अनुराग जाधव
दोन व्यक्तींचे विचार जुळतात, त्यांचे विनोद एकमेकांना सहज समजतात,  एकमेकांसमोर मुखवटा पांघरायला लागत नाही, नि:शब्द बसतानाही अवघडल्यासारखं वाटत नाही… म्हणजे ‘वाइब’ जुळली आणि मैत्री झाली… अशी ही आजच्या ‘जेन-झी’ची मैत्रीची व्याख्या. आजच्या पिढीतील लिंगभेदाच्या पलीकडे गेलेली मैत्री नात्यांना अधिक परिपक्व कशी करत जाते हे सांगणारे खास दोन लेख… नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिना’निमित्ताने 

मागच्या पिढीशी नाळ तोडून स्वतंत्रपणे आयुष्य जगू पाहणार्‍या ‘जेन-झी’ चा नवा दृष्टिकोन अनेकदा कौतुक करायला भाग पाडत असला तरी तो एका पिढीतला नाही. समाजातील वैचारिक, भावनिक बदल हे अनेक पिढ्यांच्या मानसिक घुसळणीतून होत असतात, त्यातूनच पुढची पिढी अधिक ‘रिफाईन’ होत जाते. मुलगा आणि मुलगी यांच्यातली निखळ मैत्रीही अशीच अनेक पिढ्यांच्या बंडखोरीतून, त्यागातून, विचारप्रगल्भतेतून आजचे रूप घेती झाली आहे.‘पुरुष’ म्हणून चार हात लांब ठेवू पाहणारी तरुणी आता तरुणांंकडे मैत्रीचा मुक्त अवकाश म्हणून पाहते आहे. कारण मुलींच्या मते मुलांशी मैत्री ही ‘लो-मेंटेनन्स’ असते. त्यांचे बोलणे थेट- बिनधास्त असते आणि गंभीर विषयही ते खेळकरपणे घेतात. आजची मैत्री ही लिंगभेदाच्या पलीकडे जात जिवलग नाते घडवते आहे. हा सांस्कृतिक, सामाजिक बदल घडवण्यात बदलत्या पुरुषांचे अर्थात नव्या तरुणांचे, एकूणच नव्या पिढीचे योगदान जास्त आहे, हे मान्य करायलाच हवे…

संध्याकाळचा काहीसा मोकळा वेळ… ‘‘मला तुझ्याशी बोलायचंय… बस जरा,’’ असं म्हणत आईनं श्रीयाला समोर बसवलं. श्रीयाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. ‘‘हे बघ आपल्या घरी काही बंधनं नाहीत. तू आणि सुयश नेहमी सोबत असता. तुमचं काही असेल तर सांग तसं. उगाच ताणू नकोस.’’ हे ऐकताच श्रीयाला हसूच फुटलं. जोरजोरात हसून ती म्हणाली, ‘‘आई अगं, वेडी आहेस का? मी आणि सुयश? नो वे… वी आर बेस्टीज्!’’ आता आईच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. त्यावर श्रीयानं मित्रांबद्दलची तिची व्याख्या उलगडून सांगितली आणि आईलाही अर्थातच पटत गेली.

