गिरीश कुलकर्णी girishkulkarni1@gmail.com
‘‘भारतीय दूरचित्रवाणी व्यवसाय, राजकारण, मूल्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या साऱ्यांनी एकदमच मुक्त व्हायचं ठरवलं, तेव्हा मी ‘गद्धेपंचविशी’त होतो आणि मुक्त, बेलगाम होतो. लहानपणी आश्रित म्हणून वावरत असताना, लैंगिक अत्याचाराला बळी ठरत असताना,

गच्च कोमेजून, दडून बसलेल्या मला या मुक्ततेकडे नेणारी वाट गवसली- ती म्हणजे नाटक, शिवाय लवकर उपजीविका मागे लागल्यावर त्रासलेल्या जिवाला विसावा देणारं आणि त्याच वेळी स्वत:तलं ढोंग ओळखायला लावणारंही नाटकच होतं. आपपरभाव न करणारे गुरूवर्य, बहकत्या अवस्थेत सावरणारे मित्र आणि भणंग असताना पाठीशी उभी राहिलेली प्रेमाची माणसं, यांनी माझी पंचविशी स्थिर के ली आणि त्यामुळेच मी एका प्रवाहाला लागलो.’’

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

स्वत:पासून पळण्याच्या हजार वाटा शोधत तुम्ही धावत असता. अवचित झाडाआडून कुणी समोर ठाकतो अन् रोकडी ओळख पुसतो. भांबावून तुम्ही स्वत:ची ओळख शोधण्यासाठी मागे पाहत आठवणी जाळत राहता. या मागे वळून पाहण्याबद्दल माणसांनी हरतऱ्हेचे ग्रह करून ठेवले आहेत. त्यात रंजन शोधणारी समजूत ही अगदीच भाबडी गोष्ट आहे. मला माझ्या पंचविशीबद्दल विचार करताना भांबावून जायला होतं. जे जे आठवतं त्यातल्या कशाचीही गोष्ट होत नाही. मात्र माणसांनी परस्परांना गोष्टी सांगाव्या, ऐकाव्या यावर माझी श्रद्धा आहे आणि म्हणून मी काही घडलेलं सांगायचा प्रयत्न करण्यासाठी धाडसानं मागे पाहत आहे.

आजच्या या मुक्कामाच्या ठिकाणाहून पाठीमागचं सगळंच उथळ दिसत आहे. कुठलाही नेमका विचार, ध्येय, आकांक्षा नसलेलं माझं तारुण्य मुक्त होतं. आत्मचरित्राच्या बाजारात बरा भाव मिळणारी हलाखीची परिस्थिती, विखंडीत कुटुंब, बेताचं शिक्षण इत्यादी जिनसांतून ते मुक्तपणे साकारलं होतं. मी देईन तो आकार, मी म्हणेन तो उच्चार असा सगळा मीपणाचा व्यवहार. स्वत:च अडचणीत पडायचं अन् मग त्यातून मार्ग शोधत व्यग्र राहिलं असता आपोआप काळ सरतो. सरावानं मग पिंड तयार होतो अन् अनेकानेक संधी आकर्षित करतो. तुम्हाला फार काही करावं लागत नाही. माणसांना ‘मी केलं’ असं म्हणण्याची जुनी खोड आहे. ती जन्मजात लाभलेली असतेच. त्यामुळे काही काळ घडल्या गोष्टींना ‘मी केलं’ म्हणत कर्तृत्व वगैरेही आपोआप घडतं. मुळात मला करता येतं याची पक्की जाणीव झाली असता करून दाखवणं फुकाचं, पोरपणाचं वाटतं. स्वत:च्या न्यूनत्वाचा किती आधार असतो माणसाला. त्याकडे करुणेनं पाहता यायला हवं. असो.

