scorecardresearch

गेले लिहायचे राहून.. : ‘आजीचा बटवा’

‘‘माझं आणि आजीचं नातं भावनिक नव्हतं, तर वैचारिक होतं. वाचलेल्या पुस्तकांमधले प्रश्न विचारणं, चर्चा करणं, यासाठीची माझी ती जागा होती.

–  मृदुला भाटकर

‘‘माझं आणि आजीचं नातं भावनिक नव्हतं, तर वैचारिक होतं. वाचलेल्या पुस्तकांमधले प्रश्न विचारणं, चर्चा करणं, यासाठीची माझी ती जागा होती. आजोबा-आजी दोघंही जातपात, मानपान न मानणारे. कर्मयोग हाच जगण्याचा आधार मानणाऱ्या आजीच्या, विमलाबाई बेहेरेंच्या आठवणी, तिचे संस्कार हा माझ्यासाठी तिच्या विचारांची जडीबुटी असलेला ‘आजीचा बटवा’च आहे.’’

एकांकिकांच्या ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धे’मध्ये सर्वोत्तम अभिनयाचा ‘केशवराव दाते करंडक’ मला १९७६ मध्ये मिळाला होता. त्याच्या बक्षीस समारंभाच्या वेळी ‘महाराष्ट्रीय कलोपासक’चे त्या वेळचे सर्वेसर्वा राजाभाऊ नातू यांची आई मला भेटायला आली. 

‘‘तू मृदुला बेहेरे, म्हणजे नागपूरची का?’’

  ‘‘हो.’’

 ‘‘विमलाबाई बेहेऱ्यांची नात?’’ 

‘‘होय.’’

  ‘‘तरीच! मग तुला पारितोषिक मिळालं यात नवल ते काय! विमलाबाईंची नात तू. मिळालं नसतं तरच नवल!’’ त्यांच्या मनात असलेल्या आजीच्या कर्तृत्वाच्या खात्रीची मला गंमत वाटली आणि आजीचा मिळालेला वारसा मला जबाबदारीची जाणीवही देऊन गेला. माझी आजी, वडिलांची आई – माहेरची यमुना दत्तो तुळजापूरकर. सासरची विमला नारायण बेहेरे. माहेरचा अत्यंत अभिमान असणारी आणि सासरचा मान तितकाच जपणारी आजी होती. माझ्या संस्कारांचा पहिला पाया आजीचा! एका उन्हाळय़ात आम्ही नातवंडं तिच्या माहेरी- म्हणजे मळवलीला दाजीसाहेबांच्या (तुळजापूरकर) बंगल्यात कोणाच्या तरी लग्नाला गेल्याचं मला आठवतं. सकाळी सकाळी चाळीस ते पन्नास जणांच्या पंगतीला नाश्त्याला फोडणीचा भात आणि तिथल्याच  झाडांच्या कैऱ्या किसून केलेला तक्कू (मीठ, तिखट, गूळ घालून) मिळायचा. तो द्रोणात घेऊन खायचा. पत्रावळीवर जेवायचं. द्रोण कसा बांधायचा, पत्रावळी कशा करायच्या, याचं शिक्षण तिथे मिळालं.

माझं आणि आजीचं नातं भावनिक नव्हतं, तर वैचारिक होतं. मी तिच्या कधी गळय़ात पडल्याचं, मांडीवर बसल्याचं आठवत नाही. ना तिनं मला कधी गोंजारून जवळ घेतलं. पण सकाळी साडेचारला उठून, लांबसडक केसांचा आंबाडा घालून विळीवर भाजी चिरताना, निवडताना, स्वयंपाक करताना, ती मनाचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या, भगवद्गीता म्हणत असे. ते मी शेजारी बसून ऐकत असे. वाचलेल्या पुस्तकांमधले प्रश्न विचारणं, चर्चा करणं, यासाठीची माझी ती जागा होती. आजी म्हणायची, ‘‘ ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’ नसून, ‘वादे वादे लाभते तत्त्वबोध:’ (वाद घालण्यानं तत्त्व हरवतं असं नाही, तर ते मिळतंही) हे लक्षात ठेव.’’ त्यामुळे लहानपणापासून घरात चर्चा, वादविवाद, यावर आपले विचार तपासून पाहण्याची सवय लागली.    

