|| निलेश अडसूळ

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

यंदाच्या आठव्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार- २०२१’ च्या मानकरी ठरलेल्या दुर्गांचा गौरव सोहळा नुकताच मुंबईत  मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला साथ लाभली ती ज्येष्ठ साहित्यिका शान्ता शेळके यांच्या गीत-काव्याच्या शब्दोत्सवाची. पुरस्कार प्रदान आणि  शब्द-सुरांची सुरेल मैफल यामुळे हा सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला…         

असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे फुलाफु लांत येथल्या उद्या हसेल गीत हे…

चतुरस्रा साहित्यिक शान्ताबाई शेळके  यांच्या कवितांचा शब्दोत्सव आणि ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ प्रदान सोहळा यांचा समसमा संयोग घडला आणि गुरुवारची ही संध्याकाळ सूरमयी होऊन गेली…

   यंदा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’चे आठवे वर्षं.  गेल्या वर्षीच्या करोना काळातील ‘ऑनलाइन’ कार्यक्रमाचा अपवाद वगळता दरवर्षी ‘सामान्यांतील असामान्य’ ९ जणींचा सत्कार समारंभ नामवंतांच्या हस्ते मोठ्या कौतुकानं साजरा होत आहे. आणि या कौतुकाला साथ लाभते ती शब्द-सुरांच्या मैफलीची. यंदा ती शान्ताबाई शेळके  यांच्या कवितांनी सजली, निमित्त होतं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं.  गुरुवार- २८ ऑक्टोबर रोजी दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहा’त करोनासंबंधीचे नियम पाळून झालेल्या या सन्मान सोहळ्यास वाचकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अखंड संघर्ष करत, प्रवाहाविरोधात चालण्याची धमक दाखवत, प्रचंड ऊर्जेनं परिवर्तन घडवण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या या दुर्गांचा सन्मान करण्यासाठी विविध क्षेत्रांतील नामवंतांनी हजेरी लावली होती.  कार्यक्रमाची सुरेल सुरुवात प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’च्या कलाकारांनी केली.  शान्ताबाईंची अर्थगर्भ गीतं आणि काव्यामुळे आणि  सुरेल गायनानं कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ‘तोच चंद्रमा नभात’, ‘ही वाट दूर जाते’, ‘रूपास भाळलो मी’, ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’, ‘माझ्या सारंगा राजा सारंगा’ यांसारख्या शान्ताबाईंच्या अजरामर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. केतकी भावे जोशी, सोनाली कर्णिक, मंदार आपटे या गायकांनी ही मैफल रंगवली. केवळ भावगीतंच नाही, तर बोली भाषेतील गीतं, लावणी, अशा विविध गीतप्रकारांमधून शान्ताबाईंच्या लेखणीचं वेगळेपण उलगडण्यात आलं. या वेळी कुणाल रेगे यांच्या निवेदनातून शान्ताबाईंचा लेखनप्रवास, किस्से आणि घटनांमधून उलगडत गेला.

  ‘‘स्त्रीच्या आयुष्यातील आव्हानं, जीवनप्रवास, चौकटीबाहेरचं कार्य वाचकांसमोर आणण्याचं काम ‘लोकसत्ता’ सातत्यानं करत आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गां असते, जी तिच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत असते. त्याच कार्याचा सन्मान म्हणजे हा पुरस्कार आहे,’’ असं ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी पुरस्काराचं महत्त्व विशद करताना सांगितलं.     ‘‘नवरात्रीत विविध क्षेत्रात विधायक काम करणाऱ्या नऊ स्त्रियांचा सन्मान केला, तर नवरात्रीला खरा अर्थ प्राप्त होईल, या हेतूनं या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली,’’ असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांनी या दुर्गांच्या शोधाचा प्रवास आपल्या प्रस्तावनेतून उलगडला. कर्तृत्ववान स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आदर्श उभा राहावा, हा या पुरस्कार सोहळ्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. वृत्तपत्रात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेल्या ४५० हूनही अधिक स्त्रियांच्या नामांकनांतून नऊ जणींची निवड करण्यात आली. ही निवड अतिशय चोखंदळ पद्धतीनं करण्यात आली असून अंतिम निवडीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पाटकर आणि कवयित्री-कथाकार नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं, अशी माहितीही त्यांनी दिली.

सांगीतिक मैफल आणि पुरस्कारांचं वितरण यांचा उत्तम मेळ या वेळी साधला गेला होता. सुरुवातीला काही गीतांच्या सादरीकरणानंतर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. कठीण परिस्थितीवर मात करत परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचं संघटन उभं करणाऱ्या शुभदा देशमुख, या तीन दुर्गांचा सन्मान ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते करण्यात आला.

