मानसी महेन्द्र
बडोद्यात पदव्युत्तर शिक्षण घेतानाचा तो काळ होता. मी एकुलती एक लेक, हक्काच्या आणि सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून पहिल्यांदाच घरापासून इतक्या दूर, एका अनोळखी शहरात राहायला गेले होते. साहजिकच सुरुवातीला कधी कधी एकटेपणा किंवा निराशा जाणवायची. पण या नव्या प्रवासात मला खर्‍या अर्थाने सावरले आणि भक्कम आधार दिला तो माझ्या सर्व मित्रांनी.

ठाण्याच्या घरची आठवण येत असताना माझे काही जिवलग मित्र तर थेट ठाण्यावरून बडोद्याला केवळ मला भेटण्यासाठी आले होते. पुढे पायाला गंभीर दुखापत झालेली असताना माझी चेष्टामस्करी करत पण व्यवस्थित काळजी घेणारे, मला घरी पाठवण्याची चोख व्यवस्था करणारे आणि ट्रेनमध्ये बसवून, अगदी ट्रेन सुटेपर्यंत थांबणारे, माझ्या आईवडिलांना दिलासा देणारे माझे बडोद्याचेही मित्रच होते. बडोद्याला आणि पुढे लखनौला प्रशिक्षणासाठी गेले असतानाही अनेक नवीन मित्र बनले जे माझ्याहून वयाने तसे मोठे होते, त्यामुळे मी त्यांना आदराने भैया म्हणत असले तरी आमचे नाते खर्‍या अर्थाने मित्रांचे होते आणि आहे. आधीच्या पिढ्यांमध्ये एखाद्या मुलासोबतची मैत्री समाजाला सुरक्षित वाटावी किंवा स्वत:चा बचाव करता यावा, यासाठी त्याला सोयीस्करपणे ‘राखी बंधू’ किंवा ‘मानलेला भाऊ’ मानण्याची एक अघोषित सक्ती असायची. पण आमचे तसे नाही. वयाच्या अंतरामुळे आलेला तो निव्वळ आदर आहे, मैत्रीच्या आड आलेला राखीचा सोयीस्कर बुरखा नव्हे. आहे ती कोणत्याही अटींविना उभी राहिलेली दोन माणसांमधली अत्यंत पारदर्शक आणि निर्मळ मैत्री.

या तीन वर्षांच्या काळात मैत्रिणींपेक्षा मी माझ्या मित्रांवर जास्त विसंबून होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अजूनही त्यांच्या घोळक्यात वावरताना मला अनेकदा मी लहानपणापासून आवडीने पाहिलेल्या परदेशी मालिका किंवा चित्रपटांमधील त्या मुलींची आठवण येते; ज्यांच्या पाठीशी त्यांचा मित्रपरिवार कोणत्याही अटींविना खंबीरपणे उभा असतो आणि जिथे निखळ, निरपेक्ष मैत्री हेच एकमेव सत्य असते. माझा हा वैयक्तिक अनुभव आज केवळ माझा राहिलेला नाही, तर तो आजच्या पिढीतील अनेक भारतीय तरुणींचा प्रातिनिधिक अनुभव बनला आहे.

‘डिजिटल लाइफस्टाइल’, जागतिकीकरण आणि समाज माध्यमाच्या अफाट विस्तारामुळे  भारतीय ‘जेन-झी’( (Gen Z)) तरुणींचे विश्व आता कोणत्याही भौगोलिक वा सांस्कृतिक सीमेत अडकलेले नाही. त्यांच्या वैचारिक जडणघडणीवर स्थानिक परंपरेपेक्षा जागतिक ‘पॉप-कल्चर’ आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचा प्रभाव अधिक गडद आहे. सर्व जग आपल्या हातात घेऊन फिरणार्‍या, देश-विदेशातील शेकडो योजने दूर असणार्‍या व्यक्तींशी, त्यांच्या अनुभवांशी ‘कनेक्टेड’ असलेल्या ‘जेन-झी’ ला ‘आम्ही जग जास्त पाहिलंय’ हे आधीच्या पिढ्यांचे लाडके वाक्य अधिक लागू होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

‘हॅरी पॉटर’मधील हॅरी-हर्मायनीची अढळ मैत्री असो किंवा आधीच्या ‘फ्रेंड्स’, ‘द बिग बँग थिअरी’, ‘ब्रुकलिन नाईन-नाईन’ आणि ‘स्ट्रेंजर थिंग्ज’सारख्या मालिकांमधील अत्यंत पारदर्शक, प्लॅटोनिक नातेसंबंध असोत; ही सर्व उदाहरणे पाहतच ही पिढी मोठी झाली आहे. या परदेशी कलाकृतींनी त्यांच्यासमोर नात्यांचा एक असा नवा आणि प्रगल्भ आदर्श ठेवला, जिथे विरुद्ध लिंगी मैत्रीत कोणत्याही रोमँटिक गुंतागुंतीची किंवा लपवाछपवीची गरज उरत नाही (अपवाद वगळता).

