– मीनल कुमठेकर

‘आईची स्मृती कृतीतून जागवावी’, या जाणिवेतून मन आणि पाय आपसूकच गेल्या वर्षी पुन्हा एकदा माऊलींच्या वारीकडे वळले, पण गेली १० वर्षं सांसारिक जबाबदार्‍या सांभाळत आळंदी ते पुणे एवढंच अंतर पायी चालत होते. संपूर्ण वारीचे समाधान काही या एवढ्या चालण्यातून मिळत नव्हतं. पूर्ण वारी पायी करणं शक्य नाही, पण थोडी अधिकची करावी का, मनाच्या या घालमेलीतूनच गोंदवले ते पंढरपूर ही थोड्या दिवसांमध्ये होणारी वारी पायी करावी, असं ठरवलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही तिघी मैत्रिणी, मी, वंदना आणि माधुरी निघालो.

तीन दिवसांच्या वारीनंतर आता आम्ही अगदी शेवटच्या टप्प्यावर होतो. वाखरी ते पंढरपूर अंतर पूर्ण करायचं होतं. ते होतं, फक्त पाच किलोमीटर. म्हणजे आता आपण पंढरपूरला खरंच पोहचणार हे नक्की झालं. मन नामदेव पायरीपाशी कधीच पोहोचलं होतं. मोबाइलमधील ‘ॲप’ आत्तापर्यंत २१ किलोमीटर अंतर पूर्ण केलं असा आकडा दाखवत होतं. सतत तीन दिवस २४ ते २५ किलोमीटर चालणं झालं होतं. अजून देऊळ प्रत्यक्षात ८ किलोमीटर लांब होतं. आणि आजच ते पूर्ण करणं आवश्यक होतं. मनानं शरीराला सांगितलं, पंढरपूरच्या वेशीपर्यंत तरी जाऊया, देवळापर्यंत नको जायला. वेशीपासूनच नमस्कार करू, असं म्हणत मी, वंदना आणि माधुरी आम्ही शरीराला अक्षरश: पुढे ढकललं… पण बहुधा पांडुरंगालाच आम्ही यावंसं वाटत होतं कारण पाच-दहाच पाऊलं टाकली असतील नसतील तोच एक रिक्षा आमच्या जवळ येऊन थांबली. रिक्षावाला स्वत:च म्हणत होता, ‘‘रिक्षात बसा.’’ आम्ही वारीला चाललो आहोत हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण आम्ही ‘‘नाही’’ म्हणत होतो. शेवटी तो म्हणाला, ‘‘मी तुम्हाला ‘गजानन महाराज धर्मशाळे’- पाशी नेतो. तेथून देऊळ फक्त २०० मीटरवर आहे.’’

‘‘ फक्त २०० मीटर?’’, आमच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. त्या रिक्षावाल्याला खरं तर इतर भरपूर ग्राहक मिळाले असते पण तो आम्हालाच ‘‘बसा’’ म्हणत राहिला. व्यावहारिक बाजू आम्हीच विचारली, पण त्यातही त्याच्याबरोबर वाद घालण्यासारखं काहीच नव्हतं. नाही-हो करत शेवटी रिक्षात बसलो. पुढील २० मिनिटांत आम्ही देवळाच्या पश्चिम दरवाजासमोर होतो. पांडुरंगाच्या देवळापर्यंत वाहन जाऊ शकत नाही हे आम्ही ऐकलं होतं. अनेक बोळ, गल्ल्यांमधून आमची रिक्षा योग्य ठिकाणी पोहचली होती. अगदी योग्य क्षणी कोणी धाडलं होतं त्या रिक्षावाल्याला? त्या असंख्य वारकर्‍यांमध्ये आम्हालाच त्यानं कसं शोधलं? कोण होतो आम्ही? पांडुरंगाच्या लाडक्या लेकी होतो का? असे नानाविध विचार घोळवतच आम्ही नामदेव पायरीपाशी पोहोचलो होतो. सगळंच अद्भुत वाटत होतं. डोकं नामदेव पायरीजवळील एका लोखंडी गजावर होतं, पण मनाने आमचं डोकं विठ्ठलाच्या चरणांवर होतं. मन तुकाराम महाराजांचा गुरू परंपरेतील अभंग म्हणत होतं. ‘‘तुज वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी.’’

