गौरी-गणपतीच्या सणात धार्मिक भाव आहेच, पण त्या बरोबरीने फार पूर्वीपासून स्त्रियांनी या काळात आपल्या कलाकुसरीला, कौशल्याला वाव दिला. गणपती, गौरीसाठी केल्या जाणार्‍या साध्या-सोप्या सजावटीतूनही स्त्रियांची कला दिसत राहिली. गौरीसाठी साडी नेसवणं, साजश्रृंगार असो किंवा गणपतीसाठी केलेली छोटी सजावट… घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीच्या साहाय्याने केलेल्या सजावटीतून स्त्रियांनी पूर्वीच्या काळातही या सणांचं चैतन्य जपलं. स्त्रिया त्यांची कला अभिव्यक्त करीत राहिल्या.


गौरी-गणपतीचा सण अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. माझ्या लहानपणीच्या आठवणी मला येऊ लागल्या आहेत. गौरी यायच्या म्हटलं की, घरामध्ये खूप गडबड सुरू असायची. हल्ली सजावटीच्या सगळ्या वस्तू बाजारामध्ये तयार मिळतात, परंतु माझ्या बालपणी, म्हणजे साधारण सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी स्त्रिया स्वत: अनेक कलाकुसरीच्या, सुंदर वस्तू घरीच तयार करत असत. या वस्तू तयार करण्यासाठी त्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा उपयोग करत. म्हणजे हल्ली ज्याला ‘कचर्‍यातून कलाकृती’ म्हणतात, तशा बर्‍याच असत. गणपतीची सजावट करत असताना फारसा प्रश्न येत नसे, कारण पुरुष माणसं गणपतीच्या पाठीमागची सजावट करत. पण या सजावटीत घरातल्या बाईची एखादी जरीची, बुट्टेदार साडी गणपतीच्या बैठकी मागे पडदा म्हणून लावली जाई. नंतर गणपतीचं आसन सजवलं जाई आणि गणपतीची प्रतिष्ठापना होत असे.
गौरीची सजावट फार मोठी असे. गौरीचे निरनिराळे प्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत. विशेषत: गौरी-गणपतीचं माहात्म्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात विशेष आहे. काही जमातींमध्ये दोन उभ्या गौरी बसवल्या जातात, त्यांना ‘ज्येष्ठा’ आणि ‘कनिष्ठा’ असं म्हणतात. म्हणजे मोठी गौर आणि छोटी गौर. छोट्या बाहुल्या असाव्यात दीड-दोन फुटाच्या, अशा प्रकारे त्यांचे साचे असतात आणि त्या साच्यावर देवीचा मुखवटा बसवलेला असतो. आजही अनेक ठिकाणी त्या देवीचे मुखवटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. कुठे पितळेचे असतात, मोठे श्रीमंत लोक असतील तर चांदीचे असतात. अगदी सामान्य आर्थिक परिस्थितीच्या लोकांमध्ये पाणी पिण्याचा जो जुन्या पद्धतीचा गोल तांब्या असतो, त्या तांब्यावरच रंगाने भुवया, नाक, डोळे वगैरे रेखाटून नाकात नथ घालण्याची जागा, कान, डोक्यावर केस म्हणून तांब्याची वरची बाजू काळी करणं असं करत गौरीच्या मुखवट्यासारखा आकार बनवला जायचा आणि तो पुजला जायचा. असे दोन तांबे सजवायचे आणि ते एखाद्या मधल्या लहान दांडीवर बसवायचे. त्याला साडी नेसवून पूर्ण सजवायचे. त्यांना अलंकार घालायचे.

