मृदुला भाटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या कायदेबाह्य घटनेला मदत केली यात मला यित्कचितही गैर वाटत नाही. कारण कायदा + क्ष = न्याय! प्रेमाच्या जगातला न्याय हा आपल्या कायद्यापल्याड असतो, हेच खरे! या दोन्ही गोष्टी समजायला कठीण. त्यातूनही ‘क्ष’ जास्तच! तो असतो. कधी चटकन सापडतो, तर कधी लपतो. कधी तो व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष, समाजसापेक्ष, देशसापेक्षही असतो. त्याला आपण ‘इक्विटी’ असं साधारण मिळतंजुळतं नावही देतो.

माझ्या मैत्रिणीच्या, बागेश्री पारेखच्या कुटुंब न्यायालयावरील अनुभवांवरचं ‘अनुभूती’ या पुस्तकाचं प्रकाशन अलीकडेच, २८ नोव्हेंबरला झालं. तेव्हा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले होते, ‘‘दोन व्यक्ती वैवाहिक कलहासाठी न्यायालयात जातात, तेव्हा एकीकडे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असणं असतं, म्हणणं वेगळं असतं (individualistic) आणि दुसऱ्या बाजूला असते कायद्याची कठोर चौकट. न्यायालयाला दोन्ही गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. हे काम करताना न्यायाधीशांना कठोर असावं लागतंच, पण तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्या प्रत्येक समोर आलेल्या व्यक्तीबद्दल मनात असावी लागते ती आस्था.’’

माझ्या मते तर आस्था, करुणा, क्षमा ही सगळी न्यायाचीच वेगवेगळी रूपं आहेत. मी वकिली करत असताना माझ्याकडे एक तरुण तीस-बत्तीस वर्षीय दाम्पत्य आलं. ते दोघंही वास्तुशास्त्रज्ञ. त्यांना आपण अजय आणि नीता म्हणू. लग्नाच्या काही वर्षांनंतर अजय त्याच्याच व्यवसायातल्या एका २२-२३ वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला होता. ती वैदेही. तिचंही खूप प्रेम होतं अजयवर! नीता आणि अजय तेही प्रेमात एकमेकांच्या! प्रेमाचा त्रिकोण तयार झाला होता. वर्षभर सुरू असलेलं हे प्रेमप्रकरण समजल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला घरात डांबून ठेवलं. त्यामुळे रोजच ऑफिसमध्ये येणारी, भेटणारी वैदेही कशी आहे, तिला नेमकं कोणत्या परिस्थितीतून जावं लागतंय, याची त्याला काहीच खबर लागत नव्हती. १५ दिवसांच्या उलाघाल, काळजी आणि असोशीनं अजय घायकुतीला आला होता. तिला कसं भेटायचं, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तो बायको नीताबरोबर माझ्याकडे आला होता. एकमेकांपासून ते दोघं काहीच लपवत नव्हते हे कळतच होतं. ‘‘माझं वैदेहीवरती नितांत प्रेम आहे, तसंच नीतावरही! मला वैदेहीशी लग्न करायचं आहे, पण नीताला घटस्फोट न देता. हे सर्व बेकायदेशीर आहे, पण मला दोघीही हव्या आहेत. समाजाच्या दृष्टीने मी खलपुरुष असलो आणि मी गुन्हा करीत असलो, तरीही मी काहीही करू शकत नाही.’’ अजयची बाजू ऐकल्यानंतर मी नीताला एकटीला भेटले तर तिचेही विचार स्पष्ट आणि सुसंगत होते. ‘‘मला त्रास तर खूपच होतोय. माझा इगोही दुखावलाय. पण मी अजय आणि वैदेहीचं प्रेम समजू शकते. लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गरीब, बिच्चारी असा सहानुभूतीचा आहे आणि या दोघांच्या लग्नानंतर तो पक्का होणार याचा मला जास्त त्रास होतो आहे. मात्र, माझं आणि अजयचं एकमेकांवर तितकंच प्रेम आहे. आमचं लग्न ठरवून झालेलं असलं, तरी आमचे सूर छान जुळले. आता तर नात्यात अधिक परिपक्वता आणि आश्वासकता आहे. मी अजयच्या आयुष्यातून दूर जाऊ शकत नाही. कारण आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि हीच गोष्ट अजय आणि वैदेहीचीसुद्धा आहे. त्यामुळे मी ठरवलंय की हे सारं समजून तिघांच्या संसाराचा पर्यायच योग्य! हे बेकायदेशीर असलं तरीसुद्धा!’’