त्यापूर्वीचा पिलीव ते भालवणी हा प्रवासाचा तिसर्‍या दिवसाचा टप्पा. आधीचे दोनही दिवस ढगांनी डोक्यावर सावली धरली होती. सकाळच्या वेळेत साधारण १०किलोमीटर अंतर पूर्ण केलं होतं. आज आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या पालखीच्या मागे होतो. विविध गावांमधून बर्‍याच पालख्या येत होत्या. प्रत्येकाची अभंग आणि गवळणी म्हणण्याची लय वेगळीच होती. गाण्याचं काहीही ज्ञान नसल्यानं कानावर पडणारं हरीनाम थेट मनात, हृदयात उतरत होतं.

आज सूर्यदेवाने डोकं वर काढलं होतं. वाटेत कुठे बसावं असं सावलीचं ठिकाण दिसत नव्हतं. संपूर्ण शरीर घामानं भिजलं होतं… आणि तेवढ्यात पालखीचा रथ आणि त्या शेजारी झाडाखाली बसलेले वारकरी दिसले. झाड फार मोठं नव्हतं, त्यामुळे पडणारी सावलीही मर्यादितच होती. त्यातच आम्हीही सामील झालो.

दुपारच्या प्रसादासाठी वारकरी रांगेत उभे राहिले आणि लांब रांग तयार झाली. या लोकांना ऊन कसं लागत नाही? कुठल्या मुशीतली आहेत कोण जाणे? आमच्याही पोटात भूक होती. आणि अन्नाचा येणारा सुवास त्यात भर घालीत होता. पण रांगेत आणि तेही रणरणत्या उन्हात जाऊन कोण उभं राहणार? असं वाटत होतं. कुणीतरी बसल्याजागेवर प्रसाद आणून द्यावा ही इच्छा मात्र होती. इथे उन्हात थांबण्यापेक्षा आपण पुढे जाऊ, असं ठरलं. वंदना आधी उठली. म्हणाली, ‘‘हातातल्या प्रसादासाठी घेतलेल्या या रिकाम्या पत्रावळी कुणाला तरी देऊन येते.’’ वारकरी बाई रिसबुडताई जवळच बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात तीनही पत्रावळी देणार, तोच त्यांच्या शेजारी बसलेलं एक जोडपं म्हणालं, ‘‘अहो, आमच्याकडे प्रसाद आहे. परत उठायला लागू नये म्हणून जरा जास्तच आणला होता. तुम्ही घ्या ना. आम्हाला तिघींनाही पुरेल इतका प्रसाद वंदना त्यांच्याकडून घेऊन आली, तेही अवघ्या काही मिनिटांत! काय बोलणार? नमस्कार करून प्रसाद ग्रहण केला. पोट जरा शांत झालं. पण शरीराचं उकडणं काही थांबत नव्हतं. तिघीही उठलो आणि फक्त पाच पावले चाललो असू, जो काही पाऊस आला त्यानं क्षणार्धात इतकं भिजवलं की शरीर आणि मन दोन्ही तृप्त झालं. आम्ही प्रसाद घेईपर्यंत पाऊस थांबला होता का? कारण त्यानंतर पुढील २ तास तो सतत बरसत राहिला.

