आज भारतीय स्त्री खेळाडू केवळ पदके जिंकत नाहीत, तर त्या भारतीय क्रीडाजगताचे भविष्य घडवत आहेत. प्रत्येक पदकविजेत्या स्त्री खेळाडूच्या गळ्यातील पदक आणि हातातील तिरंगा भारतीय स्त्रीच्या जिद्दीचे,सामाजिक परिवर्तनाचे आणि नव्या भारताच्या उंच भरारीचे प्रतीक आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण १३ पैकी तब्बल ८ सुवर्णपदके स्त्री खेळाडूंनी मिळवून भारताचा झेंडा उंच फडकवला आहे. त्यानिमित्ताने… लहरा दो…

‘भारतीय ऑलिम्पिक संघटने’च्या पहिल्या स्त्री अध्यक्ष पी.टी.उषा यांनी नुकत्याच ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी भारताचा तिरंगा आणि बॅटन मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन या स्त्री खेळाडूंकडे मोठ्या विश्वासाने सोपवला होता. एखादी प्रतीकात्मक कृती दिसायला छोटी असली तरी त्यात खूप लोकांना प्रेरित करण्याची ताकद असते. स्त्री खेळाडूंना सन्मान आणि समानता बहाल करण्याची ही सुवर्णसंधी स्वत: गतकाळच्या प्रथितयश खेळाडू असल्यामुळे उषा यांनी अंमलात आणली. स्त्री खेळाडूंच्या मनाची स्पंदने ओळखून अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींनी त्याचा योग्य तो आदर करणे हा दुग्ध-शर्करा योग त्यामुळे साधला. स्पर्धेच्या अखेरीस भारताला मिळालेल्या एकूण १३ सुवर्णपदकांपैकी तब्बल ८ सुवर्णपदके मिळवण्याचा महत्त्वाचा वाटा भारतीय स्त्री खेळाडूंनी उचलून उषा यांचा विश्वास सार्थ ठरवला.

वास्तविक २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये घेण्याचे सुनिश्चित होते, परंतु ऑस्ट्रेलियाने आर्थिक अडचणींमुळे या स्पर्धा घेण्याबाबत असमर्थता दर्शविली. शेवटच्या घटकेला ग्लासगोने या स्पर्धांचे यजमानपद स्वीकारले. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेणे हे मोठे जिकिरीचे काम असते आणि त्यासाठी खूप पूर्वतयारी आवश्यक असते. ती ग्लासगो येथे आयत्या वेळी करणे शक्य नव्हते. त्यामुळे या स्पर्धांमधील पूर्वनियोजित १९ खेळांऐवजी काटछाट करून फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची स्पर्धेच्या सुरुवातीला खूप निराशा झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्पर्धेतून काढून टाकलेले खेळ पारंपरिकदृष्ट्या भारतासाठी भरपूर पदके मिळवून देणारे होते. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी, तिरंदाजी, हॉकी, क्रिकेट यासारखी भारताची बलस्थाने स्पर्धेतून बाद झाल्यामुळे भारत पदकतालिकेत खालच्या स्थानावर फेकला जाण्याची शक्यता सर्वांना भेडसावत होती. गेल्या वेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांपैकी जवळपास अध्र्या पदकांचा वाटा या खेळांतून आला होता. पण यंदा सर्वच भारतीय खेळाडूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत १३ सुवर्णपदकांसहित एकूण ३९ पदके मिळवली आणि पदक तक्त्यात मानाचे चौथे स्थान मिळवले. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, ज्युडो आणि वेटलिफ्टिंग हे खेळ या वेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारताचे तारणहार ठरले.
साधारणपणे परदेशात जाऊन तेथील स्पर्धांमध्ये पदके मिळविणे थोडे जास्त अवघड असते. दीर्घकाळ विमान प्रवासानंतर होणारा जैविक चक्रावरील परिणाम, बदललेले अन्न, स्पर्धेचे वेळापत्रक या सर्व परिस्थितीशी जुळवून घेत मानसिक दबावाखाली सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणे खूप कठीण असते. त्यात ग्लासगो येथील बोचर्‍या थंडीचा सामना खुल्या मैदानात होणार्‍या खेळांमधील खेळाडूंना करावा लागला. यावर मात करत भारतीय स्त्री खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्या क्रीडा सामर्थ्याचे जोरदार प्रदर्शन केले. आपल्या देशासाठी या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून भारताची सोनेरी सुरुवात करून दिली ती मीराबाई चानूने! या स्पर्धेत बाकी स्पर्धकांपेक्षा कितीतरी सरस वजन उचलून तिने बाकीच्या स्पर्धकांना जवळपाससुद्धा पोचू दिले नाही. मीराबाई मूळची मणिपूरमधील इंफाळपासून २० किलोमीटर लांब एका गावात राहणारी. तिचे वडील बांधकाम मजूर होते, तर आई चहाचे छोटेसे दुकान चालवून संसाराला हातभार लावत असे. सहा भावंडांमधील सर्वात धाकटी मीराबाई जवळपासच्या जंगलात भावंडांबरोबर लाकूडफाटा गोळा करायला जात असे. एके दिवशी सोळा वर्षांच्या भावाला उचलायला कठीण झालेली लाकडाची मोळी बारा वर्षांच्या मीराबाईने लीलया डोक्यावर उचलून घेतली आणि दोन किलोमीटर डोंगराळ भागातून सलग चालत घरी घेऊन आली. या प्रसंगामुळे तिच्या कुटुंबीयांना तिच्या या लीलया वजन उचलण्याच्या कौशल्याची जाणीव झाली आणि तिथेच तिच्या वेटलिफ्टिंग कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. सरावासाठी करावा लागणारा खडतर प्रवास, अपुरी साधने, सुरुवातीचे अपयश हे सर्व पचवून मीराबाईने जागतिक विजेतेपद आणि ऑलिम्पिक रौप्यपदक अशा उत्तुंग शिखरांना गवसणी घातली आहे. जागतिक स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या मीराबाईच्या दृष्टीने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविणे हा डाव्या हातचा मळ होता.