माझी त्या दोघांच्या सच्चेपणाबद्दल खात्री पटली. माझ्या एका स्त्री सहकारीला घर बांधण्याच्या संदर्भात व्यावसायिक सल्ला हवा आहे, असं खोटं कारण सांगून खोटाच घराचा नकाशा वगैरे पाठवून वैदेहीच्या घरी एक चिठ्ठी देऊन पाठवलं, कारण वैदेहीचे वडील तिला एकटीला सोडत नसत. तिच्या घरातल्या ऑफिसमध्ये कोणी व्यवसायानिमित्तसुद्धा आलं तरी ते तिथे हजर असत. आम्ही सांगितल्याप्रमाणे, वैदेहीनं तिच्या हस्ताक्षरात नीताच्या नावानं एक चिठ्ठी लिहिली, की तिला घरात डांबून ठेवलेलं असून नीतानं तिला बाहेर काढण्यासाठी मदत करावी. माझी सहकारी ती चिठ्ठी घेऊन आमच्याकडे आली. त्या चिठ्ठीच्या जोरावर मी नीताकरवी ‘कलम ९७ फौजदारी’ प्रक्रियेखाली वैदेहीला न्यायालयात हजर करण्याचा आदेश मिळविला. त्याच दिवशी पोलिसांच्या सहकार्यानं वॉरंटसह तिच्या घरी रात्री १० वाजता जाऊन तिच्या घरून तिला सोडवून आणलं आणि न्यायाधीशांच्या समोर घरी हजर केलं. न्यायाधीशांनी तिला कुठे जायचं आहे, असं विचारलं. तेव्हा तिनं तिला नीताबरोबर राहयचं आहे, असं सांगितलं आणि ते प्रकरण तिथंच संपलं. अर्ज निकाली निघाला.

संपली ती न्यायालयीन प्रक्रिया. पण पुढे काय, हा प्रश्न नीता, वैदेही आणि अजयनं अत्यंत समजूतदारपणे केवळ प्रेमाच्या बळावर सोडविला. नीता आणि अजयचा घटस्फोट न होता अजयनं वैदेहीशी लग्न केलं. मी वॉरंट घेऊन गेले तेव्हा वैदेही मला प्रथम भेटली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘समाजाच्या दृष्टीने मी खलनायिका आहे. एकीच्या सुखी संसारात विष कालवणारी, तिच्यापासून नवरा तोडणारी, पण तसं नाही. नीताचं आणि अजयचं अतूट प्रेम मी समजू शकते आणि ते मी कायम जपेन.’’ तिची बाजूही मला पटली. अशा त्रिकोणाची तिसरी बाजू कायद्याला मान्य नाही. त्यामुळे न्यायाधीशाच्या भूमिकेतून मी वेगळा निर्णय घेतला असता. पण त्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू खरी आणि बरोबरही होती. मला ती नीटच समजली होती. गालिबला उमगलेलं ‘इश्क पर जोर नहीं’ हे सत्य मला प्रत्यक्ष पुन्हा अनुभवायला मिळालं होतं. त्या त्रिकोणाचा दोन वर्षांत चौकोन झाला. वैदेहीला बाळ झालं. ते बाळ मोठं होऊन आज इंजिनीनिअर झालंय. ते घर आजही सुखानं चौघांचं आहे. या कायदेबाह्य घटनेला मदत केली यात मला यित्कचितही गैर वाटत नाही. कारण कायदा + क्ष = न्याय!

प्रेमाच्या जगातला न्याय हा आपल्या कायद्यापल्याड असतो, हेच खरे! या दोन्ही गोष्टी समजायला कठीण. त्यातूनही ‘क्ष’ जास्तच! तो असतो. कधी चटकन सापडतो, तर कधी लपतो. कधी तो व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष समाजसापेक्ष, देशसापेक्षही असतो. त्याला आपण ‘इक्विटी’ असं साधारण मिळतंजुळतं नावही देतो. चर्चगेटला ओव्हल मैदानाच्या बाजूनं पाहिलं, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीवर तिरंगा झेंडा फडकताना दिसतो आणि त्याच्याखाली दोन्ही बाजूला दोन पुतळे आहेत. एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार घेतलेल्या न्यायदेवतेचा (स्टॅच्यू ऑफ जस्टिस) आणि दुसरा पुतळा क्षमा, दया देवतेचा (स्टॅच्यू ऑफ मर्सी). ही सबंध इमारत उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना आहे. १६ लाख ४४ हजार ५२८ एवढय़ा रुपयांना सुमारे दीडशे वर्षांपूर्वी बांधलेली ती वास्तू आजही दिमाखात उभी आहे. माझ्या दृष्टीने ही वास्तू म्हणजे सारं काही माहीत असलेला सहस्र पारंब्यांचा पुरातन वटवृक्ष आहे!

