आईने पहिला पदार्थ शिकवला, ‘फोडणीचे वरण’. डाळ कुकरमध्ये शिजवतानाच हळद टाकणे इथपर्यंत ठीक होतं, पण पुढचं सर्व इंजिनीअरिंगमधील ‘टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी’ व ‘प्रोसेस प्लॅनिंग’चा एक उत्कृष्ट नमुना होता. शिजलेली डाळ रवीनं घुसळल्यावर कढई गॅसवर ठेवणं, त्यात तेल ओतणं. ते तापेपर्यंत लसूण सोलून घेणं. मोहरी टाकून तेल तापल्याचा अंदाज घेणं, लगेच हिंग आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकणं हे सर्व शिताफीनं झालं. अन् मग आला तो क्षण, जेव्हा लसूण लालसर झाला, तेव्हा आईनं डाव्या हातात घुसळलेल्या डाळीनं भरलेला डाव आणि उजव्या हातात भरलेला तिखटाचा चमचा घेतला. तिनं तिखट त्या फोडणीत टाकलं अन् पापणी लवते न् लवते तोच डाळीचा गोळा टाकला आणि बैठकीतून ठसक्याचे आवाज ऐकू आले.. तोपर्यंत फक्त नाटकात आणि चित्रपटातच संवादफेकीत टाईमिंग साधावं लागतं असा माझा गैरसमज होता..

आम्ही कधीही विचार केला नव्हता की जागा बदलली की आमच्या समोर खाण्याचा प्रश्न निर्माण होईल. खाणावळ अतिशय लांब आणि नवीन जागेत स्वयंपाकाला बाई मिळणं जरा अवघडच होतं. म्हणजे स्वत: स्वयंपाक करण्याला पर्याय नव्हता. पण दोन बॅचलर्स, ज्यांना चहाशिवाय काहीही करणं माहीत नव्हतं, त्यांच्या दृष्टीने हे जरा अशक्यच, असं माझ्या धाकटय़ा भावाचं, परागचं ठाम मत होतं. म्हणजे सुरुवात मला एकटय़ाला करायची होती हे निश्चित झालं.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
market is loaded with cakes candies chocolates for Easter festival
ईस्टर सणासाठी बाजारात केक, कॅन्डी, चॉकलेटची रेलचेल

खिचडीने श्रीगणेशा करायचं ठरवलं. डाळ-तांदूळ एकत्र करून पाणी टाकून कुकर लावला की झालं, या माझ्या भाबडय़ा कल्पनेला खिचडीने सुरुंग लावला. एक दिवस पाणी कमी, दुसऱ्या दिवशी जास्त असं करत तिसऱ्या दिवशी जरा खाण्याइतपत खिचडी जमली. मीठ, हळद, हिंगही प्रमाणात होतं. माझा उत्साह जरा वाढला. मग भाजी करायचं ठरवलं. कांदा, फोडणी जमली आणि भाज्या मुळातच आपली चव घेऊन येत असल्यामुळे हे प्रकरण जमलं. अर्थात आईच्या हातच्या चवींपासून त्या कोसो दूर होत्या. तरी एक बरं झालं, माझे प्रयत्न बघून पराग मदतीला आला. आता मात्र उत्साह चांगलाच दुणावला. आम्ही चक्क चपात्या करायचा घाट घातला. कणिक मळणे हे जगातील सर्वात अवघड काम असावं, असं दोन्ही कर्णिकांचे एकमत झाले. वर्तुळ काढणे म्हणजे जगातलं सगळ्यात सोपं काम (करकटाने का होईना) हा आमचा भ्रम पोळ्या लाटायला घेतल्यावर दूर झाला. जगात अस्तित्वातही नसलेल्या देशांचे नकाशे काढत, आकारात काय ठेवलंय असं म्हणत, आम्ही त्याही चपात्या फस्त केल्या.

वरणाच्या फोडणीने आमची नेहमीची परीक्षा घेतली. मोहरी-तिखट जळून खाक होणे, तेलातून जाळ, धूर निघणे हे सर्व प्रकार झाले. शिवाय आईच्या हातच्या फोडणीच्या वरणाच्या जवळपासही कधी पोहोचू शकलो नाही ही खंत होतीच, म्हणून मग आम्ही हे स्वयंपाक प्रकरण जरा गांभीर्याने घ्यायचं ठरवलं. जगात इंडियन, काँटिनेंटल, केक, आईस्क्रीम अशा सर्वाचे क्लासेस असतात.. फक्त रोजचं साधं जेवण कसं बनवायचं हे कोणी शिकवतं का माहीत नाही. शेवटी सुट्टीत घरी गेल्यावर आई आणि ताई यांचा गंडा बांधण्याचं एकमतानं ठरलं.

