डॉ. स्नेहा दामले
अलीकडच्या मुलांच्या, तरुणाच्या अनेक ‘रिलेशनशिप टर्मिनॉलॉजी’ थोडक्यात नात्यांचे प्रकार सतत कानावर येत असतात. त्या ऐकल्या की, अर्थातच मनात धस्स होतं. पण, शूऽऽऽऽ! असं बोलायचं नाही. अन्यथा आपण त्यांना पाषाण युगातले वाटू. त्यामुळे, असे काही शब्द ऐकले की, मी सावध प्रतिक्रिया देते. जसं, ‘‘ओहो, इंटरेस्टिंग!’’, ‘‘कूल हा!’’, ‘‘वॉवऽऽऽ!’’ हा सावध पवित्रा यासाठी की, ते आमच्या पिढीकडे एकदम ‘पिछडे हुए’ थोडक्यात ‘बूमर्स’ वा ‘जेन एक्स’ पिढीतले म्हणून त्यांनी बघू नये आणि त्यांच्याबरोबरचे संवादाचे मार्ग खुले राहातील, यू नो! वरकरणी त्यांच्यासमोर कितीही ‘कूल’ दिसण्याचा प्रयत्न केला तरी आतून या नात्यांच्या व्याख्या ऐकून मी हादरलेली असते.

का म्हणून काय विचारताय? आमच्या तरुण वयात आम्ही किती संस्कारी होतो. तेव्हाच्या चित्रपटवाल्यांनी आम्हाला किती प्रतीकात्मतेची सवय लावली होती. आठवतं? बगीच्यातल्या एकांतात एखादं जोडपं भेटायचं, आता ते पुढे काय करतात, याची उत्सुकता जागृत होते ना होते, तर ते जायचे थेट झाडाच्या मागे आणि मग ती ओठ पुसत बाहेर येणार किंवा त्यांच्याऐवजी दोन फुलं एकदम जवळ आलेली दाखवली जायची. बस्स… पुढचं सगळं प्रेक्षकांचं ‘इमॅजिनेशन!’ माझा तर दावा आहे, की त्या काळच्या दिग्दर्शकांनी आमच्या लैंगिक शिक्षणाची जबाबदारी दोन फुलं आणि एका झाडावर सोपवली! या अशा साहित्याने आणि चित्रपटाने आमच्या पिढीचं एकंदर फार नुकसानच केलंय. नात्यांच्या संदर्भातील आमचा शब्दकोश ना धड वाढवला, ना कधी नात्यांच्या जाणिवा, सामान्य ज्ञान वाढवण्याची काही नैतिक-सांस्कृतिक जबाबदारी घेतली. याउलट अलीकडचे चित्रपट- वेब सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी संपूर्ण पिढीच्या कल्याणाची जबाबदारी किती मनावर घेतली आहे ना.

माझा तर दावा आहे, की आमच्या काळच्या चित्रपटांनीच आमचं आयुष्य असं मिळमिळीत ‘कांदे पोहे’ करून ठेवलं. कारण आमच्या पिढीच्या कथांचा आणि चित्रपटांचा शेवट बहुतांशी ‘आणि ते सुखाने नांदू लागले…!’ या वाक्याने व्हायचा. पण जेन-झी आणि मिलेनिअल्स पिढीच्या चित्रपटाची सुरुवातच ‘ब्रेकअप पार्टी’ने होते. ब्रेकअप – मूव्ह ऑन – स्वाइप राइट – मॅच – डेटिंग – सिच्युएशनशिप – घोस्टिंग – ऑर्बिटिंग – कमिटमेंट इश्यू – थेरपी – आणि पुन्हा स्वाइप राइट म्हणजेच नवीन नातं. सगळं कसं चमचमीत, मसालेदार, झणकेदार तडका!

