अमित घोडेकर
हल्ली मुले ‘मोबाइलआहारी’ गेली आहेत. वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाच्या जाळ्यात मुले अडकत आहेत, अशी ओरड पालक वर्तुळात होत असताना, या समस्येच्या मूळ कारणांचा शोध आपण पालक या नात्याने घेत आहोत का? मुलांच्या ‘ऑनलाइन गेमिंग’ आणि ‘आभासी ओळख’ (Virtual Identity) या डिजिटल जगाचा जाणीवपूर्वक मागोवा घेत पालकांना भानावर येण्याची वेळ आली आहे. आभासी जगात गुंतलेल्या आणि कौटुंबिक संवादाला मुकलेल्या गाझियाबादमधील तीन मुलींच्या आत्महत्येची घटना पालकांना आपल्या मुलांच्या मोबाइल व्यसनाकडे डोळसपणे पाहण्यासाठी जागे करते…
आजच्या काळात तंत्रज्ञान ही दुधारी तलवार झाली आहे. एकीकडे तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असताना, दुसरीकडे हेच जग आपल्या मुलांना आपल्यापासून दूर- एका अशा अंधार्या दरीत ओढत आहे, जिथून परतणे कठीण होत चालले आहे. गाझियाबादमध्ये नुकत्याच घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या ही केवळ एक बातमी नाही, तर हा आधुनिक पालकत्व आणि बदलत्या समाजव्यवस्थेसमोर उभा राहिलेला एक गंभीर प्रश्न आहे.
कोरियाई संस्कृती (के-पॉप/ के-ड्रामा), ऑनलाइन गेमिंग आणि आभासी ओळखीच्या ( Virtual Identity) वेडापायी तीन कोवळ्या मुलींनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यातील एकीच्या डायरीतून समोर आलेले शब्द- ‘‘तुम्ही आम्हाला कोरियाला जाण्यापासून थांबवाल का?’’ हे पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. ही घटना केवळ त्या मुलींची नसून, आजच्या डिजिटल पिढीच्या मानसिक आरोग्याचा आरसा दाखवणारी आहे. यानिमित्ताने दशकभरापूर्वी गाजलेल्या ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ या गेमची आठवण होते. २०१६-१७ च्या सुमारास या गेमने जगभरात शेकडो मुलांचे बळी घेतले. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ हा काही डाऊनलोड करायचा गेम नव्हता, तर समाजमाध्यमांवरील एक गट होता. यात क्युरेटर मुलांना ५० दिवसांसाठी ५० टास्क द्यायचा. सुरुवातीला हॉरर चित्रपट पाहणे किंवा पहाटे लवकर उठणे… असे साधे टास्क असायचे. काही दिवसांनी हे टास्क हिंसक होत जायचे. जसे की, हातावर ब्लेडने मासा कोरणे. शेवटच्या टास्कमध्ये मुलाला आत्महत्या करण्याचे आदेश दिले जायचे. मुलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ‘तू कमकुवत आहेस’ किंवा ‘तुझ्या कुटुंबाला इजा पोहोचवू’ अशी भीती घालून धमकी देण्यात यायची. ब्लू व्हेल गेमप्रमाणेच ‘मोमो चॅलेंज’ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सर्वत्र पाठवला गेला. यात एक भयानक दिसणारी बाहुली मुलांना धोकादायक कामे करण्यास प्रवृत्त करायची. या दोन्ही जीवघेण्या गेम्सनी हे दाखवून दिले की, मुले एकदा या आभासी जाळ्यात अडकली की त्यांना वास्तवाचे भान राहत नाही. आजच्या काळात ब्लू व्हेलसारखे थेट आत्महत्या करायला लावणारे गेम नसले तरी असे अनेक ऑनलाइन गेम्स आहेत, जे मुलांना मानसिकदृष्ट्या गुलाम बनवत आहेत.
