मृदुला भाटकर
‘‘डॉ. मोहन पंडित हे नाव धारण करणाऱ्या एका व्यक्तीनं एके काळी पुण्यात चांगलीच खळबळ उडवून दिली होती. मी तरुण असतानाच्या काळात वकील म्हणून हा खटला माझ्या हाती आला आणि शोध सुरू झाला या नावामागच्या खऱ्या व्यक्तीचा. त्यातून जे उलगडलं ते केवळ धक्कादायक होतं. माणसं कशी सहज फसवू शकतात आणि माणसं कशी सहज फसू शकतात याचा पुरावा देणारा, हा कायम स्मरणात राहिलेला खटला..’’
लहानपणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं उत्कृष्ट नाटक ‘तो मी नव्हेच’ आणि पंतांनी (प्रभाकर पणशीकर) अजरामर केलेला त्यातला ‘लखोबा लोखंडे’ पाहताना मी खिळून गेले होते. माझ्या वडिलांना मी परत परत विचारत होते, ‘‘दिवाकर दातार, कॅप्टन अशोक परांजपे, राधेश्याम महाराज ही सर्व माणसं म्हणजे खरंच एकच माणूस होता? ’’ अन् असाच प्रश्न मला किती तरी वर्षांनी मी वकील झाल्यावर डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक विचारत होते. ‘‘मोहन पंडित आणि मोहन कुळकर्णी एकच? असं कसं?’’
तर त्या सगळय़ा प्रकरणाची सुरुवात झाली, ती माझा त्या वेळचा मित्र समीरण वाळवेकरमुळे. मी तेव्हा पुण्याला वकिली करत होते. एक दिवस तो सकाळीच अस्वस्थ होऊन आला.
‘‘तू भेटली आहेस डॉ. मोहन पंडितला?’’
‘‘नाही. कोण आहे?’’
‘‘ पुण्यातलं तो सध्याचं ‘इंटलेक्च्युअल्स’मधलं मोठंच प्रस्थ आहे. जो तो डॉ. मोहन पंडितचेच गोडवे गातोय. तू वकील म्हणून माझ्या एका ओळखीच्या मुलीला मदत कर ना. त्या मुलीच्या आई-बाबांनी त्याच्याशी तिचं लग्नही लावून दिलंय. पण तो मोहन पंडित नाहीच आहे. ती एक संशयास्पद व्यक्ती आहे.’’
‘‘पण त्या मुलीला आक्षेप नाही ना, मग?’’
‘‘तिला आणि तिच्या आईला आता काहीतरी खटकतंय. त्याचे पैसे इंग्लंडमध्ये अडकले आहेत असं सांगून तो त्यांच्याच घरी राहतोय. तो सांगतोय, की तो इंग्लंडला सर्जन म्हणून काम करत होता. आता तो भारतात परत आलाय. त्याचे वडील आणि त्याचं घरबीर तिकडेच आहे. पण आता या सगळय़ा गोष्टी थापा आहेत असं त्यांच्या लक्षात येतंय. त्याच्या वागण्यात बरीच विसंगती आहे. काहीतरी करायला हवं. त्या मुलीची आजी मोठय़ा सामाजिक कार्यकर्त्यां आहेत. पण त्यांचाही विश्वास आहे, की हा
डॉ. मोहन पंडित आहे.’’ ही चर्चा करता करता हे सर्व ऐकल्यानंतर मी त्या मुलीला, तिच्या कुटुंबाला मदत करीन असं कबूल केलं.
