scorecardresearch

‘ग्रीनेशा’तून साकारल्या गणेश मूर्ती !

२०१३ मध्ये रुपाली आणि त्यांचे पती गौतम पाटोळे यांनी नवी मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.

स्वाती केतकर-पंडित swati.pandit@expressindia.com
रुपाली पाटोळे यांची पदवी खरं तर मानसशास्त्रातली. पण आवड म्हणून मातीकामाचा ‘श्रीगणेशा’ केल्यानंतर तेच काम त्यांना आवडू लागलं आणि ही कला इतरांनाही- विशेषत: मुली आणि स्त्रियांना शिकवावीशी वाटू लागली. या स्त्रियांना मातीकामाच्या वर्गात गणेशाचं रूप घडवताना मन:शांती मिळालीच, शिवाय त्यातून अनेकींनी रोजगार व समाजात मान मिळवला. आत्तापर्यंत त्यांनी २५ हजारांपेक्षा जास्त मुलांना या मूर्ती करायला शिकवलं आहे. या वाटचालीतूनच पुढे निर्माण झाली, पर्यावरणपूरक ‘ग्रीन गणेशा’- अर्थात ‘ग्रीनेशा’ची चळवळ.      

‘‘हं, चला, सुरू करा. बरं आकाराचा अंदाज येण्यासाठी लाडू आठवा बरं.. मोतीचूर लाडू, तिळाचे लाडू आठवतायत ना? आता पोटासाठी मोतीचूर आणि हातासाठी तिळाचा लाडू बरं का. अगदी मस्त वळून घ्या. चला, बसवा आता ते एकमेकांच्या सोबत! बरं, बघू आता.. झाला, आपल्या मातीकामाचा श्रीगणेशा!’’ रुपाली पाटोळेंच्या वर्गात बाप्पा आकाराला येत असतो. समोर असतात छोटी छोटी मुलं-मुली तर कधी मोठय़ा बायाही.

‘‘हं, काकू , तुम्ही इथे थोडासा रंग द्या पाहू. कोणतेही कृत्रिम रंग वापरू नका बरं का.’’

‘‘ताई, पहिल्यांदा बाप्पा करतोय म्हणून घाबरू नका. उलट बाप्पा सगळं सांभाळून घेईल!’’ रुपाली सांगत असतात. आणि पाहता पाहता सुरुवातीला मातीला हात लावायला घाबरणाऱ्या अनेक स्त्रिया रुपालींच्या मार्गदर्शनाखाली गणपतीची अत्यंत सुंदर मूर्ती घडवतात.

निमित्त असतं रुपाली पाटोळे यांच्या ‘ग्रीनेशा’ उपक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या गणपती तयार करण्यासाठीच्या कार्यशाळांचं. गेली जवळपास ११-१२ वर्ष हजारो मुलामुलींना आणि स्त्रियांना गणपती घडवण्याचा हा वसा देण्याचं व्रतच जणू रुपाली पाटोळे यांनी घेतलं आहे. त्यातच हा बाप्पा पर्यावरणपूरक असावा, यासाठीच ‘ग्रीनेशा’ अर्थात ‘ग्रीन गणेशा’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

