|| मीना चंदावरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘लहानपणापासून अंगभूत असलेला चुणचुणीतपणा, बेधडकपणा आणि आईवडिलांनी अंगी भिनवलेली आनंदानं जीवनानुभव घेण्याची वृत्ती यामुळे असेल कदाचित, पण माझी ‘गद्धेपंचविशी’ बरीच लवकर- शालेय वयातच आली. पुढे महाविद्यालयासाठी एकटीनं पुण्यात राहणं, सायकलवर फिरून ट्यूशन्स करून पैसे कमावणं, फिरतीची नोकरी करणं, इथपासून ते एकटीनंच भावंडांना पुण्यात आणण्यासाठी घर शोधणं, त्यांचं शिक्षण करणं, असे अगणित अनुभव माझ्या ‘गद्धे्नपंचविशी’चा भाग आहेत. यात अनेकदा मूर्खपणाही झाला, ससेहोलपट पुष्कळ झाली; पण माझ्यातला सच्चेपणा ज्यांना दिसला, त्या माणसांमुळे तरून गेले. आमच्यावर किती तरी हृदयविदारक प्रसंग आले आणि गेले, त्या आठवणींनीही अपराधी वाटतं. मात्र त्यातल्या एकाही प्रसंगानं आमचं स्वत्व गमावलं नाही…’’ सांगताहेत बालशिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर. 

माझी ‘गद्धेपंचविशी’ जरा लवकरच- म्हणजे वयाच्या तेरा-पंधराव्या वर्षीच आली, आणि पन्नाशी झाली तरी हटेचना! स्वतंत्र बुद्धीमुळे लहान वयातच मारलेल्या उड्या उडाल्या, बुडाल्या किं वा तरंगल्या! पण त्यामुळे माझं धावणं पक्कं  झालं. अति धावाधाव के ल्याशिवाय काही मिळवणं हे मला दुरापास्तच झालं. (त्याला अपवाद एकच- माझ्या विविध नोकऱ्या. मुलाखत दिली आणि मला नोकरी मिळाली नाही असं कधीही झालं नाही!)

मी पूर्वाश्रमीची मीना कु लकर्णी. मूळ गाव कोकणातलं पांग्रड. कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि थोडंफार परदेशी, अशी राहिले असले तरी माझ्या हृदयात ठसलेलं माझं ‘वतन’ म्हणजे पांग्रड! बिगरी ते चौथीपर्यंत मी तिथल्या शाळेत शिकले. या शाळेनं आणि आमच्या जडये गुरुजींनी पुढल्या शिक्षणाचा पाया अगदी चिरेबंदी मजबूत करून दिला. तिथलं निसर्गशुद्ध वातावरण, जडये गुरुजी, आजी-आजोबा आणि मुंबईत राहणारे आई-वडील या सर्वांनी, आम्हा पाचही भावंडांमध्ये आनंदी आणि स्वतंत्र बाणा आणि स्वत: विचार करण्याची वृत्ती रुजवली. मी मोठी असल्यानं जरा जास्त बाणेदार आणि आगाऊही होते. आमचे वडील उत्तम डॉक्टर आणि महत्त्वाकांक्षी, पण अयशस्वी कारखानदार होते. आमचा अभ्यास घेणारी आमची आई सुस्वरूप, कष्टाळू आणि धडाडीची बाई होती. या सर्वांनी आम्हाला उत्तम वळण लावलं. म्हणजे ‘खोटं कधी बोलू नये’ छापाचं नाही, परंतु समृद्ध जीवनानुभवांसाठी लागणारी वृत्ती, मन आणि सचोटी त्यांनी आम्हाला दिली.

