एकत्र कुटुंबाप्रमाणेच कुटुंबांचे डॉक्टरही (फॅमिली डॉक्टर) आता दुर्मीळ झालेत. जितके आजार तितके डॉक्टर्स, तितक्या तपासण्या, त्यानुसार बदलणारे उपचार या फेर्‍यात सापडणं नको, असं कित्येकदा वाटतं. ‘फॅमिली डॉक्टर’ असतील, तर पहिला सल्ला त्यांचाच घ्यावा. याशिवाय वृद्धापकाळात अस्थिरोगतज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट यांची गरज तर लागतेच. मनोविकार- तज्ज्ञ,मेंदूविकारतज्ज्ञांचीही लागू शकते.

नफेखोरीपासून वैद्यकक्षेत्र अलिप्त नसल्याने डॉक्टरकडे जायची भीती वाटते. भरवसा वाटत नाही. कोणते डॉक्टर चांगले, असं एकमेकांना विचारलं जातं. आपलं म्हणणं नीटपणे ऐकून घेणारे, फक्त त्या-त्या वेळेपुरतं नाही, आपल्या तब्येतीविषयी मागचं-पुढचं नीट जाणणारे-विचारणारे, शंकानिरसन होईपर्यंत माहिती देणारे, वृद्ध शरीराला तपासण्या कितपत झेपतील, हे बघणारे, रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवण्याचा सल्लाही खरोखरच गरज असेल तरच देणारे, आपल्या आर्थिक ऐपतीचा विचार करून उपचार ठरवणारे डॉक्टर चांगले. या अपेक्षा पूर्ण करणार्‍या काही डॉक्टरांशी सदर-लेखनादरम्यान बोलत गेले. त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आजचा लेख. हे सगळेच त्यांच्या पालकांचं पालकत्वही करत आलेत.

डॉ. श्रीराज काळे हे जरावैद्यक (एमडी, जेरियाट्रिक) पंढरपूरला असतात. त्यांनी सांगितलं, ‘‘वृद्धावस्थेचे वयानुसार ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७५ आणि ७५ च्या पुढे चार टप्पे असतात. वाढत्या वयात स्नायूंची शक्ती कमी होत जाते. त्यामुळे व्यायाम, ‘फिजिओथेरपी’ पन्नाशी- पासूनच आवश्यक. कंबरेखालच्या शरीराची ताकद वाढवावी लागते. आता ग्रामीण भाग वगैरे असा फार राहिलेला नाही. पंढरपूरमधली मुलंसुद्धा पुणे-मुंबई, ऑस्ट्रेलिया-लंडन-अमेरिका अशी कुठे कुठे असल्याने वृद्धांना स्वत:ची काळजी स्वत:च घ्यावी लागते. माझ्याही अनेक रुग्णांची मुलं बाहेरगावी आहेत. निरोगी वृद्ध ८०-८५ वर्षापर्यंत चांगलं आयुष्यं जगू शकतात. रोजची देखभाल करायला जवळ कुणी असण्याचीही गरज नाही, इतके ठणठणीत वृद्ध स्त्री-पुरुष मी पाहातो. आपल्या समाजातली ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, ‘स्मृतिभ्रंश’, ‘अल्झायमर्स’, कंपवात किंवा ‘ब्रेन स्ट्रोक’, हृदयविकार, कर्करोग असे आजार झाले, तर त्यांची काळजी घेण्यासाठी मदतनीसांची गरज लागते.’’ फिजिओथेरपिस्ट मित्र डॉ. आशीष चव्हाण यांच्यासोबत डॉ. श्रीराज पंढरपूरच्या वृद्धाश्रमांमध्ये जातात. गरिबांना उपचार देतात.

फिजिओथेरपिस्ट डॉ. अहमद सिद्दिकी हे पाठीच्या कण्याचे तज्ज्ञ आहेत, त्यातही वृद्ध रुग्णांना त्यातले उपचार देण्यातला त्यांचा अनुभव मोठा आहे. ‘फिजिओथेरपी’मुळे हाडं-स्नायूंची झीज होण्याचा वेग कमी करता येतो. तसेच शस्त्रक्रियाही टाळणं शक्य होतं. लवचिकता टिकवता येते. हात-पाय-मान-पाठ-कंबर यांच्या हालचाली सामान्य राहाव्यात म्हणून सोपे, आपले आपल्याला करता येतील असे व्यायाम घरातल्या सगळ्यांनीच शिकून घ्यावेत. फिजिओथेरपीचा उपयोग फुप्फुसांचं कार्य नीट सुरू राहण्यासाठीही होतो.