त्या दोघी मला भेटल्या ते पक्षकार म्हणून. त्यांची संपूर्ण बाजू ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं, की डॉ. मोहन पंडित नावाची व्यक्ती फारच बनेल आहे. त्या दोघी तो ‘तो’ नाहीच असं त्याच्या तोंडावर सांगायला घाबरत होत्या. त्यात नुसती त्याची भीती नाही, तर सामाजिक दडपण, कौटुंबिक प्रतिष्ठा, ही सबळ कारणं होती. नेमकी त्याच दरम्यान माझी मैत्रीण
सुषमा देशपांडे तिथे आली. त्या दोघींच्या आणि समीरणच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं, की विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी हे ‘सद्’गृहस्थ आपण ‘डॉ. मोहन पंडित’ आहोत, इंग्लंडहून आलेले सर्जन, तबलापटू, गायक, इत्यादी आहोत यावर विश्वास ठेवला होता. त्याचा गाण्याचा अभ्यास होता. साहित्याची उत्तम जाण होती. डॉ. मोहन पंडित याची प्रतिष्ठित मान्यवरांकडे ऊठबस होती. माझ्या लक्षात आलं, की यात वकिलीपेक्षाही शोध घेण्याची, तपासकामाची जास्त गरज आहे. कारण एखाद्या माणसानं स्वत:ची ओळख खोटय़ा नावानं करून दिली. म्हणजे समजा, मी माझं नाव ‘मृदुला भाटकर’ ऐवजी ‘परवीन खान’ सांगितलं, तर गुन्हा शून्य! प्रत्येक चुकीची गोष्ट ही गुन्हा नसते, तर ते कृत्य भारतीय दंडविधानातल्या कलमाखाली (आयपीसी) गुन्हा असावा लागतो. आता एखादा अनोळखी माणूस जेव्हा आपलं नाव सांगतो, व्यवसाय सांगतो, त्यावर आपण विश्वास ठेवतो. त्यात खोटं असेल असं सहसा वाटत नाही. तर या ‘सद्’गृहस्थांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारच चांगला होता. त्याच्या ‘डॉ. मोहन पंडित’ असण्यावर फक्त ती २० वर्षांची मुलगी आणि तिची आईच नव्हे, तर प्रख्यात गायिका नीला भागवत, अभिनेते अमोल पालेकर यांनीही विश्वास ठेवला होता. ‘डॉ. मोहन पंडित’ला ‘पुरुषोत्तम करंडक’च्या एकांकिका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणूनही आमंत्रित करण्यात आलं. एवढंच नव्हे, तर ‘सिंबॉयसिस’मध्ये त्यानं तो व्यवस्थापनाचा पदवीधर आहे म्हणून खोटंच सांगून चक्क व्यवस्थापन वर्गावर काही तास शिकवलंही.
त्याची एक वेगळीच ‘मोडस ऑपरेंडी’- गुन्हा करण्याची पद्धत होती. म्हणजे तो तरुण मुली, मध्यमवयीन स्त्रिया यांच्यावर स्वत:च्या संवादकौशल्यानं, तबला, गायनादी कलांनी आणि साहित्यावर बोलून भुरळ घालू शके. मग त्या स्त्रिया त्याला पैशांची मदत करत. काही तरुण मुली तर त्याच्याबरोबर लग्न करायचं स्वप्न बघत प्रेमाच्या जाळय़ातही फसल्या. माझ्यातली पत्रकार एकाएकी जागी झाली. मुलीचं वकीलपत्र घेतलं आहे, तर शोधपत्रकारिता गरजेची. मग सुषमा आणि मी यातल्या फसल्या गेलेल्या काही व्यक्तींना भेटलो, टिपणं काढली. पुण्याच्या थिएटर अकादमीच्या श्रीराम रानडय़ांनीही काही महत्त्वाचे धागेदोरे दिले. गुन्ह्याच्या तपासकामात दोन गोष्टींचं भान ठेवावं लागतं. एक म्हणजे गुन्हेगार सगळय़ाच लोकांना कायमस्वरुपी फसवू शकत नाही. सगळय़ा लोकांना थोडा काळ किंवा थोडय़ा लोकांना जास्त काळ फसवू शकतो. दुसरं म्हणजे गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी एखादा धागा त्याच्या हातून मागे राहतोच.