तर भारतीय दूरचित्रवाणी व्यवसाय, भारतीय राजकारण, भारतीय मूल्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था या साऱ्यांनी एकसमयावच्छेदेकरून मुक्त व्हायचं ठरवलं. तेव्हा मी ‘गद्धेपंचविशी’त होतो आणि मुक्त होतो. मुक्त म्हणजे बेलगाम, बेमुर्वतखोर आणि बेताल. लोकव्यवहारात भिरुता दाखवत असलो तरी स्वत:चं ढोंग पुरेपूर ओळखून होतो. लहानपणी आश्रित म्हणून वावरत असताना, लैंगिक अत्याचाराला बळी ठरत असताना, गच्च कोमेजून, दडून बसलेल्या मला या मुक्ततेकडे नेणारी वाट गवसली- ती म्हणजे नाटक. विंगेतला उबदार अंधार अन् समोर प्रकाशात खेळलं जाणारं नाटक, या दोन्हीतला फरक समजावून सांगणारी मायेची, बुद्धिमान माणसं गुरुजन म्हणून लाभली, म्हणूनच केवळ मला माझ्यातलं ढोंग पाहण्याची सवय लागली. त्यातूनच पुढे आपलाच फुगा फोडणारं सत्य शोधण्याची धडपड स्वभाव बनली. ‘फुगा फुटला’ हे मी केलेलं (बहुधा पहिलं) बालनाटय़ मला अनेकार्थानं स्वत:ची ओळख लावण्यास मदत करतं झालं. अनुभवावर माणूस जरा अतीच विसंबतो. त्यामुळे पदार्पणात झालेलं कौतुक मनावर बिंबलं गेलं आणि नाटक आवडीची गोष्ट बनली. असं असलं तरी माणसाठायीची वरदायीनी कल्पना हीच खरी बांधून राहिली. एकटेपणा अत्यंत आवडू लागला. कल्पना नित्य नवी मनोराज्यं उभी करत गुंगवून ठेवत असे. त्या मनोराज्यात मीच हरेक पात्र रंगवत असे. कधी प्रकट, पण स्वत:शी बोलत असे. कल्पनेतल्या सामन्यात मी शेवटच्या चेंडूवर षट्कार मारून भारताला इयत्ता चौथीपासून विजय देत आलो आहे. हा विसावा फारच मौजेचा असला, तरी व्यवहारात हरघडी अन्याय पदरी येत असे. त्यामुळे कातावल्यानं आलेला संताप अत्यंत विध्वंसक असे. तो संताप सावरण्यासाठीही नाटकानं मोठी मदत केली.

जरा अतिच मागे गेलो. पण खरं सांगायचं तर फक्त पंचविशीबद्दल कसं लिहायचं? ते तर आजकालच्या आमच्या टीव्ही, सिनेमाच्या कथांसारखं होईल. किंवा पूर्वपीठिका अन् तत्कालीन संदर्भाविना इतिहासाचे तुकडे एकमेकांना फेकून मारत बसणाऱ्या उठवळ भावनिक उकिरडय़ांनी भरलेल्या बाजारमाध्यमांसारखं. हा एक य:कश्चित माणसाचा इतिहास आहे. त्याला सन्मानानंच सामोरं जावं. तर असो.

बहरहाल, पंचविशीत येईस्तोवर मी शालेय स्तरावर नानाविध स्पर्धामधून, गणेशोत्सवी आयोजनातून काही कसबं हासिल केली होती. फारच चांगले गुरुजन लाभल्यानं काव्यगायन ते नाटय़वाचन, ते वक्तृत्व ते अभिनय अशा साऱ्या कसबांनी माझा घुमेपणा, एकांडेपणा कमी झाला. माणसं हळूहळू आवडू लागली. त्यांच्या गटात मी रमू लागलो. पुढे सोळा ते वीस या कालखंडात ‘डाव्या’ विचारांच्या लोकांत मिसळून राहिलो. त्या विचाराचं कुतूहल वाटलं. संघशाखेत बालपणी खेळात रमलेल्या मला अनेक नवलाचे विचार हादरवून टाकत होते. तरी पुढे मात्र नाटक करायला मिळावं म्हणून उजव्यांच्या तळ्यावर पाणी पिऊ लागलो. मला दोन्हीकडे विसंवाद अन् ओढ जाणवली. माणसं दोन्हीकडे लोभस अन् विकल होती. अभ्यासू अन् उथळ होती. बिचारी अन् हताश होती. कनवाळू अन् क्रूर होती. प्रत्येकाच्याच तळ्यानं तहान भागवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर माणसं भाबडी श्रद्धा ठेवून होती. मला या कशात माझी ओळख लागत नसे. मात्र मी लिहू लागलो त्याला कारण ओळख निर्माण करण्याची धडपड असं नसून, पुणेरी आसमंतातला अतिशहाणं असण्याचा, भासवण्याचा दुर्गुण इतरांचं काही आवडू देत नसे, हे होतं.