आजी मॅट्रिकपर्यंत शिकली होती. ती मुंबईत गिरगावात वाढली. तिच्या मैत्रिणी सुशीलाबाई पै, प्रेमाताई कंटक या शेवटपर्यंत घरी येत. प्रेमाताई या गांधींच्या अनुयायी, शंकरराव देवांबरोबर काम करणाऱ्या. त्या घरी जेव्हा राहायला यायच्या, तेव्हा आम्हा बच्चेकंपनीला शांतता पाळा, नीट वागा, अशा सूचना असायच्या. त्या आल्यावर त्यांच्यासाठी आई खास बदामाचा शिरा बनवत असे. त्यांच्याशी मला हिटलर, मार्क्‍सवादावरून बडबड करून त्यांना उगाचंच छळायला आवडायचं. तेव्हा मी नववीत होते. सुशीलाबाईंनी आजीला ‘तुझ्या घरी कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा नव्या पिढीवर दिसतो त्याची काळजी वाटते,’ असं पेपरकार्ड पत्र लिहून पाठवल्याचं मला आठवतं.  

आजोबा ना. के. बेहेरे यांनी ‘सप्तर्षी’ कविता लिहिली. ती इंग्रज सरकारविरुद्ध होती. वसिष्ठ, वाल्मीकी नाही, तर राजगुरू, भगतसिंग, सोलापूरचे हुतात्मे हे खरे सप्तर्षी आहेत, अशी. त्या वेळेस आजोबा नागपूरच्या पटवर्धन शाळेत मुख्याध्यापक होते. इंग्रज सरकारनं त्यांना ‘लेखी माफी मागा, अन्यथा राजीनामा द्या,’ असं कळवलं. पत्र हातात पडता त्यांनी त्याच दिवशी पदाचा राजीनामा दिला. घरी आल्यावर आजीला सांगितलं, तेव्हा आजीनं तो निर्णय योग्यच, असं म्हणून विनातक्रार पुढे आयुष्यभर काटकसरीनं जगण्याचा वसा घेतला. आजीचं एक स्वत:चं अर्थशास्त्र होतं. ती स्त्री शिक्षणाची खंदी पुरस्कर्ती तर होतीच आणि बाई सुसंस्कृत असेल तर ते घर प्रगती करतं हा तिचा विश्वास होता. परंतु स्त्रियांनी नोकरी करून अर्थार्जन करण्याबाबत तिचा खास विचार होता. ज्या स्त्रियांना विशेष कर्तृत्व दाखवायचं आहे, कला-क्रीडा यांसारख्या विशेष खुबी आहेत, त्यांनी जरूर नोकरी करावी. पण घरात भरपूर वस्तू आणणं, दोन-चार गाडय़ा आणणं, खूप साडय़ा-दागिने आणणं इत्यादी छानछोकीसाठी पैसे मिळवण्यास तिचा विरोध होता. ती म्हणे, की बायकांनी घरात काटकसरीनं, निगुतीनं राहून संसार करावा. पैसे वाचवणं म्हणजे अर्थार्जनच! जेव्हा एक बाई बाहेर जाऊन नोकरी करते, तेव्हा ती एका कमावत्या पुरुषाची जागा अडवते. पर्यायानं समाजातल्या एका घराची चूल थांबते. असा थोडा साम्यवादाकडे झुकणारा आणि भोगवादी संस्कृतीशी फटकून वागणारा तिचा विचार होता. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळाची ती गरज असू शकते. मी त्यावर तिच्याशी वादही घालत असे, पण मला तिनं एक वेगळा दृष्टिकोनही दिला. 

