायचं? पंचविशीत हा निर्णय झाला, की बाबा रे मनोज, तुला जगायचंय ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठीच! त्याचीच ही गाथा.

 शालेय शिक्षण संपलं की आपण लागतो आपल्या आयुष्याचं ईप्सित साध्य करायच्या धामधुमीला. वयाच्या अठराव्या वर्षी रायगड जिल्ह्य़ातल्या गोरेगावातून मुंबईत आलो. मला ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये जाऊन चित्रकार बनायचं होतं. हाताच्या बोटांना योग्य वळण होतं; पण प्रवेश मिळाला नाही. मग ‘मिठीबाई महाविद्यालया’त प्रवेश घेतला. तिथे जेमतेम सहा महिने होतो. ‘मिठीबाई’मध्ये गेल्यावर दोन-चार दिवसांत फळ्यावर नाटय़ मंडळाची जाहिरात पाहिली आणि खेडेगावातील शाळेतल्या नाटकात कामं करणारा मी आपसूक तिथे ओढला गेलो. त्या वेळी तिथे कृ.रा. सावंत यांची ‘बच्चू बर्वेची दिवास्वप्ने’ ही एकांकिका बसवणं सुरूहोतं. मी त्यात सामील झालो. मी नाटकात काम करायला लागलो हे माझ्या आईला आवडेना. तिनं माझी रवानगी परत गोरेगावला केली आणि मला कॉमर्सला घातलं; पण त्यातलं अकाऊंट्स मला कळेना. (आजही मला अकाऊंट्स कळत नाही.) अर्थात जे व्हायचं तेच झालं आणि पुढच्या वर्षी अस्मादिकांना परत मुंबईत आणण्यात आलं.

त्या काळात मला बरंच काही काही व्हायचं होतं. माझे वडील- नवनीतभाई जोशी संस्कृतमध्ये त्या काळातील ‘एम.ए.’ होते आणि नारदीय शैलीतील कीर्तनकार होते. त्यांच्याप्रमाणे संस्कृत शिकून शास्त्री व्हावं, संस्कृतमध्ये पदवी घ्यावी, असा विचार मनात घोळत होता. ते लक्षात घेऊन भाईंनी (वडिलांनी) मला ‘भारतीय विद्या भवना’त शनिवार-रविवार संस्कृत शिकण्यासाठी प्रवेश घेऊन दिला. ते चालू असताना कधी वाटे की आपण भाईंप्रमाणे कीर्तनकार व्हावं. पण माझ्या आवाजाला भाईंसारखी गोडी नव्हती. त्या काळात, मनाच्या आतल्या भागात नाटकाबद्दलची ओढ लपलेली असावी. मग जे.जे.ला हॉबी क्लासला प्रवेश घेतला. तिथे मला माझ्यापेक्षा थोडासा सीनियर असलेला आशुतोष आपटे भेटला. हा म्हणजे एकदम अवलिया! त्याला उपजतच ललित कलांचं ज्ञान होतं. जे.जे.मधला असा एकही कोर्स नसेल, जो त्यानं केला नसेल. त्याला नाटकाचंही ज्ञान उपजतच होतं. दिग्दर्शन, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य (सेट्स), हे त्याला येतच होतं. जे.जे.मध्ये जरी मला रीतसर प्रवेश मिळाला नसला, तरी जे.जे.च्या आवारात माझा वावर असायचा. तिथे मी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका लिहिली- ‘कर्म’. त्या काळात तिचा विषयही वेगळा होता आणि तो मला घरातच सापडला होता. भाई आणि माझे आजोबा यांच्यातला वैचारिक संघर्ष. आमच्या घरात वंशपरंपरागत पौरोहित्य होतं. आजोबांची इच्छा होती, की भाईंनी धर्मात सांगितलेली सोळा संस्कारांची सर्व कर्म करावीत. आजोबांना किरवंत म्हणूनही काम करावं लागे, कारण गोरेगाव परिसरात दुसरं कोणी नव्हतं. भाईंनी संस्कृतमध्ये एम.ए. केलेलं, वेद-उपनिषदं—पुराणं-अर्थशास्त्र आदींचं रीतसर अध्ययन केलेलं होतं, ते गुजराती-मराठी भाषेत नारदीय शैलीत कीर्तनं करणारे एकमेव कीर्तनकार होते. त्यांचं म्हणणं वेगळं होतं. त्या दोघांच्या संघर्षांमध्ये मला नाटकाची बीजं दिसली आणि मी ‘कर्म’ ही एकांकिका हिंदी भाषेत लिहिली. ‘गोदरेज’, ‘इप्टा’, ‘यूथ फेस्टिव्हल’ अशा अनेक स्पर्धामध्ये ती सादर झाली, तिचा बोलबाला झाला. आशुतोष आपटेनं तिला आकार देण्यासाठी मदत केली होती, आशूनंच ती मराठीत भाषांतरित करून तिचे अनेक स्पर्धात प्रयोग केले.

