शर्मिला पुराणिक
परवाच मी माझी मैत्रीण गीताकडे गेले होते. मुलाने लवकर सून आणली म्हणून ती खूश  होतीच, त्यातच नातूही लवकर झाल्याने दुधात साखर पडली होती… मला तिच्याकडे जाताना खरं तर नेहमीच कौतुक वाटतं, कारण गीताच्या घरात तीन पिढ्या एकत्र राहतात. हल्लीच्या दिवसांतलं दुर्मीळ असं हे चित्र. पण एकत्र असणं आणि एकजीव होणं यात फरक असतो, हे मला तोपर्यंत कळायचं होतं.

आम्ही गप्पा मारत असताना तिचा मुलगा आला आणि ‘‘आई, आम्ही दोन दिवस बाहेर जातोय. कोण, कधी, कुठे हे मी तुला रात्रीपर्यंत ‘टेक्स्ट’ करतो.’’ असं म्हणून तो आतल्या खोलीत निघूनही गेला. तेवढ्यात दुसरीकडून तिची सून आली. आमच्या जवळच तिचा पाच वर्षांचा मुलगा खेळत होता, त्याला म्हणाली, ‘‘कियान, स्कूलमध्ये डॉगीसाठी फाईव्ह सेन्टेन्स बोलायची आहेत, आर यू रेडी?’’ तर तो चिमुरडा म्हणाला, ‘‘मम्मा डोन्ट वरी, आय विल आस्क अलेक्सा,’’ मी हे सारे संवाद ऐकत होते. गीता म्हणाली, ‘‘काही कळत नाही.

आठवडाभर कामात असतात म्हणून आमच्याशी फारसं बोलणं होतं नाही आणि शुक्रवार, शनिवार आला की यांना बाहेर जायचंच असतं, तेही उशिरापर्यंत. मग दुसर्‍या दिवशी उशिरा उठणं क्रमप्राप्त आणि रविवारी तर दिवस-दिवस मॉलमध्ये फिरत राहतात, काय आणि किती खरेदी ती, अंतच नाही. ठेवायला जागा नाही आता घरात. आपणही तरुण होतोच ना गं? असं बाहेर जायचो का दर रविवारी? नातेवाईक, काही कार्यक्रम असेल तरच नाहीतर कुठेच नाही. या मुलांना ऑफिसचं काम नसेल तेव्हा घरी बसवतच नाही आणि हा कियान तर एका हातात ‘टॅब’ आणि दुसर्‍या हातात ती ‘अलेक्सा’ घेऊनच जन्माला आलाय असं वाटतं. तो आपला त्यातच गुंग. हसणं खेळणं विसरलंच आहे हे घर. वस्तूंनी घर भरलंय, पण…’’ असं म्हणत तिने मोठ्ठा सुस्कारा सोडला.

आजकाल दूरचित्रवाणीवर काही बघताना, समाजमाध्यमांवर काही वाचताना किंवा साध्या गप्पांमध्येही पिढ्यांच्या आचार विचारात तफावत जाणवत राहते. पंचेचाळीसची आई मुलीला म्हणणार, ‘‘काय चर्चा करायची ती घरी करा, मी देते मस्त कॉफी करून, पण मुलीला त्या महागड्या दुकानात एका कॉफीला ३०० रुपये दिल्याशिवाय काही सुचतच नाही म्हणे.’’ १८ वर्षांचा आर्यन म्हणणार, ‘‘मी मम्माला पाठवलेला मेसेज ती वेळेवर बघणार नाही. मैत्रिणींच्या ग्रुपवरचे लांबच लांब मेसेज वाचत बसेल आणि मी जेवायला नाही हे अचानक कळले म्हणून आरडाओरडा करणार, कसं करायचं?’’  १५ वर्षांची सानिया म्हणणार, ‘‘मम्मा कधी कधी फारच टॉक्सिक होते.

मी कोणते कपडे घालायचे यावर हिचं लक्ष आणि ही स्वत: शाळा-कॅालेजचे गेट-टूगेदर, किटी पार्टीला वाटेल तसे कपडे घालते, हे बरं चालतं? आवरा तिला.’’ अगदी ५-६ वर्षांची बच्चे कंपनी म्हणणार, ‘‘मला बोअर करू नको, मी बिझी आहे.’’ किंवा आजीने पापा मागितला तर म्हणणार, ‘‘तुझा मोबाइल दे, मग पापा देतो.’’ हे असे सगळे संवाद ऐकले की लक्षात येतं की, ‘जेन एक्स’(Gen X ), ‘जेन झी’(Gen Z) आणि ‘जेन अल्फा’(Gen Alfa) या तीन पिढ्यांच्या नात्यामध्ये खूप अंतर पडलंय.