तो सगळा शोध मी आणि सुषमानं पछाडल्यासारखा याला-त्याला भेटून घेतला. ते सात-आठ दिवस आमच्या डोक्यात ‘डॉ. मोहन पंडित’ याशिवाय दुसरा विषयच नव्हता. ती मुलगी, तिची आई आणि दुसऱ्या प्रांतात, दूरवर काम करत असलेले तिचे बाबा, हे तिघंही मोहन पंडितला धडा शिकवायचा, यावर ठाम होते आणि तीच तर त्या खटल्यातली जमेची बाजू होती. कारण जिथे चारित्र्याचा प्रश्न येतो, तिथे मध्यमवर्गीय माणूस पटकन पाय मागे घेतो. या प्रकरणात त्याच्यापासून घटस्फोट घेणं- त्याला कल्पना देऊन, की ‘तू डॉ. मोहन पंडित नाहीस, तर तू खरा मोहन कुळकर्णी आहेस’ हा अगदीच सोपा मार्ग होता. त्यातून त्या मुलीचा पाय मोकळा झाला असता, पण जी फसवणूक झाली होती ती भयानक होती. कारण खरा मोहन कुळकर्णी हा मॅट्रिक पास होता, विवाहित होता, त्याला मुलगा होता. मोहननं स्वत:चं वय ३० सांगितलं होतं. तो तेव्हा सुमारे ४२ वर्षांचा होता. तेव्हा फौजदारी गुन्हा नोंदवणं सगळय़ाच- वैयक्तिक, सामाजिकदृष्टय़ा गरजेचं होतं. गमतीचा भाग म्हणजे त्यानं याआधी अशाच एका मुंबईतल्या मुलीला जाळय़ात ओढलं होतं, पण ते मोहन कुळकर्णी म्हणून आणि लग्नाचं पक्कं केलं होतं. पण त्याचं भांडं फुटलं आणि तिला कळलं की तो ४० वर्षांचा आहे. तरीही ती त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण त्याचा प्रथम विवाह झाला आहे हे कळल्यावर मात्र ती खचलीच. पण पुण्याच्या तक्रारदार मुलीच्या आजीला हा
डॉ. मोहन पंडित एवढा आवडला होता, की सगळं सांगूनसुद्धा त्या म्हणत होत्या, की ‘‘कशाला घटस्फोट वगैरे? एवढा उत्तम नातजावई आहे. शिकला-सवरलेला आहे. आता एकदा लग्न झालंय तर या गोष्टी काय करायच्यात. पुढे संसार करा.’’ इतकं मोठं ‘गुडविल’ मोहननं मिळवलं होतं. फौजदारी खटल्यात मुख्य म्हणजे तक्रारदार मनाचा पक्का लागतो आणि तो अशा खटल्यात केव्हाही डळमळू शकतो. पण त्या मुलीचं आणि तिच्या आई-वडिलांचं मला तेव्हाही आणि आजही कौतुकच वाटतं.
मी आणि सुषमानं खूप माहिती जमवली होती. नोंदी केल्या आणि ते सर्व घेऊन मुलीसह आम्ही डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनला गेलो, तर तिथे पोलीस निरीक्षकाला काय गुन्हा झालाय हेच कळेना. बरीच डोकेफोड केल्यावर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावलं. तर त्यांनीही वरील प्रश्न विचारला, ‘‘हे असं दुसरं लग्न करणं यात कसा आणि कोणता गुन्हा?’’ विवाहासंदर्भातले गुन्हे भारतीय दंडविधानाखाली कलम ४९३, ४९४, ४९५, आणि ४९६ ही सर्व कलमं पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न करणं, फशी पाडणं या गुन्ह्यासंदर्भातले आहेत. त्याखाली आणि शिवाय आम्ही त्यांना सांगत होतो, की यात भारतीय दंडविधानाखाली कलम ३७६ खाली गुन्हा होतो, तो नोंद करा. त्यांचं म्हणणं होतं, की ‘पहिलं लग्न लपवून दुसरं लग्न करणं ही जरी कायद्यात फसवणूक असली, भारतीय दंडविधानाखाली गुन्हा असला, तरी दुसरं लग्न मान्य नसेल तर घटस्फोट घ्यावा. यात बलात्कार कुठे आहे?’ वास्तविक, शरीरसंबंधांसाठी स्त्रीची जाणीवपूर्वक दिलेली खुली संमती गरजेची. जर मुलीला माहीत असतं, की मोहनचा प्रथम विवाह झालाय, तर तिनं लग्न केलं नसतं आणि शरीरसंबंधास संमतीही दिली नसती. म्हणजेच लग्नामुळे शरीरसंबंध झाला असला तरी ही संमती लबाडीनं मिळवलेली होती. ती खुली नव्हती, म्हणून हा बलात्कार होतो. पण शेवटी विवाहसंदर्भातल्या इतर फसवणुकीखाली गुन्हे दाखल करण्यात आले.