 त्यानंतर पुन्हा एकदा शान्ताबाईंच्या अजरामर गाण्यांची मैफल सजली. शान्ताबाईंच्या लेखणीतून उतरलेली गाणी ऐकण्यात प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी गाण्यांवर ताल धरला होता.  त्यानंतर पुन्हा दुर्गांच्या पुरस्काराचा सोहळा सुरू झाला.  रत्नांची पारख करण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. जयश्री पंजीकर, ओडिसी नृत्यातील ज्येष्ठ नृत्यांगना व वंचितांना नृत्यशिक्षणात सामावून घेणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडितांसाठी तसेच कचरावेचक व्यक्तींसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदूम यांचा प्रसिद्ध अभिनेत्री

सुकन्या कु लकर्णी-मोने यांच्या हस्ते, तर रेशमाच्या किड्यांपासून मिळणाऱ्या स्त्रावाचा मानवी उपचारांसाठी उपयोग करण्याबाबतचं संशोधन करणाऱ्या डॉ. अनुया निसळ आणि दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत पीएच.डी. मिळवणाऱ्या डॉ. ऊर्वी जंगम यांना प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  इराणमध्ये असल्याने पुरस्कारप्राप्त कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन यावेळी उपस्थित राहू शकल्या नाहीत. या कार्यक्रमाची संहिता चिन्मय पाटणकर यांनी लिहिली होती, तर अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या रसाळ सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढत गेली…  या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या दुर्गांचा प्रवास रासिकांपुढे केवळ शब्दरूपातच नाही तर चित्रफितीच्या रूपातही मांडला गेला. प्रत्येकीचं कार्य थोडक्यात, पण समर्पक पद्धतीनं उलगडण्यासाठी हे लघु-माहितीपट तयार करण्यात आले होते. पुरस्कारप्राप्त दुर्गांचं कार्य नेमकं कसं चालतं, त्यांच्या वाटेतील अडथळे काय आहेत, त्यांचा संघर्ष आणि त्यातून घेतलेली भरारी हे त्यात अधोरेखित करण्यात आलं.

 दुर्गां पुरस्कारांच्या वितरणानंतर सुरू झाला कवयित्री शान्ता शेळके  यांच्या कवितांचा शब्दोत्सव. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर व अनुश्री फडणीस यांनी शान्ताबाईंच्या काव्यांतील रेशीम धाग्यांची आणि ‘कर्नाटकी कशिद्या’ची हळुवार पेरणी करत त्यांची काव्यप्रतिभा उलगडत नेली.  या काव्यधारेत शान्ताबाईंच्या विविध लोकप्रिय कवितांचा रसिकांना पुन्हा आस्वाद घेता आला. शब्दांची निवड, भावनेला करून दिलेली वाट आणि रचनेचं लालित्य अशी खासियत असलेल्या शान्ताबाईंच्या कवितांना रसिक वर्ग भरभरून दाद देत होता. करोनाकाळात बंदी घातली असल्यानं कित्येक महिन्यांनी सर्व नियम पाळून पहिल्यांदा होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या या सार्वजनिक सोहळ्यांत शब्दसुरांची ही मैफल हटके  आनंद देऊन गेल्यानं रसिक तृप्त झाले.

 इंग्रजीत ‘चेरी ऑन द के क’ म्हणतो त्या प्रमाणे सोहळ्याचा शेवट झाला तो ‘लोकसत्ता दुर्गां जीवनगौरव पुरस्कारा’नं. ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना यंदा हा सन्मान देण्यात आला तो यंदाच्या पुरस्कारप्राप्त दुर्गांच्या हस्ते. ‘‘हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्काराइतकाच मानाचा आहे,’’ असं सांगत डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्याचं कौतुक केलं. कलेच्या महत्त्वाविषयी त्या भरभरून बोलल्या. शालेय जीवनात मुलांना कलेचं शिक्षण द्यायला आपण कमी पडतो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘‘कला हीदेखील माणसाची मूलभूत गरज असून ती जीवनमूल्यं घडवण्यास मदत करते. आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, याची जाणीव कलेमुळे होते. काय करावं आणि काय करू नये, याचं भान कलेमुळे माणसाला प्राप्त होतं,’’ अशा शब्दांत त्यांनी कलेचं महत्त्व पटवून दिलं. ‘‘आपलं शिकणं सुरू आहे तोवरच आपल्याला शिकवण्याचा अधिकार आहे. माझं शिकणं अजूनही सुरू आहे. ‘लोकसत्ता’नं हा पुरस्कार देताना समाजातील इतर कार्यांबरोबर  कलेलाही प्राधान्य दिलं, म्हणून हा पुरस्कार मला विशेष वाटतो.’’ असे गौरवोद्गार त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना काढले.

