प्रत्येक वेळी मुलांना ‘गॅजेट्स रोग’ व्हायला पालकच कारणीभूत असतात असं नाही. मुलाचं अडनिडं वय आणि आजूबाजूची प्रलोभनंसुद्धा तितकीच कारणीभूत असतात. आजारी पडलो की आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतो तसंच या गॅजेट्सच्या आजाराला बरं करण्यासाठी समुपदेशनाची आणि योग्य मदतीची, आधाराची मात्रा द्यावी लागते. ‘मला वेड लागले गॅजेट्सचे’ या लेखाचा भाग- २

ल हानसहान कामांसाठी उपयोगी पडणारं साधन-यंत्र म्हणजे गॅजेट्स हे खरं, पण किशोरवयीन मुलांना या गॅजेट्सचं लागलेलं वेड आणि त्यामुळे घराघरात निर्माण होणारे तणाव याविषयी गेल्या सदरात (१९ सप्टेंबर) माहिती घेतली. तो भाग प्रसिद्ध झाल्यानंतर मला आलेल्या ईमेल्स आणि पत्रांनी, गॅजेट्सचं आरोग्यशास्त्र जाणून घेणं आणि ते जपणं ही आता कोण्या एका कुटुंबाची नव्हे, तर समाजाची गरज कशी बनली आहे, ही बाब अधोरेखित केली.

मागच्या भागात आपण पाहिलं की, या गॅजेट्सचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी, तुमच्या पैशांशी आणि प्रतिष्ठेशी कसा जवळचा संबंध प्रस्थापित झाला आहे ते. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुलांना जेव्हा नैराश्य येतं तेव्हा ती सहजपणे या गॅजेट्सच्या आहारी जाण्याचा संभव असतो. नैराश्यात त्यांच्या अवाजवी मागण्या जोर धरतात. अशा वेळी आधी नैराश्य दूर करण्यासाठी उपचार करावे लागतात. उपचारादरम्यान त्यांच्या स्वभावातील गुण-दोषांवर काम करून त्यांच्या मनातील बुरसटलेल्या किंवा अवाजवी कल्पना काढून टाकल्या जातात आणि हळूहळू नव्या विचारांची पेरणी केली जाते. अर्थात त्याचा परिणाम एका रात्रीत दिसून येत नाही, कारण ती जादू नाही. आम्ही त्यांच्या मनाच्या इतर खिडक्या उघडतो. शरीराचा एखादा भाग काम करेनासा झाला की त्याला जसं बदललं जातं तशी आम्ही मनाची शस्त्रक्रिया करून त्याची मशागत करतो. आजकाल कुटुंबं छोटी होत चालली असून एकल अपत्य पद्धती असते. अशा ठिकाणी एकुलत्या एका अपत्यामध्ये संतापी, शीघ्रकोपी किंवा हिंसक वृत्ती जास्त पाहायला मिळते. पूर्वी मोठय़ा कुटुंबांमध्ये अशा मुलांना हाताळण्याची कला प्रत्येकाला अवगत असायची. पण आता तसं होत नाही आणि मग दमून-भागून आलेल्या पालकांच्या रोषाला मुलांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळी गॅजेट्स हेच कारण असेल असं नाही, पण अलीकडे बऱ्याच वेळा तेच मुख्य कारण असतं. अशा वेळी पालकांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची किंवा चांगल्या मित्र-मैत्रिणींची या बाबतीत मदत घ्यायला हरकत नाही.

पालकांच्या बरोबर हॉटेलमध्ये जेवायला आलेली दीड-दोन वर्षांची लहान मुलेसुद्धा आई-बाबांच्या मोबाइलवर गेम्स सुरू केल्याशिवाय समोर आलेला पदार्थ खायला तयार होत नाहीत हे चित्र आजकाल सहज पाहायला मिळतं. पालकसुद्धा मग उगाच तमाशा नको म्हणून त्यांना शरण जातात किंवा काही वेळेस पालकच मुलांनी जेवावं म्हणून त्यांना मोबाइल गेम्स खेळायला देण्याचं आमिष दाखवतात. त्याशिवाय मूल जेवत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. प्रत्येक वेळी मुलांना गॅजेट्स किंवा तत्सम महागडय़ा वस्तूंचं आमिष दाखविण्याची पालकांची ही सवय मुलांना हट्टी, दुराग्रही बनवते; जी पुढे मुलं मोठी झाल्यावरही कायम राहते.

आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गॅजेट्स हे उपकरण हाताळावं कसं! लहानपणापासूनच मुलांना अभ्यास करताना ही सगळी उपकरणे दूर ठेवण्याची सवय लावा. अर्थात हा नियम पालकांनीसुद्धा थोडासा पाळायला हवा. म्हणजे तुमच्या मोबाइलची एक जागा नक्की करा आणि घरी आल्यावर ते उपकरण त्याच जागेवर ठेवा. प्रत्येक खोलीत, बाल्कनीत किंवा घरात सगळीकडे ते उपकरण घेऊन फिरायची गरज नसते. रात्री झोपताना मात्र घरातील सगळ्यांनी आपापले मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅब, आयपॅड, आयपॉड जी काही गॅजेट्स असतील ती एका खोलीत ठेवावीत. पाहिजे तर या उपकरणांसाठी एक बेडरूम तयार करा आणि त्यांना तिकडे नेऊन झोपवा, पण तुम्ही तुमच्या खोलीत शांत झोप घ्या. गॅजेट्सचं बेडरूम म्हणजे एखादं टेबलसुद्धा असू शकतं. पण एकदा त्यांना तिथे झोपवलं की कुणीही गॅजेट्सना हात लावायचा नाही. अगदीच काही आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा तुम्ही अशा एखाद्या व्यवसायात असाल जिथे कधीही आणीबाणीचा प्रसंग येऊ  शकतो तर त्यांची गोष्ट वेगळी, पण इतरांना हे शक्य आहे. तसंच उशी किंवा चादरीखाली गॅजेट्स ठेवून झोपणं अनेकार्थानं धोकादायक आहे. कठीण प्रसंगी मित्रांशी बोलण्यासाठी हे यंत्र कामी येत असलं तरीदेखील कोणतंही गॅजेट्स हे तणावमुक्तीचं यंत्र किंवा चिंता कमी करणारं औषध नसतं. लॅपटॉप, टीव्ही, संगणक या गोष्टी दिवाणखान्यात असाव्यात, मुलांच्या बेडरूममध्ये नको. त्यांना काही वेळेस अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं. पण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना एकीकडे सोशल नेटवर्किंग साइट उघडून तासन्तास टाइमपास करीत बसणं हेसुद्धा अनारोग्याचं लक्षण आहे. झोप पुढे ढकलली जाते. ज्याचा थेट परिणाम माणसाचा मूड, स्मरणशक्ती आणि वर्तणुकीवर होतो आणि ते जास्त हानिकारक आहे. म्हणूनच झोपताना, जेवताना, सण-उत्सव साजरे करताना, कौटुंबिक स्नेहसंमेलानांमध्ये सहभागी होताना जाणीवपूर्वक गॅजेट्स दूर ठेवा, कारण जेव्हा ही उपकरणे दूर राहतील तेव्हाच माणसं जवळ येतील. अडीअडचणींच्या काळात मदतीचे, जुन्या मित्रांच्या-शिक्षकांच्या संपर्कात राहण्याचे साधन म्हणून या गॅजेट्सचा उपयोग होतो, पण तरीदेखील प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव आनंद, उत्साह देणारा आणि ताजातवाना करणारा ठरतो. या गॅजेट्सना थोडा वेळ बंद ठेवलं तर माणसा-माणसांमध्ये बोलण्याची प्रक्रिया सुरू होईल ना!