काही ठिकाणी सुगडावर गौरी रंगवतात. सुगड म्हणजे संक्रांतीला पूजेसाठी स्त्रिया मातीचे छोटे छोटे कलश वापरतात, त्याला सुगड म्हणतात. त्याच्यावर नाक, डोळे रंगाने काढून गौरीचा मुखवटा रंगवला जातो. तो अजूनही अनेक ठिकाणी तसाच रंगवला जातो. कोणाकडे तयार मुखवटे, काही ठिकाणी तांब्याच्या तांब्यावर रंगवलेले, तर काही ठिकाणी मातीच्या सुगडावर रंगवलेले मुखवटे असतात. अलीकडे चेहरा रंगवलेले तयार मुखवटे मिळतात, तसे पू्र्वी मिळत नसत. त्यामुळे मुखवटा रंगवणं हे खास स्त्रियांचं काम असे. मी असं पाहिलंय की, माझी आई, काकू या बायका तो तांब्या घेत असत. त्या तांब्याला नाक, डोळे व्यवस्थित रंगवत असत, पण त्या रंगवण्यासाठी रंगसुद्धा त्या स्वत: तयार करत. केस रंगवायचे झाले तर कोळसा उगाळून, तो काळा करून त्याने केस रंगवायचे. भुवया रंगवायच्या. पांढरा रंग ज्या ठिकाणी डोळ्यात असतो, तिथे चुन्याचा रंग द्यायचा. मधोमध काळा ठिपका तो पुन्हा कोळशाच्या रंगाने द्यायचा. अशा विविध प्रकारच्या घरगुती वस्तू वापरून त्या मुखवट्यांचे रंग तयार करीत आणि मुखवटे तयार करीत. त्यांचे अलंकारही बायका स्वत: तयार करायच्या. म्हणजे नकली मोती किंवा मणी आणून गौरीसाठीचे अलंकार तयार करायचे आणि ते घातले जायचे.
काही ठिकाणी गौरी बाहुलीच्या आकाराच्या आणि उभ्या असतात. त्यांना आडवे खांदे असतात. मधोमध तो मुखवटा ठेवतात आणि त्याला साडी नेसवली जाते. काही ठिकाणी नुसतेच मुखवटे ठेवतात आणि त्यांना डोक्यावरून छान जरीच्या खणाचे आवरण घालून फक्त दर्शनी भाग दिसेल अशा प्रकारे ते मुखवटे पाटावर ठेवले जातात आणि त्याच्या भोवताली रांगोळ्या वगैरे घालून सुंदर सजावट केली जाते. हे मुखवटे उभे केले जातात, याचेही निरनिराळे प्रकार. हल्ली गौरी बसवण्यासाठी दीड-दोन फुटाचे बाहुलीच्या आकाराचे लाकडाचे साचे मिळायला लागले आहेत. त्यावर मध्यभागी तो मुखवटा ठेवायला जागा असते आणि त्याला साडी-चोळी नेसवून नटवलं जातं. त्या साडी नेसवण्याआधी आमची आई कमरेच्या वरचा भाग म्हणजे धड बनवण्यासाठी मुलांचा खेळायचा विटी-दांडूमधला दांडू वापरायची. एक उभा दांडू घ्यायचा, दुसरा आडवा थोडासा कमी घ्यायचा, वरती मधोमध त्या उभ्या दांडूला तो मुखवटा अडकवण्यासाठी जागा ठेवायची आणि तो दांडू त्या खांद्याच्या बाजूला येईल अशा प्रकारे बांधायचा, त्याच्यावर पुष्कळ चिंध्या गुंडाळून त्या लाकडाने ती धड तयार करायची. एखाद्या अरुंद तोंडाच्या बरणीत ते धड बसवायचे ती उभी बरणी हा बाहुलीच्या कमरेखालचा भाग असे. तो सांधा म्हणजे कंबर व त्यावर साडी नेटकी नेसवली जायची आणि त्याला नटवताना त्या ्त्रिरया निरनिराळ्या रंगाचे साधे मणी, गोफ वापरून चकचकीत हार तयार करायच्या. ते हार तयार करत असताना आम्ही लहानपणी सिगारेटच्या पाकिटात मिळायचा तो चकचकीत कागद वापरायचो. त्याला आम्ही ‘सिगारेटची चांदी’ म्हणायचो. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हाताने त्याच्या चौफुल्या तयार करायच्या. छोटी छोटी फुलं पारिजातकाची असावीत, तशा चौफुल्या हाताने दाबून तयार करायच्या, ज्याचं मला नीट वर्णन करता येणंही अशक्य आहे. त्यात रंगीत मणी घालून त्याचा ओवून हार तयार करायचो. त्या हाराला फुलं लावली जायची. ती फुलंसुद्धा घरात असणार्‍या जुन्या उरलेल्या रंगीबेरंगी लोकरीमधून तयार केली जायची. लोकरीच्या फुलांचे गुच्छ, गोंडे तयार करायचो आणि त्यातून गौरीसाठी हार केले जायचे.

