कुठे बाहेर जायचं म्हटलं की, बहुतेक घरांमध्ये लहान मुलांना आधी तयार करून, बाकी सगळं आवरून मग घरातली स्त्री स्वत: तयार होते. माझी आईसुद्धा मला छानसा फ्रॉक घालून, डोक्यावर दोन नारळाची झाडं असल्यासारख्या शेंड्या बांधून द्यायची आणि नंतर स्वत: साडी नेसायची. मी तिच्याकडे बघतच बसायचे. लोखंडी कपाटाच्या निमूळत्या आरशात बघत, पंखा बंद करून पटापट निर्‍या करून मग, ‘‘हुश ऽऽऽ, गिरिजा जरा पंखा लाव गं!’’ म्हणणारी आई मला आजही आठवते.

साडी नेसताना तिला कुणाचीच मदत लागत नसे. निर्‍या स्वत:च काढायची आणि पदराला पिनसुद्धा स्वत:च लावायची! मग साडी नेसून झाल्यावर टाचेत फॉलचा भाग दाबून साडीची मागची बाजू ओढून घ्यायची… हे सगळं बघत बसायला मला खूप आवडायचं. आई साडीत इतकी सुंदर दिसायची; अजूनही दिसते… पण आताशा ती साड्या कमी नेसते.

मला वाटतं, माझं ‘साडीप्रेम’ बहुतेक तेव्हाच सुरू झालं असावं. साडी हा पेहराव्याचा प्रकार मला प्रचंड आवडू लागला. मला वाटायचं, फक्त वयाने मोठ्या आणि लग्न झालेल्या बायकांना रोज साड्या नेसायची परवानगी असते, या एकमेव कारणासाठी मी लग्न करायला तयार होते. लग्न झालं की आपल्याला रोज छान छान साड्या नेसता येतील आणि अधून-मधून केसांत गजराही माळता येईल. बस्स! अजून काय पाहिजे?

काही वर्षांपूर्वी मी एक मालिका करत होते. मालिकेत माझं पात्र जरा बेताची परिस्थिती असलेल्या कष्टाळू, रोज कामावर जाणार्‍या मराठी महिलेचं होतं. या पात्राने साड्या नेसाव्यात असं दिग्दर्शकानं सांगितलं. आमच्या वेशभूषाकार ताई सुती, गडद रंगाच्या (त्यांच्या मते मराठमोळ्या दिसणार्‍या) काठा-पदराच्या साड्या घेऊन आल्या. त्यावर मॅचिंग खणाचे ब्लाऊजसुद्धा शिवले. कॉस्च्युम ट्रायलला गेल्यावर मी हे सगळं पाहून त्यांना म्हणाले, ‘‘अहो, जी बाई घरचं, बाहेरचं, मुलांचं, सासू सासर्‍यांचं, नवर्‍याचं सगळं करून कामालाही जाते, तिला कसा वेळ मिळेल सुती साड्यांची निगा राखायला? त्यांना अधूनमधून ‘स्टार्च’ करावं लागतं, वाळायला वेळ लागतो, इस्त्री लागते. सिंथेटिक साड्या पटकन वाळतात (मुंबईत देखील) आणि दोरीवरून काढून सरळ नेसायला घेता येतात.

इस्त्रीची भानगड नाही! हे पात्रं सुती साड्या नेसणं शक्यच नाही!’’ हे तिला एकदम पटलं आणि तिथून पुढे माझ्या सगळ्या साड्या बदलल्या. हे सगळं मला माहीत असायचं कारण, माझ्या घरात आजी, आत्या आणि आई साड्या नेसायच्या. सिंथेटिक साड्या. लग्न कार्याला, सणासुदीला सिल्कच्याच असायच्या; सुती साड्या जवळपास नाहीच. ऑनलाइन शॉपिंग, मॉल्स आणि मोठमोठ्या दुकानांच्या आधीच्या काळात जेव्हा सर्व सामान्य लोक आपल्या जवळच्या बाजारात खरेदी करायला जायचे; तेव्हा साड्यांच्या दुकानाच्या बोर्डखाली कागदी पंख्यासारख्या रांगेत लटकवलेल्या ज्या साड्या असायच्या त्या- ‘जॉर्जेट’, ‘शिफॉन’, ‘वायल’- रोजच्या साड्या.