या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारतीय स्त्री खेळाडूंनी आपला जोश दाखवला. प्रीती पवार, जास्मिन लाम्बोरिया, साक्षी चौधरी, प्रिया घंघास आणि अरुंधती चौधरी या वाघिणींनी आपल्या मनगटाची ताकद दाखवत एकट्या बॉक्सिंग या खेळात तब्बल पाच सुवर्णपदके खेचून आणली. प्रथितयश खेळाडूंना मिळालेली प्रसिद्धी खेळाडूंची पुढची पिढी कशी घडवू शकते याचे ठळक उदाहरण म्हणजे प्रीती पवारचे या स्पर्धेतील यश! हरयाणातील भिवानी येथून आलेल्या प्रीती पवारचे वडील हरयाणा पोलीसमध्ये नोकरी करीत असत. ते स्वत: कबड्डी खेळत, तर काका राष्ट्रीय पातळीवरचे मुष्टियोद्धा होते. तिचे पणजोबादेखील कुस्तीपटू होते. परंतु या मैदानी खेळांची आवड जोपासणार्‍या कुटुंबात घरातील मुलीला मैदानी खेळात उतरविण्याची कल्पना या कुटुंबाला सुचली ती ‘दंगल’ चित्रपटातील ‘हमारी छोरीया छोरों से कम हैं के?’ या वाक्याने! पुढे हरयाणाच्या साक्षी मलिकने भारतासाठी कुस्तीतील स्त्रियांचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळविल्यावर तर प्रीतीला मैदानी खेळात उतरविण्याचे विचार तिच्या कुटुंबात प्रकर्षाने चर्चेस येऊ लागले. काका मुष्टियोद्धा असल्याने १३ वर्षांच्या प्रीतीला त्यांनी थोडेफार प्राथमिक धडे देऊन बॉक्सिंगच्या रिंगणात उतरवले. शांत स्वभावाची प्रीती गांगरून गेली आणि तो सामना हरली. पण त्यामुळे तिच्या मनात भीती उत्पन्न न होता, आपण हे शिकले पाहिजे, बॉक्सिंग वर मेहनत घेतली पाहिजे अशी ईर्षा उत्पन्न झाली. प्रचंड मेहनतीनंतर प्रीतीने राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मुक्काम गाठला आहे. आता विविध जागतिक दर्जाच्या स्पर्धांसाठी तिची जोरदार तयारी चालू आहे. फोगट भगिनींवर बेतलेल्या ‘दंगल’ चित्रपटाने आणि साक्षी मलिकच्या यशाने प्रेरित होऊन मैदानात उतरलेल्या प्रीतीच्या रूपाने भारताला आणखी एक गुणी युवा खेळाडू मिळाली आहे.