बिझनेसच्या नादात वडिलांनी मुंबईचं बस्तान हलवून ते कोल्हापूरला आणलं. ‘ताराराणी विद्यामंदिर’ या प्रगतिशील आणि सर्वांगीण शिक्षण देणाऱ्या शाळेत मला पाचवीत घातलं. ‘ताराराणी’नं आम्हाला जीवनदृष्टी दिली. शाळेचा सर्वांत मोठा गुण म्हणजे प्रत्येक बाई आणि सरांना प्रत्येक मुलीची काळजी वाटत असे. माझी आनंदी आणि स्वतंत्र वृत्ती सगळ्यांना जाणवत असे, पण कोणीही मला कधी नाउमेद केलं नाही. मी शिवणात ‘ढ’ असल्यामुळे त्या विषयाच्या बाई मला, ‘अति शहाणपणा करू नकोस’ म्हणायच्या, पण शिवणात पस्तीस माक्र्स मात्र द्यायच्या! लहान वयातच माझ्या अफाट वाचनाबद्दल सर-बाईंनी केलेल्या कौतुकानं मी जरा शेफारलेच होते. शिवाय पाचवी ते अकरावी इयत्तेत सतत पहिला नंबर असे. त्यामुळे ‘गद्धेपंचविशी’चं वारं कानात शिरल्यासारखी मी हुंदडत असे. एकदा शाळेच्या तपासणीसाठी आलेल्या इन्स्पेक्टरशी, ‘महंमद तुघलक, वेडा की दूरदर्शी?’ यावर माझं कडाक्याचं भांडण झालं. नंतर मधल्या सुट्टीत त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं. मी सातवी- आठवीमध्ये असेन. ते म्हणाले, ‘‘बाळ, खरं म्हणजे तुझे मुद्देच बरोबर होते!’’ आता मी ‘थँक यू सर’ म्हणून बाहेर जावं की नाही? पण मी कसली आगाऊ! त्यांना म्हणाले, ‘‘हे तुम्ही मला इथं बोलावून का सांगताय? वर्गात का नाही सांगितलं? आपलं भांडण तिथे झालं ना?’’ आमचे प्रिन्सिपल (थोर शिक्षणतज्ज्ञ सीताराम रावजी तावडे सर) मला शांतपणे म्हणाले, ‘‘मीना, पळ, जेवायला जा, नाही तर उशीर होईल.’’

त्यानंतरच्या काळात आमची आर्थिक परिस्थिती अगदी भयानक खालावली होती. गावाहून तांदूळ यायचे म्हणून थोडंफार तगलो; पण कोल्हापूर सोडून पांग्रडला जाऊन राहायची वेळ आली. मी मोठी, म्हणून आईनं मला संकटाची कल्पना दिली. पांग्रड कितीही प्रिय असलं, तरी तिथे शाळा चौथीपर्यंत होती. म्हणजे शिक्षण बंद! पांग्रडला जावं लागलंच, तर तिथून पळून जाऊन मालवण किंवा सावंतवाडीला जायचं, कष्ट करून, माधुकरी मागून, भांडी घासून शिकायचं, असा विचार मी रोज रात्री करत असे. (आजसुद्धा पैसे नाहीत, मोबाइल नाही, म्हणून शिक्षण बंद होईल, या भीतीनं कोवळी मुलं-मुली आत्महत्या का करतात, हे मला आतून कळतं.)

त्या दिवसांत माझ्या वडिलांना काळ्या बाजारानं हात दिला. त्यांना मीच साथ दिली, कारण बाकीची भावंडं फारच लहान होती. सिमेंटची पोती, लोखंड आणि बांधकामाचं इतर साहित्य, मी ठरलेल्या ठिकाणी जाऊन विकत असे आणि वडिलांकडे पैसे आणून देत असे.

हे सगळं मी बिनधास्त आणि दादागिरीच्या आवेशातच करत असे. मला कधीही, कोणाचीही भीती वाटली नाही. कोणाला वाटेल, किती निर्दयी वडील! पण तसं काही नव्हतं.  त्यांचं माझ्यावर अपरंपार प्रेम होतं आणि त्यांना माझा विलक्षण अभिमान होता. आपली मुलगी कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊन त्यातून यशस्वीपणे बाहेर पडेल, असा त्यांना पूर्ण भरवसा होता. शिवाय ते थोडे आजारी आणि खूप आळशी होते. अर्थात हा काळा बाजार लवकरच बंद पडला. मग आजोबा थोडी थोडी शेती विकून पैसे पाठवू लागले.

