गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या अखेरच्या टप्प्यात समस्त मराठी विश्वाचा शब्दसंग्रह खाडदिशी ‘अपग्रेड’ झाला. ‘वडीलधारे’, ‘पुढची पिढी’ इत्यादी जुनाट शब्दांची उचलबांगडी झाली. त्याजागी ‘बूमर’ ‘मिलेनियल्स’ आणि द ग्रेट ‘जेन झी’ हे शब्द अलगद येऊन बसले. ‘जेन झी’ नामक पिढीच्या सार्वजनिक अभिव्यक्तीमधला कल्पकपणा, बेधडकपणा आणि प्रामाणिकपणा बघून काहींचा रक्तदाब वाढला, काही जण मनापासून कौतुकावले. पण या आठवड्यात त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची आणि चकित करून टाकणारी एक गोष्टही दिसली, ती म्हणजे या आंदोलनातला टीन-एज आणि तरुण मुलींचा, खरं तर किशोरवयीन मुलींपासून वृद्ध आजी अशा सर्व वयोगटांतल्या स्त्रियांचा अभूतपूर्व, सक्रिय नि धडाकेबाज सहभाग.
हा सहभाग ‘यात मुलीही होत्या बरं का!’ असं म्हणून ‘टिकमार्क’ करता येईल इतका मुळमुळीत नव्हता. मुली या आंदोलनातल्या बिनीच्या शिलेदार होत्या. किती म्हणून उदाहरणं द्यावीत? त्यातून स्त्रीरूपाचं विविधांगी आणि लोभस दर्शन घडलं.आंदोलनस्थळी २३ दिवस उपोषण करणारी शांत, पण ठामपणे मुद्देसूद बोलत जनमानसाला हाकारण्याची क्षमता असलेली नेहा बोरा. मुंबईच्या निदर्शनांमध्ये कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता आंदोलकांना पोलिसांनी गाडीत कोंबल्यावर गाडीसमोर उभी ठाकत अक्षरश: एकहाती गाडी थांबवून, पोलिसांशी वाद घालून आंदोलकांची सुटका करायला भाग पाडणारी रिया अहिर. दिल्लीतल्या सुरक्षा दलाच्या स्त्रीने कपडे टरकावल्यावर ‘‘डोंट यू डेअर टच मी, आय विल स्यू यू!’’ असं किंचाळत तिला दूर करणारी कुणी एक अनामिका.
पोलिसांच्या लाठ्या अंगावर घेत आपल्या बरोबरीच्या मुलांचा बचाव करणारी कुणी एक कन्यका. ‘‘जोवर राजीनामा मिळत न्हाई, तवर इथंच राहनार!’’ असं ठणकावून सांगणार्या मराठी आजी. आपल्या गुडघ्याएवढ्या पोरांना हाताशी नि कडेवर घेऊन ‘‘यांच्या भविष्यासाठी आलो आहोत. त्यांनाही मारणार आहात? मारा!’’ असं ऐकवताना हुंदका फुटलेली एक आई तर दुसरीकडे ‘‘पुलिस अंकल, आज डंडे तो नहीं मारोगे ना, प्रोटीन शेक पीके नही आयी मैं, भाग नही सकूंगी!’’ असं हसत सांगणारी कुणी मुलगी. आईबाबांशी भांडून आंदोलनात सामील व्हायला आलेल्या कुणी होत्या, तर आईबाबांना न सांगता गुपचूप आंदोलनस्थळी आलेल्याही होत्या. त्यांच्या या सहभागात धैर्य आणि समयसूचकता होती, निर्धार होता, आईची ममता होती, अन्यायाबद्दलची चीड होती, धीट विनोद होता, कणखर आत्मविश्वास होता.
पण सगळ्यांमधला एक समान धागा म्हणजे सामाजिक चौकटींच्या सीमा भेदून त्यापल्याड जाणारं नितांतसुंदर मोकळेपण होतं. ‘पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून’, ‘पुरुषांच्या पावलावर पाऊल टाकून’ ही रुळलेली भाषा या मुलींनी बाद करून टाकली. त्या एक पाऊल पुढे होत्या. बरोबरीच्या लोकांची ढाल होत होत्या, चुकीचं वागणार्याची कॉलर धरून जाब विचारत होत्या, धीटपणे विरोध नोंदवत होत्या, नि:शंकपणे तिथेच आडव्या होऊन थोडी झोप घेत होत्या. एखाद्या सुरक्षित स्थळी वावरावं तशा मोकळेपणी वावरत होत्या.