१७ वर्षांच्या रक्षाकडे एक गुप्त सिम कार्ड होतं, ज्याचा वापर ती फक्त तिच्या बॉयफ्रेंडशी गप्पा मारण्यासाठी करीत होती. ते कार्ड एक दिवस तिच्या पालकांच्या हातात पडलं. ते खूप चिडले आणि तितकेच दु:खीसुद्धा झाले. या गोष्टीची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी त्या मुलीशी बोललो तेव्हा मला एका गोष्टीचा उलगडा झाला की त्यांचं कुटुंब अतिशय रूढीप्रिय आणि जुन्या विचारांना चिकटून बसणारं होतं. त्यामुळे मुलींनी जास्त वेळ मुलांशी बोलू नये असा एक अलिखित नियमच होता. एकदा रक्षाला तिच्या मित्राशी बराच वेळ फोनवर गप्पा मारताना त्यांनी पाहिलं होतं आणि त्यावरून घरात मोठं भांडणसुद्धा झालं होतं. त्यानंतर त्यांनी रक्षाला बजावल्यामुळे गुप्त सिम कार्डचा मार्ग तिनं शोधला होता. दोघांचंही काही काळ समुपदेशन केल्यानंतर त्यांच्यातील तणाव दूर झाला आणि मग सिम कार्ड गुप्त ठेवण्याची गरज राहिली नाही.

हेही खरे की प्रत्येक वेळी मुलांना ‘गॅजेट्स रोग’ व्हायला पालकच कारणीभूत असतात असं नाही. मुलाचं अडनिडं वय आणि आजूबाजूची प्रलोभनंसुद्धा तितकीच कारणीभूत असतात. ज्याप्रमाणे शारीरिक आजार होतात तसाच हा गॅजेट्सचाही आजार होतो. आजारी पडलो की आपण डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतो तसंच या गॅजेट्सच्या आजाराला बरं करण्यासाठी समुपदेशनाची आणि योग्य मदतीची, आधाराची मात्रा द्यावी लागते.

आता शाळा-महाविद्यालयांनीसुद्धा गॅजेट्सच्या वापराबद्दल नियमावली घालून देणं आवश्यक आहे. अर्थातच ते नियम शिक्षकांनासुद्धा लागू असतील. जी गॅजेट्स शाळा-महाविद्यालयातील ग्रंथालय आणि प्रयोगशाळांमध्ये माहितीचा स्रोत म्हणून वापरली जात असतील त्याचा उपयोग फक्त तेवढय़ापुरताच होईल यावर नजर असावी. पोर्न व्हिडीओ किंवा व्हिडीओ गेम्स पाहताना आढळणाऱ्या किशोरवयीन मुलांना बेदम मार देणं किंवा त्यांना खूप अपमानास्पद आणि वाईट शब्दात ओरडणं, शिवीगाळ करणं, कठोर शिक्षा करणं हे योग्य नाही, कारण त्याने प्रश्न सुटणार नाही. घरात कुणी आजारी पडलं तर आपण त्याला शिवीगाळ-मारहाण करतो का? तसंच गॅजेट्सचा आजार बरा करण्यासाठी समुपदेशनाची आणि वैद्यकीय उपचारांची गरज असते.

कानात सतत इअरफोन अडकवून रस्त्यानं चालत राहिलात तर अपघाताची शक्यता २३ टक्कय़ांनी वाढते असं निरीक्षण अमेरिकेतील विद्यपीठांनी नोंदवलं आहे. भारतातील १.२५ अब्ज लोकांपैकी एक पंचमांश लोक इंटरनेट वापरतात तर त्यातील ५० टक्के लोक सोशल मीडिया वापरतात. भारतात दूरसंचारचं जाळं वेगानं पसरत असून सप्टेंबर २०१४ च्या सर्वेक्षणानुसार भारतातील मोबाइल फोनधारकांची संख्या ९३ कोटी ०२ लाख एवढी आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या महापुरानं माणसाची जगण्याची, विचार करण्याची, काम करण्याची आणि संवाद साधण्याची पद्धतच बदलून टाकली आहे. गॅजेट्स उपयुक्त साधन जरूर आहेत, पण त्याच्यामागे धावता धावता आपण हे विसरत चाललो आहे की निसर्गाने निर्माण केलेला माणूस हा या पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर गॅजेट आहे…बाकीची गॅजेट्स ही फक्त एक वस्तू आहेत. या वस्तूंना निसर्गानं निर्माण केलेल्या खऱ्या गॅजेट्सवर म्हणजेच माणसाचं मन आणि शरीर यावर कब्जा करण्याची आणि त्यांना गुलाम बनविण्यांची संधी कधीही देऊ  नका…
-शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी  harish139@yahoo.com