आताच्या ‘जेन झी’मध्येच नाही तर त्याच्याही आधीच्या ‘मिलेनियल्स’ पिढीमध्येही ‘जस्ट फ्रेन्ड’ ही संकल्पना चांगल्या प्रकारे रुजलेली आहे. आज एखादा मुलगा आणि मुलगी रात्री दोन वाजेपर्यंत फोनवर बोलत बसतात, एकमेकांना अगदी नात्यांचे सल्ले देतात, एकत्र फिरतात, पार्टी करतात, अभ्यासही एकत्र करतात आणि धमालही. त्यांना खरं तर त्याबद्दल कुणी फारसं विचारत नाहीतच, पण अगदी विचारलंच तर दोघंही अगदी सहज उत्तर देतात ‘वुई आर बेस्टीज्!’ किंवा ‘वुई आर होमी’ (Homie).  ‘जेन झी’बद्दल बोलताना एक गोष्ट आधी समजून घ्यावी लागेल की, ही पिढी मोबाइल फोन, इंटरनेट आणि समाजमाध्यमांना बरोबर घेऊनच मोठी झाली आहे. त्यांच्यासाठी जगाची व्याख्या शाळा, महाविद्यालय किंवा परिसरापुरती मर्यादित नाही. त्यांचे मित्र मुंबईत असतात, पुण्यात असतात, दिल्लीत असतात, अगदी परदेशातील कोणत्याही टोकावर असू शकतात. गंमत म्हणजे ते बहुतांशी कधीच प्रत्यक्षात भेटलेलेही नसू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मैत्री ही ‘मुलगा की मुलगी?’ या प्रश्नापेक्षा ‘ही व्यक्ती माझ्याशी जोडली जातेय का?’ या प्रश्नावर ठरते. त्यासाठीचे त्यांचे शब्द असतात homie,bruh fam, bro, bestie,twin सगळे मैत्रीशी संबंधित. घरातल्यासारखा/सारखी, कुटुंबातलाच/लीच जणू, भावासारखा घट्ट, किंवा अगदी जुळ्या भावा/ बहिणीसारखा सेम टू सेम. आणि ही सगळी नाती लिंगभेदापलीकडची असतात.

आजच्या या मुलांच्या भाषेत एक शब्द खूप लोकप्रिय आहे ‘वाइब’ (Vibe). दोन व्यक्तींचे विचार जुळतात, त्यांचे विनोद एकमेकांना सहज समजतात, एकमेकांसमोर मुखवटा पांघरायला लागत नाही, शांत बसतानाही अवघडल्यासारखं वाटत नाही… म्हणजे ‘वाइब’ जुळली. एकदा का ती जुळली की ते एकमेकांचे मित्र होतात. त्यांच्या दृष्टीने हीच मैत्रीची सुरुवात असते. त्यामुळे समोरची व्यक्ती मुलगा आहे की मुलगी, हा मुद्दा अनेकदा दुय्यम ठरतो. याच कारणामुळे आजच्या पिढीत मैत्रीचे प्रकारही बदलले आहेत. ‘वर्क फ्रेंड’, ‘जीम फ्रेंड’, ‘ट्रॅव्हल फ्रेंड’, ‘गेमिंग फ्रेंड’, ‘ऑनलाइन फ्रेंड’, ‘थेरपी फ्रेंड’ प्रत्येक मित्राचं आयुष्यात वेगळं स्थान असतं. प्रत्येक मित्र-मैत्रिणीकडून सगळ्याच अपेक्षा नसतात. कोणासोबत ‘ट्रेक’ची आवड जुळते, कोणासोबत ‘करिअर’बद्दल चर्चा होते, कोणासमोर मन सहजपणे मोकळं करता येतं, तर कोणासोबत फक्त ‘मीम्स’ शेअर करूनही दिवस छान जातो. मैत्री एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती जीवनशैलीचा भाग बनली आहे.

‘मिलेनियल्स’ वा ‘जेन झी’च्या नात्यांमधला सर्वात मोठा बदल म्हणजे ‘बाऊन्ड्रीज्’.ओलांडू नयेत असा अलिखित नियम असलेल्या. आपण मित्र आहोत, म्हणून प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी किंवा २४ तास एकमेकांसाठी उपलब्ध राहायलाच हवं, असा आग्रह हे धरत नाही. एखादा मित्र वा मैत्रीण दोन दिवस उत्तर देत नसेल, तर पहिला विचार तो वा ती  दुर्लक्ष करतोय वा करतेय असा नसतो, कदाचित तो व्यग्र असेल किंवा तिला स्वत:साठी वेळ हवा असेल असा विचार केला जातो. हा भावनिक अवकाश वा ‘इमोशनल स्पेस’ त्यांच्या मैत्रीचा मोठा भागआहे.