अस्मिता डे हिने या स्पर्धेत भारतासाठी ज्युडोत मिळविलेले पहिलेवहिले राष्ट्रकुल सुवर्ण पदक विशेष महत्त्वाचे आहे. ज्युडो, जलतरणसारख्या काही खेळांमध्ये भारतासाठी पदकांची वानवा असते. त्यामुळे जितक्या अधिकाधिक खेळांमध्ये भारताला पदके मिळतील, तेवढ्या या दुर्लक्षित खेळांचा पाया देशात विस्तारायला मदत होईल. त्रिपुरामधील एका लहान गावातून आलेल्या अस्मिताचे वडील सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करून कसाबसा चरितार्थ चालवत असत. पण घरची बेताची परिस्थिती त्यांनी अस्मिताच्या खेळाच्या सरावा आड येऊ दिली नाही. राष्ट्रकुल स्पर्धांच्या निवड चाचणीच्या काही दिवस आधी अस्मिताचा हा आधारस्तंभ काळाने हिरावून घेतला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. परंतु अस्मिताच्या आईने त्यांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करीत अस्मिताला वडील गेल्यानंतर दहाच दिवसांनी सराव सुरू करायला उद्युक्त केले. आपल्या वडिलांची इच्छा काही अंशी पुरी केल्याचा आनंद अस्मिताला या सुवर्ण पदकामुळे झाला असेल.

या राष्ट्रकुल स्पर्धेत शर्मिला धनखड आणि शिल्पा शैला या भारतीय स्त्री दिव्यांग खेळाडूंनी प्रथमच गोळा फेक या क्रीडाप्रकारात एकाच वेळी अनुक्रमे सुवर्ण पदक आणि कांस्य पदक पटकाविण्याचा आगळा-वेगळा पराक्रम केला. आयुष्यात जरी अनेक वेळा नियतीने अडथळे उभे केले तरी खचून न जाता पुन:पुन्हा उभारी घ्यायचे शिकावे ते सुवर्ण पदक विजेत्या शर्मिला धनखडकडून! वयाच्या दुसर्‍या वर्षांपासून पोलिओमुळे आलेल्या अपंगत्वाला सोबत घेऊन बालपण घालवावे लागलेल्या शर्मिलाने तरुणपणी आयुष्याकडून मौजमजेच्या अपेक्षा ठेवल्या तर त्यात गैर नव्हते. पण लग्नानंतर बघितलेली तिची स्वप्ने वैवाहिक आयुष्यात झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे उद्ध्वस्त झाली. दोन मुलींना घेऊन घर सोडावे लागलेल्या शर्मिलाची आर्थिक स्थितीसुद्धा साधारणच होती. पण हिंमत न हरता शर्मिलाने संसाराचा दुसरा डाव मांडला. या वेळी मात्र तिला समजून घेणारा जीवनसाथी भेटला. आर्थिक चणचण असूनसुद्धा तिच्या दुसर्‍या पतीने तिला वयाच्या तेहतिसाव्या वर्षी गोळाफेक खेळण्यास प्रवृत्त केले आणि खेळात खूप प्रोत्साहन दिले. ज्या वयात खेळाडू निवृत्तीचा विचार करतात, त्या वयात शर्मिलाने खेळ शिकायला सुरुवात केली. सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये पदक मिळविण्यात अपयश आले तरी खचून न जाता शर्मिला धनखडने प्रयत्न सोडले नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताची पहिली सुवर्ण पदक विजेती दिव्यांग खेळाडू होऊन इतिहास रचण्याचा मान तिने ग्लासगोला मिळवला. शर्मिलाच्या कहाणीने प्रेरित होऊन, कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागणार्‍या स्त्रियांना पुन्हा जगण्याची ताकद मिळावी आणि या पदकामुळे तिच्या कुटुंबाला हक्काचे घर घेता यावे अशी तिची इच्छा आहे.

