– सुजाता कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लग्न म्हणजे एकानं भाळणं आणि दुसऱ्यानं सांभाळणं’ हे वाक्य प्रसिद्ध आहे. माझ्या मैत्रिणींच्या संसाराची स्थिती अशीच होती. तशात मी वांद्रे कोर्टात ‘मॅरेज काऊन्सिलर’ची नोकरी सुरू केली होती. तिथले वेगवेगळे अनुभव तर रोज घेतच होते. आपल्या वाटय़ालासुद्धा यापेक्षा वेगळं असणार नाही, याची मनोमन खूणगाठ बांधली होती.

 मी २ वर्षांची असताना मला पोलिओ झाला. आमच्या चौकोनी कुटुंबात खूप सुख असताना माझ्या पदरात अपंगत्वाचं दान पडलं! पण मी ते स्वीकारलं. स्वत:च्या हिमतीवर ‘एमएसडब्ल्यू’ झाले, नोकरी मिळवली. दरम्यान, मोठय़ा बहिणीच्या लग्नाचे वारे घरात वाहू लागले. एक-दोन ठिकाणी स्पष्टपणे विचारलं गेलं, की ‘सुजाताची जबाबदारी मोठीला उचलावी लागणार का? कारण तुम्हाला मुलगा नाही ना?’ खाडकन जमिनीवर आणणारा हा प्रश्न ऐकून आमच्या अण्णांनी मला जवळ बसवून म्हटलं, ‘‘तू एवढी कणखर आणि ‘सेल्फमेड’ झाली पाहिजेस, की उद्या आमच्यानंतर तुला एकटीला सगळय़ाला तोंड देता आलं पाहिजे. आर्थिक तरतूद तर आपण करूच, पण स्वत: तू खूप खंबीर राहा.’’

त्या रात्री खूप रडू आलं. म्हणजे मी आता कोणासाठी तरी ओझं आहे, हा विचार काळीज कुरतडणारा होता. अण्णांनी माझ्यासाठीसुद्धा स्थळं बघायला सुरुवात केली. लग्नाच्या बाजारात तर खूप विचित्र अनुभव आले. शारीरिक अपंगत्व निदान दिसतं तरी, पण स्वत:ला सुशिक्षित समजणाऱ्या, मनानं अपंग असलेल्या लोकांपुढे काय बोलणार? मला माहिती होतं, माझ्या आयुष्यात पांढऱ्या घोडय़ावरून राजकुमार येणार नव्हता. पण माझ्या आयुष्यात जो जोडीदार आला, तो सर्वार्थानं राजा माणूस निघाला. दोन्ही पायांना पोलिओ झालेला, माझ्यासारखंच कुबडय़ा आणि बूट सावरत मला भेटला. त्याच्याशी बोलताना एक आश्वासक साथ जाणवली. रवी कुलकर्णी. राहणार कल्याण. नोकरी ‘ओरिएंटल इन्शुरन्स’मध्ये, भिवंडीला. त्याला होकार देताना अण्णांनी, आईनी भविष्याविषयी विचारलं, त्यावरच्या रवीच्या उमद्या उत्तरानं मी त्याच्याविषयी ठाम झाले. रवीला म्हटलं, ‘‘मी दादर सोडून कुठेच कधी प्रवास केलेला नाही. मला नोकरी, सासू-सासरे आणि अप-डाऊन झेपेल का?  आपण दोघेही असे आहोत, तर आपल्या संसाराची खिल्ली तर उडवली जाणार नाही ना?’’ आपल्या आश्वासक स्वरात त्यानं म्हटलं होतं, ‘‘एकमेकांच्या साथीनं आपण सगळय़ा परीक्षा पार करू. बघशील तू.’’ लग्नाआधी दिलेली गोड आश्वासनं लग्नानंतर पाळली जातील का? असा विचार करत संसारात पाऊल ठेवलं. पण खरंच मला जणू लॉटरी लागली.