हे कशामुळे घडलं असेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्यायाबद्दलचा असंतोष. मेहनत करूनही केवळ सरकारी यंत्रणेतल्या दोषांमुळे अन्यायाला सामोरं जावं लागण्याबद्दल समाजाच्या सगळ्या थरांमध्ये असंतोष होता. देशभरातून, सर्वधर्मीय, सर्वस्तरीय पाठिंबा आंदोलनाला मिळाला, त्यामागचं ते एक कारण होतं, असं या सगळ्या आंदोलनाबद्दलच म्हणता येईल. पण आंदोलनातल्या स्त्रियांच्या सहभागाचं काय? त्यावर असं म्हणता येईल की, स्त्रीशिक्षणाने बर्याच अंशी हे काम केलं आहे. आपले हक्क आणि आपली कर्तव्यं यांचं लख्ख भान आलं तरच असा आत्मविश्वास येतो.
दुसरं म्हणजे, समाजाच्या निदान उच्चमध्यमवर्गीय स्तरामधल्या संगोपनाच्या कल्पना. स्त्री-पुरुष समानता हा आता निव्वळ पुस्तकातला विषय उरलेला नाही. सगळीकडेच हे चित्र नसलं तरी बर्याच शिक्षित घरांमधून मुलींना मुलांहून वेगळं वाढवलं जात नाही. काही पुरुषांची त्याच्या आधीच्या पिढीकडे बघणारी आणि त्याच्या जोडीदाराकडे बघण्याची नजर आजही काही प्रमाणात बुरसटलेली आहे हे खरं, पण पोटच्या मुलीच्या बाबत मात्र चित्र मोठ्या प्रमाणात पालटत चाललेलं आहे. मुलींना सक्षम करणं हा अनेक आईबापांचा प्राधान्यक्रम असतो. अपवाद अर्थात असतात, पण बदलही बराच झाला आहे.
तिसरं कारण इंटरनेटनं दिलेली जगाकडे बघण्याची खिडकी. स्मार्टफोनचे तोटे आहेत, तसे फायदेही आहेतच. मुलांना त्या माध्यमातून अक्षरश: सगळं जग खुलं होत असतं. राजकारण आणि युद्धं, घडामोडी, त्यावरच्या प्रतिक्रिया, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षणाच्या नि कामाच्या संधी, पर्यावरण, लैंगिक आयुष्य नि नातेसंबंध… अक्षरश: म्हणाल त्या विषयावर जगात काय चालू आहे, हे जाणून घेण्याची संधी मुलांना असते आणि मुलं या ना त्या प्रकारे ही माध्यमं वापरतातच. अशा प्रकारच्या ‘एक्स्पोजर’ मुळेही ‘आम्ही सांगतो म्हणून ऐका’ अशा धर्तीवर मुलांशी वाद घालणं अशक्यप्राय होऊन बसल्याचं अनेक वाचकांनाही अनुभवानं माहीत असेल. या प्रकारच्या जडणघडणीतून लिंगभावाबद्दलचं मोकळेपण येतं.
ही मुलं ज्या जगात आणि काळात जन्मली आहेत, त्या जगात ‘मुलग्यांनी(ही) स्वयंपाक करणं शिकलं पाहिजे’ हे धक्कादायक सत्य नव्हतं, निव्वळ एका व्यावहारिक सोयीचा भाग होता. लैंगिक संबंध तर सोडाच, पण समलिंगी संबंध हीदेखील आज तितकी अस्वीकारार्ह बाब उरलेली नाही. या पिढीच्या ‘टीनएजर्स’चे वादाचे विषयच मुळी ‘He, She, It We’ ही सर्वनामं वापरायची की ‘They / Them’ वापरायची, इथून सुरू होतात. त्यांना वडीलधाऱ्यांची भीती वा धाक नाही, त्यामुळे ‘काय बोलू, कसं बोलू…’ असे अनाठायी संकोचही नाहीत. ती मोकळेपणानं स्पष्ट बोलतात आणि विसरूनही जातात. शिव्या, लैंगिक उल्लेख, बीभत्सपणाच्या सीमारेषेवरचे विनोद, छे छे… रील्स आणि मीम्स! यांविषयी एक प्रकारचा नि:संकोच बिनधास्तपणा असतो. ज्या प्रकारच्या वातावरणात आपण वाढलो, त्यात हे धक्कादायक वाटणं साहजिक आहे. पण या संदर्भात एक झेन कथा आठवते.