मणी बाजारात विकत मिळायचे, त्या मण्यांनीच गळ्यामध्ये घालायचे निरनिराळे अलंकार जसं की ठुशी, मंगळसूत्र, छोटे-मोठे मण्यांचे हार असतील तर करायच्याच, पण बाकीच्या वस्तूसुद्धा बायका स्वत: तयार करायच्या. अशा अलंकारांनी गौर सजवली जायची. गौरीला साड्या नेसवतानासुद्धा मोठी साडी छोट्याशा गौरीला नेसवणं कठीण जायचं. त्या साडीची मधोमध घडी करायची आणि नेसवायची. किंवा काही बायका नऊवारी साडी घ्यायच्या आणि त्याच्या दोन साड्या तयार करायच्या. आपली मैत्रीण किंवा नातेवाईकांना त्यातली अर्धी साडी त्यांच्या गौरीला नेसवायला द्यायच्या आणि त्याच्या छोट्या साड्या तयार करायच्या. अशा प्रकारे गौरींची सजावट दोन-तीन महिने आधीच मोठ्या कलाकुसरीने केली जायची. आमच्यासारख्या मुली त्यात सहभाग घ्यायच्या. गौरीसाठी मखर केले जायचे. भोवतालची सजावट जशी जमेल तशी केली जायची. ते खूप कौशल्याचं काम असायचं.

गौरींच्या पुढेही तांब्यावर एक नारळ ठेवून त्यावर जरीचं टोपडं घालून त्याला बाळाचं रूप दिलं जायचं. ते बाळ त्या गौरींच्यामध्ये ठेवायचे. दोन गौरींच्या पुढे दोन ओट्या ठेवल्या जायच्या. एकीच्या समोर गव्हाचा ढीग, दुसरीच्या समोर तांदळाचा ढीग. त्यावर सुपारी, हळकुंड आणि नारळ. ओटीला जे जे सामान लागतं, ते दोघींच्या समोर वेगवेगळं ठेवायचं. एकीला रेशमी साडी नेसवायची, दुसरीला साधी साडी नेसवायची. जिला रेशमी साडी नेसवायची, तिला म्हणायचे ती ‘सोवळ्यातली गौर’ आणि ही दुसरी ‘ओवळ्यातली गौर’ म्हणजे साधी गौर. ‘ज्येष्ठा’ आणि ‘कनिष्ठा’ अशी त्यांची नावं असायची. त्यातली ‘ज्येष्ठा’ म्हणजे ती ‘ज्येष्ठराजाची’ पत्नी म्हणून ‘ज्येष्ठा’, कारण गणपतीला ‘ज्येष्ठराज’ हे एक नाव आहे आणि त्या ज्येष्ठराजाची जी पत्नी, ती ‘ज्येष्ठा’ आणि दुसरी ती ‘कनिष्ठा’. ही स्त्री-रूपे त्यांची.