कागदावरच्या रंगांबरोबरच मी नाटकात रमू लागलोय हे पाहिल्यावर आई तर वैतागलीच, पण भाईंनीही मला सांगितलं, ‘‘तू तुझं कमाव आणि शिक. महागडय़ा रंगांसाठी आणि कागदासाठी मला फारसे पैसे देता येणार नाहीत.’’ मलाही परिस्थितीची जाणीव होती. मी वांद्रे येथे एका हॉटेलात कॅशियरची नोकरी पत्करली. पुढच्या पाच-सहा वर्षांत मी केलेल्या एकूण १७ नोकऱ्यांपैकी ही पहिली नोकरी. हा अनुभव म्हणजे एकदम डिझास्टर! एक तर माझी अकाऊंट्समध्ये बोंब, त्यात वयानं जेमतेम

१९ वर्षांचा. वेटर मंडळींनी मला फसवलं. वीस दिवसांनी ती नोकरी मी सोडून दिली. पगार तर मिळालाच नाही, उलट माझ्याच अंगावर थोडे पैसे देणं आलं. हॉबी क्लास सुरू झाल्यावर मी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त जाऊ लागलो. तिथली प्रदर्शनं मला मोहवत होती. कागदावर अवतरणारी रंगांची जादू मला तिथे खेचून नेत होती. तिथे ‘चेतन आर्ट गॅलरी’ ही टेरेस गॅलरी होती. (आता बहुधा ती नसेल.) चेतनजी व कुमारजी हे दोन आर्टिस्ट ती गॅलरी चालवायचे. चेतनजी लँडस्केप आर्टिस्ट, तर कुमारजी हे पोट्र्रेट आर्टिस्ट. मला पोट्र्रेट्सचं आकर्षण होतं. माझ्या एका परिचितांच्या ओळखीनं मी त्यांना भेटलो व त्यांना विनंती केली, ‘मला काही तरी काम द्या. मी झाडू-पोछा करीन, ब्रश धुवून देईन, सारं आवरून देईन,’ असं म्हटलं. ते दोघेही अतिशय चांगले होते. ते म्हणाले, ‘‘अरे, असं करू नकोस, तू येत जा; पण तुझ्यासाठी आपण काही तरी बघू या.’’ आणि माझ्या आयुष्यात सुरेश सोमपुरा पर्व आलं.