दोनेक वर्षांतच मी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे उत्तम प्राध्यापक, जिवलग मैत्रिणी आणि परिपूर्ण ग्रंथालय होतं, तरीही ‘भारताचं ऑक्सफर्ड पुणे’ हा भुंगा माझ्या डोक्यात भिरभिरत होता. शिवाय विद्येचं माहेरघर वगैरे. काहीही करून मी पुण्याला शिकायला जाणार, असं मी घरी सांगितलं. माझ्या-माझ्या हिमतीवर! १९५७ च्या जून महिन्यात मी वाडिया महाविद्यालयात ट्यूशन फी, वसतिगृह, जेवणखाण हे सगळं पूर्ण माफ करून घेऊन प्रवेश मिळवला. शिवाय मी गुणांत पहिली असल्यानं ‘ज्युनियर बी.ए.’च्या वर्षी मला स्कॉलरशिपही मिळाली! वाडियात मला सगळ्या सुविधा होत्या, तरी हातखर्चासाठी पैसे मिळवणं गरजेचं होतं. त्या काळात सायकलवर हिंडून मी खूप ट्यूशन्स करीत असे. जवळ-जवळ वीस मैल सायकल मी रोज हाणत असे. ४ नंबरच्या बसशी रेस लावत असे! पुण्याच्या गल्लीबोळांत फिरून एक-दोन खोल्यांची भाड्याची घरंही मी शोधत असे, कारण माझ्या भावंडांना मला पुण्यात आणायचंच होतं. सात जन्मांत ज्यांची    ऋ णं फेडता येणार नाहीत अशा मैत्रिणी आणि त्यांच्या आया यांच्या जिवावर मी पुणंभर भटकत असे. अर्थात भटकेपणामुळे मी कुप्रसिद्धही होते. एकदा एकानं माझी छेड काढल्यावर मी त्याच्या कानाखाली सॉलिड आवाज काढला होता. त्यानंतर ‘कोल्हापूरची अंबाबाई’ असं माझं नामकरण झालं. सकाळी ट्यूशन्स, मध्ये कॉलेज, ‘हिंद विजय’मधला दुपारचा स्वस्तातला सिनेमा आणि परक्या देशात ‘अ‍ॅम्बॅसडर’ व्हायचं स्वप्न, असं चाललं होतं.

अशा वेळी भास्कर चंदावरकर (ज्येष्ठ संगीतकार) नावाचा अवलिया माझ्या आयुष्यात अवतरला! प्रथमदर्शनी प्रेम दोघांचंही नव्हतं; परंतु टेबल-टेनिस, नाटकात कामं करणं, नाटक-सिनेमे पाहून चर्चा करणं, सवाई गंधर्व आणि इतर मैफली एकत्र ऐकण्यासाठी मला बुद्धिमान, संवेदनशील, कलात्मक आणि सज्जन मित्र मिळाला.

१९५९ मध्ये मी ‘बी.ए.’ झाले, पण फर्स्ट क्लास हुकला. मात्र रीझल्टच्या आधीच मला ‘हिंदुस्तान लिव्हर’मध्ये मार्केट रीसर्च करण्याची नोकरी मिळाली. पगार उत्तम होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आम्हा स्त्रियांना फिरती असायची. भटकण्याची माझी हौस फिटायची आणि फिरतीमुळे जास्त अलाऊन्स आणि थोडी सलग सुट्टी मिळाली, की मी पुण्याला पळायची. काही वर्षं मुंबईत मी तीन कुटुंबांत ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहायचे. तेही त्या काळात जरा नवलाईचंच होतं. ‘हिंदुस्थान लिव्हर’चं काम कधी ४-५ महिने, कधी तीन महिने, असं चालायचं. या काळात मी ‘मेडिकल रीप्रेझेंटिटिव्ह’ची नोकरी ५ दिवस, एका प्रकाशन संस्थेमध्ये आठ दिवस, एका शाळेत पंधरा दिवस, अशा नोकऱ्या केल्या. या धरसोडीचं कारण एकच. सभ्य मार्गानं जास्तीत जास्त पैसे मिळतील, ती नोकरी करायची!

नंतर मला माझी सर्वांत आवडती नोकरी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये मिळाली. मी ‘इन्फर्मेशन ब्युरो’मध्ये होते, पण ‘नवभारत टाइम्स’मध्ये स्त्रिया-मुलांसाठी पानं चालवणं, ‘इंद्रजाल कॉमिक्स’चं मराठी आणि हिंदीमध्ये भाषांतर करणं, थोरामोठ्यांच्या मुलाखती घेणं, अशी कामंही करायचे. हौस म्हणून आणि पैसे मिळतात म्हणूनही. हे दिवस मी खूपच आनंदात घालवले. त्याआधी माझी बरीच ससेहोलपटही झाली होती. मात्र ‘गद्धेपंचविशी’त आपण जशा मूर्ख, अविवेकी आणि अव्यावहारिक गोष्टी करतो, तसं कधी कधी धाडस, पक्के निर्णय आणि शहाणपणही आपल्या हातून घडतं. नशीबही अचानक साथ देतं.