रुपाली यांनी आजवर अनेक मुलींना, स्त्रियांना शिल्पकलेची ही दीक्षा दिली आहे. पण त्यांचं मूळ शिक्षण मात्र यात झालेलं नाही. ती एक वेगळीच गोष्ट आहे. मानसशास्त्रातील पदवी मिळवल्यानंतर रुपाली यांनी मातीकामाविषयी एक अभ्यासक्रम पूर्ण के ला आणि त्यांच्या लक्षात आलं, की यामध्ये आपल्याला गती आहे.  ही कला आपल्याला समाधान देते आहे, हे  लक्षात आल्यावर याच विषयात पुढील शिक्षण घ्यायचं त्यांनी नक्की के लं. बंगळूरु इथल्या कला महाविद्यालयात शिकण्याची संधी चालून आली आणि रुपालींनी त्या संधीचं सोनं के लं. त्या कला महाविद्यालयात २०० विद्यार्थ्यांमध्ये रुपाली ही एकमेव विद्यार्थिनी होती. दक्षिणेतील मंदिरांमध्ये, प्राचीन शिल्पकलेमध्ये आढळणारं कोरीव काम, लाकू ड कोरण्याची कला, या विषयातला त्यांचा अभ्यासक्रम होता. परंतु तो करताकरताच रुपालींना दगड, धातू आणि त्यांची आवडती माती, टेराकोटा यावरही काम करण्याची संधी मिळाली. सकाळी मुख्य अभ्यासक्रमातील वर्ग आणि दुपारनंतर आपल्या आवडीच्या विषयातील अधिकचं शिक्षण अशी रुपालींची कसरत सुरू झाली. अर्थात दोन्ही गोष्टी आवडीच्या असल्यानं ही कसरत त्रासदायक नव्हती, तर सुखदच होती.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रुपाली मुंबईत परत आल्या. कामाच्या शोधात असताना त्यांना पहिली नोकरी मिळाली, तीच मुळी विशेष मुलांच्या शाळेमध्ये कलाशिक्षिका म्हणून. या मुलांना शिल्पकलेचं शिक्षण द्यायचं होतं. अशा वेळी सर्वात स्वस्त कच्चा माल म्हणजे माती होती. कारण दगडापासून वस्तू घडवायच्या किं वा लाकडापासून वस्तू घडवायच्या असतील, तर त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कच्चा माल लागत असे आणि किं मतही जास्त. माती हा परवडणारा पर्याय होता, शिवाय मुलांना मुळातच माती आवडते. त्यामुळे मग मातीकामाचे वर्ग सुरू झाले. हे शिक्षण देत असताना रुपालींच्या लक्षात आलं, की शिकवणंसुद्धा आपल्याला चांगलं जमत आहे. या विशेष मुलांच्या शिक्षणानंतर रुपाली यांना संधी मिळाली ती भायखळ्याच्या कारागृहातील स्त्री कैद्यांना शिकवण्याची, मग पुढे दृष्टिहीन मुलं, गतिमंद मुलं, धारावीतील आर्थिकदृष्टय़ा वंचित स्त्रिया अशा अनेकांना मातीकामाची कला त्यांनी शिकवली. धारावीतल्या स्त्रियांसाठी ब्लॉक प्रिंटिंगचे वर्ग घेतले. याचदरम्यान २००८ मध्ये त्यांचं पहिलं शिल्पप्रदर्शन भरलं.  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. रुपाली यांच्या शिल्पांना अनेक पंचतारांकित हॉटेल्स, बडय़ा कलप्रेमींच्या घरात स्थान मिळालं. त्यांच्या शिल्पांना प्रसिद्धी मिळत होती, पैसाही मिळत होता. पण पैशांबरोबरच जेव्हा रुपाली समाधानाचा विचार करत असत, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर येत, त्यांचे विद्यार्थी. जो गणेशाचं रूप प्रत्यक्ष बघू शकत नाही अशा एखाद्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनं तयार के लेली मूर्ती, वंचित, शोषित स्त्रियांच्या चेहऱ्यावर या कलेनं आणलेला आनंद.. हेच खरं आपलं आनंदनिधान, हे त्यांच्या लक्षात आलं. विशेष मुलं, गतिमंद मुलं यांच्या चेहऱ्यावर मातीकामातली एखादी गोष्ट जमल्यावर फुलणारं हसू.. या सगळ्याची किंमत आपल्या बाकीच्या कामापेक्षा खूप जास्त आहे, याची जाणीव झाली आणि मग या सगळ्याशी आपल्याला कायम जोडून ठेवेल, असं काहीतरी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इथेच पहिल्यांदा ‘ग्रीनेशा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली असावी. कारण रुपाली आपल्या मातीकाम शिकवण्याच्या वर्गाची सुरुवात विद्येची, कलेची देवता असलेल्या गणपतीपासूनच करत असत.