त्यांनी मला ‘युवदर्शन’ या नियतकालिकाच्या संपादकांकडे- सुरेश सोमपुरा यांच्याकडे पाठवलं. ते मोठे संपादक, लेखक आणि उत्तम व्यक्ती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, माझं चित्रकाम पाहिलं व म्हणाले, ‘‘तू कमर्शिअल आर्ट का करत नाहीस? तू जे.जे.ला गेलास तर तुझी चार वर्ष निघून जातील. तुला गरज आहे व हातात कलाही आहे.’’ मग त्यांचं ऐकून मी फोर्ट भागात असेलल्या  ‘भर्डा हायस्कूल’ येथे करिअर पॉलिटेक्निकमध्ये ‘कमर्शिअल आर्ट’ला प्रवेश घेतला. आता सकाळी सात ते नऊ ‘भर्डा’मधला कमर्शिअल आर्टचा क्लास, नंतर दहा ते तीन वाजेपर्यंत ‘युवदर्शन’मध्ये पार्ट टाइम नोकरी, संध्याकाळी चार ते सहा जे.जे. हॉबी क्लास अशी धावपळ सुरू झाली. माझा दिवस सकाळी साडेपाचला सुरू व्हायचा, तो रात्री अकरा-बारापर्यंत चालायचा. सोमपुरा सरांनी मला त्या वेळी चारशे रुपये पगार देऊ केला होता. घरच्या परिस्थितीला मला थोडासा आधार देता आला. भाई व बा यांना जरा आश्वस्त करता आलं. नंतर सोमपुरांनी मला ‘पब्लिकेशन डिझायनिंग’चा कोर्स करायला लावला. या सर्व गोष्टींमुळे मला प्रकाशन व्यवसायातल्या मॅगझिन लेआऊटच्या, पुस्तक डिझायनिंगच्या, अगदी खिळे जुळवायच्या विविध गोष्टी शिकता आल्या. ‘भर्डा हायस्कूल’, ‘जहांगीर आर्ट गॅलरी’, ‘जे.जे.’ आणि ‘कावसजी पटेल रोड’ हे सारं अगदी एका रेषेवर असल्यानं माझी धावपळ काहीशी कमी होती; पण ज्ञानप्राप्ती, अर्थप्राप्ती आणि आयुष्याला आवश्यक असलेली दिशाप्राप्ती यांच्या शोधाची तगमग सुरू होती.  शनिवार, रविवारी मी जे.जे.त जात असे. अन्य वेळीही जशी फुरसत मिळेल तसा जात असे. आशुतोष, मीलन पोळ, प्रसाद मुरकर, नितीन भामरे, संतोष क्षीरसागर, शुभानंद जोग, सुधारक ओलवे, शशांक तेरे, शिल्पा चौधरी असे सारे नाटकवेडे चित्रकार एकत्र येऊन काम करत असत. वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी मनात द्वंद्व सुरू झालं- चित्रकला की नाटक?

    १९८६ पर्यंत मी ‘युवदर्शन’मध्ये काम केलं असेन. त्यानंतर ‘अभियान’ साप्ताहिकात नोकरी सुरू के ली. पगार साडेसातशे रुपये. तो पुरत नसे, त्यामुळे मग खासगी कामंही घ्यायला लागलो. कोणाची व्हिजिटिंग करड बनव, कोणाची लग्नपत्रिका डिझाईन करून दे, कोणाचं स्क्रीन पेंटिंगचं काम कर, एखाद्या संस्थेचा अहवाल करून दे, कुठे एखादं प्रिंटिंगचं सबकाँट्रॅक्ट घे, असं सुरू झालं; पण एक होतं, की मी कमर्शिअल आर्टिस्ट झाल्यामुळे मला कामं मिळत गेली. ‘अभियान’मधला पगार पुरत नव्हता, त्यामुळे मी तिथल्या शीला भट मॅडमना विनंती केली, ‘पगार वाढवून द्या.’ त्यांनाही ते शक्य नव्हतं. मग मी ती नोकरीच सोडून दिली. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘अरे, अशी नोकरी सोडू नकोस, ही नोकरी तशी मानाची आहे.’’ ते खरंही होतं; पण मी त्यांना म्हणालो, ‘‘ही मानाची आहेच, पण जेव्हा ‘अभियान’मध्ये माझं नाव छापून येईल तेव्हा ते अधिक मानाचं वाटेल.’’ त्या वेळी बहुधा माझ्या मनात, नाटकात कारकीर्द घडवायचं नक्की होत असावं. त्यानंतरही खूप नोकऱ्या केल्या. ‘मध्यंतर’ नियतकालिकात नोकरी केली, तिथे काही वेळा भविष्याचं पानही लावलं, ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये पेज लेआऊटचं काम केलं, असं बरंच काही; पण या संपूर्ण काळात जे.जे. आणि आशुतोष हे सुटले नाहीत. तिथलं माझं नाटक सुरूच राहिलं. अनेक खुल्या स्पर्धात आम्ही एकांकिका सादर केल्या. आता पटकन आठवते, ती ‘फेन्सिंग आणि चप्पी’. आम्ही ‘कॅसलिंग’ हे नाटक केलं होतं. त्यात मी काळ्या हत्तीची भूमिका केली होती. त्या वेळी आम्हाला बुद्धिबळाचा मोठा पट तयार करायचा होता. प्रयोगाच्या आदल्या रात्री सगळे झोपल्यावर मी गुपचूप आमच्या घरावर असलेल्या पत्र्यांवर टाकलेलं काळं प्लास्टिकचं कव्हर काढलं आणि ते घेऊन गेलो. त्याच्यावर बुद्धिबळाचा पट आम्ही काढला. भाईंना आणि बाला हे कळलं तेव्हा त्यांनी कपाळाला हात लावला. बानं तर सरळ दम दिला, ‘‘हे सगळे उद्योग थांबव आणि एखादी पक्की नोकरी धर.’’ मला ‘ई.पी.डब्ल्यू.’मध्ये (इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल वीकली) नोकरी मिळाली. ती नोकरी मी तीन वर्ष केली. ही सर्वात दीर्घ नोकरी. मात्र ‘कॅसलिंग’ नाटकानं  माझ्या आयुष्याला दिशा दिली. मी तीन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतो, हा विश्वास दिला व मी मनात पक्कं केलं, की योग्य वेळी आपण संपूर्णपणे नाटकच करायला बाहेर पडायचं!