कोकणामध्ये जर गेलं, तर नदीच्या काठी जी तेरड्याची फुलांची झाडं उपटून तांब्यात ठेवून तीच गौर म्हणून पुजायची पद्धत काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी उंचच्या उंच एकच गौर बसवायची पद्धत असते. त्या गौरीचं सगळं कौतुक केलं जातं. पहिल्या दिवशी तिला दही-भाताचा नैवेद्य दाखवायचा. दुसर्‍या दिवशी तिला साग्रसंगीत पुरण-वरणाचं जेवण द्यायचं आणि तिसर्‍या दिवशी दही-पोहे देऊन तिची रवानगी करायची. दुसर्‍या दिवशीचं जे महत्त्वाचं जेवण असतं, ते ‘गौरीचं जेवण’. त्याला १६ प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी केल्या जातात. त्याची वर्णनंसुद्धा कहाणीमध्ये केली आहेत. एवढ्या भाज्या का? तर भाद्रपद महिन्याचा हा काळ असा आहे की, निसर्गाने भरपूर भाज्या, फळं, फुलं फुलवलेली असतात आणि त्याचा एक अंश देवाला द्यायचा, म्हणजे मग आपल्या घरीही त्या वस्तूंची सुबत्ता येईल, ही श्रद्धा असते.

घरामध्ये रांगोळीने गौरीची पावलं रेखायची. या गौरीचे मुखवटे प्रथम तुळशीजवळ ठेवायचे. तुळशीपासून ज्या ठिकाणी मखरात तिची प्रतिष्ठापना करायची तिथपर्यंत त्या दोन बायका हातामध्ये मुखवटे घेऊन यायच्या आणि त्या प्रत्येक पावलाच्या रांगोळीवर मुखवटे ठेवायच्या. ‘‘लक्ष्मी आली सोन्याच्या पाऊली…’’ असं म्हणत देवाजवळ आणायच्या, त्यांना अक्षदा वाहायच्या आणि ते मुखवटे त्यांच्या साच्यावर चढवायचे. या गौरींना घरातलं धान्य, दूध-दुभत्याची जागा सगळं आधी दाखवायचं. आदिवासींमध्येही गौरी असतात. त्यांना घरात फिरवताना म्हणतात,‘‘गौरी गौरी काय पाहतेस?
‘‘मी पाहते धान्याचं कोठार…’’
‘‘गौरी गौरी काय पाहतेस?’’
‘‘मी पाहते दूध-दुभतं…’’
‘‘गौरी गौरी काय पाहतेस?’’
‘‘मी पाहते भानवस चूल…’’ असं गाणं म्हणत सगळं घर गौरीला दाखवून तिची प्रतिष्ठापना होते. कारण तिने आपल्या घरामध्ये प्रदक्षिणा घातली की ती ‘लक्ष्मी’ अर्थात सुखसमृद्धी वर्षभर थांबते, असा समज वा स्त्रियांची तशी श्रद्धा असते. ती श्रद्धा अशा वेगवेगळ्या सण-उत्सवातून दिसत असते.
मनातल्या श्रद्धाभावनेला कलात्मकतेचा साज हौसेने सजवीत स्त्रिया आनंदाची देवाण-घेवाण करीत आल्या आहेत. कालपरत्वे तपशील बदलले तरी तत्त्व कायम राहते, ते म्हणजे श्रद्धेतला कलात्मक आविष्काराचे अधिष्ठान असणे. याचा प्रत्यय अनेक अंगांनी माणूस पिढ्यान् पिढ्या घेत आला आहे. प्राचीन दगडी उंच गोपुरांच्यावरील कोरीव शिल्पे आणि त्या मंदिराच्या आश्रयाने स्त्रियांची नृत्य- गायनासारखी कला विकसित झाली, काळाच्या ओघात टिकली.
कौटुंबिक स्तरांवरच्या सण- उत्सवांमधून स्त्रियांच्या रांगोळ्या, हस्तकला, क्रीडा, पाकशास्त्र इत्यादी अनेक कला घरोघर अस्तित्वात
आहेत. लोकपरंपरेतील स्त्रियांचा हा सांस्कृतिक कलांचा वारसा एका पिढीकडून दुसर्‍या, पुढच्या पिढीत प्रवाहित होत राहिला आहे.
uchaturang@expressindia.com