घानातील स्वयंपाकगिरी

स्वयंपाक या विषयासाठी दररोज एकूण दीड तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही असे ठरवून कामाला लागलो.

 

बरंचसं चुकतमाकत, फोनवरून बायकोचे तसेच अन्य मित्र मैत्रिणींचे सल्ले घेत आणि सोबत नेलेल्या मराठीमधल्या ‘पुरुषांसाठी सोपे पाकशास्त्र’ या पुस्तकाच्या साहाय्याने घानातील ‘माझी स्वयंपाकगिरी’ सुरू झाली. सहा वर्षांपूर्वी मी घाना या देशाच्या उत्तर सीमावर्ती ग्रामीण भागातील बोंगो गावात एक वर्ष वास्तव्य करून आलो. सामाजिक सेवा क्षेत्रातील व्हॉलंटीयर म्हणून काम करण्यासाठी मी तेथे गेलो होतो. माझा पाककलेशी खऱ्या अर्थाने संबंध तेथे आला तो एक गरज म्हणून.

आतापर्यंतच्या आयुष्यात आई, आजी, बायको, मेसवाल्या काकू अशा घरातल्या तसेच बाहेरच्या पाकनिपुण स्त्रियांमुळे मला स्वयंपाकघरामध्ये काही करायची गरज पडली नव्हती. आतापर्यंत कुठल्याच परदेशी खाद्यसंस्कृतीशी माझा संबंध आला नव्हता, त्यामुळे तेथे मिळणारे खाद्यपदार्थ खाण्याची सवय तर सोडाच पण त्यांची चवही जिभेला मान्य होत नव्हती. मिळणारे मानधन एखाद्या स्वयंपाक्याकडून जेवण करून घेण्यासाठी पुरेसे नव्हते. स्वत:ला पाककौशल्य विकसित करावे लागेल याची पूर्वकल्पना अर्थात मला होती. चहा, पोहे आणि कुकरमधला भात सोडता मला काहीच येत नव्हते. मी एकटाच राहणार होतो आणि एकटाच करून खाणार होतो. यापेक्षा कंटाळवाणे काम दुसरे नसावे असे मला वाटत होते.

तिथल्या पहिल्या तीन-चार दिवसांत घरून नेलेले लाडू, चिवडा, इन्स्टंट पदार्थ संपवले आणि स्वयंपाकासाठी सज्ज झालो. स्वत:चे तर्क लढवून कुकरमध्ये खिचडी बनवली. चांगली किंवा वाईट कसेही असले तरी ते खायचे हाच एक पर्याय उपलब्ध होता. एकंदरीत तयारी करा, शिजवा, खा आणि भांडी घासा हे काम फारसे उत्साहवर्धक नव्हते. स्वयंपाक या विषयासाठी दररोज एकूण दीड तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही असे ठरवून कामाला लागलो. बरंचसं चुकतमाकत, फोनवरून बायकोचे तसेच अन्य मित्रमैत्रिणींचे सल्ले घेत आणि सोबत नेलेल्या मराठीमधल्या ‘पुरुषांसाठी सोपे पाकशास्त्र’ या पुस्तकाच्या साहाय्याने ‘माझी स्वयंपाकगिरी’ सुरू झाली.

माझ्या प्रेशर कुकरची शिट्टी पहिल्यांदा वाजली तेव्हा माझ्या शेजारच्या घरात राहणारे लोक धावत काय झालं म्हणून पाहायला आले. त्यांना प्रेशर कुकर म्हणजे काय ते माहीतच नव्हते. पहिल्यांदा भाजी करायची ठरवली तेव्हा रोझ नावाच्या एका सहकारी व्हॉलंटीयरने दिलेला नियम कम सल्ला नंतरही कायम कामी आला. ‘जी भाजी तू आरामात कच्ची खाऊ  शकतोस ती भाजी कितीही कमीजास्त शिजली तरी प्रॉब्लेम नाही.’ कोबी, भेंडी, टोमॅटो, कांदा यांचा प्रवेश प्रथम झाला.