त्यापुढील टप्पा आम्ही चालत… नव्हे त्या वरुण राजाबरोबर तरंगत होतो. २४.६ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला होता. विठ्ठलानं तो पूर्ण करून घेतला होता. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही एका सुरात सगळ्यांनी हरीपाठ म्हटला. साधीसुधी पण अतिशय मधुर भजने, दुसर्‍या दिवशीच्या चालण्यासाठी ऊर्जा देऊन गेली. म्हसवड येथून सकाळी निघालो. ज्यांच्याकडे राहिलो त्या पिसे कुटुंबानं केलेलं आदरातिथ्य भारावून टाकणारं होतं. सकाळची वेळ होती. प्रसन्न वातावरण होतं. थोडंच अंतर चालून गेलो आणि महाराजांची पालखी दिसली. दर्शन घेऊन चालण्यास सुरुवात केली. शहरातून आलेल्यांना पालखीबरोबरच्या दिंडीत चालता येत नाही. आम्ही लुटुपुटुचे वारकरी होतो.

पिलीवकडे जाणारा रस्ता अतिशय मनोहारी आहे. विस्तीर्ण पसरलेली शेती, हिरवी माळराने आणि ठायी ठायी पायात येणारी, मोहून टाकणारी गवतफुले. साहजिकच बालकवी आठवले, आणि ओठावर उमटली त्यांची, ‘‘रंग रंगुल्या सान सानुल्या, गवतफुला रे गवतफुला’’ ही कविता. आम्ही तिघींनीही एका सुरात ती कविता म्हटली. ढगांनी संपूर्ण आकाश आच्छादलं होतं, हळदी कुंकवाच्या वेळी गुलाबपाणी शिंपडतात अगदी तशीच पावसाची मंद सर येत होती, जात होती. त्यावेळी आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या पालखीच्या अगदी जवळ होतो. त्यामुळे ‘ज्ञानोबा ज्ञानोबा’ हे भजन सतत कानावर येत राहिलं. एका विस्तीर्ण पटांगणावर वारकर्‍यांनी ताल धरला. पखवाज वाजत होता आणि वारकरी त्या तालावर लयबद्ध नाचत होते. तुळशी डोक्यावर घेऊन एका बाजूने गोलाकार पद्धतीने स्त्रिया उभ्या होत्या. आता प्रत्येकाच्याच अंगात एक लय शिरली होती. मन विठूला आळवत होतं. आणि शरीर डोलत होतं. थोड्याच अंतरावर घाटाला सुरुवात झाली. जास्त वेळ कुठे बसावंसं वाटत नव्हतं. पण एक हॉटेल दिसलं आणि आम्ही थोडं खाऊन घेतलं. पालखीसुद्धा जवळच विसावली होती. घाट खूप अवघड नव्हता, पण संपतही नव्हता. एक डोंगर बाजूला सारला की, दुसरा समोर येत होता. समोरचा डोंगर पार केला की गाव असेल असं वाटत होतं. प्रत्यक्षात चार डोंगर पार झाले आणि मग गाव दिसू लागलं. ड्रॅगन-फ्रुटच्या बर्‍याच नर्सरी येथे आहेत. बरेच पूल बांधलेले आहेत. ओढे मात्र कोरडेच होते. हिरव्या रंगाच्या अगणित छटा दाखवत आजचा २७.४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला होता.

शरीर पूर्ण थकलं होतं. फोन वाजला. रिसबूड ताईंनी राहण्याची व्यवस्था एका घरात झाल्याचं सांगितलं. सामान घेऊन तिथे पाहोचलो. मन स्तंभित झालं. हावळे कुटुंबानं त्यांचं संपूर्ण चार खोल्यांचं घर आम्हाला राहण्यासाठी दिलं होतं. घरातील सर्व सामानासकट. कसा काय एवढा विश्वास दाखवला आमच्यावर? जेवणाची इतकी उत्तम सोय का केली? वारीत समोर ठाकणारे हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. माणुसकीधर्म, ही बोलण्याची गोष्ट नसून आचरणात आणण्याची आहे, ही दृढता वारी शिकवते.