‘ज्युनियर’नंतरच्या सुट्टीत मी कोल्हापूरला गेले आणि कोणाला न जुमानता फटाफट काही निर्णय घेतले. माझ्या जास्त आजारी असलेल्या वडिलांना आईसकट घेऊन मी कोकणात गेले आणि तिथून आजीला घेऊन कोल्हापूरला आले. आजोबा आदल्या वर्षीच गेले होते. घरातल्या उत्तम वस्तू, शिसवी डायनिंग टेबल, खुर्च्या, पलंग आणि इतर सामानसुमान विकून टाकलं. आमच्याकडे २५ हॉर्सपॉवरची मोठी ‘व्हॉक्सॉल’ गाडी होती. ती मात्र लोक फार कमी किमतीत मागायला लागले. तेव्हा मला अठरावं वर्ष लागलं होतं. जन्मभर जुन्या गाड्यांची डीलर असल्याचा आव आणून ‘स्क्रॅपमध्ये विकून टाकीन, त्यात मला जास्त पैसे मिळतील,’ वगैरे बडबड मी करीत असे. माझं धोरण बघून किंवा माझी दया येऊन की काय, एका भल्या माणसानं बऱ्यापैकी किंमत देऊन गाडी विकत घेतली.

मग ठाकला मोठा प्रश्न! त्या वेळपासून ते आजपर्यंत, विशेषत: गरिबांना भेडसावणारा. घर! राहायचं कुठे? वर्षभर शोधून न मिळालेलं घर आता कसं मिळणार? तरी एक जाहिरात वाचून मी एक दिवसासाठी पुण्याला आले.

‘४६, कोरेगाव पार्क, पुणे-१’ असा उच्चभ्रूंच्या वस्तीचा पत्ता होता. केवळ मूर्खपणा आणि धाडस यावर मी तिथे पोहोचले. प्रचंड मोठा बंगला, समोर बाग. मालक, एक दिवाणजी आणि माळी ही तीन माणसं आणि मी! मालक मुंबईहून आले होते. माझी आजी आणि आम्ही पाच भावंडं शिक्षणासाठी राहाणार म्हटल्यावर माझी कहाणी शांतपणे ऐकून घेऊन त्यांनी मला आऊटहाऊसमधील एक प्रचंड मोठी खोली

६० रुपये भाड्यानं दिली. ‘‘आपुन नाय् शिकले, पण आपल्या जागेत शिकणारी पोरं राहिले तर आपलं पण कल्यानच हाए,’’ असं म्हणून, ‘‘ताईचं भाडं कधी थकलं तर सबुरीनं घ्या,’’ असं दिवाणजींना सांगून त्यांनी मला किल्ली दिली! केवळ बोलबच्चनगिरी करून मी कठीण प्रसंगातून तरले असंच नाही. संकोच सोडून मी स्वत:बद्दल थोडं लिहिते. दिसायला मी सुंदर किंवा देखणी कधीच नव्हते, मात्र ‘स्मार्ट’ म्हणतात तशी होते! गोरा रंग, लांबसडक केस, सडपातळ बांधा, डोळ्यांत तेज, हालचालीत चपळपणा, प्रचंड ऊर्जा आणि पूर्ण आत्मविश्वास. खेडवळ बायका नेसतात तशा लालजर्द, हिरव्या, पिवळ्या, जांभळ्या, साध्या, स्वस्त साड्या मी नेसत असे. गळ्यात काचमण्यांच्या माळा आणि हातभर बांगड्या घालत असे. शिवाय माझ्या बोलण्यात घरच्या संस्कारांनी आलेली एक सच्चाई असायची. मला वाटतं, त्यानं माणसं प्रभावित व्हायची.