मला या पिढीचं कौतुक यासाठी वाटतं की, त्यांना मानसिक स्वास्थ्यासाठी ‘थेरपी’ घेणं हा टॅबू वाटत नाही. उलट आपण मानसोपचार घेतोय हे सांगणं ‘ट्रेंडी’ आहे. ‘‘यू नो, आय एम टेकिंग थेरपी दीज डेज अंॅड माय थेरपिस्ट टोल्ड मी मूव्ह ऑन ऑरगॅनिकली!’’ सिधा जवाब नो बकवास!

मिलेनिअल्स आणि जेन झी यांचे रिलेशनशिप स्टेटस बघितले आणि आम्हा ‘बूमर्स’ किंवा जेन एक्स पिढीची तेव्हाची नाती बघितली तर लक्षात येतं की, खूप तफावत आहे… म्हणजे नुसता काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं असं म्हणता येणार नाही. तर विचार करण्याची पद्धत बदलली. चांगल्या- वाईटाच्या कल्पना आणखी मोकळ्या झाल्या. ‘दो फूल, एक माली… दो जिस्म, एक जान…’ असल्या उच्चकोटीच्या आदर्शवादी जगतातून ‘लेट्स कीप इट कॅज्युअल…’ पर्यंत ही पिढी पोहोचली आहे.

आमच्या वेळी बहुतेक लग्नं ठरवूनच व्हायची. शंभरात एखादा प्रेम विवाह किंवा हजारात एखादं भिन्न जातीय विवाह व्हायचा. त्यामुळे लग्न झालंय ना? आता ते निभवायचं, हे इतकं पक्क असायचं की, असेल त्या परिस्थितीत ते टिकायचंच. लग्नाआधी नात्यात असणं वगैरे भानगडी नव्हत्याच. त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा ब्रेकअप वगैरे तर नव्हतंच. त्याही वेळी वयानुसार एखादा मुलगा/मुलगी आवडणं हे व्हायचं; पण तिला किंवा त्याला ते सांगण्याचं धाडस एखादाच करू शकत असे. बहुतेकांच्या बाबतीत सगळा एकतर्फी मामलाच राहायचा शेवटपर्यंत. त्यामुळे अलीकडे सुरू असलेलं ‘ब्रेडक्रम्बिंग’ थोडक्यात, एका नात्यात असताना दुसर्‍या कोणाला तरी थोडं ‘लक्ष’ पुरवत राहायचं, म्हणजे त्या व्यक्तीचा आपल्यातला रस टिकून राहील. आमच्या काळी बाहेर काही तरी ‘लफडं’ (कारण ‘लडका-लडकी कभी दोस्त नही बन सकते,’ यावर पालकांचा पूर्ण विश्वास) चालू आहे असं घरच्यांना कळण्याचा अवकाश की, असा काही दणका बसायचा की विचारू नका. मुलगी असेल तर दोन महिन्यांच्या आत कुठेतरी ‘चांगलं स्थळ’ बघून लग्न लावून मोकळे! हे म्हणजे थेट नात्यातलं ‘हार्ड लॉँच’ होतं. आता विचार करते त्यावेळी वाटतं, नात्यातल्या ‘सॉफ्ट लाँच’विषयी माहिती वगैरे असती तर? म्हणजे जेन-झी समाजमाध्यमांवर फोटो टाकतात तसं. सुरुवातीला फक्त दोन कॉफीच्या कपांचा फोटो, नंतर धूसर लांबून काढलेला पाठमोरा फोटो. आम्हीसुद्धा अशा काही युक्त्या केल्या असत्या. म्हणजे इतर मित्र-मैत्रिणीना ‘ग्रुप स्टडी’साठी घरी बोलवायचं, ओळख करून द्यायची. एखादा संशोधनात्मक निबंध एकत्रित करायचा. झालं ‘सॉफ्ट लॉँच’! पण एवढी अक्कल कुठे होती? कुठला तरी दूरचा काका नेमका तडमडायचा आणि आपल्या नात्यांचा हार्ड लॉँच ठरलेला! परिणती… घाईनं उरकलेलं लग्न!