डाळी हा प्रकार घानाच्या त्या भागामध्ये उपलब्ध नव्हता. चवळी आणि बांबारा बीन्स ही स्थानिक कडधान्ये तेथे मुबलक होती, परंतु ती माझ्या झटपट स्वयंपाकाच्या संकल्पनेत बसत नव्हती. ‘आहारात प्रथिनांचा समावेश पाहिजे तर अंडय़ाचे पदार्थ का बनवत नाहीस?’ जवळच्या शहरात राहणाऱ्या माझ्या एका अमेरिकन मित्राने प्रश्न कम सल्ला दिला. घरी आणि बऱ्याच अंशी बाहेरही मी आतापर्यंत शाकाहारी राहिल्यामुळे अंडं कधी स्वयंपाकघरात वापरायची वेळ आली नव्हती. बोंगोमध्ये पोल्ट्री फार्ममधली अंडी सर्वत्र दररोज मिळत नसत. तेथे गिनीफाऊल हा एक पक्षी मांसासाठी पाळतात व त्याच्या अंडय़ाच्या सीझनमध्ये ती मुबलक उपलब्ध असतात. ही माहिती माझ्या एका स्थानिक सहकाऱ्याने सांगितली. त्याला सोबत घेऊन अंडय़ाच्या शोधात बोंगोच्या बाजारात गेलो. अंडी मिळाली ती एका जादुटोण्याच्या स्टॉलवर. विविध प्राण्यांची हाडे, कातडी याबरोबरच तेथे गिनीफाऊलची अंडी काळ्या जादूसाठी वापरली जातात. सीझन नसेल तेव्हा ती अशी जादुटोणावाल्यांकडेच मिळतात. त्या स्टॉलवर काही अंडी विकत घेऊन घरी आलो. त्यातलं एक अंडं ‘आत काय असेल कुणास ठाऊक?’ असा विचार करत फोडलं. त्याच्या कवचाचे बारीक तुकडे अंडय़ाच्या बलकामध्ये पडले. पांढऱ्या आणि जर्द नारिंगी रंगाच्या त्या बलकामध्ये पडलेले ते तुकडे जमतील तेवढे काढले. बाकीचं मिश्रण तसंच पॅनमध्ये ओतलं आणि पहिल्यांदा आम्लेट करून खाल्लं. अशा प्रकारे बिघडलेल्या गोष्टी खायला मी एकटाच असल्याने चुका करण्याबद्दल काही वाटलं नाही तसंच त्या सुधारायला पुष्कळ वावही मिळत होता.

तिथल्या स्थानिक बाजारामध्ये भ्रमंती वाढू लागली तसे बऱ्याच नवीन गोष्टी व पदार्थाची ओळख होऊ  लागली. अंबाडीचा पाला येथे मुबलक प्रमाणात वापरला जातो आणि एकदा तो आणला. पुस्तक, इंटरनेट सरळ बाजूला ठेवली आणि घरच्यांशी फोनवर सल्लामसलत करत मस्तपैकी भाजी बनवून वरून त्यावर लसणीची फोडणीही घातली. बोंगोमध्ये दररोज तिच्या कामासाठी येणाऱ्या एक बिहारी सहव्हॉलंटीयरला खाऊ  घातली तेंव्हा ती म्हणाली, ‘‘ये तो बहुत बढीया बना है! पहिली बार मैने ऐसा कुछ खाया है.’’ दुसऱ्याला आवडेल इतपत करायला जमतंय हे समजल्यावर आत्मविश्वास वाढला आणि अर्थातच वेगवेगळे प्रयोगही वाढले. कोबीची पचडी, फोडणीचा भात, शेवयांची खीर असे पदार्थ माझ्या विविधदेशी मित्रमैत्रिणींना आवडले. भारतीय जेवण म्हणजे पंजाबी पद्धतीच्या ग्रेव्ही आणि त्यासोबत तंदूरी रोटी एवढीच त्यांची समजूत होती. ती त्यानिमित्ताने घालवता आली.