मग आमची मोहीम सुरू झाली, ती मोहनच्या पहिल्या बायकोचा शोध घेण्याची. त्या दुर्दैवी स्त्रीचा पत्ता, फोन आम्हाला मिळाला. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलेली माहिती धक्कादायक होती. त्या स्वत: महाराष्ट्राबाहेर एका ठिकाणी वरच्या हुद्दय़ावर काम करत होत्या. मोहनला आणि त्यांना एक १८ वर्षांचा मुलगा होता. तो इंजिनीअिरगचं शिक्षण घेत होता. मोहन महिनोंमहिने परागंदा असायचा. त्या बाईंनाही आम्ही सांगितलेल्या या सगळय़ा घटनांचा धक्का बसला. मी त्यांना विचारलं, की ‘तुम्ही साक्ष द्याल का? आम्ही सर्व काळजी घेऊ.’ फार मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी होकार दिला. तो पुन्हा अशा फसवणुकीच्या घटना होऊ नयेत म्हणून! त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच.
तपासी अधिकारी म्हणून मला वाटतं,
टी. एस. भाल यांच्यानंतर अशोक चांदगुडे आले होते. त्यांनी सर्व जबाब नोंदवून घेतले आणि मग चार्जशीट पुण्याच्या जिल्हा न्यायालयात दाखल केली. खटला तेव्हाचे जिल्हा न्यायाधीश श्री. मुतालिक यांच्यासमोर सुरू झाला. भांडारकर हे सरकारी पक्षाचे वकील होते आणि मी त्या मुलीची खासगी वकील असल्यानं त्यांना मदत करत होते. सुरुवातीलाच आम्ही ठरवल्याप्रमाणे बलात्काराचाही खटला असल्यानं कलम ३७६ खाली आरोप ठेवावा, म्हणून भांडारकरांनी युक्तिवाद केला. तो मान्य करून न्यायाधीशांनी ३७६ खालीही आरोप ठेवला. खटला सुरू झाला. पहिली साक्ष मुलीची झाली. खटला बलात्काराचा असल्यामुळे तो ‘इन कॅमेरा’ चालला. मुलीची आरोपीच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली, पण ती व्यवस्थित बोलली. आमची सर्वात महत्त्वाची साक्षीदार होती, ती म्हणजे मोहनची आधीची पत्नी!