 याच जागतिक दृष्टिकोनाच्या आधारावर आज भारतातील मुला-मुलींच्या मैत्रीची समीकरणे अत्यंत ठामपणे आणि आत्मविश्वासाने बदलत आहेत. आजच्या तरुणींकरिता आता एखादा पुरुष मित्र हा केवळ संभाव्य जोडीदार नसून, तो एक भावनिक आधार, सुरक्षित अवकाश (safe space) आणि बौद्धिक पातळीवर बरोबरीचा, खर्‍या अर्थाने निखळ ‘मित्र’ आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकातील चित्रपटांनी भारतीय मानसिकतेवर एक विनाकारण ओझे लादले होते- ‘मुलगा आणि मुलगी केवळ मित्र असूच शकत नाहीत.’ या एका वाक्याने नात्यांमधील निखळपणा हिरावून घेतला गेला आणि बहुतांशी तत्कालीन पालक समाजाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. प्रत्येक मैत्रीकडे एका संभाव्य प्रेमकहाणीच्या संशयी नजरेतून पाहिले जाऊ लागले. त्या काळात वैयक्तिक मर्यादा ही संकल्पनाच आपल्याकडे रुजलेली नव्हती. पण आजच्या ‘जेन-झी’ पिढीने या भावनिक गुंतागुंतीतून स्वत:ची अत्यंत सहज आणि ठामपणे सुटका करून घेतली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्याकडे असलेली कमालीची भावनिक स्पष्टता.

  जागतिकीकरण आणि इंटरनेटच्या खुल्या युगात वाढलेल्या या पिढीने जगाकडून केवळ फॅशन किंवा ट्रेंड्स आत्मसात केले नाहीत, तर त्यांनी नात्यांची एक प्रगल्भ भाषाही शिकून घेतली आहे. मानसिक आरोग्या- विषयीची जागरूकता आणि स्वत:च्या भावना अचूकपणे समजून घेण्याची क्षमता (self- awareness) यामुळे आजची बहुतांश तरुण स्त्री नात्यांच्या बाबतीत अत्यंत ठाम आहे. तिला तिच्या मर्यादा अचूक आखता येतात. आपली मैत्री नेमकी कोणत्या वळणावर आहे आणि तिथे कोणत्या मर्यादा पाळणे गरजेचे आहे, याचे भान तिला असते.

या स्पष्टतेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तिची मैत्री ही कोणत्याही ‘फ्रेंड झोन’च्या अंधार्‍या कोपर्‍यात अडकत नाही किंवा ती रोमँटिक नात्याची ‘वेटिंग रूम’ बनत नाही. जेव्हा मैत्री केवळ मैत्रीच असते, तेव्हा ती खर्‍या अर्थाने निव्र्याज राहते. तिथे संभ्रम नसतो आणि भविष्यातील कोणत्याही लपलेल्या अपेक्षा नसतात. नेमक्या याच वैचारिक स्वातंत्र्यातून एका अत्यंत सुंदर बदलाची सुरुवात झाली आहे तो म्हणजे ‘जेंडर-ब्लाइंड’ किंवा लिंगभेदापलीकडची मैत्री. जेव्हा मैत्रीतून रोमँटिक अपेक्षांचे आणि समाजाच्या संशयाचे ओझे पूर्णपणे उतरवले जाते, तेव्हा समोरची व्यक्ती कोणत्या लिंगाची आहे हे पूर्णपणे दुय्यम ठरते.

अक्षता (वय २५) च्या मते, ‘‘आयुष्यात प्रत्येक मित्र-मैत्रिणींचे त्यांचे असे वेगळे स्थान असते. प्रत्येकासोबत वेगळे बाँडिंग असते. त्यामुळे एखाद्या मैत्रिणीसोबत चित्रपटावर चर्चा रंगतात, तर एखाद्या मित्रासोबत खूप खासगी गोष्टी शेअर करता येतात. कधी कधी अशा काही गोष्टी असतात ज्या जवळच्या मैत्रिणींनाही सांगता येत नाहीत, पण त्या एखादा मित्र समजून घेऊ शकतो. मैत्री ही मैत्री असते, त्यामुळे मैत्रीत मुलगा-मुलगी असा भेदभाव नको करायला.’’