गणेशमूर्ती घडवताना आपोआपच प्रसन्न वाटतं, मनाला उभारी येते. त्यातही योगायोगानं रुपालींना गणेशमूर्तीविषयक कामं प्रचंड येत होती. मग दरवर्षी आपण बाप्पाची मूर्ती घडवायचं शिक्षण स्त्रियांना द्यायचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. एका अर्थी गणेशाच्या चरणी त्यांची सेवाच रुजू होत होती. पुढे २०१० मध्ये त्यांनी ‘ग्रीनेशा’ची सुरुवात

के ली. २०१३ मध्ये रुपाली आणि त्यांचे पती गौतम पाटोळे यांनी नवी मुंबईत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. पतीपत्नी दोघे कलाक्षेत्रातीलच असल्यानं इथेसुद्धा त्यांचं काम सुरूच होतं. नवी मुंबईत कलाउत्सव भरवण्याच्या निमित्तानं ‘सिडको’ आणि मग ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या अधिकाऱ्यांशी रुपाली यांची ओळख झाली. त्यांची कला आणि त्यांच्यातला प्रेरक कलाशिक्षक ओळखून ‘सिडको’कडून त्यांना प्रकल्पग्रस्त गावांतील स्त्रियांसाठी कलावर्ग घेण्याची विनंती करण्यात आली. या बायकांना मातीकामाचं प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली.

हा अनुभव सांगताना रुपाली म्हणतात, ‘‘सुरुवातीला ‘हे काय मातीत हात भरायचे!’ असं म्हणून पदर तोंडाला लावून खुदूखुदू हसणाऱ्या बायका त्या कार्यशाळेच्या १०-१२ दिवसांनंतर मात्र मातीकामामध्ये छान रमून जात.’’ त्यातल्या एकीनं रुपालींना सांगितलं, ‘‘बाई आम्हाला दागिने मिळाले, भरजरी साडय़ा मिळाल्या, पण प्रतिष्ठा, आत्मसन्मान मात्र मिळाला नव्हता. तुम्ही बाप्पाच्या मूर्ती घडवायला शिकवलंत, मातीचे दागिने करायला शिकवलंत. या कलेनं आम्हाला तो आत्मसन्मान मिळवून दिला आहे.’’ ही प्रतिक्रिया ऐकून रुपालींना फार समाधान मिळालं आणि अशा प्रकारे गणपतीची मूर्ती घडवण्याच्या कार्यशाळा घेण्याचा निर्णय किती योग्य होता, त्याची एकप्रकारे खात्रीच पटली त्यांना.

२००८ मध्येच रुपाली यांनी ‘ग्रीनेशा’ प्रकल्पाला सुरुवात केली होती. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवायची, हा एकच ध्यास घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. शाडूची माती किंवा साध्या मातीपासून जास्तीत जास्त नैसर्गिक सजावट करून बाप्पा कसा बनवता येईल, यासाठी वर्ग, कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. त्यांचं या विषयातील काम आणि धडपड पाहूनच त्यांना संधी मिळाली, ती ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’बरोबर काम करण्याची. मंडळाच्या   ‘इकोफ्रें डली गणपती स्पर्धे’साठी रुपाली परीक्षक म्हणून काम पाहतात. त्याचबरोबर ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीऐवजी शाडूच्या मातीच्या, पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती घडवाव्या, यासाठी त्या प्रयत्न करतात. अनेक उपक्रम राबवतात. मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा तर आहेतच, पण त्याचबरोबर एक नवा उपक्रम त्यांनी सुरू के ला. मूर्ती तयार करताना त्या मातीमध्ये त्या तुळशीचं बी, धने, मेथीदाणे आदी मिसळतात, जेणेकरून ही माती विसर्जनानंतर जास्तीत जास्त लवकर निसर्गातत्त्वात विलीन व्हावी. त्याचबरोबर बाप्पांचं विसर्जन के लं जातं, ते पाण्यामध्ये. मग या मूर्तीच्या पोटात पाण्यातल्या माशांसाठी खाद्य ठेवलं तर?, ही अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात आली. लगोलग त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. आता अनेक शाळा, मॉल्स, कार्यक्रम, कार्यशाळांमधून शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक मूर्ती कशी घडवावी, याचं प्रशिक्षण रुपाली यांच्या ‘ग्रीनेशा’मार्फ त दिलं जातं. या निमित्तानं नदीसफाई, पाण्याचे स्रोत स्वच्छ राखणं, पर्यावरणरक्षण यांसारखे सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्नही के ला जातो. आजवर ‘ग्रीनेशा’च्या माध्यमातून रुपालींनी वेगवेगळ्या वयोगटातील २४ ते २५ हजार विद्यार्थ्यांना मूर्ती घडवणं, मातीपासून दागिने, शिल्पं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. त्याचबरोबर त्यांची ‘इरा फॉर वूमन’ ही सामाजिक संस्थाही आहे. या संस्थेमार्फत स्त्रिया आणि मुलींना कलाशिक्षण दिलं जातं, या कलेच्या आधारे त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकतील, यासाठी विशेष प्रयत्न के ले जातात. हे शिक्षण माफक दरात किं वा पूर्णत: नि:शुल्क पद्धतीनं दिलं जातं. संस्थेमार्फत वंचित स्त्रियांसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जातात. सुरुवातीला आपल्याला मूर्ती कशी करता येईल, या संभ्रमात असलेले अनेक हात रुपाली यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली लीलया मूर्ती घडवतात, मातीचे दागिने घडवतात आणि त्यापासून रोजगारही मिळवतात.