नागपूरचे वि. भि. कोलते यांच्या सुविद्य पत्नी उषा कोलते ही माझी मोठी मावशी होती. ना. के. बेहेरे (आजोबा) आणि आजी यांचे जातधर्म न मानणारे सुधारकी विचार त्यांना माहीत होते. भाऊंनी (वि. भि. कोलते) आजोबांना विचारलं, ‘‘तुमची जातीबद्दल हरकत नसेल, तर प्रताप (माझे वडील) यास माझी सर्वात धाकटी मेव्हणी प्रमिला तर्खडकर (माझी आई) ही योग्य वाटते.’’ आजी-आजोबा बोलके नाही, तर कर्ते सुधारक होते.  आजोबांनी प्रतापला सांगितलं, की तू ठरव. मग नागपूरहून प्रताप आणि नाशिकहून प्रमिला पुण्यात भेटले. प्रमिला ‘बी.ए.’ झाली होती. प्रतापनं तिला ‘मॅट्रिक कधी झालात आणि ‘बी.ए.’ किती साली झाला’ ते विचारलं. तिनं उत्तर दिलं, त्यावरून तिला चारच्या ऐवजी पाच वर्ष लागली, असं प्रतापच्या लक्षात आलं. त्यानं तिला विचारलं, ‘‘पाच वर्ष का बरं लागली?’’  प्रमिला म्हणाली, ‘‘नापास झाले एकदा. म्हणून पाच लागली.’’ 

  झालं. प्रतापच्या वधूपरीक्षेत प्रमिला उत्तीर्ण! कारण ती खरं बोलली. प्रतापचं- अर्थात माझ्या वडिलांचं मत तेव्हाही हेच होतं आणि त्यांची मृदुला नावाची मुलगी रमेश भाटकर याच्या प्रेमात आहे कळल्यावर तिलाही त्यांनी हेच सांगितलं, ‘‘लग्नं दोन गोष्टींवर टिकतात. एक प्रेम आणि दुसरा प्रामाणिकपणा!’’ प्रताप-प्रमिलांनी एकमेकाला लगेच, तिथेच होकार दिला. प्रताप नागपूरला परत आला, तर विमलाबाई बेहेऱ्यांनी (अर्थात आजीनं) सांगितलं, ‘‘मुलगी पसंत असेल, तर मुलीकडच्यांना पत्र लिहून ठरवा लग्न महिन्यानं.’’ त्यांना इतरांनी विचारलं, ‘‘अहो, मुलगी तुम्हाला बघायची नाही का?’’ विमलाबाई म्हणाल्या, ‘‘संसार प्रतापला करायचाय. त्याला पसंत मुलगी आणि प्रमिलेला प्रताप पसंत, तर आम्हांला सर्व मान्य! उगाच कशाला मुलीलाही जाण्यायेण्याचा त्रास.’’ जातपात, देणंघेणं, मानपान यापलीकडे आजी-आजोबा उभे होते. कोणालाही माणूस म्हणूनच खणखणीतपणे मोजणारे!  आजोबा गेले, तेव्हा घरी थांबलेल्या माझ्या वडिलांना दुसऱ्या दिवशी ती म्हणाली, ‘‘प्रताप कोर्टात जायचं नाही का?’’ मुलांच्या मुंजी, श्राद्ध हे विधी आजी-आजोबांनी कधीही केले नाहीत. आजीच्या वडिलांच्या- दाजीसाहेबांच्या परखड, बुद्धिवादी विचारांचे संस्कार तिच्यावर होते. स्त्रियांना असमान ठरवणारा, जातीच्या भिंती उभा करणारा ‘मुंज’ हा विधी कालबाह्य आहे, हे ती स्पष्टपणे म्हणत असे. त्यामुळे प्रताप (वडील), श्रीकृष्ण आणि प्रभाकर (काका) यांच्या मुंजी आजी-आजोबांनी केल्या नाहीत.  ती सकाळी उठून स्वयंपाक करत मुलांची जेवणं आटपून, ४ मुलांची दुपारची न्याहारी तयार करून, त्यांच्या खाण्याच्या ताटवाटय़ा मांडून घरातून ११ वाजता बाहेर पडे. खादीची नऊवारी साडी, केसांचा अंबाडा किंवा खोपा, त्यावर सुरंगीचा किंवा दारातल्या बकुळीचा गजरा माळलेला, डोळय़ांवर गॉगल, डोक्यावर नागपूरातलं ऊन लागू नये म्हणून पदर, सायकलवर स्वार अशी आजी तळेगावच्या स्वदेशी काच कारखान्यासाठी १ पैसा फंड गोळा करायला घराघरांत जात असे. गांधींचे विचार पटल्यानं ती देशसेवा म्हणून खादीची लुगडी त्या वेळी वापरे. तितकाच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलही तिला आदर होता. त्यामुळे ते जेव्हा स्थानबद्धतेतून रत्नागिरीतून सुटून नागपूरला प्रथमच आले, तेव्हा तिनं घरी पुरणपोळय़ा करून शंभर लोकांना मेजवानी दिली. 