आमचं ट्रेनिंग सेंटर म्हणजे घरातलं स्वयंपाकघर. आमच्या दोन गुरू, आई आणि बहीण, त्यांना स्वयंपाक करताना, आम्ही प्रथमच तन्मयतेने बघत होतो. आम्ही ज्या चवींवर जीव ओवाळून टाकत होतो त्या कशा काय जमवून आणतात हे बारकाईने बघण्याची ही एक छान संधी होती. आम्ही स्वयंपाकघरात रस घेतोय याचंच त्यांना एव्हढं अप्रूप होतं की आमचं या विषयातलं अज्ञान, आम्ही विचारत असलेले मूर्खासारखे प्रश्न याकडे त्यांनी जरा दुर्लक्षच केलं. शिवाय आमचा उत्साह किती टिकतोय आणि मुख्य म्हणजे हे प्रकरण आम्हाला कितपत झेपतंय याबद्दल त्या साशंकच होत्या. म्हणूनच आम्हीही जरा जास्तच जिद्दीला पेटलेलो होतो. मी  मेकॅनिकल इंजिनीअर असलो तरी ‘टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी’ शिकण्यासाठी स्वयंपाकघरासारखी जागा नाही हे मला त्या दिवशी कळलं. पहिला पदार्थ होता ‘फोडणीचे वरण’. डाळ कुकरमध्ये शिजवतानाच हळद टाकणे इथपर्यंत ठीक होतं. पण पुढचं सर्व इंजिनीअरिंगमधील ‘टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी’ व ‘प्रोसेस प्लॅनिंग’चा एक उत्कृष्ट नमुना होता. शिजलेली डाळ रवीनं घुसळल्यावर कढई गॅसवर ठेवणं, त्यात तेल ओतणं. ते तापेपर्यंत लसूण सोलून घेणं. मोहरी टाकून तेल तापल्याचा अंदाज घेणं, लगेच हिंग आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकणं हे सर्व शिताफीनं झालं. अन् मग आला तो क्षण, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो ‘टाइम अ‍ॅण्ड मोशन स्टडी’चा परमोच्च बिंदू, जेव्हा लसूण लालसर झाला, तेव्हा आईनं डाव्या हातात घुसळलेल्या डाळीनं भरलेला डाव आणि उजव्या हातात भरलेला तिखटाचा चमचा घेतला. तिनं तिखट त्या फोडणीत टाकलं अन् पापणी लवते न् लवते तोच डाळीचा गोळा टाकला आणि बैठकीतून ठसक्याचे आवाज ऐकू आले. तोपर्यंत फक्त नाटकात आणि चित्रपटातच संवादफेकीत टाईमिंग साधावं लागतं असा माझा गैरसमज होता.

जर फोडणीचे वरण हे स्वयंपाकातील इंजिनीअरिंग शिकवत असेल तर चपात्या भूमिती शिकवते असं म्हणावं लागेल. शाळेत भूमितीचा तिटकारा असणाऱ्या बायकांचीसुद्धा यातून सुटका नसते. जरी आई आणि बहिणीची पोळ्या लाटायची पद्धत जरा वेगळी असली तरी क्षणार्धात चपाती एकदम गोल लाटण्याचं दोघींचंही कसब वाखणण्याजोगं होतं. पोळ्या लाटणं हे आव्हान असेल तर त्या भाजणे म्हणजे तत्परता, एक-दोन वेळा वाफ हातावर आल्याशिवाय, ‘आधी हाताले चटके’ मिळाल्याशिवाय काही ती येत नाही. निरीक्षण आणि त्यांचं मार्गदर्शन यामुळे आम्ही तेही आत्मसात केलं पण उसके लिये बहोत पापड बेलने पडे हे खरं.

या आमच्या दौऱ्यात आम्ही दोघं खूप काही शिकलो. कुकिंग हे क्षेत्रही किती कल्पकतेला वाव देणारं आहे हे उमजूनच आम्ही परतलो. आमची डायरी खूप पदार्थाच्या रेसिपीज आणि मुख्य म्हणजे काय करा, काय करू नका अशा खूप काही सूचनांनी भरली होती. एक मात्र खरं, हे क्षेत्र महासागरासारखं होतं अन् आमच्या अनुभवाच्या तुटपुंज्या शिडांची पण आमच्या दोन चूलराण्यांनी दिलेल्या आत्मविश्वासाचं वारं उरात भरून आम्ही या दर्यात स्वत:ला झोकून देणार होतो.

व्हेज-नॉनव्हेज काहीही आम्हाला वज्र्य नव्हतं, आमची मजल तर पुरणपोळी ते चिकनपर्यंत गेली. परागच्या दृष्टीने स्वयंपाक ही हमारी बस की बात नव्हती, आता त्याच्याच हातची साबुदाण्याची खिचडी, कांदापोहे आणि इतरही अनेक पदार्थ खायला आमचे नातेवाईक उत्सुक असतात. आमच्या काही मित्रांच्या बायकांनी तर धसकाच घेतला होता त्याचा. काही जणी तर नवऱ्याची मर्जी सांभाळण्यासाठी त्याच्याकडून एकेक पदार्थ अजूनही शिकत असतात.