इतरांची लिखितं दुय्यम समजत असतानाच मी माझ्यासाठी काही दैवतंही घडवत होतो. जी. ए. कु लकर्णी, नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत, विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार ही माणसं नुसतीच तालेवार नसून परमेश्वरी अंशच आहेत, अशा समजुतीनंही अहंकार कह्य़ात ठेवला होता. अनेक मान्यवर कलाकारांना जवळून पाहता येऊ शकण्याचे ते दिवस होते. अन् ते मान्यवरही कलेची समजूत टिकून असलेल्या त्यांच्या चाहत्यांची बूज ठेवून असत. विनातिकीट किशोरीताई ते जगजीत सिंग, सवाई गंधर्व महोत्सव ते छोटा गंधर्वाची उतारवयातील नाटकं, किंवा बाळासाहेब मंगेशकरांच्या मैफली जागवताना कैफ जाणवत असे. आर्थिक हलाखीचं स्तोम माजत नसे. पैशाला बेतास बात किंमत देणारा तो काळ त्यामुळेच सुसह्य़ही करता येत होता. त्याच काळात भोसरीनामे औद्योगिक  खेडय़ात रोजचं जाणंयेणं होत होतं. लहान वयात मागे लागलेली उपजीविका, कर्तव्य निर्वाह आदी अनिवार्य कुलंगडी त्रासून टाकत असत. पैसा कमावण्याचा कंटाळा, तिटकारा तयार करत असत.

नाटक यावरही उतारा देत होतं. पदरमोड करून वेळ घालवायचं उत्तम साधन हाती लागलं होतं. ‘भरत नाटय़ मंदिर’ ही एकपरीनं पुण्यातली एक चुकल्या फकिरांसाठीची धर्मशाळाच. ती जुनी वास्तू नव्या पिढय़ांना आधार देताना परंपरेचे देखणे दाखले सांगत असे. वासुदेव पाळंदे या गुरुवर्यानी पुण्यातली अनेक मनं घडवली. मीही त्यातलाच एक. वासुदेवराव प्रेमळ होते. मुख्य म्हणजे आपपरभाव करत नव्हते. उजव्या संस्कारातही सगळ्यांना आपलं म्हणण्याचा डावखुरेपणा होता. या शहराच्या गल्लीबोळांतून नांदून गेलेली विद्वत्ता, जिज्ञासा, विक्षप्तता एकाच वेळी न्यूनत्व अन् उभारी देत असे. पाळंदे गुरुजींसह चित्तरंजन कोल्हटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर आदी नाटक कलेचे ज्येष्ठ सेवेकरी त्यांच्या सहवासातून, मोकळ्या व्यवहारातून मनातला आश्रितभाव काढून टाकायला मदत करत होते. डॉ. गो. बं. देगालूकरांसारखे विद्वान त्यांच्या विद्वत्तेनं चकित करत होते. तर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. श्रीराम लागू आदी धुरीणांच्या एखाद्-दुसऱ्या भेटीनं भारून जायला होत होतं. त्यातच सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर या द्वयीनं सावकाश एक रमल रचायला सुरुवात केली होती. त्या प्रभावातून पुण्यातल्या पुढच्या पिढय़ा समजूत घडवणार होत्या. रवी परांजप्यांसारखे सिद्धहस्त चित्रकार, सुचेताताई चापेकरांसारख्या विदुषी नर्तिका, साक्षात पं. जितेंद्र अभिषेकी आदी मंडळींना जवळून पाहता, ऐकता येत होतं. संस्कार भारतीच्या नाटय़ विभागात शिरकाव करून घेतल्यानं अनेक थोरामोठय़ांचा सहवास घडला. पुण्यात इतरही अप्रुपाची नावं सातत्यानं काही नवं मांडत होती. मला अनेकदा श्रोता वा प्रेक्षक होण्यात जास्त आनंद वाटत असे. स्वत:ची किडुकमिडुक मांडणी करताना या वेगवेगळ्या नावांचा धाक जाणवत असे. अशात मुक्त होणारी अर्थव्यवस्था, बाजारशरण होत चाललेली माध्यमं, सादरीकरणाचं वाढतं महत्त्व अन् आशयाची धूसर होत चाललेली वीण, याचा त्रास जाणवू लागला होता. तरी कुणी चंद्रशेखर फणसळकर, गिरीश जोशी गारुड घालतच होता. विद्यापीठात नाटकाचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू झाला होता. अन् मुख्य म्हणजे मोबाइल आला होता.