आजच्या ‘जेन-झी’ तरुणींच्या मैत्रीवर्तुळाकडे बारकाईने पाहिले, तर एक अत्यंत रंजक चित्र दिसते. अनेक मुलींच्या गराड्यात आता मैत्रिणींपेक्षा मित्रांची संख्या लक्षणीय असते आणि त्याही या मुलांमध्ये अत्यंत सहजपणे वावरताना दिसतात. या बदलत्या समीकरणाचे मूळ एका अत्यंत साध्या आणि हव्याहव्याशा वाटणार्‍या संकल्पनेत दडलेले आहे तो म्हणजे ‘नो-जजमेंट झोन’ किंवा कोणतीही पारख न करता होणारा स्वीकार. मुलांच्या ग्रुपमध्ये रुसवे-फुगवे, ताणतणाव किंवा बारीकसारीक गोष्टींचे अति-विश्लेषण नसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तिथे तिला ‘मुलगी’ म्हणून वेगळी वागणूक मिळत नाही; तर ती त्यांच्यातलीच एक, मित्रमंडळींचा समान हिस्सा असते. या बरोबरीच्या नात्यासोबतच, मुलांमध्ये असणारी एक नैसर्गिक संरक्षक वृत्ती सार्वजनिक ठिकाणी वावरताना तिला एक सुरक्षिततेची जाणीव देते.

यापलीकडे जाऊन, या मैत्रीत एक अत्यंत व्यावहारिक आणि मानसिक पैलूही दडलेला आहे. अनेकदा आयुष्यातील गुंतागुंत हाताळताना मुलींना कोणाच्या सल्ल्याची किंवा ठोस उपायांची गरज नसते; त्यांना फक्त मनात साचलेली खदखद किंवा राग कुठे तरी मनमोकळेपणाने व्यक्त करायचा असतो. अशा वेळी मुलगे वा तरुण अत्यंत उत्तम श्रोते ठरतात. यातील सर्वात जमेची बाजू म्हणजे, ते शांतपणे सर्व ऐकून घेतात आणि दुसर्‍या दिवशी ते विसरूनही जातात. त्यांनी तो विषय तिथेच संपवलेला असतो. एखाद्या साध्याशा विषयाचा कीस पाडणारे तरुण अगदी क्वचित सापडतात.

याउलट, मैत्रिणींसोबत अशाच प्रकारे मनमोकळं होताना अनेकदा नकळत संकोच असतो, असे दिसून येते. इथे मैत्रिणींचा स्वभाव कारणीभूत नसून, मुलींची झालेली कौटुंबिक व सामाजिक जडणघडण कारणीभूत असू शकते. मुली  स्वाभाविकपणे प्रत्येक गोष्टीचा जास्त आणि सखोल विचार करतात, गोष्टी लक्षात ठेवतात. त्यामुळे, आज रागाच्या भरात किंवा निराशेमध्ये मैत्रिणीला सांगितलेली एखादी गोष्ट तिच्या कायम लक्षात राहील आणि भविष्यात त्याच गोष्टीवरून ती आपल्याला पारखेल ( ( judge IYSXZ»F करेल), अशी एक सुप्त भीती या तरुणींना वाटू शकते. आपल्याच मैत्रिणीसमोर आपली प्रतिमा डागाळू नये, यासाठी त्या अनेकदा स्वत:ला आवर घालतात. मुलग्यांवर मात्र अशी कोणतीही बंधने नसल्याने त्यांचा दृष्टिकोन अत्यंत थेट आणि बिनधास्त असतो. रागाच्या भरात केलेल्या चुका किंवा घेतलेले फटकळ निर्णय मुले सहज हसण्यावारी नेतात.