‘पब्जी’, ‘बीजीएमआय’ आणि ‘फ्री फायर’ या गेम्समध्ये असलेल्या बॅटल रॉयल मोडमुळे मुलांमध्ये जिंकण्याची तीव्र ओढ निर्माण होते. यात ‘लूट बॉक्सेस’- यात विरोधकाला मारण्यासाठी बंदूक, विशेष पोशाख मिळतात; आणि ‘स्किन्स’- यात खेळाडू पोशाख बदलू शकतात. ते खरेदी करण्यासाठी मुले चोरून पालकांच्या खात्यातले लाखो रुपये खर्च करतात. जेव्हा पालक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत ही मुले हिंसक झालेली असतात किंवा टोकाचा निर्णय घेतात.
‘रॉब्लॉक्स’ आणि ‘माइनक्राफ्ट’ हे गेम्स दिसायला साधे वाटतात; पण यामध्ये अनोळखी लोकांशी संवाद साधण्याची सोय असते. येथे अनेकदा ‘ऑनलाइन प्रेडेटर्स’ (मुलांचे शोषण करणारे) सक्रिय असतात, जे मुलांना ‘फूस’ लावून चुकीच्या गोष्टी करायला लावतात. गाझियाबादमधील मुलींच्या प्रकरणामध्ये ‘गाचा लाइफ’ ( Gacha Life) या अशाच प्रकारच्या ऑनलाइन ओळखीचा उल्लेख आहे. अशा ॲप्समध्ये मुले स्वत:चे एक काल्पनिक पात्र बनवतात आणि खर्या जगातल्या मीपेक्षा त्या पात्रातच जास्त रमतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात पालक मुलांच्या हातात मोबाइल देऊन मोकळे होतात. मुलगा किंवा मुलगी तासन्तास कुणाशी तरी चॅट करत असतात, काही तरी बघत असतात… मूल आपल्या नरजेसमोरच आहे म्हणजे ते सुरक्षित आहे असे पालकांना वाटते. परंतु इंटरनेटच्या जगात वावरताना मूल आपल्या ‘डोळ्यांसमोर असणे’ म्हणजे ‘सुरक्षित’ असणे असे नव्हे. गाझियाबादच्या प्रकरणातही त्या मुली हळूहळू एका काल्पनिक जगात गुंतत गेल्या, त्यांची आवड जेव्हा ‘वेडात’ रूपांतरित होत होती, तेव्हा कदाचित ‘संवादाचा अभाव’ होता. आपण मुलांना विचारतो का, ‘‘आज तू इंटरनेटवर काय पाहिलंस?’’ किंवा ‘‘तुला त्या व्हिडीओमध्ये काय आवडलं?’’ मुलांना हे न विचारणे म्हणजे आपल्या पाल्याकडे ‘डिजिटल दुर्लक्ष’ होत आहे. जेव्हा पालकांच्या लक्षात येते की, मूल चुकीच्या मार्गावर किंवा व्यसनाच्या आहारी गेले आहे; तेव्हा अचानक पालकांची हुकूमशाही सुरू होते. मोबाइल हिसकावून घेणे, इंटरनेट बंद करणे किंवा टोकाचे ओरडणे यांमुळे मुलेे बंडखोरीकडे वळतात. गाझियाबादच्या मुलींच्या डायरीतील मजकूर हेच दर्शवतो. या मुलींना वाटले, त्यांचे पालक त्यांच्या ‘स्वप्नां’च्या आड येत आहेत. जेव्हा आपण मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून थांबवतो, तेव्हा त्यामागची कारणे समजून न सांगता केवळ बंधनं लादतो. मग ती मुले गुपचूप दुसरे मार्ग शोधू लागतात किंवा टोकाचे पाऊल उचलतात. यासाठी पालकांनी ‘पोलीस’ न होता ‘मार्गदर्शक’ होणे ही काळाची गरज आहे. टोकाची बंधने आणि संवादाचा अभाव यांमुळे मुले आणि पालकांच्या नात्यात दरी निर्माण होते. एवढ्या लहान वयातील मुली या गोष्टींकडे इतक्या आकर्षित का होतात? यामागे केवळ त्यांचे वय नसून, त्या ॲप्सचे आणि समाजमाध्यमांचे