अशा साड्यांमध्ये गार्डनच्या नवीन प्रिंट्स बाजारात असल्याचं कळलं की आमच्या घरात चैतन्याचं वातावरण असे. रंगीबेरंगी, फुलाफुलांच्या, सुळसुळीत साड्या! माझी साड्यांची आवड बघून आणि आईलासुुद्धा साड्यांची आवड असल्यामुळे कदाचित, तिने मला शिवलेल्या लहान तयार साड्या केल्या होत्या. त्यांना ‘कल्पना साडी’ असं म्हणायचे सगळे. अगदी ३-४ वर्षांची असल्यापासूनच माझे अशा कल्पना साड्यांमधले फोटो आहेत!

जरा मोठं झाल्यावर कळलं, रोज साड्या नेसण्यासाठी काही लग्न करावं लागत नाही! मग काय? मी ऊठसूट आईच्या साड्या नेसू लागले. गणपतीत, दिवाळी, शिक्षक दिन, निरोप समारंभ आणि कॉलेजमधले सगळे कार्यक्रम! आईच्याच ब्लाउजला आतून धावदोर्‍यानं कमी करायचं आणि नेसायच्या आईच्या सगळ्या आवडत्या साड्या! मी साड्यांमध्ये इतकी कम्फर्टेबल असायचे की ‘साडी डे’ ला जिथे जवळपास वर्गातल्या सगळ्या मुली प्रॅक्टिकल्स बुडवायच्या, तिथे मी साडी नेसून त्यावर लॅब कोट घालून प्रॅक्टिकल्सला जायचे. मला साडी नेसणं आणि मग ती सांभाळणं हे कधीच कठीण वाटलं नाही.

आजही मी सर्रास साड्या नेसून दिवसभर हिंडते, फिरते, खूप चालते. पायात स्पोर्टस् शूज मात्र नेहमी घालते. साडी नेसल्यावर फक्त उंच टाचांच्या चपला घालायच्या असतात असं कुठं लिहिलंय? माझ्यासारख्या रोज साड्या नेसणार्‍या आणि साड्यांवर प्रेम करणार्‍या माझ्या काही आवडत्या स्त्रिया आहेत. अन्विता दत्त ही लेखिका, कवयित्री, दिग्दर्शिका आहे. ती चित्रपटाचं दिग्दर्शन करताना रोज सेटवर साड्या नेसून यायची. अत्यंत धावपळीचं, कष्टाचं काम असतं दिग्दर्शन करणं म्हणजे.

पण ती सुंदर साड्या नेसून सगळं लीलया करायची. आता याचा अर्थ सर्व स्त्रियांनी साड्याच नेसाव्यात असा नाही बरं का! आपल्याला जे कपडे आवडतात, आपलं काम करताना पूरक ठरतात, ते आपल्यासाठी योग्य असतात. मीसुद्धा ड्रेस, पँट्स, शॉर्ट्स घालतेच की! पण साड्या नेसल्या की मला खूप भारी वाटतं; आणि ज्या दिवशी आपण स्वत:ला आरशात बघून खूश होतो, तो दिवस अधिक चांगला जातो, कामंसुद्धा छान होतात, असं मला वाटतं!

सहावारी साड्यांपेक्षाही जास्त कम्फर्टेबल असतात त्या नऊवारी साड्या! नऊवारी इतकं सुटसुटीत काहीच नाही. जवळ जवळ पँट घातल्यासारखी असते. कराटेच्या किक्सपण मारता येतील नऊवारी नेसून! खूप पूर्वी (जेव्हा ‘झी’ मराठीचं नाव ‘अल्फा’ मराठी होतं) तेव्हा ‘तुंबाडचे खोत’ या श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाची एक मालिका होती. त्यात मी पहिले सात- आठ भागच ‘छोट्या गोदावरी’ची (कादंबरीतली नायिका) भूमिका केली होती. तेव्हा मी नऊवारी साडी नेसायला शिकले आणि त्या शूटिंगच्या दरम्यान मी दिवसभर नऊवारीत असायचे आणि ते मला भारीच आवडायचं! लग्नात कुठल्या प्रकारची साडी नेसायची, ही चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा माझं आणि माझ्या सासूचं नऊवारीवर एकमत झालं.

माझी उंची जरा बरी असल्यामुळे मला विकतच्या नऊवारी साड्या सहसा पुरत नाहीत म्हणून माझ्या सासूने पुण्यातल्या दुकानातून दहावारी साडी शिवून घेतली! बर्‍याचदा लग्नातली नऊवारी पुढे कधी नेसणार, म्हणून ती कापून तिची सहावारी करून घेण्यात येते. यात गैर काहीच नाही म्हणा! कपाटात पडून राहण्यापेक्षा जर ती साडी नेसली जाणार असेल तर हा पर्याय छानच! मात्र मी माझी लग्नातली दहावारी साडी अजूनही बर्‍याचदा नेसते! माझी सासू एक उत्तम वेशभूषाकार असल्यामुळे माझ्या लग्नातल्या सगळ्याच साड्या कमाल होत्या. मी त्या सगळ्याच अनेकदा नेसले आहे! माझ्या सासूची साडी ‘भेट’ द्यायची पद्धतसुद्धा अनोखी आहे.