पुढच्या राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करायची संधी भारताला मिळाली आहे. २०३० मध्ये अहमदाबाद येथे नियोजित या स्पर्धांमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळेल. पण तोपर्यंत आशियाई गेम्स, विविध खेळांतील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, ऑलिम्पिक अशा अनेक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कसोटी लागेल. राष्ट्रकुल स्पर्धेचा दर्जा या स्पर्धांच्या मानाने थोडा कमी मानला जातो. त्यामुळे या खेळाडूंनी व त्यांच्या चमूने या स्पर्धेतील कामगिरीवर संतुष्ट न राहता आशियाई आणि जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी कशी करता येईल याकडे लक्ष देणे श्रेयस्कर ठरेल. आपल्या खेळाचे प्रशिक्षकांबरोबर विश्लेषण करणे, लागेल तशी वैज्ञानिक मदत घेणे, पुढचे ध्येय ठरवून त्या दिशेने अथक प्रयत्न करणे हे कोणत्याही खेळाडूला सतत करावे लागते. प्रत्येक पदकासाठी मोठे आर्थिक पाठबळ लागते. जरी यासाठी बर्‍याच सरकारी योजना राबविल्या जात आहेत, तरी लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न आहे अशा दानशूर व्यक्तींनी आणि संस्थांनीसुद्धा या कामासाठी पुढे येण्याची जरूर आहे. योग्य वयात गुणवत्ता हेरणे, त्याचे संगोपन करणे, खेळाडूंना खेळ संपल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची सोय अशी समाजपद्धती भारतात निर्माण होण्याची गरज आहे.

राष्ट्रकुल पदक विजेत्यांचे वाजत-गाजत झालेले स्वागत, प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे यांनी त्यांना दिलेली प्रसिद्धी, अनेक स्तरांवर मिळालेली कौतुकाची थाप, त्यांना जाहीर झालेली बक्षिसे या सर्वांचा भारतीय क्रीडाक्षेत्रावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. आजच्या घडीला, ज्या खेळांची पाळेमुळे भारतात रुजली आहेत अशा खेळांमधून प्रत्येकी जेमतेम दोन-तीन युवा स्त्री खेळाडू पुढे येताना दिसतात. भविष्यात अशा खेळाडूंची फळी निर्माण होण्यासाठी या प्रसिद्धीचा फायदा होऊ शकतो. तसेच जे खेळ आजवर भारतात दुर्लक्षित आहेत, त्यात भविष्य घडवण्याची जिद्द एखाद्या मुलीत यामुळे निर्माण होऊ शकते. कदाचित यशस्वी खेळाडूंच्या कहाण्या वाचून लहान गावातील अथवा सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतील कुटुंबे, दिव्यांग मुलींची कुटुंबे आपल्या मुलींना क्रीडाक्षेत्रात जाण्यासाठी पाठिंबा देण्यास प्रभावित होऊ शकतील.

प्रीती पवार प्रमाणे यशस्वी खेळाडूंच्या अशा कौतुकामुळे खेळाकडे वळलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या आणखी एका स्त्री खेळाडूचे उदाहरण आपल्याला या राष्ट्रकुल स्पर्धेतच बघायला मिळेल. ते आहे पाकिस्तानसाठी बॉक्सिंगमध्ये स्त्रियांसाठी पहिले राष्ट्रकुल पदक मिळविणार्‍या फातिमा झाहरा हिचे! पाकिस्तानातील पंजाब प्रांतातून आलेली फातिमा केवळ दहा वर्षांची असताना सुप्रसिद्ध भारतीय मुष्टियोद्धा मेरी कोम हिच्या आयुष्यावर आधारित हिंदी चित्रपट पाहून इतकी प्रभावित झाली की मेरीला आदर्श मानून तिने बॉक्सिंग हे तिचे ध्येय ठरवले. तिच्या अडथळ्यांना कुटुंबातील विरोधापासून सुरुवात झाली. पण मेरीने जशी सर्व अडथळ्यांवर मात केली, तशीच आपण करायची या जिद्दीने प्रेरित झालेल्या बावीस वर्षीय फातिमाने कठोर सरावाअंती या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. आज प्रथितयश भारतीय स्त्री खेळाडू भारतातीलच नव्हे तर जगभरातील मुलींच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत ही भारताच्या दृष्टीने निश्चित अभिमानाची बाब आहे.

gokhale.anupama@gmail.com