या काळात एक किस्सा घडला. आशू त्या वेळी घर सोडून बाहेर पडला होता. मी त्याला माझ्याकडे राहायला बोलावलं. आमचं घर छोटंसं. विलेपार्ले पश्चिममध्ये आमचं दहा बाय दहाचं पत्र्याची शेड असलेलं घर. घरात एक छोटीशी बैठक, दोन बाय दोनची मोरी, सामायिक संडास; पण आमच्यासमोर डॉ. महाप्रसाद जोशी यांचा दवाखाना होता. सज्जन माणूस. त्यांना आमची स्थिती माहिती होती. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात रात्री झोपण्यासाठी मला परवानगी दिली होती. राजेश- माझा भाऊ, मी व एखादा पाहुणा असे तिथं निजत असू. अशा स्थितीत मी आशूला ‘आमच्या घरी झोपायला ये’ असं निमंत्रण दिलं. तो येऊ लागला. मी घरात याबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. एकदा आमचे एक नातेवाईक आले होते. ते झोपायला दवाखान्यात आले. रात्री उशिरानं आशू आला, तो एका कलावंताच्या मद्यपानाचा किस्सा अभिनयासह सांगू लागला. काही वेळानं आमचे नातेवाईक महाशय बाहेर पडले आणि त्यांनी बाजवळ चहाडी केली, ‘मनोज वाईट संगतीला लागलाय, ते लोक दारू पितात, आता त्याचा एक दारूडा मित्र आलाय’ वगैरे. बा भडकलीच. तरातरा आली. मी आशूला आत लपवला. बानं आशूला शोधून बाहेर काढला आणि मग आमची दोघांची तिनं अशी खरडपट्टी काढली की ज्याचं नाव ते! आम्ही तिला परोपरीनं सांगितलं, पण तिची समजूत पटेना. आम्हाला एकेक धपाटा घातला  आणि मगच ती गेली. आज मात्र आशूवर तिचा जीव आहे.