अशात मी विडा उचलल्यासारख्या काही एकांकिका लिहिल्या, बसवल्या. त्यात मोठमोठय़ा समूह नाटय़ांपासून कुणालाच काहीही न कळणाऱ्या तथाकथित प्रायोगिक एकांकिकांचा समावेश होता. दहावीनंतर राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात जाण्याचं स्वप्न पडू लागलं होतं. मात्र लवकर नोकरी लागण्याच्या एकमेव उद्दिष्टानं इंजिनीअरिंगची पदविका घेतली अन् नोकरीचं जू खांद्यावर खोल रुतलं. अर्थात त्याचा जरा काच जाणवू लागताच मी तडकाफडकी नोकरी सोडत असे. अगदी बिनदिक्कत. मग बेकारीची धुंदी उतरेस्तोवर नाटक, अन् नाटकाची धुंदी उतरवायला परत नोकरी, असा आटय़ापाटय़ांचा खेळ चालला होता. नाटकानं भान दिलं, समूहात थोडं स्थान दिलं. उमेश कुलकर्णीसारखा सखा दिला. त्यानं त्याच्या उपजत अलिप्ततेनं माझ्यातला कोलाहल शांत केला. त्याच्या सिनेमा शिक्षणाच्या प्रवासात मला सांगाती घेतलं. विचारकांक्षा रुंदावणारे जागतिक सिनेमे दाखविले. ऐन पंचविशीत केलेल्या एका यशस्वी नाटकाचं पुढे लग्नात रूपांतर होऊन वृषालीनं माझा जीर्णोद्धार केला आणि अल्पावधीतच मला सावरून धरणारी मोठीच भेट मला दिली. आपल्याला एकच अपत्य असावं आणि तीही मुलगीच, असं एक आग्रही मत तयार झालं होतं. त्याची पूर्तता शारवीच्या जन्मानं झाली. त्याच सुमारास ज्योती सुभाष, डॉ. मोहन आगाशे आदी नव्या पालकांचा माझ्या परिवारात समावेश झाला होता. माझ्या अगोचर वागणुकीला कलाकारी मानणारे माझे मित्र श्रीकांत यादव, समीर भाटे, सुनील पाठक, संजय भावे, धनंजय नामजोशी, श्रद्धा, उल्का, सानिकादि मैत्रिणी, या सगळ्यांनी त्या बहकत्या अवस्थेत आधार दिला. मी कफल्लक, भणंग अवस्थेत असताना स्वत: नोकरी करून माझ्या नाटकाला पैसे पुरवणारी माझी मोठी बहीण शमिका अन् धाकटा भाऊ शिरीष, या साऱ्यांनी माझी पंचविशी समृद्ध, स्थिर केली.

आज वैपुल्याचा प्रश्न तयार झाल्याच्या काळात यशस्वितेची बंदूक पाठी लागल्याच्या काळात, हव्यासाची नशा चढलेल्या काळात टिकून राहण्याचं बळ, हे उत्स्फूर्तपणे, सातत्य टाळून, यशस्विता धुडकावत स्वत:चा कंटाळा येऊ न देण्याच्या मिषानं केलेल्या अवघ्या उपद्व्यापांचं फलित आहे. शक्य झालं असतं तर मी प्रसिद्ध झालो नसतो. शक्य झालं असतं तर व्यावसायिक नटही झालो नसतो. मात्र ठरवून काही करणं वृत्तीतच नसल्यानं ओघाओघानं वाहत आलो. व्यंकटेश माडगूळकरांच्या कथेतला वृद्ध शेतकरी रानातल्या त्याच्याहून वयोवृद्ध झाडाला टेकून आभाळीचा वळीव झेलत बसून राहतो. तसा मी घडणारं घडू देत आलेला पराधीन माणूस आहे.