मृदुला भाटकर

‘कोणती कारणं घटस्फोटासाठी रास्त आणि कोणती कारणं क्षुल्लक समजावीत? लहान कारणांनी ज्यांच्यात अशांतता निर्माण झाली आहे, अशा तरुण जोडप्यांना समजावण्यासाठी योग्य व्यक्तीच हवी. असमंजस व्यक्तींच्या सल्ल्यामुळे नवरा-बायको घटस्फोटाच्या निर्णयात चूक करू शकतात. एकमेकांपासून दूर जाण्यापूर्वी, समंजसपणा दाखवता आला तर पुढचं आयुष्य आनंदात जाऊ शकतं.’ ‘दूर जाताना’ (८ ऑक्टोबर) या लेखाचा हा भाग दुसरा.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

जून १९९८ मध्ये ‘ऑक्सफर्ड’च्या काऊंटी कोर्टात एक आठवडाभर जज कॅरी यांच्याबरोबर डायसवर बसण्याची मला संधी मिळाली होती. त्या वेळेस ते म्हणाले, की ‘‘भारतातली कुटुंबसंस्था हे भारताचं मोठं बलस्थान आहे.’’ त्या वेळेस इंग्लंडमध्ये ३:१ या प्रमाणात घटस्फोटाचं प्रमाण होतं. १९८४ मध्ये जेव्हा ‘कौटुंबिक न्यायालय कायदा’ केला गेला, तेव्हा दिवाणी न्यायालयावरचा भार कमी व्हावा आणि प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा हा उद्देश होता. कारण कौटुंबिक वाद फार वेळ भिजत ठेवणं योग्य नाही.

काळ आणि वेळ कुणासाठीच थांबत नाही. त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षांपर्यंत जर घटस्फोटाचा वाद उद्भवला आणि तो दोन-तीन वर्षांत निकाली निघाला, तर त्या दोन्ही व्यक्ती स्वतंत्र आयुष्य परत एकदा जगू शकतात. पण आज अशी परिस्थिती अजिबात नाही. आज कौटुंबिक न्यायालयात खटला पाच-सहा वर्षही चालतो. पुढे उच्च न्यायालयात अपील केलं, तर काही वर्ष गेलीच. हे असं का होतंय? न्यायाधीश काम करत नाहीत का? हे अगदीच चूक आहे. मग न्यायालयं कमी आहेत का? हेही बरोबर नाही.. आता कौटुंबिक न्यायालयात ४-५ न्यायाधीश पूर्णवेळ तेच  काम करत आहेत. कारण सरळ आहे, ते म्हणजे आपली वाढती लोकसंख्या आणि त्यांचं परस्परांमध्ये न जमण्याचं खूप मोठं प्रमाण. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविरुद्ध मनामध्ये असलेली सूडाची भावना आणि लग्न पैशांत मोजण्याचं वाढतं प्रमाण!

मृत शरीराला अग्नी देण्यापूर्वी मडक्यात पाणी घेऊन त्याभोवती फेऱ्या मारण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. त्याचा अर्थ असा सांगितला जातो की, शरीर हे शेवटी माती. म्हणून त्याचं प्रतीक मडकं- म्हणजे घट. त्यातलं पाणी म्हणजे आत्मा. मडकं फोडून तो आत्मा मुक्त केला जातो. त्याला ‘घटस्फोट’ म्हणतात. हे नाव विवाहविच्छेदनाला उद्देशून हिंदू कायद्यात किंवा मराठीत वापरतात. याचा नेमका उगम मला मिळालेला नाही, पण तो मराठीतला शब्द मला अगदी चपखल वाटतो. कारण ते दोन जीव बिचारे गुदमरत एकमेकांसोबत जगत असतात. तो विवाहाचा घट फुटला की दोघेही स्वतंत्र होतात. मोकळा श्वास घेतात.