अत्यंत धोकादायक ‘अल्गोरिदम’ आहे. हा एक प्रकारचा अल्गोरिदमचा सापळा आहे, जो शेवटी आत्महत्येपर्यंत नेतो. एक प्रकारची नशाच जणू! मेंदूवर होणारा हा प्रहार, यालाच ‘डोपामाइन लूप’Dopamine Loop) म्हणतात. समाजमाध्यमांचे, गेमिंग ॲप्सचे अल्गोरिदम अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की, तुम्ही एकदा काही शोधले की तुम्हाला वारंवार त्याच आशयाचा मजकूर दिसू लागतो. समजा, एका मुलीने के-पॉप बँडचा
एक व्हिडीओ पाहिला, तर तिला दिवसभर त्याच आशयाचे व्हिडीओ दिसतील. यामुळे तिला वाटते की हेच आपले खरे विश्व आहे. याला ‘इको चेंबर’ म्हणतात. वारंवार मिळणार्या ‘लाइक्स’ आणि व्हच्र्युअल प्रतिक्रियांमुळे मेंदूत ‘डोपामाइन’ नावाचे रसायन स्रवते, ज्यामुळे तात्पुरता आनंद मिळतो. जेव्हा ते कमी प्रमाणात स्रवू लागते तेव्हा नैराश्य येते. या खेळातील अल्गोरिदम अशा प्रकारे काम करतात की, मुलांना त्यांच्या खर्या आयुष्यापेक्षा ऑनलाइन आयुष्य अधिक सुंदर वाटू लागते. गाझियाबादच्या मुलींना कदाचित वाटले असेल की, कोरियामध्ये त्यांचे आयुष्य अधिक चांगले असेल. ऑनलाइन खेळात मिळणारे रँकिंग (श्रेणी) व्हच्र्युअल रिवॉर्ड्स – (आभासी बक्षिसे) यांमुळे मुलांना वाटते की, त्यांनी काही तरी मोठे ध्येय साध्य केले आहे. जेव्हा या ‘आभासी’ आणि ‘वास्तव’ जगाचा संघर्ष होतो तेव्हा ही कोवळी मने गोंधळून जातात आणि ते सतत आभासी ओळखीच्या (Virtual
Identity Obsession ) जगात वावरू लागतात. या गेम्समधील हे अल्गोरिदम मानवी कमकुवतपणाचा गैरफायदा घेतात. मुलांना सतत काही तरी गमावण्याची भीती (Fear Of Missing Out/ Fomo) वाटत राहते. जर मी आज हा गेम खेळला नाही किंवा हा व्हिडीओ पाहिला नाही तर मी मागे पडेन, ही भीती त्यांना आत्महत्या करण्याइतपत नैराश्यात ढकलते.
आपला समाज डिजिटल झाला आहे, पण भावनिकदृष्ट्या आपण विखुरले गेलो आहोत. मुलांकडे व्यग्र होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ नाही. शाळेत स्पर्धा, घरी अपेक्षांचे ओझे आणि बाहेर समाजमाध्यमांचा दिखावा यांमध्ये मुले भरडली जात आहेत. गाझियाबादमधील त्या मुलींना कदाचित आपली घुसमट कुणाकडे व्यक्त करावी हे समजले नसावे. या मुलींच्या आत्महत्येच्या तपासात असे समोर आले आहे, मुलींच्या वडिलांना तीन पत्नी आहेत- ज्या सख्ख्या बहिणी आहेत. एकाच घरात पाच मुले आणि तीन माता असे हे वातावरण मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. जेव्हा घरामध्ये वडिलांचे लक्ष विभागलेले असते किंवा कौटुंबिक कलह असतात; तेव्हा मुले भावनिक आधारासाठी बाहेरचा रस्ता शोधतात. या तिन्ही बहिणींच्या बाबतीत त्यांनी हा आधार ‘आभासी जगात’
(Virtual World)शोधला. त्यांच्या दैनंदिनीत आईचा कोणताही उल्लेख नसणे आणि केवळ वडिलांना उद्देशून लिहिणे, हे त्यांच्यातील भावनिक पोकळी अधोरेखित करते.