  माझं आणि रमेशचं अडीच वर्षांचं प्रेमप्रकरण तिला माहीत होतं. तेव्हा नंदिनीचं- माझ्या मोठय़ा बहिणीचं लग्न ठरायचं होतं. तर तिनं सांगितलं, ‘‘प्रताप, मृदुलाचं आधी लग्न करा. मग नंदिनीचं!’’ तिनं आम्हा चारही नातींना लग्नात स्वत: भरतकाम करून अप्रतिम अशा प्रत्येकी पाच साडय़ा दिल्या होत्या. माझ्या एका साडीवरच्या पदरावरचे मासे उलटे भरले गेले, म्हणून अर्धागवायूच्या झटक्यातून थोडीशीच बरी असतानाही सांगलीहून जबलपूरला साडी मागवून ७५ व्या वर्षी भरतकाम दुरुस्त करून ती मला पाठवली. त्यानंतर ती वारली. कर्मयोग तिनं शिकवला तो तिच्या आचारातून. तिला शंभर कोशिंबिरी आणि चटण्या येत असत. दरवर्षी ती स्वत: बारा पूर्ण स्वेटर विणायची आणि सगळय़ांना द्यायची. आजोबांच्या दोन पाटलोणी, चार सदरे, एक कोट ती स्वत: वर्षांला शिवायची. तिला आळस माहीत नव्हता. पूर्वीच्या बायकांप्रमाणे डावं-उजवं करायचाही तिचा स्वभाव होता. म्हणजे घरात मोठी उत्तरा लाडकी, दुसरी रोहिणी दोडकी; भाच्यांमध्ये वीरेंद्र लाडका, विराग दोडका; माझी मोठी बहीण लाडकी, मी दोडकी! पण ती स्वेटर विणायची सर्वाना!

तिनं देवपूजा कधी केलेली मी पाहिली नाही.  तिनं आजोबांच्या इच्छेनुसार ते गेल्यावर कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांना भडाग्नी दिला. आजी ८०-८५ वर्षांपूर्वी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात स्त्री कैद्यांना शिकवायला, पुस्तकं  वाचून दाखवायला जात असे. ती उत्तम कीर्तनकार होती. तिच्याकडे विचार होता आणि तो आचारात आणण्याची स्वतंत्र बुद्धी आणि प्रामाणिक धैर्य होतं. विचारांची स्पष्टता आणि स्वत:ला पटेल ते नुसतं बोलणंच नाही, तर करणं, हा वारसा मला माझ्या आजीनं दिला.  हे सगळं जे आजीकडून मिळालं, तोच माझ्या आजींच्या विचारांची जडीबुटी असलेला बटवा! आजीची आठवण साठवण!

‘सत्य’ या २ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात अनवधानाने ‘अर्जुनाने द्रोणाचार्याचा वध केला’ असे लिहिले गेले होते. ते ‘धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याचा वध केला’ असे आहे.

– मृदुला भाटकर

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gele lihayche rahun author mrudula bhatkar relation grandmother deeds rites ysh

ताज्या बातम्या