मी कामात व्यग्र असते त्यामुळे साडीचं बाळंतपण (फॉल बिडिंग, परकर, ब्लाऊज, इत्यादी) करत बसणं मला जमणार नाही, म्हणून माझी सासू साडी देताना हे सगळं आधीच करून देते. शिवलेल्या ब्लाउजसकट, त्यावर शोभेल अशा परकरसह साडी हातात! गिफ्ट बॉक्स उघडला की साडी नेसायला तयार!

मी कमवायला लागल्यावर स्वत:साठी विकत घेतलेली पहिली वस्तू काय असेल, हे काही आता वेगळं सांगायला नको. नाटकाच्या दौर्‍यावर कोलकाताला गेले होते आणि तिथून मी माझी पहिली स्व-कमाईतून विकत घेतलेली ‘बालुचेरी’ साडी आणली. ती साडी वीस वर्षं जुनी आहे आणि अजूनही माझ्याकडे नीट ठेवलेली आहे.

अशा माझ्याकडे खूप जुन्या- नवीन, आईकडून ढापलेल्या, विकत घेतलेल्या, भेट मिळालेल्या, आई, आज्जी, आत्या, मावशी, सासू, आज्जेसासू या सगळ्यांच्या साड्या आहेत. तो माझा ‘खजिना’ आहे, असं मला वाटतं. यामध्ये ‘पैठणी’, ‘इरकल’, ‘नारायणपेठी’, ‘कांजीवरम’, ‘बनारसी’, ‘जामेवार’, ‘वलकला’, ‘मेखला चादोर’, ‘पोचमपल्ली’, ‘संबलपुरी’, ‘भागलपुरी’, ‘कोटा डोरिया’, ‘उप्पाडा’, ‘तांत’, ‘जामदानी’, ‘महेश्वरी’, ‘चंदेरी’, ‘पटोला’, ‘कसवू’, ‘पट्टेदा आंचू’ या साड्यांच्या प्रकारांबरोबरच ‘टसर’,‘मुंगा’, ‘इरी’, ‘कोसा’, ‘प्युअर सिल्क’, ‘रॉ-सिल्क’, ‘कॉटन सिल्क’, ‘कॉटन’, ‘काला कॉटन’, ‘मल कॉटन’, ‘ऑर्गंडी’, ‘ऑरगंझा’, ‘टिश्यू’, ‘जॉर्जेट’, ‘शीफाँन, ‘मॉडाल’ अशा सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत!

या सगळ्यात माझ्याकडे एक खूपच खास गोष्ट आहे. माझ्या साड्यांच्या खजिन्यातला ‘कोहिनूर’. माझ्या आज्जीची साडी आणि माझ्या पणजीची शाल यांना एकत्र करून माझ्या आजोबांनी एक गोधडी शिवली आहे. त्यांना शिवणकाम करायला खूप आवडत असे. ते कापडी पिशव्या, पायपुसणी असे प्रकार शिवत बसायचे. ही खास ‘गोधडी’ देताना मला ते म्हणाले होते, ‘‘हे घे, तुला डबल आशीर्वाद. आज्जी आणि पणजी दोघींचे!’’

साड्या मला जवळच्या, जिव्हाळ्याच्या वाटण्यामागे अजून एक कारण आहे. साड्या आपल्याला ‘जज’ करत नाहीत. आपली ठेवण, उंची, वजन याकडे लक्ष देत नाहीत आणि फारसं कुणाचं लक्ष जाऊही देत नाहीत. झाकल्यासारखं, लपवल्यासारखं नाही करत. त्या आपल्याला सामावून घेतात. एखाद्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीनं मिठीत घ्यावं तसं. शिवाय या साड्या जर एखाद्या जिव्हाळ्याचा व्यक्तीच्याच असतील तर तिनंच आपल्याला जवळ घेतलं आहे असं वाटतं.

मला माझ्या खजिन्यातल्या आज्जीच्या, आईच्या साड्या नेसल्यावर नेहमी खूप सुरक्षित वाटतं. ज्या दिवशी मला उदास वाटतं, त्या दिवशी मी हमखास या साड्या नेसते. त्या साड्या मला अलगद मिठीत घेतात… माझी सगळी उदासी गळून पडते. माझ्या आजीनं, आईनं मला कुशीत घेतलंय असं वाटतं.

chaturang@expressindia