वडिलांच्या सांगण्यानुसार, मुली तासन्तास कोरियन ड्रामा आणि गेम्समध्ये मग्न असायच्या. जेव्हा त्यांनी रागावून मुलींचे मोबाइल हिसकावून घेतले, तेव्हा मुलींनी टोकाचे पाऊल उचलले. येथे प्रश्न निर्माण होतो, जेव्हा मुली तीन वर्षे शाळेत जात नव्हत्या आणि तासन्तास मोबाइलवर असत; तेव्हा पालकांनी त्यांना वेळीच का रोखले नाही? आणि जेव्हा रोखले, तेव्हा ते इतक्या कठोरपणे का? मोबाइल हिसकावून घेणे हा उपाय नसून, त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे होते. पालकांचा धाक इतका होता की, मुलींना आयुष्य संपवावे वाटले, पण कुणाशी संवाद साधावासा वाटला नाही. या मुली मागील तीन वर्षांपासून शाळेत गेल्या नव्हत्या. संवादाच्या अभावामुळे त्या केवळ ऑनलाइन जगात जगू लागल्या. जेव्हा मुलगा किंवा मुलगी समाजापासून तुटते, तेव्हा इंटरनेट त्यांचे सर्वस्व बनते.
या घटनेने प्रत्येक पालकासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा घटना टाळण्यासाठी काय करावे लागेल यावर पुन्हा एकदा ऊहापोह करण्याची वेळ आली आहे. आणि हे उपाय करणे आता अनिवार्य झाले आहे. मुलांचे ‘डिजिटल जग’ समजून घ्या, मुले काय पाहतात, कोणाशी बोलतात यात रस घ्या. ते चुकत असतील तर त्यांना प्रेमाने समजवा, केवळ ओरडून किंवा मोबाइल हिसकावून काहीही साध्य होणार नाही. कुटुंबात कितीही समस्या असल्या तरी मुलांशी संवाद तुटू देऊ नका. मुलांच्या वागण्यातील बदल म्हणजेच- कमी खाणे, एकांत शोधणे, रागीटपणा हे नैराश्याचे संकेत असू शकतात.
तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवत ‘पॅरेंटल कंट्रोल’ ॲप्सचा वापर करा आणि इंटरनेट वापराची वेळ निश्चित करा. मुलांना घराबाहेरच्या जगात, मैदानीखेळांमध्ये आणि मित्रांमध्ये मिसळू द्या. शाळेपासून दूर राहणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. गाझियाबादची ही घटना एका घराची गोष्ट नाही, तर ती एका पिढीची व्यथा आहे. तीन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी मृत्यूला कवटाळणे हे अधोरेखित करते की, आभासी जगाचा पाश किती खोलवर गेला आहे. ‘कोरिया हेच आमचे आयुष्य आहे…’ हे त्यांचे शेवटचे म्हणणे आपल्याला हेच ओरडून सांगतेय की, मुलांमधील तंत्रज्ञानाचा अतिवापर आणि भावनिक आधार नसलेले घर ही एक जीवघेणी युती आहे. वेळीच सावध व्हा, कारण पुढची शिकार आपले घरही असू शकते.
amitghodekar@hotmail.com
(लेखक सायबर सुरक्षा तज्ज्ञ आहेत.)