गोंदवले येथील दिनचर्या, आरती, नामस्मरण, दर्शन या सर्वच गोष्टी आज नव्यानं अनुभवत असल्यासारखंच वाटावं असं भारलेलं वातावरण होतं. उद्या पालखीचं प्रस्थान होतं. बरोबर जिवाभावाच्या सख्या होत्या. आम्हाला चालताना लागणारा खाऊ घेऊन आलेली वैशाली हाही एक सुखद धक्का होता. पहिला टप्पा होता गोंदवले ते म्हसवड. किती किलोमीटरचा वगैरे प्रश्न विचारावं किंवा गूगल करून पाहावं असं वाटलंच नाही. मनात एकच भावना होती पालखीबरोबर चालत जायचं आहे. किती वाजता सुरुवात करायची चालायला? अतिशय सुवाच्य अक्षरात लिहिलेली प्रस्थानाची वेळ पाहिली. पालखीची वाट सरळ असेल का? खूप वळणं आली तर आपण रस्ता चुकू का? हा मनातला हलकल्लोळ चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाने थांबला. वेण्णास्वामींचे चरित्र कथन मन मुग्ध करणारे होते. गोंदवले गावामधून एक चक्कर मारून आलो. अतिशय स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारी देवळं पाहिली.

प्रस्थान सोहळ्यात सर्वप्रथम दर्शन झालं ते रथाला जुंपल्या जाणार्‍या धष्ट-पुष्ट बैलांचे. सजलेला रथ, झेंडेवाले, टाळकरी, एकाच रंगाच्या साड्या नेसलेल्या कोळीण बायका सगळंच मोठं विलोभनीय. आणि या सगळ्यांना प्रसन्न ठेवणारं रामनाम सगळ्यांच्या तोंडी होतं. साधारण २० किलोमीटर अंतर पार केल्यावर लिंबाचा एक डेरेदार वृक्ष दिसला. देह त्या वृक्षाखाली विसावला. अजून पुढे ७ किलोमीटरचा टप्पा होता. पण सोबत असणारी वृक्षराजी शीण घालवत होती. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आणि शहरी जाणिवेतून आम्ही आमची राहण्याची वेगळी सोय करू शकतो का, याची नुसती चाचपणी केली आणि चक्क सोय झाली. एका अत्यंत मोकळ्या स्वभावाच्या माऊलीचे प्रत्यंतर आले. ४५०० नोंदणीकृत वारकरी महाराजांच्या दिंडीत होते. सामान वाहण्यासाठी ट्रकची सोय होती. सामानाची अदला बदल झाली तरी धीर धरायला शिकवणार्‍या भोसले या स्थितप्रज्ञ व्यक्तीचे वागणे बरेच काही शिकवत होते. अतिशय अत्यल्प गरजा ठेवून, चालणारा हा वारकरी स्वत:हून कधीच काही तक्रार करत नाही. ‘‘आहे त्यात समाधान’’ ही प्रचंड मोठी ऊर्जा वारी नकळत देत होती. चालताना साथ देणार्‍या सख्यांना त्रिवार वंदनच होऊ शकते. शारीरिक क्षमता अजमावून बघण्याचे वारी इतके उत्तम साधन आपल्या जवळ आहे याची ही जाणीव याच सगळ्यांनी करून दिली.

आळंदी ते पंढरपूर पायी वारी केल्यानंतर, हरीनामात रमणार्‍या माझ्या आईने स्वत:ला सोसेल असं शोधलेलं उत्तर म्हणजे गोंदवले ते पंढरपूर पायी वारी करणं. आई-बाबांनी ही वारी तीन वेळा केली आणि ते संस्कार आमच्यात रुजवले. त्यांच्या चरणी नतमस्तक होत, पुढच्या वर्षी पांडुरंगाने माझ्याकडून पायी वारी करून घ्यावी हीच प्रार्थना.

kumthekarminal@gmail.com