 लग्नानंतर कल्याण ते वांद्रे प्रवास ही माझ्यासाठी खरंच कसरत होती. पण त्यानं घराची व्यवस्था संपूर्ण स्वत:वर घेतली आणि तशी निभावलीही. अगदी मी कामावरून आल्यावर मला गरमागरम ताट वाढण्यापासून तो ते करायचा. त्यानं कधीच ‘हे तुझं काम, हे माझं काम’ केलं नाही. स्वत: एखादा चमचमीत पदार्थ न सांगता करायचा. माझ्या बाळंतपणात आईच्या मायेनं सर्व करूनही कुठेही त्याचा साधा उल्लेखसुद्धा करत नसे. साहजिकच आम्ही दोघांनी आपली कामं वाटून घेतली. रसिक तर एवढा, की एकदा माझा एक ड्रेस घेऊन नवीन कापड घेऊन स्वत: टेलरकडे जाऊन ड्रेस शिवून आणला आणि वर मॅचिंग दागिनेसुद्धा. मला ‘सरप्राईज’ करण्याच्या संधी शोधत असायचा. दरम्यान नातलगांमध्ये मी कुजबुज ऐकत असायची, की ‘लग्न तर झालं. आता पुढे कसं होणार?’ मी अनेकदा उन्मळून पडले, पण रवी शेवटपर्यंत खंबीर होता. अभिषेकचा जन्म झाला आणि पुन्हा एका भीतीनं जन्म घेतला, की आपण कसं याच्या मागे धावणार? पण अभिषेक जात्याच हुशार होता. बाबांच्या कुबडीला धरून चालायचा. आम्हाला त्याच्या मागे पळता येत नाही, हे त्या लहान जीवाला बरोबर कळत असे. आम्हाला त्रास होईल असे खेळ तो खेळलाच नाही.

  पण प्रत्येक आईबापांना वाटतं, की जे आम्हाला आयुष्यात मिळालं नाही ते आपल्या लेकाला भरभरून मिळावं. आम्ही त्याला कराटे, जिम्नॅस्टिकसाठी तयार केलं. तो नेपाळला ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवून आला, त्या दिवशी घरात दिवाळी साजरी केली! माझा ऊर अभिमानानं भरून आला.

‘नॉर्मल’ माणसांच्या आयुष्याला अर्थ मिळतो, तो त्यांनी कमावलेल्या बढती, अधिकाऱ्याच्या पदामुळे. पण आम्हाला दररोजची धडपडच इतकी होती, की कल्याणहून वांद्रेपर्यंत जाऊन वेळेवर ‘मस्टर’ गाठणं, तेसुद्धा घरचं सगळं आवरून. माझे आई-अण्णा आता आमच्या शेजारी राहायला आले होते. दुर्दैव असं, की अण्णांना कर्करोगानं गाठलं होतं. पण रवीसह आम्ही त्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं. ते अभिमानानं म्हणायचे, ‘‘रवी तू माझा नुसता मुलगा झालास नाहीस, तर माझा बाप झालास.’’ यापेक्षा वेगळी पावती कोणती?

२००५ चा २६ जुलै उजाडला तो मुळी मुंबई पाण्याखाली घ्यायला जणू. मी कोर्टातून निघाले. अख्खं वांद्रे पाण्यात. माहीमला छातीपर्यंत पाणी. एक मैत्रीण बरोबर आली. जेमतेम आईकडे दादरला पोहोचले. जीव पूर्ण कल्याणमध्ये अडकला होता. चिमुकला अभिषेक आणि रवी घरी पोहोचले असतील का? या चिंतेत असताना रवीचा फोन आला म्हणाला, की ‘मी घरी असेन. तू काळजी करू नकोस.’ त्याच्या ऑफिसमधल्या एकूण एक माणसांना सोडून हा कर्तव्यदक्ष अखेर सकाळी ५ वाजता घरी परतला. तोपर्यंत अभिषेक एकटाच. त्यात वीज गेली. आम्ही तळमजल्यावर राहायला. हळूहळू पाणी घरात शिरलं. एका मेणबत्तीच्या प्रकाशात हाताच्या साहाय्यानं छोटय़ा अभिषेकला घेऊन हा गच्चीवर गेला. दोन रात्री गच्चीवर काढाव्या लागल्या. तोपर्यंत मीही घरी आले. घरात पाऊलभर चिखल झाला होता. तो सगळा उपासताना भयंकर त्रास झाला. लाईट नाही, पाणी थोडंच येत असे. माझी जाम चिडचिड होई. परंतु अशा परिस्थितीतसुद्धा रवीचा तोल कधी ढळला नाही. फारच थोडी माणसं अशी असतात, जी आयुष्याकडे एवढय़ा सकारात्मक दृष्टीनं बघतात. आपल्याला दोन पाय नाहीत, परंतु संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला जणू पायाचं बळ आहे, असं जाणवून त्यानं मलासुद्धा तेवढंच कणखर राहायला शिकवलं. ‘नाही’ हा शब्द त्याच्या शब्दकोशात नाहीच मुळी. त्याचा वारसा आता अभिषेकमध्ये संक्रमित झालेला बघून जन्मोजन्मी याच पतीसह सप्तपदी घालायला मिळो, अशी प्रार्थना करते!

srkulkarni0907@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get married take care others world marriage councilor experience ysh
First published on: 14-05-2022 at 00:02 IST