बहुतांशी उच्च शिक्षण, नोकरी-व्यवसाय करणारी, करू पाहणारी ही पिढी असल्याने समाजातल्या आर्थिक घडामोडींचा परिणाम त्यांच्यावरही होतोच. ‘कुठे आणि कधी नोकरी लागेल?’, ‘किती टिकेल?’, ‘कामातले ताण कसे असतील?’, ‘आपल्याला झेपतील ना?’, ‘मी यशस्वी होईन ना?’ यासारखे प्रश्न त्यांनाही पडतात. साहजिकच ताण येणंही स्वाभाविक असतात. काहींच्या घरातली काही समस्या असू शकते. बहुतांशी सगळेच यातून जात असल्याने एकमेकांच्या मानसिक आरोग्याविषयीची जागरूकताही या मैत्रीला वेगळं रूप देते. ‘थेरपिस्टकडे जाऊन ये’, ‘काही दिवस ब्रेक घे’, ‘स्वत:ला दोष देऊ नको’ असं मैत्रीत एकमेकांना सहजपणे सांगितलं जातं, ऐकलं जातं. उगाचच त्याचा बाऊ केला जात नाही. त्याचमुळे भावनिक आधार हा या पिढीच्या मैत्रीचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याचमुळे मुलगे असोत वा मुली एकमेकांना आपले अनुभव सहज सांगू शकतात, त्यातून मार्ग काढतात.

२३ वर्षांच्या आर्यननं मला एकदा सांगितलं, ‘‘आम्ही मित्र शोधत नाही, आम्ही ‘सेफ पीपल’ शोधतो.’’ हे वाक्य खूप काही सांगून जाणारं आहे. समोर गोड बोलणारा माणूस आपल्या मागे वाईट बोलत असेल तर त्यांना ते अजिबात आवडत नाही. त्याअर्थी पारदर्शक नाती त्यांना आवडतात. एखाद्याबरोबर सुरक्षित वाटणं, सहज वाटणं हे त्यांना आवडतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्र ‘जजमेंटल’ होणार नाही याची खात्री असणं, कारण एखादी व्यक्ती धाडकन समोरच्या व्यक्तीविषयी आपलं मत व्यक्त करते तेव्हा काही वेळा ते मत चुकीचंही असू शकतं, दुखावणारंही असू शकतं. अशा व्यक्तीपासून दूरच राहायला त्यांना आवडतं. थोडक्यात, कोणताही आडपडदा न ठेवता जसं आहे तसं राहता येणं… ही मैत्रीची नवी व्याख्या आहे. आणि अशी व्यक्ती नसेल तर तिच्यापासून दूर जायलाही त्यांची हरकत नसते.

२१ वर्षीय साक्षी सांगते, ‘‘आमची पिढी मैत्रीला कोणताही ‘टॅग’ लावण्याची घाई करत नाही आणि त्याची आम्हाला गरज वाटत नाही. आमचा ‘बॉण्ड’ जुळला की बस्स… तेवढंच आम्हाला पुरतं!’’

याचाच परिणाम या पिढीच्या प्रेमसंबंधांवर आणि लग्नाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही झाला आहे. आज अनेक तरुण-तरुणी जोडीदार निवडताना सर्वप्रथम एकच गोष्ट शोधतात, ‘हा माझा मित्र होऊ शकतो का?’ नवरा किंवा बायको होण्याआधी ‘मित्र’ होणं त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. ही पिढी नात्यांमधल्या भूमिका शोधण्यापेक्षा समानता शोधते. पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं नातं, जबाबदार्‍या आणि ठरलेल्या भूमिका असं समीकरण होतं. आज अनेक तरुण जोडप्यांसाठी लग्न म्हणजे दोन मित्रांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय असतो. म्हणूनच आज अनेक घरांमध्ये  वेगळं चित्र दिसतं. नवरा आणि बायको दोघंही सकाळी उठून एकत्र नाश्ता बनवतात. एक जण चहा करतो, दुसरा डबा भरतो. पुरुष स्वयंपाकघरात मदत करतो. एवढंच नाही, तर दोघे मिळून घर चालवतात. किराणा आणण्यापासून मुलांच्या शाळेच्या बैठकांपर्यंत, सहलींच्या आयोजनांपासून आर्थिक निर्णय घेण्यापर्यंत दोघेही सहभागी असतात. हे फक्त ‘कामाची विभागणी’ नाही, ही मैत्रीची पद्धत आहे. पूर्वी अनेक नात्यांमध्ये भूमिका ठरलेल्या असायच्या. आज सहकार्य आहे. ‘मी करतो’ किंवा ‘तू कर’ यापेक्षा ‘आपण करू’ हा शब्द जास्त ऐकू येतो. म्हणूनच अनेक ‘जेन झी’ जोडपी स्वत:बद्दल सांगताना सहज म्हणतात, ‘She is my best friend.’ किंवा ‘He is my safe place’ अर्थात सध्याचं घटस्फोटाचं वाढतं प्रमाण हेही गंभीर आहेच. परंतु बदलती पिढी यातूनही मार्ग काढू शकेल असं वाटतं.