एमडी आणि डीएम असलेल्या डॉ. पूजा मिसाळ. ‘वृद्धांचं मानसिक आरोग्य’ (Geriatric mental health) या विषयातल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या द्विपदवीधारक. सोलापूरमधील सांगोला तालुक्यातल्या पूजाला लहानपणापासून आजी-आजोबांशी बोलायला आवडायचं. डॉक्टरकी करताना ‘वृद्धांचं मानसिक आरोग्य’ ही नवी शाखा सुरू झाल्याचं कळल्यावर त्यातच पदवी घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्या म्हणाल्या, ‘‘पालकांचं पालकत्व हे आव्हानात्मक झालंय. कौटुंबिक-सामाजिक संबंध वेगाने बदलत चाललेत. मानसिक आरोग्य चांगलं राहाण्यात ‘घर’ मोठी भूमिका बजावतं. वृद्धांची शक्यतो घरी काळजी घेतली जाणं, हे आदर्श समजायला हवं. पाल्यांनी वृद्धावस्थेत होणार्‍या बदलांची, आजारांची प्राथमिक माहिती करून घेणं गरजेचं आहे. वृद्ध व्यक्ती नेहमीपेक्षा वेगळी वागायला लागली, की तो बदल वयाशी जोडला जाऊन दुर्लक्षित होऊ शकतो. वाढत्या वयामुळेच वागण्यात बदल झालेला असतो, असं नाही. ती एखाद्या आजाराची सुरुवातही असू शकते.’’

वृद्धांचं मानसिक आरोग्य राखण्यासाठी पाल्यांनी काय करावं याविषयी डॉ पूजा सांगतात, ‘‘वृद्धांना एकाकी वाटू न देणं. आज-उद्या-परवा-पुढच्या आठवड्यात-नंतरच्या महिन्यात त्यांच्या आयुष्यात काही चांगलं घडणार आहे, हे त्यांना सांगत राहावं. नातवंडांना भेटणं हेही वृद्धापकाळी आयुष्याचं ध्येय होऊ शकतं. गप्पा मारायला कुणी येऊन बसणं, बाहेर फेरफटका मारणं, कुणाशी व्हिडीओ कॉलवर बोलणं याने उमेद वाढते. त्यांना एखादा संपर्क क्रमांक न सापडणं, कोणते कपडे घालावेत, ते ठरवता न येणं असे त्यांच्या दिनक्रमातले अडथळे दूर करण्यात त्यांना मदत लागते. त्यांची झोप, भूक, पाणी पिणं आणि मलमूत्र विसर्जन यावर लक्ष ठेवावं लागतं. अशी परिस्थिती आली तर डॉक्टरशी सल्लामसलत करावी. त्यांनी मोकळेपणाने बोलावं, असं आपलेपणाचं वातावरण घरात ठेवावं. त्यांच्याशी चिडचिड, रागराग, दूरस्थपणा नको. पाल्यांबद्दल त्यांचा विश्वास टिकून राहायला हवा.’’

वृद्धावस्थेत होणार्‍या हाडांच्या आजाराविषयी ज्येष्ठ ‘ऑर्थोपेडिक सर्जन’ डॉ सतीश सामंत, यांनी सांगितलं, ‘‘हाडांची घनता कमी होणं, हाडं ठिसूळ होणं, वंगण कमी झाल्यामुळे गुडघ्यांच्या गाद्या झिजणं, गुडघ्यांना, कमरेला बाक येणं, स्नायू-हाडांची झीज, कंबर-गुडघेदुखी, माकडहाडाचे सांधे झिजून घासले गेल्याने होणार्‍या वेदना, जिने चढण्या-उतरण्याचा त्रास, वाकता न येणं. यामुळे घराबाहेर जाणं कमी होत जातं. भूक मंदावते, अपचन, थकवा, नैराश्य असं एकातून दुसरं सुरू होतं. साध्याशा दुखापतीनेही ‘फ्रॅक्चर’ होतं. ‘हिप बोन’ची दुखापत धोक्याची असते. बिछान्यात पडून राहावं लागलं की शय्याव्रण, ‘न्यूमोनिया’ होण्याची शक्यता, श्वासोच्छवासात अडथळा येऊ लागतो. स्त्रियांच्या स्तनांचा कर्करोग काही वेळा पाठीच्या कण्यात पसरतो. हाडांचा कर्करोग संभवतो. शस्त्रक्रिया आणि अन्य उपचारांनी हे कसं रोखता येईल, ते बघावं लागतं. घरांमध्ये गालिचे नकोत, लाद्या गुळगुळीत नकोत, झोपायच्या खोलीत, शौचालयाच्या आत-बाहेर रात्री दिवा हवा. चालताना नजर खाली आणि उजवी-डावीकडे असावी.’’