अशात ‘ऑरबिटिंग’ म्हणजे आधी ‘घोस्ट’ (कोणतंही कारण न सांगता समोरच्या व्यक्तीशी अचानक सर्व संबंध तोडून टाकायचे आणि गायब व्हायचं) करायचं, पण दुरून लक्ष ठेवायचं. त्या व्यक्तीच्या समाजमाध्यमांवरच्या पोस्ट, स्टेटस, स्टोरीज बघायच्या, पण थेट संपर्क करायचा नाही. संपर्कात नसूनही संपर्कात असायचं, असलं काही तरी. त्याच्याशिवाय नात्यात येतं ते ‘कुशनिंग’ किंवा ‘बेंचिंग’ (सध्याचं नातं संपुष्टात आलं तर एकटं राहावं लागू नये, यासाठी पर्यायी जोडीदार निवडून ठेवणं, आणि ‘ब्रांचिंग’ (आधीच्या जोडीदाराशी असलेले नातं पूर्णपणे संपवण्यापूर्वीच दुसर्‍या व्यक्तीसोबत नातं जुळवणं) डोक्याचा नुसता भुगा होतोय ना…!

कधी कधी वाटतं यांचं हे नातं आहे की ‘स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ’? म्हणजे प्रायमरी होल्डिंग वेगळी ठेवायची, गुंतवणुकीसाठीचे वेगळे स्टॉक, रोजच्या ट्रेडिंगसाठी वेगळं अकाऊंट, इमोशनल होल्डिंग वेगळी आणि पुन्हा कुठे एक्झीट घ्यायची याचा ‘प्लॅन बी’ तयार आहेच. यांचं नियोजन इतकं योग्य असतं ना की काय सांगू… आम्ही ‘बूमर्स’ लग्नानंतर धड ‘कुटुंब नियोजन’सुद्धा करू शकायचो नाही. वर्षभरात घरात ‘पाळणा हललेला’ असायचा. आम्ही सगळ्याच बाबतीत कशी माती खायचो. यांचं नियोजन कोणत्या पातळीवरचं आहे ते पहा, एका जेन झीनं जेव्हा मला सांगितलं, ‘‘अजूनही ब्रेकअप न झाल्याने सॅड साँगची प्ले लिस्ट तशीच अनयुज्ड राहिली आहे.’’ तेव्हा तर मी हरलेच !

आम्ही सगळेच मध्यमवर्गीय होतो.. त्याच्यामुळे ‘लव्ह बॉम्बिंग’ कसं होणार? म्हणजे परिस्थिती अशी होती की, स्वत:च्या वाढदिवसाला मिळालेली एवढीशी ‘कॅडबरी‘ लपवून ठेवून, पुढचे तीन दिवस पुरवून खायचो. तिथे ‘लव्ह बॉम्बिंग’ कुठलं असणार नशिबात! आपल्या वेळी ‘पहिला प्यार’ चं इतकं उदात्तीकारण केलेलं होतं की, त्याशिवाय काही विचारच डोक्यात आला नाही. आता नव्या पिढीला त्यांचे चित्रपट सांगतात की, ‘‘सच्चा प्यार सिर्फ एक बार नहीं, दोबारा भी होता है (अर्थात, कितीही वेळा) म्हणून तर मग, पॉकेटिंग, बेंचिंग, ब्रँचिंग, नॅनोशिप या शब्दांना काही अर्थ उरतो.