आणखी एक घटना. माझ्यासमोर चार किलो ब्राऊन शुगर (जी पांढरी पावडर असते) पकडल्याचा एन.सी.बी.चा (नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो) खटला सुरू होता. नायजेरियाची एक बाई आरोपी होती. चार मोठय़ा कॅसेरॉलमध्ये झाकण व भांडय़ाचा मधला भाग सगळा उकरून त्यात अफूची पाकिटे घेऊन जाताना तिला विमानतळावर पकडलं होतं. तेव्हा ती सहा महिन्यांची गरोदर होती. अफू वगैरेच्या व्यापारासाठी अशा बायका वाहक म्हणून वापरल्या जातात. तिला अटक झाली. पुढे ती तुरुंगातच बाळंत झाली. जेव्हा तिचा खटला प्रत्यक्ष सुरू झाला तेव्हा तिचा मुलगा सुमारे पावणेचार वर्षांचा होता. सुनावणीच्या वेळेस ते पिल्लू आईबरोबर यायचं. आई आरोपीच्या पिंजऱ्यात बसायची. तेव्हा ते तीन-चार तास त्याची काळजी महिला पोलीस घ्यायच्या. त्याला स्वाभाविकच खूप कंटाळा यायचा. तो एकटाच खेळायचा. कोर्टाची खोली चाळीस फूट लांब होती. तो छोटुकला न्यायालयाच्या खोलीत उभा-आडवा पळत खेळायचा. मी सर्वाना ताकीद दिली होती, की बाळाला जे पाहिजे ते करू द्या. फक्त तो नजरेसमोर ठेवा. मध्येच एक दिवस थोडा वेळ एक मांजर आलं, तर त्याचा वेळ बरा गेला. तेव्हा पावसाळा होता. त्यामुळे उघडून वाळत ठेवलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या रंगीत छत्र्या घेऊन इकडेतिकडे पळणं हाही त्याच्या आवडीचा उद्योग झाला. तो छोटू माझ्याकडेही कुतूहलानं पाहत असे. कधी कधी इतरांच्या नकळत त्याच्याकडे बघून मीही हसत असे. मग गोड लाजरं हसू त्याच्याही गालावर उमटायचं. त्यावरूनच मी कविता लिहिली, की ‘आम्हां दोघांना माहितेय मी आता कोर्ट नसून करट आहे.’

चार दिवस चाललेल्या खटल्यात कायद्यानुसार पुरावा भक्कम होता. मी तिला कमीत कमी शिक्षा दिली. दहा वर्ष सक्त मजुरी आणि १ लाख रुपये दंड. दंड न भरल्यास आणखी १ वर्ष सक्त मजुरी. शिक्षा सुनावल्यावर मी माझ्या आतल्या कक्षात गेले. अर्ध्या तासाने एकाएकी बाहेर महिला पोलिसांचा ओरडण्याचा आवाज आला अन् त्याच क्षणाला माझ्या दरवाजातून ती गुन्हेगार बाई आत आली. त्या छोटुकल्याला तिनं माझ्या दिशेनं ढकललं नि मला काळजीनं ओरडून म्हणाली,

‘Now you take care of my child’ महिला पोलिसांनी तिला नंतर पकडून ताब्यात घेतलं. तो एका आईचा आकांत होता. व्हिक्टर  ह्युगोच्या ‘ला मिझरेबल’ची पानं डोक्यात फडफडत होती. तिच्या मुलाची ४ ते ५ महिन्यांतच ताटातूट होणार होती. कायद्याप्रमाणे मूल चार वर्षांनंतर आईसोबत तुरुंगात राहू शकत नाही. त्याला बाहेर पडावं लागतं. पण हे बाळ कुठे जाणार, त्याला ना भारतात कोणी होतं, ना त्या गरीब बाईचे कोणी नातेवाईक परदेशातून त्याला नेणार होते. साहजिकच ते बाळ इथेच एका सरकारी मुलांच्या वसतिगृहात जाणार होतं हे निश्चित. आता यानंतर त्याची आई त्याला कधी भेटणार होती? कल्पना नाही. पोलीस त्या दोघांना घेऊन गेल्या. पण ते बाळ आजही माझ्या मनात रंगीत छत्री घेऊन तसंच उभं आहे, कायमचं!

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gele lihayche rahun author mrudula bhatkar gone days writing law justice ysh
First published on: 15-01-2022 at 00:02 IST