आम्ही आश्चर्यचकीत तेव्हा झालो जेव्हा त्याने पाककला स्पर्धेत बक्षिसं मिळवली. एका बक्षिसपात्र रेसिपीची तर गंमतच आहे. म्हटलं तर खूपच साधी, पण पाश्र्वभूमी मजेशीर. एकदा आम्हाला रात्री घरी यायला उशीर झाला. पोळ्या होत्या. पीठलं हा पर्याय नेहमीचाच पण नेमकं बेसन संपलेलं. फक्त कांदे-बटाटे तेवढे घरात होते. मग परागने शक्कल लढवून एक इन्स्टंट भाजी करून आम्हाला चकीत केलं होतं. हीच रेसिपी आपल्याला एक दिवस बक्षीस मिळवून देईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. मुख्य म्हणजे परीक्षकही भाजी कशाची हे ओळखू शकले नव्हते. एवढं काय होतं त्या रेसिपीत? त्यानं फोडणीत हळद-तिखट-मोहरी बरोबर आलं-लसूण पेस्ट अन् कांदा किसून टाकला. अन् रेसिपीचा मास्टरस्ट्रोक पुढे होता. त्यानं भाजी झटकन् व्हावी म्हणून बटाटाही किसून टाकला. भाजी लवकर तर शिजलीच पण तिची चव ओळखू न येण्याइतपत बदलली आणि बक्षीस मिळवून गेली.

वीणा गवाणकरांच्या ‘एक होता काव्‍‌र्हर’मध्ये एक छान प्रसंग आहे. काव्‍‌र्हरनं टस्कीगीच्या शेतकऱ्यांना कापसाच्या शेतीवर पडणाऱ्या किडीपासून वाचण्यासाठी, आळीपाळीनं भुईमूग व रताळे लावण्याचा उपाय सुचविला. कुठलाही बदल सहजासहजी स्वीकारला थोडाच जातो. छोटे-मोठे कुठलेच शेतकरी ऐकत नाही म्हटल्यावर काव्‍‌र्हरने एक क्लृप्ती लढवली. मोजक्या मान्यवर नऊ-दहा शेतकऱ्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. सूप, भाजी, पाव, कोशिंबीर, चिकन, आईस्क्रीम, कुकीज, कॅण्डी आणि शेवटी कॉफीही दिली. त्या रुचकर पदार्थाची सर्वानी पोटभर तारीफ केली. अन् मग काव्‍‌र्हरने जेवणाचं गुपित फोडलं. जेवणातील एकूणएक पदार्थ भुईमूगापासून बनवलेला होता. अगदी चिकनसुद्धा खोटं होतं. आणि माझ्या विचारांना चालना मिळाली. खूप लोक शुद्ध शाकाहारी असतात. कधी तरी त्यांनाही असं वाटत असेल की काय असतं एवढं मांसाहारी पदार्थात? जर आपण काव्‍‌र्हरच्या चिकनसारखे चवीला, दिसायला हुबेहूब मांसाहारी पण प्रत्यक्षात शाकाहारी पदार्थ अशा खवय्यांना उपलब्ध करून दिले तर, अन् माझ्या डोक्यात काय काय शिजायला लागलं विचारू नका! प्रयोग सुरू झालेत खरं!

मला नेहमीच असं प्रकर्षांनं जाणवतं, स्त्रियांनी पुरुषांचं वर्चस्व असलेल्या बहुतेक सर्वच क्षेत्रांत स्वत:ला सिद्ध केलंय. मग आम्ही पुरुषच कुकिंगला का घाबरतो? तुम्हाला आवड नाही हरकत नाही. पार्ट-टाईम किंवा अगदी गरज पडेल तेव्हा तरी आपल्याला स्वयंपाकघरात काहीतरी मुशाफिरी करता यायला हवी (परदेशी नोकरीला, शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे.). समजा बायको आजारी आहे तर तिला आपल्याला साधा वरण-भात तर देता यावा. बायको माहेरी-बाहेरगावी गेली आहे, मुलांना काही घरगुती पदार्थ, साधं जेवण देता यावं; कदाचित त्यांनाही कुकिंगची गोडी लागेल. जी आपली, आपल्या आवडी-निवडींची आयुष्यभर काळजी घेते तिच्यासाठी, इतना करना तो बनता है भाई! तर आमचा एक प्रामाणिक सल्ला आहे ‘बॅचलर ऑफ कुकिंग’ ही पदवी बॅचलर असेपर्यंतच घ्या. आणि तुमचे प्रियजन निश्चितच पुढे जाऊन तुम्हाला  ‘मास्टर्स’ची पदवी बहाल करतील. काव्‍‌र्हरचंच एक सुरेख वाक्य कुकिंग क्षेत्रालाही लागू पडतं;

‘‘स्टार्ट व्हेअर यू आर, विथ व्हॉट यू हॅव. मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड.’’

जयंत कर्णिक

jayant.karnik@gmail.com