मुळात घटस्फोट ही लाज वाटावी अशी घटना वा कृती नाही. घटस्फोट हा बट्टा तर मुळीच नाही. फक्त सोबत सोडण्याचा निर्णय आहे आणि आयुष्य जगताना अनेक वळणांनी पुढे जावं लागतं. तसंच एक मोठं वळण. घटस्फोटाचा निर्णय घ्यायला धाडस लागतं. कारण आपल्या समाजाची आजही असलेली ‘अरेच्चा! त्यांचा घटस्फोट झालाय,’ ही त्या व्यक्तीला वेगळं ठरवण्याची मानसिकता. लग्न केल्याचं कारण हे सर्वमान्य असतं. ‘काय कारण घटस्फोटाचं?’ हे अनावश्यक कुतूहल! घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीला सहानुभूती नाही, तर समजून घेणं आवश्यक असतं. जेव्हा दोघांचे सूर विसंवादी लागतात, तेव्हा कारणं क्षुल्लक किंवा गंभीर असतात. जिथे काही शारीरिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे बाजूला होणं गरजेचं असतं तेव्हा परिस्थिती वेगळी असते. तिथे संमतीनंही घटस्फोट होतो. पण जिथे छोटय़ा छोटय़ा कारणांनी अशांतता निर्माण होते, तिथे त्या दोघांना त्या वेळेस कोण आणि कसं समजावतं ही महत्त्वाची बाब असते. कोणती कारणं घटस्फोटासाठी रास्त आणि कोणती कारणं क्षुल्लक समजणं ही पहिली पायरी असते. असमंजस माणसांच्या सल्लामसलतीमुळे तरुण नवरा-बायको घटस्फोटाच्या निर्णयात चूक करू शकतात, ती टाळली पाहिजे. विवाह मार्गदर्शन, समुपदेशन, या काळजीपूर्वक आणि संयम ठेवून करण्याच्या गोष्टी. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जोडप्याची दुखरी नस बरोबर पकडता आली पाहिजे. तिचं आकलन झालं नाही, तर निदान होण्याऐवजी रोगी औषधांनी दगावला असं होतं.

जी जोडपी एकमेकांबरोबर आनंदी नाहीत, ज्यांची एकमेकांसोबत वाढच होत नाही, तर खुंटते, अशांसाठी कायद्यानं केलेली घटस्फोटाची तरतूद वरदान आहे. कौटुंबिक न्यायालयात आणखीन प्रकर्षांनं जाणवणारा मुद्दा म्हणजे बायकांची ‘सासू’ झाल्यावर मुलांच्या संसारात होणारी अनावश्यक ढवळाढवळ. मी हे ‘सासू’ म्हणजे नवरा आणि बायको या दोघांच्या आईंना उद्देशून लिहितेय. आज सासू असणाऱ्यांना एक किंवा दोनच मुलं आहेत. त्यामुळे एकुलत्या एक किंवा दोन मुलांच्या आयुष्यावर सगळं लक्ष केंद्रित असतं. आपले सल्ले, सूचना, बाजू घेणं, नकळत अहेतुक-सहेतुक अगदी कमी करायला हवं. दोन्ही आईंनी- मुलांच्या वा मुलींच्याही. गमतीनं लक्षात ठेवायचं की, ‘Mother in Law’ यातील अक्षरांची उलटापालट करून ‘Woman Hitler’ हाही शब्द तयार होतो!

माझ्याकडे उच्च न्यायालयात एक घटस्फोटाचं प्रकरण आलं. त्यात ते दोघंही नवरा-बायको वयस्कर- म्हणजे श्रीयुत ७२ वर्षांचे व श्रीमती ६८ वर्षांच्या होत्या. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी नाशिकच्या कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. कुटुंब न्यायालयातील त्या घटस्फोटाच्या मूळ दाव्यात खूप वेगवेगळय़ा केसेस एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या होत्या. त्यात पोटगी, घरगुती हिंसाचार इत्यादी सर्व होतं. त्यांना कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट नाकारल्यामुळे ते हायकोर्टात आले. अपिलात एकमेकांविरुद्ध आणखी बारीकसारीक गोष्टी, अगदी न्यायालयाचा अपमान, दुरुस्ती अर्ज हेही दाखल झालं. त्यांची परदेशात शिकून तिथेच स्थायिक असलेली, इंजिनीयर असलेली ३६ वर्षांची अविवाहित मुलगीही त्यात उतरली. तिनंही वडिलांवर तिच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी द्यावा म्हणून एक पोटगी अर्ज दाखल केलेला होता. अशा एकमेकांच्या विरुद्ध एकूण ४२ केसेस दाखल केलेल्या होत्या. त्यातल्या तीन ते चार नाशिकच्या जिल्हा न्यायालयात आणि बाकी सर्व उच्च न्यायालयात प्रलंबित होत्या.