यामागे एक मोठा सामाजिक बदलही आहे. घरातली कामं, करिअर, आर्थिक जबाबदार्‍या आणि भावनिक जबाबदार्‍या यांचं स्वरूप बदलत आहे. मैत्री ही आता फक्त महाविद्यालयीन कट्ट्यावरची गोष्ट राहिलेली नाही, ती लग्नासारख्या पारंपरिक संस्थेलाही नव्या अर्थाने आकार देत आहे. ही पिढी भावनिकदृष्ट्या अधिक मोकळी आहे. मुलांनी रडू नये, भावना व्यक्त करू नयेत किंवा मुलींनीच नेहमी समजून घ्यावं, सांभाळून घ्यावं असे पारंपरिक समज आता हळूहळू कमी होत आहेत. आज एखादा मुलगा आपल्या मैत्रिणीकडे मानसिक ताणाबद्दल बोलतो आणि एखादी मुलगी आपल्या मित्राकडे करिअरबद्दलचा संभ्रम व्यक्त करते. ही देवाणघेवाण नात्यांना अधिक सच्ची बनवते. एका मैत्रिणीने मला आयुष्यात पहिल्यांदा मासिक पाळीबद्दल सांगितलं. त्या दिवसांत नेमक्या कोणत्या गोष्टी शरीरात होतात, त्याचे स्त्रियांवर कसे परिणाम होतात, त्याविषयी कशी चुकीची माहिती सांगितली जाते हे सर्व तिने मला विस्तृतपणे सांगितलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात निखळ मैत्री असल्यामुळे आमच्या या संभाषणात कुठलाच संकोच नव्हता.

अर्थात समाजमाध्यमांनी या बदलाला वेग दिला आहे. ‘इन्स्टा’वर ‘कपल रिल्स’ दिसतात, पण त्याचबरोबर फ्रेन्ड रिल्स’ही तितक्याच लोकप्रिय आहेत. मुलगा-मुलगी एकत्र ट्रेकला जाणं, कॅफेत बसणं किंवा छोटा उद्योग सुरू करणं यात आता कुणालाही वावगं वाटत नाही. उलट ‘त्यांची मैत्री किती छान आहे,’ अशी प्रतिक्रिया सहज मिळते. कामाच्या ठिकाणीही हा बदल स्पष्ट दिसतो. आज जवळजवळ सर्वच क्षेत्रांत स्त्री-पुरुष एकत्र काम करतात. ऑफिसनंतर ‘टीम डिनर’, ट्रॅव्हल किंवा वीकेंड प्लान हेही सामान्य झाले आहेत. या मैत्रीमध्ये व्यावसायिक आदर  आणि वैयक्तिक विश्वास दोन्ही असतात. त्यामुळे तिथे प्रत्येक सहकारी प्रेमात पडेल अशी अपेक्षा ठेवणं हास्यास्पद ठरेल.

समाजमाध्यमामुळे या पिढीला जगभरातील लोकांशी जोडण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या संस्कृती, विचारसरणी आणि जीवनशैली पाहताना त्यांनी एक गोष्ट शिकली ती म्हणजे नात्यांचं एकच ठरलेलं स्वरूप नसतं. त्याचे तोटेही आहेत. उदाहरणार्थ, सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव, ‘फियर ऑफ मिसिंग ऑउट’ (FOMO), सततची होणारी तुलना. Ghosting, Situationship, Benching, Breadcrumbing,  यांसारख्या संकल्पनाही याच पिढीने अनुभवलेल्या आहेत. पण एक फरक आहे. या गोष्टींबद्दल ही पिढी बोलते. नातं बिघडलं तर त्यावर चर्चा करते. मानसिक आरोग्य, त्रासदायक ठरणारी अर्थात टॉक्सिक रिलेशनशिप, भावनिकदृष्ट्या उपलब्ध असणं (Benching) यांसारखे शब्द त्यांच्या रोजच्या संभाषणाचा भाग झाले आहेत. त्यामुळे नात्यांकडे पाहण्याची त्यांची संवेदनशीलता आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळी आहे.