तिघांचे तीन कॅलेंडर आहेत. ‘जेन एक्स’ (जनरेशन एक्स) म्हणजे आता साधारण ४५ ते ६० वयोगटातले. आई, बाबा, मावशी, काका, कार्यालयातले वरिष्ठ अधिकारी बॉस हे सगळे, तर ‘जेन झी’(जनरेशन झी) म्हणजे साधारण आत्ता १३ ते २८ वयोगटातले, ‘जेन अल्फा’ (जनरेशन अल्फा) म्हणजे २०१३ नंतर जन्मलेली मुलं म्हणजे आजची १३ वर्षांपर्यंतची मुलं. खरं तर पिढ्यांमधलं अंतर आणि त्यातील ताणतणाव यात नवीन काहीच नाही. पिढी दर पिढी हे होतंच आलंय. ‘‘आमच्या वेळी असं नव्हतं,’’ हे बहुतेक प्रत्येक पुढच्या पिढीला ऐकावं लागतं, हे होणंही कदचित स्वाभाविकच. परंतु फार पूर्वी दोन पिढ्यांतील वैचारिक अंतर फार नसायचं. अगदी अलीकडेपर्यंत किमान पाच वर्षांचं वैचारिक अंतर मानलं जायचं. मात्र हल्ली हे अंतर फारच जास्त वाटू लागलं आहे.

एकाच छताखाली दोन-तीन वेगळी विश्वं जगत आहेत असं वाटतं. अशावेळी ते कुटुंब एकत्रित ठेवायची जबाबदारी कुणाची?  ‘जेन एक्स’ आपल्या मुलांना विचारेल, ‘‘जेवलास का? जेवून मगच बाहेर जा.’’ म्हणजे ही पिढी प्रेम, काळजी दाखवणार, तर अगदी उलट ‘जेन झी’ म्हणेल, ‘‘अरे, किती लुडबुड किंवा किती आमच्यावर कंट्रोल? ‘जेन एक्स’ एका प्रश्नावर दहा जणांची मतं विचारेल तर ‘जेन झी’ त्याचसाठी समाज माध्यमांवरील एखाद्या ‘रील’ मधून शंकांचे निरसन करेल आणि इतरांना सहभागी करून घेईल. ‘जेन एक्स’ म्हणेल, ‘‘बाहेर कुठे बोलू नको, घरातच प्रश्न सोडवू,’’ तर ‘जेन झी’ पटकन इतरांची मदत घेईल आणि मोकळेपणाने सांगेल, ‘‘घेतली मी मदत…’’ ‘जेन एक्स’साठी मोठ्यांचा आदर म्हणजे वाद टाळणं तर ‘जेन झी’ला आदर म्हणजे समान वागणूक आणि कोणालाही प्रश्न विचारण्याचे अधिकार तर ‘जेन अल्फा’ मंडळी, ‘एआय’(कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या जगात सगळं मिळतं या विश्वात रमलेली. त्यामुळे या पिढीला सगळं ज्ञान, माहिती हातात मिळते किंवा ते शोधतात तरी. 

या सर्व गोष्टींचा विचार केला तर लक्षात येईल की, ‘जेन एक्स’लासुद्धा स्वतंत्रपणे अनेक गोष्टी करण्याची, बोलण्याची,  शिकण्याची, खाण्याची, हवे तसे कपडे घालण्याची मुभा किंवा मोकळीक होती तरी त्याला एक विचार, नियम, लोकमत, समाज यांची चौकट होती. पण आता ‘जेन झी’ कडे (कदाचित ‘जेन एक्स’ने दिल्यामुळे ) किंवा परिस्थितीमुळे या सर्वच गोष्टींची वाजवीपेक्षा जास्त उपलब्धता झाली आहे. त्यांच्यासमोर येणार्‍या आणि घडणार्‍या गोष्टी वेगात आणि खूप जास्त प्रमाणात येत आहेत. म्हणजे अगदी तोंडावर पाण्याचा फवारा मारला तर जसं गुदमरल्यासारखे होईल तसं होतंय त्याचं. हे सगळं पाहून असं वाटू लागलंय, की अगदी जवळच्या नात्यात, घरात या ‘जेन झी’लासुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीशी ‘जेन अल्फा’बरोबर जमवून घेता येईल ना? पण आशावादी असायला हरकत नाहीच. या पिढ्यांना बांधणारा सांधा सापडणारच नाही असंच नाही. सापडेल काहीतरी…