मुलांच्या मैत्रीतील याच सहजतेवर बोलताना, पौरवी (२४) या तरुणीचे निरीक्षण आजच्या अनेक मुलींच्या अनुभवांचे अचूक प्रतिनिधित्व करते. ती म्हणते, ‘‘मैत्रिणींच्या नात्यात अनेकदा ‘फिजिकल प्रेझेंस’ किंवा सतत संपर्कात राहण्याची एक अलिखित अपेक्षा असते. जर तुम्ही सतत भेटत नसाल किंवा नेहमी बोलत नसाल, तर मुलींच्या नात्यात नकळतपणे एक दुरावा येऊ लागतो. बर्‍याच महिन्यांनंतर मैत्रिणीशी नव्याने संवाद साधताना अनेकदा एक प्रकारचा अवघडलेपणा (awkwardness) जाणवतो. पण मुलांच्या बाबतीत हे समीकरण एकदम ‘लो-मेंटेनन्स’ आणि अत्यंत सोपे असते. एखाद्या पुरुष मित्राशी कित्येक महिन्यांच्या अवधीनंतर जरी संपर्क साधला, तरी तो संवाद अगदी कालच बोलणे थांबवल्यासारख्या सहजतेने पुन्हा सुरू होतो. तिथे संवादात कोणताही ताठरपणा नसतो किंवा ‘इतके दिवस संपर्क का नव्हता?’ याचे कोणतेही स्पष्टीकरण त्याला द्यावे लागत नाही.’’

पावलोपावली नियम पाळत, स्वत:ला सिद्ध करत जगणार्‍या आजच्या तरुणीला म्हणूनच मुलांच्या मैत्रीतील हा मोकळा अवकाश हवाहवासा वाटत असावा. त्या अवकाशात ती मनसोक्त व्यक्त होऊ शकते, चुका करू शकते आणि भूतकाळातील ओझे न बाळगता खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकते.

 भारतीय समाज नक्कीच प्रगल्भ झाला आहे, पण हा बदल एकसमान नाही. आपण जे सरसकटीकरण (generalization) करतो, ते बर्‍याचदा शहरी आणि मोकळ्या वातावरणातील अनुभवांवर आधारित असते. मित्रांच्या ग्रुपमध्ये बिनधास्त वावरण्याची, त्यांच्याशी कोणत्याही संकोचाविना गप्पा मारण्याची मुभा आजही प्रामुख्याने त्याच मुलींना मिळते, ज्यांना आधुनिक विचारसरणीचे पालक लाभले आहेत आणि ज्यांचे कौटुंबिक वातावरण या बदलांचा स्वीकार करणारे आहे. पारंपरिक चौकटीत वाढलेल्या मुलींसाठी एका मुलाला केवळ ‘मित्र’ मानणे आणि ते समाजाला, अगदी स्वत:च्या घराला पटवून देणे हा आजही एक मोठा संघर्ष आहे. त्यांच्या वाट्याला आजही संशयी नजरा आणि समाजाचे जाचक नियम येतातच. तरीही, ज्या वर्गाला आणि ज्या तरुणींना हा आधुनिकतेचा अवकाश मिळाला आहे, त्यांच्यापुरता का होईना, पण एक अत्यंत स्पष्ट आणि सकारात्मक बदल घडत आहे, हे नाकारता येत नाही. या मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि विशेषाधिकाराचा योग्य वापर करत आजची तरुणी जुन्या ‘बॉईज क्लब’ची मक्तेदारी मोडून काढत आहे. जेव्हा ती तिचे वर्तुळ निवडते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीचे केवळ व्यक्तित्व पाहते. तिला आता ‘मुलगा मित्र’ किंवा ‘मुलगी मैत्रीण’ नको असते; तिला केवळ अशी माणसे हवी असतात, ज्यांच्यासोबत तिची ‘व्हाईब’ जुळेल, जिथे बौद्धिक समानता असेल आणि भावनिक सुरक्षितता मिळेल. थोडक्यात, ती मोकळेपणाने व्यक्त होईल.

थोडक्यात सांगायचे तर, मैत्रीतील असा मोकळेपणा आणि समानता हा संपूर्ण भारताचा आजचा चेहरा नक्कीच नाही. तो एक विशेषाधिकार आहे. पण ज्यांना हा अधिकार मिळाला आहे, त्या जेन-झी तरुणी खर्‍या अर्थाने मैत्रीची एक नवी, पारदर्शक आणि लिंगभेदापलीकडची व्याख्या लिहीत आहेत. या पिढीने खर्‍या अर्थाने एका नव्या सामाजिक सत्याची नोंद घेतली आहे : जेव्हा तुमच्या नात्यांच्या बाउंड्रीज (मर्यादा) भक्कम आणि पारदर्शक असतात, तेव्हा मैत्री केवळ लिंगाच्या चौकटीत अडकून राहत नाही तर ती दोन व्यक्तींमधला एक निखळ आणि सुंदर प्रवास बनते.

umanaseekonde@gmail.com