वृद्धांचा व्यापक विचार करून माहिती, मार्गदर्शन देणार्‍या, वृद्धस्नेही कल्पना सुचवणार्‍या मिरजच्या डॉ. प्रिया देशपांडे या जनऔषध, रोगप्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्रतज्ज्ञ. त्या सांगतात, ‘‘पन्नाशी-साठी-सत्तरी असं मोजत बसण्यापेक्षा नेहमीच विश्वसनीय वैद्यकीय माहिती मिळवत राहावं, शरीर-मन तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा. श्रीमंत वर्ग वगळता कृत्रिम प्रज्ञा (एआय), वाढती बेरोजगारी, पगार-बढत्यांची बिकट स्थिती याचा फटका सगळ्यांनाच बसतोय. त्यामुळे भविष्यात वृद्धांची देखभाल आणि त्याहूनही त्यांच्यासाठी निराळी व्यवस्था करणं जास्त खर्चीक होत जाणार असल्याने वृद्धस्नेही घरं, परिसर विकसित करण्याचा मार्ग योग्य ठरेल.’’

डॉ. स्वाती कामशेट्टे यांच्या बिदर इथल्या रुग्णालयात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून रुग्ण येतात. त्या ‘कुटुंब-डॉक्टर’च आहेत. त्यांच्या ‘ओपीडी’मध्ये रोज सुमारे ६० टक्के वृद्ध असतात. वृद्ध आणि त्यांचे पाल्य या नात्याचं दर्शन एका डॉक्टरला कसं घडतं, ते स्वातीकडून समजतं. १८ वर्षांच्या ‘प्रॅक्टिस’मुळे साठीतले रुग्ण ८५ वय ओलांडताना स्वातीने बघितलेत. वेगवेगळ्या पिढ्यांशी संबंध असल्याने त्यांच्या रुग्णालयात कुणाची वृद्ध आई वारली, तरी पाल्य नंतर वृद्ध मावशीला घेऊन येतात. उपचार इथेच मिळूदेत आणि मरण आलं तरी ते इथेच येणं चांगलं, अशी भावना असते.

वृद्ध स्त्री-पुरुषांना सहसा त्यांच्या सुनाच घेऊन येतात, पथ्यपाण्याचं विचारतात. ‘इन्सुलिन’ घरच्या घरीच देऊ शकतात. इथल्या कुटुंबांना मुलं बरीच असतात. ते आई-वडिलांची काळजी घेणं आपलं कर्तव्यच समजतात. चारपैकी दोन मुलं मुंबई-पुण्यात, एखादा जिल्ह्याच्या ठिकाणी. मोठा मुलगा गावातच आई-वडिलांसोबत राहाणारा. एखादी मुलगीही लांबच्या गावाहून सोबत करण्यासाठी धावणारी. वेळ आली तर ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा घरी विकत घेतात. वृद्धांची मुलांबद्दल काहीच तक्रार नसते. सगळीच मुलं बाहेर असली, तर एखादी शेजारीण वृद्धांबरोबर येते. नात्यातली असल्यासारखीच तीही दोन वेळचं जेवण, हवं-नको बघते. मुस्लीम कुटुंबांमध्ये वृद्धांविषयी विशेष आदर दिसतो. सकाळी नाश्ता कोणता केला, हा प्रत्येकच रुग्णाला विचारायचा प्रश्न. मुस्लीम कुटुंबांत वृद्धांना बदाम वगैरे आवर्जून खायला घातले जातात. भावंडं नसलेल्या पाल्यांची मात्र कसरत होते. रुग्णालयात एक आजी दाखल होत्या. त्यांचा मुलगा आणि सून सोबत होते. तेव्हा त्यांनी सुनेच्या आईला- देखील, त्या घरी एकट्या राहू शकत नसल्याने, दाखल करून घ्याल का विचारलं, असं डॉ स्वाती म्हणाल्या.