ग्रामीण भारताचा विचार केला तर तिथल्या समाजाचा चष्मा अद्याप फारसा बदललेला नाही. आज तिकडची बहुतांश मुलं-मुली आणि त्यांचे पालक पिढ्यान् पिढ्यांची चालत आलेली वैचारिकता मानतात, निदान मैत्रीबाबत तरी. अर्थातच त्यासाठी जात, जीवनशैली, समाजरचना हा महत्त्वाचा भाग ठरतो. पण हे चित्र बदलणार नक्की. मुलांची आणि मुलींची मैत्री होणं आणि समाजात ती ‘फक्त मैत्री’ म्हणूनच मान्य होणं इथपर्यंतचाच संघर्ष त्यात असेल. त्यानंतर शहरात निर्माण होणार्‍या  र्र३४ं३्रःल्ल२ँ्रस्र् आणि  Emotional Availability सारख्या समस्या इथे भेडसावणार नाहीत. म्हणूनच त्यांची मैत्री अधिक निखळ असेल. त्यांच्या मैत्रीत अधिक स्पष्टता असेल.

‘जेन झी’मुळे मागच्या पिढीचीही ‘वुई आर जस्ट फ्रेंड्स’बद्दलची मानसिकता बदलतेय. आज कित्येक घरी एखाद्या मुलाने किंवा मुलीने जर आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला- ‘फ्रेंड’ला घरी बोलावलं तर बहुतांश आई-बाबा त्यांच्याकडे फक्त मैत्री म्हणूनच पाहतात. काही कुटुंबांत आई-बाबाच मुलांसाठी ‘सरप्राइज बर्थ-डे पार्टी’ आयोजित करून त्यांच्या सर्व मित्र-मैत्रिणींना बोलावतात. कारण बदल हा कधी एका पिढीत होत नाही. तो हळूहळू नंतरच्या पिढ्यांत उतरत जातो. मैत्री ही प्रत्येक पिढीचा आधार होती म्हणूनच हा बदल होत गेला. प्रत्येक पिढीच्या नात्याबद्दलच्या असलेल्या संकल्पना हळूहळू बदलत गेल्या तरी त्याचं महत्त्व हे प्रत्येक पिढीने ओळखलं, जपलं आणि निभावलंसुद्धा.

कुसुमाग्रजांच्या छान ओळी आहेत. त्यांनी त्या कोणत्या संदर्भात लिहिल्या आहेत हे नक्की ठाऊक नाही; परंतु आताच्या पिढीच्या आणि त्यांच्या दृष्टिकोनास अगदी समर्पक आहेत असे वाटते.

नात्यास नाव आपुल्या

    देऊ नकोस काही

सार्‍याच चांदण्यांची

    जगतास जाण नाही

नवीन पिढीने ही गोष्ट स्वीकारली आहे. नात्यांना नाव देण्यापेक्षा त्यातला प्रामाणिकपणा महत्त्वाचा. समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते की नाही, यापेक्षा ती तुमच्या आयुष्यात आहे, कठीण काळात तुमच्या पाठीशी उभी राहते, तुमच्या यशाच मनापासून सहभागी होते आणि अपयशात खांद्यावर हात ठेवते. अशीच सकारात्मकता राहिली तर भविष्यात ‘वुई आर जस्ट फ्रेंड्स’ हे बोलण्याची गरजच भासणार नाही. १ ऑगस्टच्या जागतिक मैत्री दिनानिमित्ताने एवढं तरी सांगायलाच हवं.

anuragjadhav.191919@gmail.com