मृदुला भाटकर

‘‘आपले कपडे आणि एकंदर दिसणं, यावरून आपली एक प्रतिमा पाहाणाऱ्याच्या मनात तयार होते. त्यावर पुढच्या अनेक गोष्टी ठरणार असतात! कारण माणूस म्हणून आपण सगळे- अगदी न्यायाधीशही काही साचेबंद पूर्वग्रह बाळगणारे. मात्र वकील आणि न्यायाधीश म्हणून काम करताना मला हे पूर्वग्रह पूर्णपणे मोडून टाकणारे अनेक प्रसंग पाहायला मिळाले. कपडय़ांच्या आतला माणूस समजावून देणारे..’’

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
naralachya rasatali bhendi recipe in marathi
नारळाच्या रसातली भेंडीची भाजी; भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

‘‘कोर्टात अन् इस्पितळात कधी जायची वेळ येऊ नये. हिथं सारे कावळे अन् तिथं बगळे!’’ पुढची तारीख दिल्यामुळे वैतागलेला एक वयस्कर पक्षकार हे वाक्य मला सुनावून न्यायालयाबाहेर गेला. हजर वकील माझ्याकडे अपेक्षेनं बघायला लागले. पण मला अजिबातच राग आला नाही. उलट त्या पक्षकाराच्या निरीक्षणबुद्धीची गंमत वाटली.

  न्यायाधीशाला सततच्या ताणलेल्या वातावरणात विनोदबुद्धी हा मोठा आधार असतो. पांढऱ्या कोटातला तो डॉक्टर अन् काळा कोट, बॅन्ड्स घालणारा तो वकील, हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं. हा ठरावीक काळय़ा पांढऱ्याचा नियम न्यायालयात पाळावाच लागतो. काळा कोट आणि पांढरे बॅन्ड्स न घातलेला माणूस आपला वकील असू शकतो हे पक्षकार मान्यच करू शकत नाही. आपण कोणते कपडे घालतो यावरून आपला परिचय होतो. आपल्याबद्दलचं मत ठरतं.

अन्न- वस्त्र- निवारा या तीन मूलभूत गरजा. कंदमुळांपासून विविध पदार्थापर्यंत आणि झाडाखालच्या निवाऱ्यापासून ते अत्याधुनिक घरांपर्यंत हा प्रवास सुरूच आहे.  तसंच पानं-वल्कलांच्या कपडय़ांपासून आता लिनन, नॅनो फायबर, कार्बन फायबर.. अनेकविध पर्यायांची साखळीही उपलब्ध आहे.  आपलं या देहावर इतकं प्रेम असतं, की ‘देह झाकण्यासाठी’चा वस्त्रांचा उद्देश आपण ‘देह सजवण्यासाठी’ करतो.  मला गुलजार यांची ‘लिबास’ कविता आठवते. त्याचा गोषवारा असा, ‘कपडे आणि नातं हे दोन्ही सारखंच. जसे कपडे बदलले जातात, तशी नातीही बदलतात. कपडे मळतात, ते धुवावे लागतात. तशीच नातीही मळतात. त्यांना धुवून साफ करावं लागतं.’

 गिनी  हे पूर्वीचं सोन्याचं नाणं. मुंबईमध्ये सॉलिसिटर फर्ममध्ये अगदी आतापर्यंत- म्हणजे १९८०-८२ पर्यंत गिनीमध्ये फी आकारली जात असे. पूर्वी १ गिनी म्हणजे १५ रुपये असा दर असे. अशी एक दंतकथा आहे, की पूर्वी वकिलांच्या काळय़ा गाऊनला  एक मानेवर लोंबणारा छोटासा रेशमी खिसा असे. वकील महाशय युक्तिवाद जितका जास्त करत तसा मागे असलेला पक्षकार ठरलेल्या फीव्यतिरिक्त एक एक गिनी त्या खिशात टाके. तो खिसा जसजसा वकील महोदयांना जड लागे, तितका त्यांचा युक्तिवाद अधिक खुलून रंगे. 

आपले काही सामाजिक संकेत आहेत, त्यानुसार पेहराव करणं गरजेचं. ते स्वाभाविकही आहे. कारण त्याप्रमाणे आपणही दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्याच्या कपडय़ांवरून मतं बनवतो. नेहमी भरपूर दागिने घालणारी, उंची साडय़ा नेसणारी माझी मैत्रीण तिच्या घटस्फोटासाठी साक्ष देताना लंकेची पार्वती बनून गेली. ‘अगं, त्या जज्जाला माझी दया यायला हवी.’ असं तिचं म्हणणं! असं ‘जज्ज’मंडळींना आपल्या बाह्यरूपानं ‘बनवण्याचे’ साक्षीदार आणि वकिलांचे प्रयत्न सतत सुरूच असतात. न्यायाधीशांनाही त्याची पूर्ण जाणीव असते.