मी नाटकातच करिअर करायचं ठरवलं, त्या वेळी माझ्याबरोबर आशू आणि मिहिर भुता हे दोघे मित्र होते. मिहिर अतिशय प्रतिभाशाली माणूस. १९८३ मध्ये एका स्पर्धेच्या निमित्तानं आमचं मैत्र निर्माण झालं ते आजतागायत टिकून आहे. मी मिहिरला म्हणालो, ‘‘तू नाटक लिही, आपण करू या.’’ एका नाटकावर आमची चर्चा झाली. त्याने दोन-तीन सीन्स लिहिलेही; पण ते नाटक पुढे सरकेना. एक दिवस नाटकावर बोलत असताना अचानक माझ्या मनात चमकून गेलं, आपलं नवं नाटक आर्य चाणक्यांवर का असू नये! लहानपणापासून वाचलेलं संस्कृत साहित्य, तत्त्वज्ञान, कन्हैय्यालाल मुन्शीजींचं लेखन, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चंद्रगुप्त मौर्याच्या काळाची केलेली चिकित्सा, आजोबा, भातखंडे शास्त्री, भाई, शाळेतल्या बाई यांच्याकडून ऐकलेले असंख्य किस्से क्षणार्धात मनासमोरून तरळून गेले. अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात  ओंकारनाद उमटल्यासारखं वाटलं. मी मिहिरला म्हणालो, ‘‘चाणक्य हा आपल्या नाटकाचा विषय असेल.’’ मिहिर म्हणाला, ‘‘अरे चाणक्यांनी शेंडीला गाठ मारली एवढंच मला माहितीय.’’ मग ‘भारतीय विद्या भवन’, ‘एशियाटिक सोसायटी’ येथे आमच्या वाऱ्या सुरू झाल्या. मिहिरनं भरपूर वाचन सुरू केलं. त्या वेळी त्यानं बिल्डिंगच्या लीक प्रूफिंगचा व्यवसाय सुरू केला होता. नवा व्यवसाय आणि हे नवं आव्हान! त्यानं ते पेललं. तीन-चार महिन्यांनंतर त्यानं पहिला सीन लिहिला. तत्पश्चात पुढची तीन वर्ष ‘चाणक्य’ नाटकाचं लेखन सुरू होतं. त्यानंतर आम्ही तालमी सुरू केल्या.

दरम्यानच्या काळात मी ‘ई.पी.डब्ल्यू.’मध्ये नोकरी करत होतो. त्या काळात मला साडेतीन हजार रुपये पगार होता. बानं माझं लग्न ठरवलं चारूशी. चारू ही आमच्यापेक्षा किती तरी श्रीमंत घरातली. एका लग्नात मी तिला पाहिलं होतं. तिच्याशीच विवाहाचा योग जुळून आला. लग्न जुळल्यावर एकदा आम्ही मुंबईत भेटायचं ठरवलं. तिला घेऊन मी निघालो आणि अचानक मला आठवलं, की ‘भारतीय विद्या भवन’मध्ये चाणक्य नाटकासंबंधी कोणाला तरी भेटायचं होतं. चारूला म्हणालो, ‘‘तू भवनाच्या पायरीवर थांब, मी येतोच.’’ आत गेलो आणि चर्चेच्या ओघात मी विसरलोच की आपल्याबरोबर चारू आहे व आपण पहिल्यांदाच एकत्र फिरायला बाहेर पडलोय. दीड-दोन तासांनी तिथले द्वारपाल आत सांगायला आले की, ‘‘बाहेर एक मॅडम कोणाची तरी वाट बघत बराच वेळ उभ्या आहेत.’’ माझी टय़ूब पेटली की ती चारूच असणार! ओशाळून मी बाहेर आलो, तिला दहा वेळा ‘सॉरी’ म्हणालो. तिनं ही घटना अजिबात मनावर घेतली नाही; पण त्याच वेळी तिच्या ध्यानात आलं असणार, की कोणत्या महाभागाबरोबर आपल्याला आयुष्य कंठावं लागणार आहे ते! आमचं लग्न जवळ आलं आणि ‘चाणक्य’चा स्पर्धेतला पहिला प्रयोगदेखील. मी लग्नाकरिता व नंतरच्या हनिमूनकरता पंचवीस हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते पैसे ‘चाणक्य’ नाटकाच्या उभारणीत घातले. चारूपासून मी हे लपवलं नाही, पण घरात सांगितलं नाही. आम्ही हनिमूनसाठी लोणावळ्याला गेलो, पण तिथे पोहोचताच मला ऑफिसमधून निरोप आला व आम्ही तात्काळ मुंबईला परतलो. त्यानंतर तब्बल अठ्ठावीस वर्षांनी आम्ही दोघंच श्रीलंकेत फिरायला गेलो, तेही चारूमुळेच!