मोहननं त्या मुलीच्या साक्षीत त्याचं तिच्याशी झालेलं लग्न मान्य केलं होतं. तेव्हाच आमच्या लक्षात त्याचा बचाव आला. तो पहिलं लग्न नक्कीच कायदेशीर नव्हतं अशी भूमिका घेणार. त्याच्या वकिलांनी उलटतपासणीत त्याच्या पहिल्या पत्नीला, ‘‘तुमचं लग्न खऱ्या अर्थानं कायदेशीर झालंच नव्हतं, तर तुम्ही नुसतंच देवळात हार घालून नवरा-बायकोप्रमाणे राहात होतात. आणि तुम्हाला ते मान्य होतं, त्यातून तुम्हाला मुलगा झाला,’’ असे प्रश्न विचारून बचाव घेतला. त्यांचं आणि मोहनचं लग्न होऊन अर्थातच खूप वर्ष झाली होती. त्यांच्याकडे मला असं वाटतं, की लग्न नोंदणीचं प्रमाणपत्र (मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) नव्हतं. पण कागदोपत्री त्यांचं नाव, लग्नातले विधींचे दोन-चार फोटो, मुलाच्या जन्मदाखल्यावरचं वडिलांचं नाव, त्यांच्या कामाच्या ठिकाणचा मोहनचा पती म्हणून उल्लेख असलेल्या नोंदी, हे पुरावे सादर केले.
न्या. मुतालिक साहेब यांनी पुराव्यांच्या छाननीनंतर सरकारी पक्षाची बाजू मान्य करून मोहनला विविध गुन्ह्यांखाली बलात्कार धरून सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. मोहन आत गेला. पण इथे हे प्रकरण संपलं का? तर नाही..
त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मला येरवडा सेंट्रल जेलमध्ये काही कामानिमित्त जावं लागलं. तेव्हा सुपिरटेंडंट धनाजीराव चौधरी होते. मी कारागृहाच्या आतल्या त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांनी बोलता बोलता कारागृहाच्या काही उपक्रमांची माहिती दिली आणि मोठय़ा कौतुकानं माझ्यासमोर एक हस्तलिखित ठेवलं.
‘‘हे आमच्या कैद्यांनी लिहिलेलं हस्तिलिखित!’’
‘‘मोत्यासारख्या दाणेदार अक्षरात आहे. फारच सुंदर.’’ मी म्हटलं. त्यातल्या कविता, लेख नजरेखालून घालताना मी पहिल्या पानाशी थबकले आणि त्यांच्याकडे पाहिलं.
चौधरी माझ्या प्रतिक्रियेचीच वाट पाहात होते. ‘‘संपादन- मोहन कुलकर्णी?’’
‘‘होय. तोच तो. तुमचा आरोपी! त्यानंच या उपक्रमाची कल्पना दिली अन् राबवला. अरुण गवळी गँगचे इथले कैदी त्याला गुरुजी मानतात.’’
मग मोहननं ती शिक्षा भोगली. कदाचित चांगल्या वागणुकीची सूटही त्याला मिळाली असेल. तो सुटला! खटल्याच्या वेळेस ‘स्त्रियांना भुरळ घालणारा हा कोण ‘कॅसानोव्हा’ म्हणून काहीजण त्याला उत्सुकतेनं बघायला आले होते. त्यांची पूर्ण निराशा झाली, कारण मोहन हा किरकोळ देहयष्टीचा, ५.४’’ उंचीचा, सामान्य चेहऱ्याचा माणूस होता. पण त्याच्या जिभेवर साखर काय अमृतच! श्रीकांत सिनकर यांनी यावर ‘मारीच’ ही कादंबरी लिहिली. लोकही त्याला विसरले. त्या फसवणुकीला विसरले. पण मोहन लोकांना फसवायचं अजिबात विसरला नाही. त्याने ‘मास्क थिअरी’ पुढेही वापरली. लोकांचा त्याच्यावर तसाच विश्वास बसत गेला. त्यानं वेगवेगळी नावं घेतली. त्या नावानं आणखी एक लग्न केलं, मुलगी जन्माला घातली. काहींना गाडी देतो, कोणाला भूमिका देतो इत्यादी थापा मारत, पैसे मिळवत त्याचं जगणं सुरूच राहिलं..
सावध राहा! नाही तर भरोसा टाकलेला, नव्या ओळखीचा माणूस तुम्हाला म्हणेल, ‘तोच मी!’
chaturang@expressindia.com

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Aurangzeb seated on a golden throne
‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल