पूर्वीच्या आणि आत्ताच्या पिढीतील लोकांच्या जगण्यात जमीन आस्मानाचा फरक पडलाय. गेल्या काही वर्षांत जगण्याला आलेल्या वेगाशी जुळवून घेताना मागची पिढी थकतेय आणि त्यांना आपल्याबरोबरीने कसं चालवावं, या संभ्रमात आताची पिढी आहे. मागच्या पिढीची जगण्यातली स्थिरता, आजच्या पिढीसाठी प्रगती खुंटवणारी वाटते.आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीचा अनुभव प्रत्यक्ष आणि तोही आत्ताच घ्यायचाय, कारण कुणास ठाऊक, कल हो ना हो! त्यामुळे कमवायचंही आहे आणि खर्चही एकाच वेळी करायचा आहे, जे मागच्या पिढीला उधळणं वाटतंय… असे अनेक विषय घरात स्फोट घडवताहेत. कालच (१५ मे) झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिना’निमित्ताने जनरेशन एक्स, जेन झी, जेन अल्फा… या बदलत्या पिढ्यांविषयीचे दोन लेख, शेवटी सारं येऊन ठेपतं ते कुटुंबाच्या आनंदापाशी हे सांगणारे…

‘‘आई-बाबा, मी यंदा ‘सोलो ट्रिप’साठी थंडीत लॅपलँडला जाण्याचा विचार करतेय आणि हो! खर्चाचं टेन्शन घेऊ नका. मी करेन मॅनेज!’’ २६ वर्षांची स्वानंदी जेवताना सहज बोलून गेली. हे ऐकल्यावर घरामध्ये काही सेकंद एकदम शांतता पसरली. त्या शांततेत काळजी, धक्का आणि बरीच चलबिचलही होती आणि त्याबरोबरीनं ‘‘आमची लेक स्वतंत्रपणे इतके मोठे निर्णय कधीपासून घ्यायला लागली? आता कुठे हिने कमवायला सुरुवात केली आहे. परदेशी सहलीचा खर्च परवडणार आहे का? काही गुंतवणूक आणि भविष्याचा विचार केलाय की नाही हिने?’’असे अनेक प्रश्नही होते.

तिच्या पालकांना लेकीला प्रोत्साहन द्यायचं तर होतं, पण त्यांच्या मनात कित्येक प्रश्नांचं वादळही घोंघावत होतं. अचानक पसरलेली शांतता पाहून स्वानंदीला पालकांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज आला. तरीही तिने धीर एकवटून विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही गं. तू परदेशात फिरायला जाणार म्हणून आनंदच वाटतोय. पण एवढं सगळं कसं जमवशील याची काळजीही वाटतेय!’’

‘‘चिल, गाईज. माझा सगळा प्लॅन रेडी आहे. कुठे जायचं, कसं जायचं, कुठे राहायचं, काय खायचं, काय प्यायचं. सब सेट है! आणि काही अडलंच तर ‘एआय’(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आहे ना! काही काळजी करू नका.’’ ‘‘तुझी तयारी बरीच झालेली दिसतेय. पण तू याच वर्षी तो महागडा फोन घेतलास आणि बाकीचे खर्चही आहेतच तुला. मग या वर्षाअखेरीस युरोप सहल परवडेल का?’’

‘‘कम ऑन! माझे सेव्हग्िंज आहेत तसे. मीसुद्धा विचार करूनच बोलतेय. म्हणूनच मला तुम्हाला इतक्यात सांगायचं नव्हतं.आता वर्षभर खर्चाबद्दल लेक्चर देत राहणार तुम्ही! जाऊ दे! उगाच बोलले.’’

‘‘अगं, तसं नाही. पण सगळी सेव्हिंग्ज एका सहलीमध्ये संपवलीस तर पुढचं काय? थोडं ‘लाँग टर्म प्लानिंग’ पण हवं ना!’’

‘‘तुम्हाला असं का वाटतं, की मी भविष्याचा अजिबातच विचार करत नाहीये? तुम्ही इतक्या सहजासहजी हे गृहीत धरता की, मला यापुढे याबद्दल काहीही बोलायचंच नाही.’’ जेवण आटपून थोडी फुरंगटूनच स्वानंदी आपल्या रूममध्ये निघून गेली.

‘‘आपल्या वेळेस नव्हतं बुवा असं काही. एकतर आपण पालकांना आधी ‘हे करू का’ असं विचारायचो आणि मग काय ते ठरवायचो. आजची ही ‘जेन झी’ (जनरेशन झी) आणि ‘जेन अल्फा’ (जनरेशन अल्फा) पिढी सरळ जे असेल ते सांगून टाकते. त्यात आपल्याशी सल्लामसलत करणं तर दूरचीच गोष्ट. आपल्या पिढीने आधीच्या पिढीसारखा अगदी पै-पै साठवून संसार नसेल केला, पण कुटुंबाला सांभाळलं, मुलांना जितक्या सोयीसुविधा पुरवता येतील तितक्या दिल्या. आजकालची पिढी या ‘कॅफे कल्चर’, ‘इन्स्टंट डिलिव्हरी’ आणि ‘सोशल मीडिया’च्या नादात बाहेर खाण्यावर आणि फिरण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करते. म्हणजे गुंतवणूक वगैरे करत असतील ते, पण अवाचे सव्वा खर्चसुद्धा करतात. आपणच इतकं स्वातंत्र्य दिलं का यांना? कठीण आहे या पिढीचं!’’ स्वानंदीचे पालक एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या तारुण्यात त्यांनी अनुभवलेल्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांचं म्हणणं बरोबरच होतं. स्वानंदीलाही हे दोन पिढ्यांमधलं अंतर जाणवत होतंच.

आपले पालक, त्यांचे पालकही आयुष्यभर केवळ आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य शोधत राहिले. आणि त्यांनी त्यासाठी केलेली अथक धडपडसुद्धा तिला ठाऊक होती. पण त्यांनी वर्षानुवर्षं घेतलेले अतोनात कष्ट आणि जबाबदार्‍यांमागे धावता धावता स्वत:च्या हौशीला घातलेली मुरडसुद्धा तिने पाहिली होती. हा एकच जन्म आपल्याला मिळणार आहे, असं मानून चाललो तर केवळ इतरांसाठी स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या झिजवून, आपल्या स्वप्नांना लगाम घालून, वय वाढत गेल्यावर आम्हाला कशा मनासारख्या गोष्टी करता आल्या नाहीत याबद्दल वाईट वाटण्यापेक्षा आताच जगून घेऊ या ना? आणि तसंही आपल्या पालकांच्या पिढीतल्या सगळ्याच व्यक्ती इतक्या शिस्तबद्ध जीवन जगणार्‍या नव्हत्या. कारण कोणतीच पिढी कधी ‘परफेक्ट’ नसते. आमचीही नाहीये, याची तिला चांगलीच जाणीव होती.

खरं पाहिलं तर हा फक्त वयाचा फरक नाही. हा अनुभवांचा, भीतीचा, जगण्याच्या पद्धतीचा आणि बदलत्या जगाशी जुळवून घेण्याच्या वेगातील फरक आहे. या फरकांमुळे दोन पिढ्यांमधील दरी मात्र वाढत चालली आहे. आताची ‘जेन झी’ आणि तिच्या पुढच्या पिढ्या माहितीच्या महाविश्वात जन्मल्या आहेत. अगदी जन्मल्यापासूनच त्यांच्याकडे निवडीसाठी असंख्य पर्याय आहेत. टीव्ही चॅनेल्सपासून ओटीटीपर्यंत, देशी-परदेशी कपड्यांपासून विविध शैक्षणिक बोर्डांपर्यंत, पर्याय मोजू तितके कमीच! जगभरातील लोक, कला, संस्कृती, करिअरचे पर्याय आणि लाइफस्टाइल. त्यांंच्या एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध आहेत. त्यामुळेच आज आजी-आजोबा, आई-बाबा आणि त्यांची मुलं यामधला ‘जनरेशन गॅप’ हा फक्त कपडे, मोबाइल किंवा समाजमाध्यमांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो जगण्याच्या शैलीपर्यंत पोहोचला आहे.

‘समृद्ध आयुष्य’ म्हणजे नेमकं काय याची व्याख्याच बदलली आहे. आधीच्या पिढीसाठी स्थिर नोकरी, बचत, लग्न, मुलं, घर हे टप्पे गाठणं म्हणजे सुरक्षिततेचं प्रतीक होतं. हे स्थैर्य म्हणजेच परिपूर्ण जीवन जगणं अशी अनेकांची दृढ समजूत होती. पण आता निवृत्तीपर्यंत एकाच (किंवा फार फार दोन) कंपनीत काम करणारी, तारुण्यात बचत करून एकदा जबाबदारीमधून मोकळं झालो की फिरायला जाऊ या असं म्हणणारी ही नवी पिढी नाहीये, हे पचवणं आताच्या पालकांना काहीसं अवघड जातंय. ‘जेन झी’ला सतत नावीन्य हवंय. अर्थात, यासाठी समाज माध्यमेसुद्धा तितकीच जबाबदार आहेत. या पिढीसाठी ‘जगणं’ म्हणजे फक्त पैसे कमावून निवृत्तीसाठी तजवीज करणं नाही; तर, देशा-परदेशांतील खाण्यापिण्याचे-हिंडण्याचे अनुभव घेणं, स्वत:ला भावनिकदृष्ट्या समजून घेणं, शारीरिक आरोग्याकडे या वयातच लक्ष देणं असू शकतं. आजच्या अनेक तरुणांनी अर्थव्यवस्थेतली अस्थिरता, मोठमोठ्या जागतिक कंपन्यांनी अचानक केलेली टाळेबंदी, करोनामुळे जीवनात एकंदर आलेली अनिश्चितता खूप कमी वयात जवळून पाहिली आहे. ‘‘आजचं आज बघू, क्या पता – कल हो ना हो?’’ असं म्हणून भविष्याचा विचार करता करता, वर्तमानकाळ जगायचा राहून गेला, असं व्हायला नको म्हणून ही पिढी बरीच धडपड करतेय. आपल्या पालकांनी आर्थिक स्थैर्यासाठी एकाच कंपनीत राहून काम केलेलं असलं तरी आता एकाच पद्धतीचं काम सतत करून साचलेपण जाणवल्याने, मनासारखी पगारवाढ न झाल्याने किंवा ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ नसल्याने आजची पिढी अवघ्या काही वर्षांतच (किंवा अगदी महिन्यांतही) नोकर्‍या बदलत आहेत. आपल्याला जगण्यासाठी काम करायचं आहे, काम करण्यासाठी जगायचं नाहीये, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे.

पिढ्यांमधले हे अंतर  केवळ भौतिकवाद म्हणजेच सुख-सुविधा, पैसा (मटेरियलिस्टिक) या गोष्टींपुरते मर्यादित नसून भावनिक विश्वातही आढळत आहे. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये भावनिक विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. बालपणात अनुभवलेला शारीरिक, मानसिक आघात, नैराश्य, चिंता या गोष्टी त्यांनीही अनुभवल्या होत्या. मात्र मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोललं जात नसल्याने कितीही त्रास होत असला तरी त्याकडे बरंच दुर्लक्षही होत होतं. पण आजची पिढी जास्त उघडपणे आपल्या भावना व्यक्त करत आहे. यातील कित्येक जण स्वत:ला समजून घेण्यासाठी थेरपीचा आधार घेत आहेत आणि इतरांनासुद्धा ही थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. तरीही आधीच्या पिढीकडून ‘‘आम्हाला काही याची गरज नाही. आम्ही आमचं मानसिक आरोग्य जपायला सक्षम आहोत,’’ असं बरेचदा ऐकायला मिळतं. तेवढा मोकळेपणा, स्वीकारार्हता आधीच्या पिढीत नसते. म्हणून आज मुलं जेव्हा आई-वडिलांसोबत त्यांचं खासगीपण, पालकत्व आणि जीवनशैली या विषयांच्या ‘बाऊन्डरी सेट’ करण्याबद्दल किंवा लिंगभाव ओळखीबाबत(जेंडर आयडेंटिटीबाबत) बोलतात, तेव्हा आपण यावर नक्की कसा संवाद  साधायचा, हा त्यांना प्रश्न पडू शकतो. 

घरी मोकळेपणाने करता न येणारे संवाद इंटरनेटमुळे आभासी जगात केले जाऊ लागलेत. ‘जेन झी’साठी आज ‘ऑनलाइन’ जग हे केवळ लक्ष विचलित न करता, स्वत:ची ओळख निर्माण करण्याचं आणि अनेक लोकांशी जोडून राहण्याचं साधन बनलंय. विशेषत: ‘क्वीअर’ व्यक्ती आणि मेंदूची रचना सामान्यपेक्षा वेगळी असणार्‍या (Neurodivergent) तरुणांना त्यांच्या अनुभवांकडे पाहण्यासाठी आणि स्वत:ला स्वीकारण्यासाठी या माध्यमांचा वापर केला जाताना दिसतोय. आधीच्या पिढीला ज्या गोष्टी समाज माध्यमांवर ‘टाइमपास’ वाटायच्या, त्याच गोष्टी आता कित्येकांच्या मिळकतीचं साधन बनतायत. पण त्याचवेळी समाज माध्यमांवरील परक्या व्यक्तींबरोबर केलेली तुलना, सतत निर्मितीक्षम किंवा कल्पक, सर्जक असण्यासाठीचा दबाव आणि ‘परफेक्ट लाइफ’ असल्याचं प्रदर्शनही वाढत चाललंय.

‘जेन झी’ आणि त्यांच्या पुढील पिढ्यांना जितक्या सोयीसुविधा मिळाल्या आहेत, तितक्याच त्यांच्या समस्याही वाढल्या आहेत. वाढती महागाई आणि ‘हम दो, हमारा एक’मुळे विभक्त कुटुंबपद्धतीकडे वाटचाल सुरू झाली आणि आई-बाबा कामावर जात असल्याने आताची ‘जेन झी’ अनेक गोष्टींत स्वावलंबी बनली. पुढे शिक्षण किंवा कामानिमित्त अनेक जण इतर शहरांत किंवा देशांत स्थायिक व्हायला लागले आणि सतत आसपास असणारी जिवाभावाची समवयस्क मंडळी कमी कमी व्हायला लागली. कट्ट्याची जागा आता ‘व्हॉट्सॲप’ ग्रुपने घेतली. हळूहळू जिवलग दोस्तांसोबतचे बेतही वेळापत्रक बघून बरेच आठवडे आणि महिने आधी नियोजित व्हायला लागले. इंटरनेटमुळे जग तसं बरंच जवळ आलं. पण या धावत्या जगात ‘जेन झी’चा एकटेपणा मनाच्या एका कप्प्यात तसाच दडून राहिला. कदाचित त्यातूनच आपलं किती मस्त चाललंय आणि आपण या सगळ्याशी किती सुसंगत आहोत हे दाखवण्यासाठी समाज माध्यमांवर चढाओढ सुरू झाली.

जसे प्रत्येक पिढीत असतात तसेच ‘जेन झी’लाही अपवाद असणारच की! त्यांना उपलब्ध असलेल्या असंख्य पर्यायांमुळे कधी कधी त्या नादात एक ना धड भाराभर चिंध्या असंही होतंय. त्यांचा हा चोखंदळपणा कधी कधी नात्यांमध्ये दिसून येतो. एखादं नातं कसं ‘परिपूर्ण’ असावं आणि दिसावं याच्या टोकाच्या कल्पना समाज माध्यमांवरून आत्मसात केल्याने कित्येक नात्यांना बहरण्यासाठी वेळ आणि अवकाश दिला जात नाही. पण अशामुळे ‘यह नही, तो कोई और सही!’च्या नादात बर्‍याचदा टिकू शकणारी नातीही टिकत नाहीत. त्यावर ‘आम्ही आमच्या आधीच्या पिढीला काहीही झालं तरी अपमानास्पद वागवणारी नाती मरेपर्यंत टिकवताना पाहिली आहेत. त्यामुळे दु:खाची ओझी वाहून स्वत:चं आयुष्य रडतखडत काढण्यापेक्षा आम्ही कोणत्याही नात्यात स्वत्व गमावून बसणार नाही,’ हा त्यांचा दृष्टिकोन असतो. हे जरी खरं असलं तरी अनेकदा जरा आपल्या मनासारखं झालं नाही की एखादी व्यक्ती ‘रेड फ्लॅग’ आणि त्यांचं वागणं ‘टॉक्सिक’ असं लेबल पटकन चिकटवलं जाऊ शकतं. एकमेकांना आणि नात्यालाही.

जगण्याच्या मूलभूत तत्त्वज्ञानात इतकी तफावत असल्याने ‘‘आमच्या वेळेस असं नव्हतं,’’ हे वाक्य आजही अनेक पालकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. कारण आजची मुलं आणि तरुण मंडळी वेगळ्या काळात वाढत आहेत. त्यांच्या शिकण्याची पद्धत, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, नात्यांकडे आणि जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि भावनिक गरजा सगळंच बदलत आहे. त्यामुळे पालकत्वाची व्याख्याही बदलणं गरजेचं आहे. यात कोणतीच पिढी पूर्णपणे चुकीची नाही आणि कोणतीच पूर्णपणे बरोबरही नाही. शेवटी, प्रत्येक पिढीला पुढची पिढी जास्त ‘स्वच्छंदी’ वाटू शकते आणि मागची पिढी थोडी ‘जास्त साचेबंद वृत्तीची वाटू शकते.! पण कदाचित पिढ्यांमधले हे अंतर ‘कोण पुढारलेलं आणि कोण नाही,’ हा प्रश्न दर्शवणारा नाही. तो दोन वेगळ्या काळात वाढलेल्या लोकांनी एकमेकांवर प्रेम करण्याचा प्रयत्न आहे. कारण शेवटी प्रत्येक पिढीला स्वत:वर, इतरांवर, आणि एकंदरीत जगण्यावर प्रेम करायचंच असतं. फक्त ते व्यक्त करण्याची त्यांची भाषा कालपरत्वे बदलत जाते, इतकंच. हा बदल सगळ्याच पिढ्यांना स्वीकारता आला तर कुटुंबाचा डोलारा भक्कम उभा राहील.

(लेखिका समुपदेशक आहेत)

theselfgrowthproject@gmail.com