यातील गंमत बाजूला ठेवली तरी, आयुष्यात येणारं प्रत्येक नातं, प्रत्येक व्यक्ती ही किती महत्त्वाची असते, हे या मुलांकडून शिकण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट खूप निश्चित केली आहे. घोळ नको उगाच. हा माझा बॉयफ्रेंड, ही माझी गर्लफ्रेंड असं कुणाला ते नाव देऊन टाकत नाहीत. त्यामुळेच सिच्युएशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट, लिव्ह इन असं सगळं त्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर ठेवलंय. आधीच्या आमच्या पिढीत, एखादं प्रेमाचं नातं पूर्णत्वास गेलं नाही; म्हणजे ‘लग्ना’ पर्यंत गोष्ट गेली नाही, तर ते फार मोठं अपयश समजलं जायचं. मोठा धब्बा होता तो. लपवून ठेवलं जायचं सगळं प्रकरण. आता किती मोकळेपण आहे, बघा. ‘‘ही माझी ‘एक्स’ आहे…’’ अशी सहज, अपराधाविना ते ग्रुपमध्ये ओळख करून देतात. ‘‘हा माझा क्रश होता. कितवा माहीत नाही…’’ ते खुलेआम सांगतात. आपल्या वेळी डायरीतलं ते गुलाबाचं फुलं (कोणीतरी… कोणाच्या तरी हाती पाठवलेलं…) पण ते देखील किती लपवून ठेवावं लागायचं. कुणाला दिसलं तर किती छी-थू होईल चारित्र्याची या कल्पनेने झोप लागायची नाही. कोणाला ‘लव्ह यू’, ‘मिस यू’ म्हणताना सुद्धा केवढा विचार करावा लागायचा. किती किती दिवस लागायचे.

बरं झालं… गेले ते अपराधीपणाचे दिवस! आता मोकळेपणा वाढलेला आहे. लग्न वगैरे मोठं पाऊल टाकण्याआधी तुम्ही कितीही ‘शिप’ अर्थात नात्यात राहू शकता, अजमावू शकता स्वत:ला. आम्ही डेटींग करतोय, लिव्ह-इन मध्ये राहतोय, आम्हाला ‘कॉन्ट्रॅक्ट मॅरेज’ किंवा ‘ओपन मॅरेज’ मध्ये राहायचं आहे, हे ते सहज सांगू शकतात. आणि जमलं नाही तर लगेच ‘मूव्ह ऑन’ करतात. आपल्या काळात ‘कम्पॅटीबिलिटी’ हा शब्दच नव्हता नाही का?. मुलगा चांगला आहे, नोकरी आहे. स्वत:चं घर आहे, कुटुंब चांगलं आहे, बस! हेच एकमेकांसाठी पूरक असणं. ‘‘आधी लग्न होऊ दे! बाकी सगळं आपोआप होतं,’’ हा केवढा ‘बाप विश्वास’ होता पालकांना.

आता या पिढीकडे एक भारी संकल्पना आहे, रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग आणि बेज फ्लॅग सुद्धा! नात्यामध्ये नुसतं घर, नोकरी महत्वाची नाही. स्वभाव, सवयी, विचार, मतं हे देखील महत्वाचे. म्हणजे ‘फेमिनिस्ट’ आहे हा ग्रीन फ्लॅग. विशिष्ट राजकीय पक्ष किंवा सामाजिक घटना-चळवळ याबद्दल टोकाचं मत व्यक्त होतंय का? तर मग सरळ रेड फ्लॅग. सतत नियंत्रण ठेवतो त्यालाही रेड फ्लॅग. मद्यपान, धुम्रपान ‘ओकेजनली’ असं बायोमध्ये लिहिलं आहे तर बेज फ्लॅग, म्हणजे यावर विचार, चर्चा करू. काय स्वच्छ विचार आहेत बॉस! कमाल! त्यामुळे ‘पार्टनर कंट्रोलिंग’ म्हणजे काळजी करणारा वाटायचा. ‘पझेसिव्हनेस’ म्हणजे प्रेम. ‘सायलेंट ट्रिटमेंट’ म्हणजे रुसणं. संसारात सतत सांभाळूनच घ्यावं लागतं, हा ‘थंब रूल’ होता.

आमच्या वेळी कसं सर्वात जास्त अपेक्षा निर्व्यसनी ‘स्थळा’चीच असायची, भलेही हे निर्व्यसनी ‘स्थळ’ सत्तर टक्के वेळा लपून छपून बाहेर सगळं उरकून यायचं. माझ्या माहितीतलं एक जोडपं – लग्नाला ५० वर्षं झालेली. मित्रांमध्ये व्यवस्थित ‘घेणारे’ हे नवरोबा अभिमानाने सांगत असतात की, ‘‘मी ‘घेतो’ हे बायकोला अजूनही कळू दिलेले नाही’’. कमाल आहे बावा!

आता मागे वळून आमच्या तारुण्याच्या काळाकडे बघते तेव्हा लक्षात येतं की, आमच्या सगळ्यांमध्ये अशा हजार बारीक-सारिक सवयी होत्या. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर निव्वळ बेज फ्लॅगचा साठाच! पण आमच्या शब्दकोशात एकच शब्द होता, ‘ॲडजस्टमेंट’. खूप फ्लॅग फडफडत राहिले त्या तडजोडींच्या आड. आता कुठूनतरी कुरबुरणारा कुजबुजता आवाज येतो, ‘‘आयुष्यभर हे सगळं कसं सहन केलं कळत नाही!’’.

आणखी एक महत्वाचा शब्द, ‘बाऊंड्रीज.’ आमच्या पिढीला हाही शब्द माहीत नव्हता. आम्हाला तोपर्यंत फक्त क्रिकेटच्या मैदानातील बाऊंड्री माहीत होती. बाऊंड्री अर्थात प्रायव्हसी. काही महत्वाच्या गोष्टीभोवती वर्तृळ आखलेल्या त्यात इतर कुणालाही यायला परवानगी नाही. जोडीदाराचा फोन सहज उचलून त्याचे मेसेज वाचले, डायरी वाचली,चालणार नाही. ‘‘कोणाशी बोलत होतीस?’’, ‘‘कुठे जातोय?’’, ‘‘कधी येणार?’’ या प्रश्नांना ‘प्रायव्हसी वायोलेशन’ म्हणतात हे आम्हाला माहीतच नव्हतं. जोडीदाराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगावी, आपल्या प्रत्येक निर्णयात सहभागी व्हावं, आपल्यासोबतच प्रत्येक ठिकाणी यावं, हे प्रेमाचं लक्षण मानलं जायचं. आजची पिढी म्हणते, ‘इट्स माय स्पेस’, ‘दॅट्स माय बाऊंड्री,’ ,

‘यु कान्ट डिसाईड दॅट फॅार मी…’

आमच्या काळात प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्यात मिसळून जाणं. आजच्या पिढीला प्रेम करतानाही स्वत:चं आयुष्य टिकवून ठेवायचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत अशा ‘बाऊंड्रीज’ मान्य करायला थोडं कठीण जातंय. पण खरं तर दुसर्‍याच्या भावनांचा, वेळेचा, वैयक्तिक अवकाशाचाचा आदर करायला शिकवणारी आजच्या पिढीची ही कल्पना वाईट नाही. आणि कदाचित सगळ्यात मोठा बदल म्हणजे प्रेमाचं नातं संपलं तरी व्यक्तीचं आयुष्य संपत नाही, हे त्यांनी थोडं आधीच शिकून घेतलंय.

नातं टिकणं हे एकमेव यश आणि नातं तुटणं म्हणजे अपयश हा आपला हिशोब त्यांनी निश्चित बदलला आहे त्यामुळे नात्यांमध्ये ‘डायरेक्ट कमिटमेंट’ वगैरेची गरज उरलेली नाही. पण तरीही बंध, अनुरूपता, मर्यादा सगळं बघाच. यातलं काहीच जमलं नाही तरी ‘जस्ट फ्रेन्डस’ आपण असतोच.
snehadamle0@gmail.com