‘ग्रॅव्हिटस् फाउंडेशन’च्या उषा काकडे, ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’चे डी. शिवप्रसाद, ‘सनटेक रिअल्टी लिमिटेड’चे अंकित शहा, ‘बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.’च्या प्रिया राणे, ‘राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टिलायझर्स लि.’चे पराग दांडेकर आदी या वेळी उपस्थित होते.

 या पुरस्काराच्या माध्यमातून केवळ नऊ दुर्गांना सन्मानित केलं जात असलं, तरी या पुरस्कारांसाठी दरवर्षी येणारे चारशेहून अधिक अर्ज ही समाजाच्या जागलेपणाची बाब आहे. गेली आठ वर्षं मोठ्या प्रमाणात राज्यभरातून हे अर्ज येत असून करोनाकाळातही हा ओघ थांबला नाही. स्त्रिया केवळ सक्षम झाल्या नसून समाज समृद्ध करण्यासाठी झटत असल्याची प्रचीती यावरून येते. अगदी वैयक्तिक स्तरावर संघर्ष करत आपल्या कु टुंबाला प्रगतिपथावर आणणाऱ्या स्त्रियांपासून उत्तुंग यश मिळवणाऱ्या किं वा मोठं सामाजिक काम उभारणाऱ्यां अनेकींचे अर्ज या पुरस्कारांसाठी येतात. खरं तर या सर्वजणी त्यांच्या त्यांच्या जागी ‘दुर्गां’च आहेत! स्त्रीच्या समृद्धीचा आलेख असाच वाढत राहणार आणि ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारां’ची परंपरा वर्षानुवर्ष अखंडित राहणार याचीच खात्री या पुरस्कार सोहळ्यानं ठसठशीतपणे अधोरेखित के ली.

‘दुर्गा पुरस्कार’ हा कायमच मला भावत आलेला आहे. गेल्या आठ वर्षांत आपल्याला माहीत नसलेल्या कित्येक गोष्टी या पुरस्काराने जगासमोर आणल्या आहेत. ‘नव्हत्याचं होतं’ करणाऱ्या या असामान्य स्त्रिया कायमच मला प्रेरणा देणाऱ्या वाटतात. या सर्व दुर्गांना माझा मनापासून सलाम. – रोहिणी हट्टंगडी, ज्येष्ठ अभिनेत्री

माझ्यासाठी हा पुरस्कार सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे. माझे पहिले नाटक ‘दुर्गा झाली गौरी’ होते. ज्यात रोहिणी हट्टंगडी माझ्या आजीच्या भूमिकेत होत्या. माझी जवळची मैत्रीण ऊर्मिला मातोंडकर आणि ‘जीवनगौरव पुरस्कारा’च्या मानकरी  सुचेता भिडे-चापेकर या माझ्या गुरू, असे सगळे या पुरस्काराच्या निमित्ताने इथे एकत्र भेटले. माझ्या गुरूला पुरस्कार घेताना पाहणे याहून दुसरे सुख नाही. ज्या नऊ दुर्गांना पुरस्कार मिळाला त्यांचे कार्य अवाक करणारे आहे. इथपर्यंत पोहोचणे सोपे नसते. त्यांच्या कार्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळाळत आहे. अशा दुर्गांना पुरस्कार देण्यासाठी मला आमंत्रित केले हे माझ्यासाठी भाग्याचे आहे.    – सुकन्या कुलकर्णी-मोने, सुप्रसिद्ध अभिनेत्री

‘जीवनगौरव पुरस्कारा’बरोबरच ‘दुर्गा पुरस्कारां’मध्येही इतरांबरोबर कला क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांनासुद्धा सन्मानित केले गेले, याचे मला विशेष कौतुक वाटते. ‘लोकसत्ता’ने कलेचे महत्त्व जाणले याबद्दल मी आभार मानते. हा पुरस्कार स्वत:वरचा विश्वास वाढवणारा आहे. कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याला प्रसिद्धी देऊन केलेला त्यांचा गौरव हा समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. हा पुरस्कार असाच पुढे सुरू राहावा.  – डॉ. सुचेता भिडे-चापेकर,  ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू

हा ‘दुर्गा पुरस्कार’ आहे. स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे काम करताना मी जी लढाई लढते, ती लढाई कु णा पुरुषाशी नसून वाईट प्रवृत्तींशी आहे. दुर्गेनेही नेमके हेच केले होते. राक्षसाचा वध केला, म्हणजे तिने राक्षसी प्रवृत्तीला नष्ट केले. म्हणून हा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो. जेव्हा आपल्या कामाचा गौरव योग्य हातांतून होतो तेव्हा खरे समाधान प्राप्त होते. ‘लोकसत्ता’ने माझे २५ वर्षांचे कार्य पाहून सन्मानित केले याचा मला मनोमन आनंद आहे.   – अरुणा सबाने, सामाजिक कार्यकर्त्या

हा माझ्या एकटीचा पुरस्कार नसून माझ्याबरोबर काम करणाऱ्या साडेसहा हजार स्त्रियांना मिळालेला सन्मान आहे. बचतगटांच्या माध्यमातून या स्त्रियांनी गावांमध्ये मोठे बदल घडवून आणले. कुपोषणावर मात करण्यासाठी त्यांनी चळचळ उभी केली. स्त्रियांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय सक्षमीकरण करणे हा आमचा उद्देश आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’असे ब्रीद घेताना केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तर स्त्रियांच्या मानसिक आणि सामाजिक आरोग्यालाही महत्त्व देण्याचं काम आम्ही करतो. या कामाची दखल ‘लोकसत्ता’ने घेतली हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. – शुभदा देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या

‘लोकसत्ता’ जेव्हा आपल्या कामाचा सन्मान करते तेव्हा आपल्याच कामाकडे पुन्हा एकदा मागे वळून पाहताना आनंद वाटतो. ‘रत्नपारखी’ हे अत्यंत वेगळे क्षेत्र असूनही त्याला प्रकाशात आणण्याचे काम ‘दुर्गा पुरस्कारा’ने केले. माझ्याबरोबर ज्या स्त्रियांना पुरस्कार मिळाले त्यांचेही कार्य तितकेच महत्त्वाचे आहे. असेच कार्य समाजात घडत राहिले तर देश प्रगती  करतच राहील.    – डॉ. जयश्री पंजीकर, रत्नशास्त्रातील तज्ज्ञ

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ मिळणे ही महत्त्वाची बाब आहेच; पण त्याहीपेक्षा ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून माझे काम जगभरात पोहोचले याचा आनंद विशेष आहे. हा माझा गौरव नसून माझ्या कार्याचा गौरव आहे. इथे पुरस्कार मिळालेल्या नऊ दुर्गा काहीतरी नवा विचार, नवी प्रेरणा समाजाला देत आहेत. त्यामुळे त्या नवनिर्मिती करणाऱ्या ‘नवदुर्गा’ही आहेत.     – झेलम परांजपे, ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना व नृत्यगुरू

‘लोकसत्ता’च्या माध्यमातून माझे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. माझी माहिती ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच

कित्येक वाचकांनी संपर्क साधून मदतीचे

हात पुढे केले. मला वाटते, पुरस्कार मिळण्याबरोबरच  पुरस्काराचा असा सकारात्मक प्रभाव पडणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘लोकसत्ता’ने या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल त्यांचे आभार.       – वृषाली मगदूम, सामाजिक कार्यकर्त्या

हा पुरस्कार मला मिळाला हे  मी माझे भाग्य समजते. ही शाबासकीची थाप आहे, हे पाठबळ आहे, जबाबदारी आहे. या पुरस्काराने केवळ व्यक्ती सन्मानित होत नाही, तर त्यांचे कार्य समाजापुढे आणले जाते. ते कार्य पाहून कित्येक लोक प्रेरणा घेतात. अंधासाठी कार्य करताना मोठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार ठरला आहे.   – डॉ. ऊर्वी जंगम, जर्मन भाषेच्या अभ्यासक

‘लोकसत्ता’ने ‘दुर्गा पुरस्कारां’ची एक संवेदनशील  सुरुवात केली आणि गेली आठ वर्षं ती सुरू आहे. समाजाला दिशा देणाऱ्या आणि त्यास विकसित आणि समृद्ध करणाऱ्या व्यक्तींकडे लक्ष वेधून त्यांची सामाजिक नोंद ‘लोकसत्ता’ नेहमीच घेत आले आहे. त्यामुळे या पुरस्कारार्थी कर्तबगार भगिनींची निवड करणाऱ्या परीक्षक समितीचे कौतुक वाटते. त्यामुळेच अशा अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या स्त्रियांचा परिचय साऱ्या महाराष्ट्राला होऊ शकला.अतिशय अवघड, पण महत्त्वपूर्ण विषयांवर सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, कला या विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येतो. या उपक्रमाशी मी मागच्या काही वर्षांपासून ‘लोकसत्ता’बरोबर कार्यरत आहे  याचा मला आनंद आहे. – उषा काकडे, ग्रॅव्हिटस फाउंडेशन