दोन्ही बाजूचे वकील तितक्याच उत्साहात एकमेकांच्या विरुद्ध आरोप करत माझ्यासमोर युक्तिवाद करत होते. मी पुढची तारीख दिली, कारण सगळी प्रकरणं नीट वाचून या दोघांना नेमकं काय हवंय आणि हा तिढा कसा सोडवता येईल याचा मला स्वत:ला अंदाज घ्यायचा होता. पुढील दोन तारखांना मी दहा-दहा मिनिटं त्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्या सर्व तारखांना श्रीयुत आणि श्रीमती नाशिकहून न्यायालयात आले होते. एका तारखेला त्यांची मुलगीही अमेरिकेहून आली. तिला नोकरी होती, तरी ती तिच्या शिक्षणाचा खर्च मिळण्याचा तिचा अधिकार आहे म्हणून वकिलांमार्फत भांडत होती. मला एकूणच कळलं की, त्या दोघांना आता कोर्टात येण्याची सवय लागली होती. तारीख, वकील, प्रकरणांचे नंबर हे सर्व त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले होते. कोर्टात येऊन केसेस दाखल करण्याचं व्यसन लागलेल्या व्यक्तींना ‘कोर्ट बर्ड’ म्हणतात. अशा कितीतरी जोडप्यांचं ‘लव्ह बर्डस्’मधून ‘कोर्ट बर्डस्’मध्ये कालांतरानं रूपांतर झालेलं न्यायिक अधिकारी अनेकदा अनुभवतात. या श्रीयुत आणि श्रीमती यांना घटस्फोट हेच सर्वात योग्य उत्तर होतं, परंतु शेवटी सगळय़ा गोष्टी अडकल्या होत्या त्या मालमत्तेच्या आपापसातल्या वाटपामध्ये..

माझ्या हेही लक्षात आलं की, दोन्ही बाजूंच्या वकिलांनाही त्यामध्येच रस होता. त्यामुळे प्रत्येक तारखेला दोन्ही वकील पहिल्याच उत्साहात आपापल्या पक्षकाराचं कसं बरोबर आणि दुसरा किती चूक हे मांडायला तयार असत. त्या दोन्ही बाजूंना समुपदेशनाची फार गरज होती. त्यांच्या वकिलांना बाजूला ठेवून मी श्रीयुत आणि श्रीमती यांचं कोर्ट संपल्यानंतर चेंबरमध्ये बसून जवळजवळ तासभर समुपदेशन केलं. तसंच दुसऱ्या दिवशीही. हे असंच चालू राहिलं तर त्यांच्या आयुष्यातला पुढचा प्रवास केवळ भांडणातच जाणार आणि ते एकमेकांपासून मुक्त न होताच मरणार, हे त्यांच्या मनावर पूर्ण ठसलं. मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट प्रत्येक वेळी पैशांमध्ये मोजता येत नाही. स्वास्थ्य मिळवणं त्यांच्याच हातात होतं ते केवळ छोटय़ामोठय़ा मालमत्तेच्या संदर्भातल्या तडजोडी स्वीकारून. त्यांच्या चार-पाच स्थावर मालमत्ता होत्या. आर्थिकदृष्टय़ा दोघंही उच्च मध्यमवर्गीयांत मोडणारे होते. पण ‘तुला हे घर हवं, तर मलाही तेच घर हवं’ या दोन्ही बाजूंच्या हट्टी स्वभावापायी सगळा प्रश्न पंधरा वर्ष भिजत राहिला होता. सरतेशेवटी ते दोघंही संमती देण्यास तयार झाले, तेव्हा वकिलांना बोलावून त्यांच्यासमक्ष तशी नोंद करून चौघांच्याही सह्या घेतल्या.

त्या दोघांनी एकमेकांविरुद्ध ज्या ४२ केसेस दाखल केल्या होत्या, त्या मागे घेण्याबद्दल त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करून घेतलं. काही मालमत्तेची विक्री करून आलेला पैसा दोघांमध्ये वाटून दिला. अर्थात घटस्फोटाची संमती घेतल्यानंतर सहा ते आठ महिने वेळोवेळी तारखा देऊन मी या प्रकरणावर पूर्ण लक्ष ठेवत होते. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी सर्व संपवल्याचा आणि घटस्फोटाचा अंतिम आदेश देताना श्रीयुत, श्रीमती आणि त्यांचे वकील समोर होते. आदेश दिल्यानंतर श्रीमतींनी सांगितलं, ‘‘आता माझ्या पायाचं दुखणं खूपच कमी झालं आहे. माझी काठी दोन वर्षांनंतर सुटली.’’ श्रीयुत म्हणाले, ‘‘मला शांततेचं महत्त्व समजलं. आता मी सुखाने जगीन.’’ मी मात्र त्यांनी भांडणात घालवलेल्या आजारी, अशांत, वाया गेलेल्या बहुमूल्य पंधरा वर्षांचा हिशेब मनात लावत बसले होते.