तोंड उघडण्याआधी पहिली छाप पडते, पहिलं मत तयार होतं, ते व्यक्तीची देहबोली आणि कोणते आणि कसे कपडे घातलेत यावरून! असे साचेबंद पूर्वग्रह (स्टीरिओटाइप्स) मनात असण्याला न्यायाधीशही माणूस असल्यामुळे कधी कधी अपवाद नसतोच. धोतर-टोपी घातलेला, मळके कपडे घातलेला साक्षीदार कधी कधी इतका हुशार असतो, की त्याला ‘खेडूत’ समजणाऱ्या वकिलाची तोच उलटतपासणी घेतो.  विनयभंगाच्या गुन्ह्यात तक्रारदार स्त्री जर घट्ट आणि स्लीव्हलेस टी-शर्ट-जीन्समध्ये आली, तर जरा जास्तच सावधपणे पुरावा तपासला जाऊ शकतो.  

ते दिसत नाहीत पणपहातो त्यांना प्रत्येक न्यायाधीश ते बोलत नाहीत पण ऐकू येतो त्यांचा आवाज ते देत नाहीत साक्ष पण असतो त्यांचा वजनदार पुरावा ते राहतात लोंबकळत तराजूच्या पारडय़ांना, वर्षांनुवर्ष श्री. पूर्वग्रह अन् सौ. सहानुभूती पोलीस खात्यात, न्यायालयात आणि सर्व सशस्त्र दलांत फारच कटाक्षानं कपडय़ांचे संकेत पाळले जातात. म्हणून ‘गणवेश’ (ड्रेसकोड) हा त्याचाच भाग. सर्वजण एकाच पातळीवर असावेत, दिसावेत. इतरांपेक्षा वेगळे ओळखू यावेत. त्यात सभ्यता असावी,  पोशाखामुळे लक्ष विचलित होऊ नये. हाच त्यामागे व्यापक उद्देश आहे. 

उच्च-सर्वोच्च न्यायालयात जे आपल्याकडे न्यायमूर्ती घालतात त्या काळय़ा जॅकेटला (जे पूर्वी खलाशी घालत असत) ‘मंकी जॅकेट’ का म्हणतात ते मला अजूनही नीटसं कळलेलं नाही. माझ्या मैत्रिणीच्या चिमुकल्या मुलीनं, ‘‘ही मावशीपण आपल्या बाळासारखं लाळेरं बांधते ना?’’ असं म्हणून न्यायाधीश आणि वकिलांनी गळय़ात बांधायच्या पांढऱ्या ‘बॅन्ड्स’चा वेगळाच उपयोग सुचवला होता! माझ्या घरातल्या मांजर-कुत्र्यांना आमचा मुलगा हर्षवर्धन लहानपणी माझे जुने बॅन्ड्स बांधून त्यांना ‘स्मार्ट लुक’ देत असे. बॅन्ड्स बांधल्यावर त्याच्या मांजरांना तो ‘अ‍ॅडव्होकॅट्स’ म्हणे!

त्या दोन पांढऱ्या पट्टय़ा म्हणजे न्यायव्यवस्थेतल्या वकील आणि न्यायाधीश अशा दोन बाजूंचं प्रतीकात्मक एकीकरण असंही म्हटलं जातं. तर मोझेसनं दिलेल्या दहा आज्ञा लिहिलेले दगड- Tablet of stone याचं प्रतीक असंही विवेचन समोर येतं. जूनच्या सुरुवातीला एक बातमी वाचली, की केरळमध्ये उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या नवीन वकील मंडळींच्या बिनबाह्यांचे कपडे व आखूड पॅन्ट्स घालण्यावर बार कौन्सिलनं आणि न्यायालयाने नाराजी दर्शवून व्यवसायाचा सन्मान करणारे कपडे घालावेत, असं बजावलं.  तेव्हा मला पॅन्ट्सबद्दलच्या दोन घटना आठवल्या.

माझ्यासमोर हजर करण्यासाठी एका परदेशी आरोपीला पोलीस तुरुंगातून  घेऊन आले. येत असताना एका पोलिसानं त्याला ‘पम्पकिन’ (भोपळा) म्हटल्यानं राग येऊन त्यानं भांडण केलं. मग निषेध म्हणून स्वत:चे सगळे कपडे काढून ते फाडून टाकले आणि तो दिगंबरावस्थेत निषेध म्हणून बसून राहिला. तो यायला तयार होता, पण पोलीस आणत नाहीत म्हणून आरडाओरड करत होता. शेवटी त्याच्या वकिलांनी माझ्यासमोर त्याला नवीन कपडे आणून घालायची परवानगी मागितली. अन् मग फॅशन स्ट्रीटवरून खास शॉपिंग करून आणलेला टी शर्ट आणि बम्र्युडा घालून नवीन कपडे मिळाल्याच्या आनंदात तो हजर झाला! 