अर्थात फक्त ‘ग्रीनेशा’पुरतंच रुपाली यांचं काम मर्यादित नाही. शिल्पकलेची कामं, मातीकाम, लाकूड कोरीवकाम, दगडातील शिल्प, कुंचला, या सगळ्या माध्यमांतून रुपाली यांनी रंगांशी, कलेशी असलेली नाळ कायम जोडून ठेवली आहे. माती आणि त्यामधील शिल्पं या विषयात तर त्या भरपूर काम करतातच, परंतु दगड, लाकू ड यांपासूनही त्यांनी भव्यदिव्य आणि पर्यावरणपूरक मूर्तीची, शिल्पांची निर्मिती के ली आहे. देशभरात आणि परदेशातही विविध ठिकाणी त्यांच्या एकटीच्या कलाकृतींची आजवर अनेक प्रदर्शनं झाली आहेत. जॅकी श्रॉफ, आशा भोसले, रितेश देशमुख यांच्यासारख्या अनेक ‘सेलिब्रिटीं’बरोबर रुपाली यांनी कलात्मक काम के लं आहे. अनेक सेलिब्रिटींकडे रुपालींची शिल्पं विराजमान आहेत. विविध संस्थांमध्येही त्यांनी शिल्पं घडवली आहेत. गेल्या काही वर्षांत रुपाली यांनी शेतघर- अर्थात ‘फार्महाऊस डिझायनिंग’सारख्या नव्या विषयात, नव्या व्यवसायात पाऊल टाकलं आहे. सोबतीनं मूर्ती घडवण्याचे वर्ग, कार्यशाळा सुरूच आहेत.

रुपाली म्हणतात, ‘‘बाप्पा कायमच माझ्या पाठीशी उभा राहिलेला आहे. सुरुवातीला जेव्हा मी अगदी नवखी होते, तेव्हाही माझ्या कामाची सुरुवात गणेशाच्या मूर्तीनंच झाली होती आणि आजही योगायोग म्हणा, अथवा माझी श्रद्धा असेल, पण मी सगळ्यात जास्त काम गणरायाच्या मूर्तीवरच केलं आहे. गणराय आणि निसर्ग दोघांचा आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल आहे. त्यामुळे तो जपण्यासाठी ‘ग्रीनेशा’ आणि ‘इरा फॉर वूमन’ संस्थेच्या साथीनं, माझ्या सर्व स्त्री सहकाऱ्यांच्या साथीनं नवनवे प्रयोग करत राहणार आहे. बाप्पाच मला ही कलेची वाट दाखवतो आहे.’’

 

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2021 sculpture female teacher rupali patole eco friendly green ganesha zws

ताज्या बातम्या