‘अभियान’ स्पर्धेत आम्ही गुजरातीत ‘चाणक्य’ नाटक सादर केलं. स्पर्धेत अनेक दिग्गज होते, पण सर्वोत्कृष्ट नाटकाचं पारितोषिक ‘चाणक्य’ला मिळालं व मला सर्वोत्तम अभिनेत्याचं पारितोषिक! पारितोषिकाचे अकरा हजार रुपये घेऊन मी घरी गेलो आणि बाच्या चरणांवर ठेवून म्हणालो, ‘‘बा, ज्या नाटकाला तू शिव्या घालत होतीस, त्याच नाटकानं हे पैसे दिलेत. ज्या शिवशंकराची तू पूजा करतेस, त्याच्याच नटराज रूपानं दिलेला हा आशीर्वाद आहे. तो तुझ्या चरणावर अर्पण करतो.’’ बानं ते पैसे अजून जपून ठेवले आहेत. दुसऱ्या दिवशी मी नोकरीचा राजीनामा दिला व ठरवलं की, आता जगायचं ते अभिनयासाठी!

‘चाणक्य’ नाटक जोरात सुरू होतं. विविध मान्यवर ते पाहायला येत. चंद्रप्रकाश द्विवेदी त्या वेळी ‘चाणक्य’ मालिकेची तयारी करत होते. ते म्हणत, ‘‘जर मला कोणी ‘चाणक्य’ मिळाला नाही, तर मी मनोजला चाणक्यची भूमिका देईन.’’ नंतर त्यांनी चाणक्यांची भूमिका स्वत:च केली व एक मानदंड स्थापन केला. त्या मालिकेत त्यांनी मला चाणक्यच्या मित्राची भूमिका दिली. एकदा ‘चाणक्य’ नाटक बघायला माझी मैत्रीण स्वप्ना वाघमारे-जोशी आली होती. त्याच वेळी स्मिता तळवलकर ‘राऊ’ मालिका करत होत्या. त्यांचा बाजीरावाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू होता. स्वप्नानं त्यांना माझं नाव सुचवलं. दोन दिवसांनी चित्रीकरण सुरू होणार होतं. स्मिता मला घेऊन ना.सं. इनामदारांकडे गेली. माझं व्यवस्थित स्मश्रू केलेलं डोकं, तरतरीत नाक वगैरे बघून ते क्षणभर स्तब्ध झाले व म्हणाले, ‘‘हे माझे बाजीराव पेशवे आहेत!’’ त्यांची पसंती मिळाल्यानंतर संजय सूरकर व स्मिता मला घेऊन कोल्हापुरात गेले. शूटिंग सुरू झालं. याच वेळी एक गमतीदार योग घडला. मालिकेत काशीबाई, मस्तानी या गरोदर होत्या आणि चारूही गरोदर होती. सारे जण माझी यावरून चेष्टा करत असत. एकाच वेळी तीन मुलांचा बाप होणार म्हणून!’’

 ‘राऊ’ मालिका हिट झाली, ‘चाणक्य’ नाटकही प्रचंड हिट झालं. ‘चाणक्य’ मालिकेतून माझा चेहरा देशभरात परिचित होऊ लागला. एकापाठोपाठ एक मालिका येऊ लागल्या.. त्या वेळी मी पंचवीस वर्षांचा होतो!

शब्दांकन – डॉ. नितीन आरेकर

-nitinarekar@gmail.com

( सदर समाप्त)

+++++++++++++++++++++