मी वकिली करत असताना ऐके सकाळी ११ वाजता मला कोर्टात राजूची नऊवारीतली आई येऊन म्हणाली, ‘‘ल्योक पोलीसनी धरून  आणलाय. त्याची पँट फाटून गेलीय. मी आणलीय दुसरी, तर तेवढी घालायची परवानगी मिळवून द्या. पोलीस ऐकत नाहीए..’’ तेव्हा मी नुकतीच सुरुवात केली होती. उत्साहात आपल्या हातून समाजकार्य घडतंय या विचारानं लगेच कोर्टातल्या कस्टडीत जाऊन पोलिसांना विनंती केली. त्यांनी मला चक्क ‘हुडूत’ केलं. माझ्या लक्षात आलं, की त्याला पैसे हवेत. मला एक पैसाही लाच त्याला द्यायची नव्हती. परत जरा भांडून विचारलं, तर खेकसला, ‘‘ओ, वकील बाई, जावाकी कोर्टाचा हुकूम आणा.’’  मला तेव्हा हे नवीनच कळलं, की कोर्टाची परवानगी लागते असे कपडे घालायला. मी तातडीने पळत जाऊन पासष्ट पैशांचं तिकीट अर्जाला लावून मॅजिस्ट्रेट साहेबांना विनंती केली. त्यांनी लगेच मान्यता दिली. मी त्या बाईंना म्हटलं, ‘‘आता राजूला पॅन्ट मिळेल.’’ त्या खूष झाल्या. पण आम्हाला हातात हुकूम काही मिळेना. शेवटी दोन वाजता कोर्ट उठलं, तशी मी त्या डायसवरच्या भाऊसाहेबाला म्हटलं, ‘‘तो हुकूम द्या.’’

‘‘अहो, जेवून येतो, मग देतो.’’

झालं, आम्ही परत थांबलो. भाऊसाहेब अडीचला आले. त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला, तर ते लक्ष देईनात. दहा मिनिटांत साहेब आले आणि आमचा हुकूम तसाच राहिला. रिमांडच्या कैद्यांची पेशी सुरू झाली. राजूही कोर्टासमोर आणला. त्या वेळेस मध्येच मी उभं राहून साहेबांना विनंती केली, ‘‘हुकूम हवाय.’’ तेव्हा सुमारे साडे चार वाजले होते. राजूला पोलीस लगेच तुरुंगात नेणार होते. गाडय़ा तयारच होत्या.

साहेब टंकलेखकाला म्हणाले, ‘‘अजून नाही दिला का हुकूम?’’

तशी तत्परतेनं भाऊसाहेबानं ड्रॉवरमधला तो हुकूम शिक्का मारून मला दिला. मी पटकन बाहेर बसलेल्या त्या बाईंना दिला.  मी जाऊन मग बार रूममध्ये बसले, समाधानात! त्या बाई आनंदानं पाच वाजता आल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘ताई, पोलीसनं फक्त पाच रुपये घेतले अन् राजूला पॅन्ट दिली घालायला.’’ मी कपाळावर हात मारला!

माझी आजी सकाळी उठून गीतेतले श्लोक म्हणत असे, त्यामुळे मीही नववीत असताना अध्याय पहिला अर्जुन विषादयोग आणि अध्याय दुसरा सांख्ययोग हे पाठ केले होते. त्यातला हा श्लोक माझा आवडता.

‘वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृहणाति नरो पराणि।

तथा शरीराणि विहाय

जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही’

हे असं आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं केवळ एकानंतर दुसरे कपडे बदलल्यासारखं आहे. इतकं सरळ जन्ममृत्यूचं नातं गीतेत सांगितलेलं आहे, एक महत्वाची वेगळी गोष्ट सांगायलाच हवी. नक्की स्मरत नाहीये, पण असं वाटतं की माझे मेहुणे दिवंगत सुभाष मुंजे हे सिव्हिल सर्जन असताना त्यांनी सांगितलेली असावी. फाशी दिलेला कैदी मेल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी सिव्हिल सर्जनला कारागृहात त्या ठिकाणी उपस्थित राहाणं कायद्यानं गरजेचं असतं. त्या प्रमाणे ते उपस्थित होते. त्यांच्यासमोर तो कैदी फाशीच्या दोराकडे चालला होता. पाऊस नुकताच पडून गेला होता. छोटीशी पाण्याची डबकी मध्ये मध्ये साचली होती. फाशीच्या दोराकडे जाताना त्याला मध्येच एक पाण्याचं छोटं डबकं लागलं, त्यानं स्वत:ची पॅन्ट वर उचलली, छोटीशी उडी मारली. नाहीतर त्याच्या कपडय़ांना चिखल लागला असता. आणि तो लगेच फाशी गेला..

chaturang@expressindia.com