मुळात नवरा-बायकोमध्ये प्रेम हाच एक महत्त्वाचा जोडून ठेवणारा दुवा असतो. पण एकमेकांविषयी प्रेमच नसेल आणि एखाद्या व्यक्तीला त्यापासून सुटका हवी असेल, तर घटस्फोट न देऊन त्या व्यक्तीवर प्रेम लादण्यात काय अर्थ? डार्विनचा ‘उत्क्रांतीवादाचा सिद्धांत’ मला नेहमी आठवतो. न वापरल्यास निरुपयोगी अवयव गळून पडतो. जशी माणसाची शेपटी गेली! तसा मी गेले दहाएक वर्ष विवाहसंस्थेचं बदलतं स्वरूप पाहाताना मलाच प्रश्न विचारतेय की, ‘खूपशी तरुण मुलं-मुली प्रेम करायला हळूहळू विसरत चालली आहेत की काय?’  भीती वाटते की, पुढे काही वर्षांनी ‘प्रेमात पडणं’ ही न वापरलेली भावना होऊन ती मेंदूच्या विशिष्ट भागातून पुसली जाईल की काय? स्त्री-पुरुषांचं नातं हे शारीर आकर्षण आणि समाधानावर उभं असलेलं. यात प्रेम ही अत्यंत महत्त्वाची कुटुंबाला बांधून ठेवणारी भावना! सामंजस्य, सहिष्णुता याही भावना प्रेमाबरोबर येतात. स्त्रीला मातृत्वाची- निर्मितीची निसर्गदत्त देणगी असल्यामुळे कुटुंबाला उभं करण्याची आणि सावरून ठेवण्याची मोठी जबाबदारी ती उपजतच घेऊ शकते. संसार करण्यासाठी आवश्यकता असते प्रेमाबरोबरच थोडाशा चातुर्याची!

विवाहबाह्य संबंध हेही आज जिथे स्त्री-पुरुष एकत्र काम करतात तिथे घटस्फोटाचं एक महत्त्वाचं छुपं किंवा खुलं कारण असू शकतं. विवाहबाह्य संबंध असलेले काही जोडीदार चूक कबूलही करतात. त्यांना कधी-कधी नवीन नातं नाकारून जोडीदाराकडे परत यायचं असतं. तिथे दुसऱ्या जोडीदारानं हा आत्मसन्मानाचा विषय म्हणून आपल्या मनाचे दरवाजे बंद करणं किंवा चुकलेल्या जोडीदाराच्या आयुष्यातूनच निघून जाणं, असे टोकाचे मार्ग चोखाळण्यापूर्वी क्षमाशील होऊन भरकटलेल्या जोडीदाराला मदतीचा हात देऊन सोबत अधिक पक्की का करू नये, हाही एक समंजस मार्ग निश्चितच उपलब्ध असतो. अर्थात यानंतर पुढे चालताना चुकलेल्या जोडीदाराला सतत अपराधीपणाची भावना न देता, काही झालंच नाही अशा पद्धतीनं पुढची वाटचाल व्हावी. दोघांच्या नात्यात गुंफण हवी, गुंता नको.

आणखी एक महत्त्वाची जाणवणारी बाब म्हणजे, आजकाल नात्यांवर ठाम विश्वास असणारे, त्याची उकल करू शकणारे समंजस आजी-आजोबा सहज सापडत नाहीत. कधी कधी पालकांनाही त्याची जाणीव नसते. सोशल मीडियाच्या अतोनात वापरामुळे हल्ली सातशे-आठशे मित्रमैत्रिणी असणाऱ्या त्याला किंवा तिला मनाच्या कप्प्यातलं सांगावं, वाटून घ्यावं, असं जिवाभावाचं मैत्र नसतं. ‘ग्लोबली कनेक्टेड अँड पर्सनली आयसोलेटेड’ अशा व्यक्ती तयार होत आहेत आणि हे ढासळत्या कुटुंबसंस्थेचं उद्याचं प्रमुख कारण आहे.

नवरा, बायको आणि संसार यावरचं अत्यंत शहाणं आणि समंजस उत्तर कोणत्याही पाश्चिमात्य थिअरीपेक्षा आपल्या बहिणाबाईंच्या कवितेत आहे –

अरे संसार संसार

खोटा कधी म्हनू नये

राऊळाचे कळसाले

लोटा कधी म्हनू नये

chaturang@expressindia.com