दोन पिढ्यांना एकमेकांच्या मनातील थोडं वेगळं ऐकता येईल?  ‘लोक काय म्हणतील’ यापेक्षा माझं मूल काय म्हणतंय हे थोडं शांतपणे ऐकलं तर जमेल का? सतत तंत्रज्ञानाला नावं न ठेवता त्याचा योग्य उपयोग करता येईल का? ज्यामुळे आपल्याही माहितीची कक्षा विस्तारेल? आमच्या वेळी ‘डिप्रेशनचे फॅड’ नव्हतं म्हणण्यापेक्षा ते कमी करायला किंवा मुलांना ताण का येतोय याचा विचार करून त्यांना कशी साथ देता येईल हे पाहता येईलच का? समाज माध्यमं ही आधीच्या पिढीची आहेत, पुढच्या पिढीच्या नसानसात ‘ए आय’ वाहाणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते फक्त वेळ वाया घालवणं नाही तर कदाचित कुठल्याशा कामाची किंवा नवीन सुरुवात असेल, हे आधीच्या पिढीला समजून घेता येईल का? आपल्या समजण्याच्या बाहेर अनेक गोष्टी असणारच आहेत, जसं ‘जेन एक्स’ किंवा त्याही आधीच्या पिढीला अनेक गोष्टी कुठे माहीत होत्या. त्याही त्या त्या पिढ्यांनी समजून घेतल्याच ना. तसं या पिढीचंही नवीन काही असेल तर ते निदान समजून घेण्याचा प्रयत्न तर केला पाहिजे ना?

मी वयाने मोठा आहे ना? मग मला समजतं तेच बरोबर… असा अट्टहास सोडता यायला हवा ना? याउलट मुलांनीही आपल्या पालकांना असंच समजून घेणं अपेक्षित आहे.  सगळीच मोठी माणसं काही ‘टॉक्सिक’ नसतात तर बरे-वाईट अनुभव घेतलेली लोकच असतात, तेही कधी चुकले तर काही त्यातूनही शिकले आहेत. काही तर कधी फसलेसुद्धा आहेत. तेव्हा पाल्य हो, तुम्ही कोणत्याही पिढीचे असाल, तुमचे विश्व अवाढव्य आहे त्याचं पालकांना सतत दडपण येतंच. तुम्ही त्यांचा हात घट्ट धरलात, तर तुमच्या विश्वात ते येऊ शकतील.  तुमच्यासाठी ‘रील्स अपडेट’ महत्त्वाचं असतं तसंच घरी थांबलात तर त्यांच्या नात्यांची खरी रील्स पाहता येतील.

मजा येईल कदाचित. कारण तुम्हाला अपेक्षित नसलेली पण तुम्हाला आवडणारी एखादी कृती पालकांकडून होईल. आताच्या मुलांना स्वातंत्र्य हवंय, जगण्यातला अवकाश हवा मान्य आहे, पण त्याबरोबर येणारी जबाबदारीसुद्धा घेता यायला हवी ना? नाहीतर कदाचित भविष्यात मोठ्या, अनपेक्षित अडचणी येऊ शकतील आणि त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी नसेल, समोर कुणीच नसेल आधाराला. मग? म्हणूनच मग एखादी वेब सीरिज, एखादा चित्रपट बघताना आई, मावशी, आत्या, काका, मामाला जरूर हसा, पण ती बघायला कधीतरी त्यांच्या बरोबर बसा तर. आजच्या जेन ‘झी’ला अर्थात पालकांना ‘जेन अल्फा’ (अर्थात पाल्यांबरोबर) अनेक गोष्टी करताना ते यांचं विश्व तर आभासी जग, अनाकलनीय संकल्पना आणि कमालीचा वेग यांनी गुरफटून गेल्यासारखं वाटतंय. तर एकीकडे पाल्यांना हातातील मोबाइल फोन किंवा टीव्हीवर दिसणारं दृश्य हेच वास्तव वाटू लागलंय. त्यांना चंद्रावरच्या मातीचा पोत माहीत असेल, पण आपल्या शाळेच्या मैदानावरील माती हाताला कशी लागते हे माहिती असेलच असं नाही. ‘जेन अल्फा’ला ‘एआय’च्या मदतीने आभासी मित्रांबरोबर तासन् तास गप्पा मारता येतील, पण बाजूला बसलेल्या आई किंवा आजीच्या मांडीवर डोकं ठेवून, थोपटून घेतानाचा आनंद माहिती असेलच असं नाही.

सर्वच पिढ्यांनी सगळ्याच बाबतीत ‘आज, आत्ता, ताबडतोब’ चा आग्रह धरला नाही. बदलता काळ, परिस्थिती स्वीकारली आणि त्यानुसार थोडी लवचीकता दाखवली. अनेक गोष्टीत पूर्वग्रह न ठेवता संवाद साधला तर सध्या प्रत्येक घरात बहुतांशी पाहायला मिळणारी प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र खोली, अर्थात एकाच घरात प्रत्येकाची स्वतंत्र बेटं राहाणार नाहीत.

सगळे निखळपणे एकत्र आले तर ‘जेन एक्स’ आणि ‘जेन झी’च्या बरोबरीनं ‘जेन अल्फा’ही एकाच खोलीत एकत्र मजा करताना, एकमेकांबरोबर हसताना, क्वचित प्रसंगी रडतानासुद्धा दिसतील.

(लेखिका वैवाहिक आणि नातेसंबंध या विषयाच्या समुपदेशक आहेत.) 

25.sharmila@gmail.com