आपले आपण शिकलो, गरिबीतून वर आलो, की माणसं स्वत:ला ‘सेल्फमेड’ समजतात. मला वाटतं, त्यातल्या त्यात कोणी खरा ‘सेल्फमेड’ असेल, तर कदाचित हिमालयातला नि:संग साधू. आपण कोणीही तसे नसतो. आपल्या आजूबाजूचा समाज, मित्रमैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, अवचित भेटलेली माणसं, या सगळ्यांमुळे आपण कठीण प्रसंगातून तरतो. आमचे शेजारी जयकुमार पाटील (घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे) यांनी आम्हाला अशीच मदत केली. माझी आजी आणि पाच भावंडं यांना आमच्या थोड्याफार सामानासकट ट्रकमध्ये घालून कोरेगाव पार्कात आणून सोडलं. म्हणाले, ‘‘तू कधी लग्न करशील कोण जाणे! हा माझा आहेर समज.’’ भावंडांना घेऊन पुण्यात आल्या आल्या धाकटी बहीण आणि तिच्या मागचा भाऊ यांना ‘वाडिया’मध्ये फर्स्ट इयरला प्रवेश घेतला.  माझ्या (धाकट्या) मैत्रिणीनं- सई परांजपेनं धाकट्या दोन बहिणींना शाळेत प्रवेश देववून मला उपकृत केलं. जमीन विकून माझे वडील फीपुरते पैसे पाठवायचे. घरात तांदूळ भरपूर. बाकी रेशन, भाज्या, तेल, चहा, साखर, सर्वांचे कपडेलत्ते, वह्यापुस्तकं, बूट-चपला, फर्निचरचं भाडं, रॉकेल, बारीकसारीक दुरुस्त्या, हे सगळं माझ्यावरच होतं; परंतु त्याचा कधी त्रास वाटला नाही. आम्ही सगळी जणं मजेत असायचो. माझ्या आजीला मात्र फार कष्ट करावे लागत. ते आठवलं, की आजही माझ्या मनात कालवाकालव होते. आमच्यावर किती तरी हृदयविदारक प्रसंग आले आणि गेले, त्या आठवणींनीही अपराधी वाटतं. मात्र त्यातल्या एकाही प्रसंगानं आमचं स्वत्व गमावलं नाही.

‘हिंदुस्थान लिव्हर’च्या नोकरीत असताना चहा आणि बनमस्का-टोस्ट यावर मी दुपार चालवत असे. अजूनही ते माझं लाडकं जेवण आहे. दहा-पंधरा रुपयांच्या साड्या मी नेसत असे. पुण्यातल्या चोळखण आळीत आणि मुंबईला लोहार चाळीत तशा साड्या आणि खूप स्वस्तात सुरेख बांगड्या आणि काचमण्यांच्या माळा मिळत असत. तरीही ‘टाइम्स’मधल्या उच्चभ्रू सहकारिणींमध्ये माझ्या कपड्यांची चर्चा असे! एकोणिसाव्या वर्षी माझा भाऊही इंजिनीअर म्हणून ‘टाइम्स’मध्ये दाखल झाला आणि त्यानं माझा भार खूप हलका केला. तेव्हापासून आम्ही दोघं एका डब्यात जेवत असू. एव्हाना माझी धाकटी बहीण वैद्यकीय महाविद्यालयात होती आणि खालच्या दोघी ‘वाडिया’त आल्या होत्या. संकटं जशी एकदम येतात, तसे बरे दिवसही येऊ लागतात. मला ‘आय.बी.एम.’ या अमेरिकी कंपनीत नऊशे रुपयांची नोकरी लागली! त्याच सुमारास (१९६१-६२) भास्करही (चंदावरकर) सतार कार्यक्रमांसाठी इंग्लंड आणि युरोपला गेले. १९५७ मध्ये भेटलेलो आम्ही १९६५ मध्ये लग्न केलं! आज माझी सगळी भावंडं सुस्थितीत, सामाजिक जाणिवा प्रखर असलेली, जमेल तशी गरिबांना मदत करणारी आणि मुख्य म्हणजे आनंदी आणि समाधानी आहेत.

  आयुष्यातल्या पहिल्या ‘गद्धेपंचविशी’चा मी तात्पुरता निरोप घेतला. बुद्धिमान आणि संवेदनशील कलावंताबरोबर मध्यमवर्गीय संसार थाटला. आमचा मुलगा स्वेच्छेनं पत्रकार झाला. नंतर आर्थिक परिस्थितीही सुधारली. मात्र, पुन्हा एकदा वयाच्या तेहेतिसाव्या वर्षापासून ते त्रेपन्नाव्या वर्षापर्यंत मी ‘गद्धेपन्नाशी’च्या आहारी गेलेच! त्याबद्दल नंतर कधी तरी सांगीन. आता ८२ व्या वर्षी मात्र मी शांत आहे! जवळजवळ!

gayatri0110@gmail.com  

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaddhepanchvishi author meena chandavarkar article rich life experience akp
First published on: 23-10-2021 at 00:00 IST