एक तरुण आणि एक वृद्ध भिक्षू ओढ्याजवळून चालले होते. तिथून जाणार्या एका तरुण स्त्रीनं ओढा पार करण्यासाठी त्यांची मदत मागितली. तरुण भिक्षूनं तात्काळ नकार दिला. वृद्ध भिक्षूनं मात्र त्या स्त्रीला हात धरून पलीकडच्या किनार्यावर सोडलं. तरुण चकित झाला. त्यानं वृद्ध भिक्षूला त्याबद्दल विचारलं. त्यावर हसत वृद्ध म्हणाला, ‘‘मी तिला पलीकडे सोडूनही आलो आणि विसरूनही गेलो. पण तू अजूनही तिला मनात घेऊन फिरतो आहेस की…!’’ तेव्हा कुठे त्या तरुणाला त्याची चूक कळली. आपण सगळे जण त्या तरुण भिक्षूसारखं तर वागत नसू ना? भाषा क्षेत्रातलं संशोधन असं सांगतं, की भाषेची पुढची पावलं ठरवण्यामध्ये पौंगडावस्थेतल्या मुलांचा आणि त्यातही मुलींचा लक्षणीय सहभाग असतो.
परंपरेनं घातलेली बंधनं झुगारण्याकडे असलेला कल, बरोबरीच्या मित्रमैत्रिणींमध्ये घालवलेला भरपूर वेळ, समुदायाचा दबाव (पीअर प्रेशर), स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची तीव्र इच्छा या सगळ्या गोष्टी भाषेवर परिणाम घडवून आणतात आणि भाषेतूनच व्यक्तही होतात. त्यातही मुलींना एका सामाजिक असमतोलासकट वावरायचं असतं, स्वत:ला जपायचंही असतं, आणि सिद्धही करायचं असतं. त्यामुळे त्या भाषेचा वापर अधिक लवचीकपणे, कौशल्यानं करतात, भाषिक बदल अधिक वेगानं आत्मसात करतात आणि त्यांचा जोमानं प्रसारही करतात. व्हर्चुअल (आभासी) माध्यमांमध्ये घडणारा संवाद-संपर्कही याच प्रकारे चालतो, किंबहुना भौगोलिकदृष्ट्या अधिक दूरगामी परिणाम घडवून आणतो.
थोडक्यात, या मुलामुलींची भाषा ही उद्याची भाषा आहे. ती आत्मसात करणं पटो न पटो, तिच्याकडे मोकळेपणानं बघणं तरी आवश्यकच आहे. असा सगळा विचार केला, की या आंदोलनातल्या स्त्रीसहभागाचं नवल वाटेनासं होतं. वाघीण म्हणून जन्मलेल्या नि वाघिणीसारख्याच वाढलेल्या या पोरी दुसरं कसं वागणार होत्या! कुठल्याही सामाजिक अवकाशातल्या उपक्रमामध्ये स्त्री-पुरुष समसमानरीत्या सहभागी असतील, तर त्या समुदायातल्या लोकांच्या परस्परांप्रतिच्या सभ्यपणाचं नि ऋजुतेचं प्रमाण लक्षणीयरीत्या उंचावतं, असं एक समाजशास्त्रीय निरीक्षण सांगतं. इथंही ते दिसलं. आंदोलनातल्या सहभागाविषयीचे अनुभव सांगताना अनेक मुलींनी असे नोंदवले की, अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये बहुतकरून पुरुष असतात. कोण कसे स्पर्श करतील याचा भरवसा नसतो, त्यामुळे सुरुवातीला मनात थोडी धाकधूक होती.
पण आंदोलनाच्या जागी आल्यावर सगळ्या शंका-कुशंका विरून गेल्या. पूर्णत: अनोळखी असलेल्या मुला-पुरुषांनी आम्हाला पोलिसांपासून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या वागण्यात एखाद्या मित्रासारखा मोकळेपणा आणि सहज जपणूक होती. त्यामुळे दिल्लीसारख्या, मुलींसाठी असुरक्षित मानल्या गेलेल्या शहराच्या पोटातही अतिशय सुरक्षित वाटलं. कुणाचा चुकून धक्का लागलाच, तर पटकन मनापासून ‘सॉरी’ ही म्हटलं जायचं. स्वत:च्या शरीराविषयीचे संकोच, सतत स्वत:ला सांभाळत राहण्याची जबाबदारी, मनातली सार्वजनिक अवकाशाबद्दलची भीती या आंदोलनात वावरताना विरून गेली. असं वातावरण कायम सगळीकडेच का नसतं?’’ कायम तथाकथित सभ्य-सुसंस्कृत भाषेत बोलणार्या आपल्यासारख्या ‘मिलेनियल्स’ वा ‘बूमर्स’कडे या प्रश्नाचं काय उत्तर आहे?