भारतीय किराणा सामानाचे सगळ्यात जवळचे दुकान माझ्यासाठी ७०० किलोमीटर दूर होते त्यामुळे सोबत आणलेले पदार्थ जसजसे संपू लागले तसतसे उपलब्ध स्थानिक गोष्टींचा वापर वाढला. त्या गोष्टींचा वापर करून भारतीय पद्धतीचे पदार्थ बनवणे हा एक छंदच जडला. शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तिथे उपलब्ध शेंगदाण्याची पेस्ट बरीच बहुउपयोगी ठरली. कधी पावाला लावून, कधी कोशिंबिरीमध्ये तर कधी रस्सा भाजीमध्ये ती वापरता येत असे. तिथे उपलब्ध आफ्रिकन प्रजातीच्या उकडय़ा तांदळाची पेज बनवता आली. मलेरियाने आजारी असताना व स्वत:च स्वत:ची काळजी घेत असताना या पेजेचा बराच उपयोग झाला. अलेफू, कोंटोमीरे, भोपळ्याचा पाला, गार्डन एग्ज, वाला अशा विविध भाज्या तसेच यॅम, कसावा, कोकोयॅम असे कंद हे पूर्वी कधीही न पाहिलेले साहित्य फोडणीत परतून किंवा रश्श्यात घालून मी शिजवत असे.

तिथे मिळणाऱ्या बऱ्याच पदार्थाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग होऊ  शकतो हे स्थानिक लोकांना माहीत नव्हते. शेवग्याचा पाला तिथे खाल्ला जातो तसेच त्याचा चहाही बनवला जातो, पण त्याच्या शेंगा खाता येतात हे जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांना हे पटत नसे. तिथे पिकवली जाणारी केमोल्गा नावाची लाल रंगाची ज्वारी एक हलक्या गुणवत्तेचे धान्य समजले जाते व ती प्रामुख्याने स्थानिक प्रकारच्या बियर उत्पादनासाठी वापरले जाते. फक्त गरीब लोकच त्याचा वापर अन्नामध्ये करतात. आम्ही एकदा एका स्थानिक मित्राच्या साहाय्याने पिठाची गिरणी शोधून तीन किलो केमोल्गा ज्वारी दळून आणली. काही स्थानिक सुगंधी मसाले, बारीक चिरलेल्या बॉनेट जातीच्या लाल ओल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा असं सर्व पिठात घालून ते भिजवून, मळून त्याची थालिपिठं थापून तव्यावर तेल टाकून अधूनमधून भाजू लागलो. ऑफिसमधले सहकारी, मित्र-मैत्रिणी अशा बऱ्याच लोकांना ती खाऊ  घातली. काहीतरी अभूतपूर्व खात असल्याचे सर्वानीच सांगितले.

स्थानिक पदार्थाची माझी चव जसजशी विकसित होऊ  लागली तसे माझे बाहेरचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले. स्वयंपाकघरात घालवलेला वेळ कमी जरी झाला तरी त्या प्रमाणात माझा स्वयंपाक या विषयाबाबत घालवलेला वेळ मात्र कमी झाला नाही. स्वयंपाकघरात घालवलेल्या वेळेबरोबरच त्या विषयातील इंटरनेटवरून माहिती मिळवणे, मार्केटमध्ये फिरणे, घानाच्या शेती पद्धती आणि खाणे बनवण्याच्या व खाण्याच्या सवयी जाणून घेणे, भारतीय तसेच अन्य देशीय व्हॉलंटीयरसोबत जेवण बनवणे आणि अर्थातच खाणे या सगळ्यातून खाद्यसंस्कृती या विषयाबद्दलचे ज्ञान विकसित झाले.

तिथून परतल्यानंतर चार महिन्यांनी एक अनपेक्षित फोन कॉल आला. त्यावर घानाचा कोड नंबर होता. पलीकडून माझ्या घानामधल्या कार्यालयात काम करणाऱ्या क्रिस्तिना मॅडम बोलत होत्या. सांगत होत्या, ‘‘तू तिथे असताना ते तुझे केमोल्गा केक्स (म्हणजे थालिपीठ) शिकून घ्यायला पाहिजे होते. आता त्यासाठी परत कधीतरी नक्की ये.’’ त्यांना मला मराठीत सांगावंसं वाटलं, ‘‘मॅडम तुमचं हे बोलणं ऐकून आज कृतकृत्य झालो. धन्य वाटलं.’’ पण  ग्रेट, थँक यू व्हेरी मचच्या पलीकडे शब्द मिळाले नाहीत.

sachin.ratnagiri@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व घड(व)लेले पदार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: My cooking story marathi articles