फिजिशियन असलेल्या डॉ. तस्नीम रंगूनवाला यांचा दवाखाना वांद्रे इथे असल्याने पाली हिलच्या उच्चभ्रूंपासून बेहराम पाडा, धारावी इथले गरीब रुग्ण त्यांच्याकडे येतात. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्याकडे सर्वधर्मीय, मराठी, उत्तर प्रदेशी, बिहारी रुग्ण येतात. ६५ ते ८५ वयोगटातल्या रुग्णांचं प्रमाण वाढतंय. लठ्ठपणा, संधीवात, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, पोटाचे विकार हे त्यांचे आजार. या वृद्ध स्त्री-पुरुषांना त्यांच्या सुना, जावई किंवा महाविद्यालयात जाणारी नातवंडंदेखील घेऊन येतात. हातावर पोट असणारे पाल्य आई-बापासाठी मोठा खर्च करू शकत नाहीत. या ओढाताणीत हप्त्याने पैसे द्यायची सवलत मागायची, काही तपासण्या पुढे ढकलायच्या असे मार्ग ते शोधतात. मी त्यांना कमीत कमी तपासण्या सुचवते. एकदा गुण आला की गावातल्या वृद्ध नातलगांनाही मोठा प्रवासखर्च करून वर्षातून एकदा तपासायला आणतात. आपल्याकडच्या सर्व सुविधा श्रीमंतांसाठी आहेत. या कष्टकरींना निरोगी आरोग्याचा अधिकारच नसल्यासारखी स्थिती आहे.’’

डॉ मंजिरी मणेरीकर, रोगनिदानतज्ज्ञ (Pathologist) यांनी सांगितलं, ‘‘अतिचाचण्या, चाचण्यांची आकर्षक ‘पॅकेजेस’ यापासून सावध राहावं. रक्तदाब, मधुमेहाच्या काही तपासण्या घरीच करणं शिकून घ्यावं, अनेक वृद्ध ्त्रिरया तपासण्यांची टाळाटाळ करतात. त्यांच्याकडे कुटुंबाने अधिक लक्ष द्यावं. हल्ली डॉक्टरच्या शिफारशीशिवाय एमआरआय’सारख्या तपासण्या करतात. हे मुळीच योग्य नाही. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणत्याही चाचण्या कराव्यात.’’

वैद्यकीय जनुकशास्त्रतज्ज्ञ असलेल्या डॉ. स्नेहल मल्लकमीर यांनी वृद्धत्व आणि जनुकशास्त्र यांचा संबंध उलगडून सांगितला. ‘‘आनुवांशिकता, जीवनशैली आणि पर्यावरण यासारखे घटक आपण किती लवकर वृद्ध होणार, ते ठरवतात. वृद्धत्व म्हणजे पेशींची झीज, उतींची (Tissue) दुरुस्ती करणार्‍या स्टेम पेशींची घट, ‘डीएनए’मधल्या उत्परिवर्तनांमुळे (म्युटेशन) होणारे रोग आणि शरीराची दुर्बलता. अंत्यखंड म्हणजेच ‘टेलोमेयर’ आपल्या ‘डीएनए’चं संरक्षण करतात. परंतु वयाबरोबर त्याची लांबी कमी होते. यामुळे वृद्धत्व येतं, आजार होतात. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यासाठी सध्या जोमाने प्रयत्न सुरू आहेत. आनुवांशिक विज्ञान, पेशी पुनरुत्पादन प्रक्रिया, जैवतंत्रज्ञान याद्वारे संशोधक दीर्घायुष्याचं रहस्य उलगडतायत. दीर्घायुष्य-संशोधनाबाबत नैतिक-सामाजिक प्रश्न विचारले जातायत. हे उपचार कोणाला मिळतील? कोणाला परवडतील? आणि लोक जास्त काळ जगू लागले, तर काय होईल? शास्त्रज्ञ, धोरणकर्ते चर्चा करतायत. मात्र, योग्य आहार आणि व्यायाम, चांगली झोप आणि तणाव व्यवस्थापन ही जीवनशैलीतली चतु:सूत्री निरोगी दीर्घायुष्य बहाल करू शकते,’’ असं डॉ स्नेहल यांनी सांगितलं.

शेवटी जैविक वय वाढणारच. पालक-पाल्य नातं घट्ट राहाण्याने वृद्धत्वातही मन टवटवीत राहील.

kulmedha@gmail.com