‘दुर्गा पुरस्कारा’ने सन्मानित व्यक्तींकडे बघितल्यावर ‘लोकसत्ता’ किती योग्य व्यक्तींना पुरस्कार देते याची प्रचीती येते. केवळ त्या व्यक्तींना सन्मानित करणे इतका ‘लोकसत्ता’चा मर्यादित उद्देश  नाही, तर त्या लोकांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी प्रयत्न करणे, हा उद्देश आहे. ‘लोकसत्ता’चा हा उपक्रम असाच कायम सुरू राहावा आणि समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या दुर्गांना प्रोत्साहित करत राहावे, ही सदिच्छा.     – शिरीष देशपांडे, बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.

आपल्या क्षेत्रात यशस्वी, तरीही फारशी दखल न घेतल्या गेलेल्या स्त्रियांचा सन्मान करण्याचा ‘दुर्गा पुरस्कार’ हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. ‘राष्ट्रीय के मिकल्स अँड फर्टिलायझर्स’ या उपक्रमाशी जोडलेले आहेत, याचा अभिमान आहे. प्रतिभावान स्त्रियांना प्रोत्साहन देणे आम्हाला महत्त्वाचे वाटते. या उपक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे अभिनंदन व असेच प्रयत्न पुढेही सुरू राहोत यासाठी शुभेच्छा! – पराग दांडेकर, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.

गेली कित्येक वर्षे आम्ही आमच्या क्षेत्रात काम करतच होतो, पण ‘लोकसत्ता’ने त्याचा गौरव केल्याने आम्हाला गावागावांतून विचारणा झाली. आता सर्वांच्याच अपेक्षा वाढल्याने अधिक जोमाने काम करावे लागणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रियांकडून होणाऱ्या विलक्षण कामगिरीचे दर्शन घडते.   – डॉ. अनुया निसळ, संशोधक

या पुरस्काराच्या माध्यमातून कबड्डी आणि क्रीडा क्षेत्रातील स्त्रियांच्या योगदानाची दखल घेतली गेली, याचा मला खूप आनंद होतो. कबड्डी हा खऱ्या अर्थाने मातीतला आणि प्राचीन भारतीय खेळ. खेळासाठी शारीरिक ताकदीबरोबर तितकीच दांडगी मानसिकताही लागते. म्हणूनच की काय, अनेक मुलींना यामध्ये येण्यासाठीसुद्धा धडपड करावी लागते, कारण ‘मुलगी नाजूक म्हणजे सुंदर’ अशी समजूत! या व्यासपीठाच्या माध्यमातून हेच आवाहन करावेसे वाटते, की कुठलाही गैरसमज न बाळगता नव्या उत्साहाने आपला हा खेळ आपण जगू या आणि जगवू या!– शैलजा जैन, कबड्डी प्रशिक्षक

‘लोकसत्ता’सारखे मोठे माध्यम जेव्हा माझ्या कामाचा गौरव करते तेव्हा आनंद होण्याबरोबर दडपणही येते. या पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली आहे. या पुरस्काराची प्रतिष्ठा तसूभरही कमी होणार नाही असे काम मी भविष्यात करेन. ‘दुर्गा पुरस्कार’ हा स्त्रियांना प्रेरणा देणारा आहे. या माध्यमातून आमच्यासारख्या स्त्रियांचे कार्य समोर येते तेव्हा शहरापासून ते गावकुसापर्यंत अनेकींना आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते.      – डॉ. मेधा ताडपत्रीकर, उद्योजिका व पर्यावरण कार्यकर्त्या

मुख्य प्रायोजक         :        ग्रॅव्हीटस फाऊंडेशन  सह प्रायोजक :   महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ,  व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि.  सनटेक रिअल्टी लि.    बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

पॉवर्ड बाय :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी,  शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

टेलिव्हिजन पार्टनर :  एबीपी माझा

‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ सोहळ्याचे प्रक्षेपण आज (१३ नोव्हेंबर)  दुपारी ४ ते ५ या वेळेत ‘एबीपी माझा’ वाहिनीवर होणार आहे.

chaturang@expressindia.com