सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
ज्याने कधीच गाडी चालविली नाही व जो कुठल्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कधी गेला नाही त्याच्या हातात जर गाडी चालवायला दिली तर जे काय होईल ते बहुतांश पालकांचे होत असते. उद्या जर सरकारने असा फतवा काढला की ज्या पालकांना मुले व्हावयास हवी असतील त्यांनी कमीत कमी काही परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावयास हवे. तर एकही पालक चार ते पाच वर्षांच्या अभ्यासाशिवाय ही परीक्षा पास होणार नाही.
मी ‘स्फूर्ती फाऊंडेशन’तर्फे अनेक कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांची सुरुवात मुलांच्या त्यांच्या पालकांविषयी असलेल्या समस्या व तक्रारी याने करीत असे. आपल्या आई-वडिलांबद्दल तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या विस्ताराने लिहा, असा एक ‘अभ्यास’ मी देत असे. आपल्या आई-वडिलांबद्दल वाटणाऱ्या प्रेम व आदरामुळे असे काही लिहायला मुले तयार नसत. त्यांना याचे आश्वासन द्यावे लागे की, असे लिहिणे म्हणजे आपल्या आई-वडिलांचा अनादर करणे नाही. आपल्यावर एखादा माणूस कितीही प्रेम करीत असला तरी त्याबद्दल काही तक्रारी असतातच. त्या जर योग्य वेळी व्यक्त करता आल्या तर त्या नातेसंबंधाची झळाळी आणखीनच खुलते. शिवाय तुम्ही इथे जे काही लिहिणार आहात ते बाहेर कोणीही तुमच्या आई-वडिलांना सांगणार नाही. अशा आश्वासनानंतर मात्र मुले खुलेपणाने त्यांच्या तक्रारी मांडत असत. या सगळ्या तक्रारींचे थोडक्यात स्वरूप असे.
१) कुठल्याही परीक्षेच्या निकालानंतर आमची तुलना सतत आमच्यापेक्षा अधिक मार्क्‍स मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर केली जाते आणि  तेवढे गुण आम्हाला मिळत नाहीत त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते.
२) प्रत्येक परीक्षेआधी झालेल्या परीक्षांमध्ये मिळालेल्या अपयशाचे उल्लेख केले जातात आणि या वेळी तसेच घडले तर बघा, अशी सरळ धमकीच दिली जाते.
३) एका मुलीचे उदाहरण येथे आवर्जून द्यावेसे वाटते. वडील वारल्यानंतर अतिशय गरीब परिस्थितीत तिच्या आईने तिला वाढविले. मुलगी दहावीत मेरिटमध्ये आली. तरीसुद्धा कुठल्याही परीक्षेपूर्वी तिची आई अवास्तव ताण घेत असे आणि जर तुला कमी मार्क्‍स मिळाले तर आपले जे काही हाल होतील त्याची तिला सतत जाणीव करून देत असे. त्यामुळे त्या मुलीला ताण असह्य़ होऊन तिचे अभ्यासावरचे लक्ष उडत असे.
४) काही मुले-मुली म्हणतात, आमच्या अभ्यासात आमचे आई-वडील नको तितके लक्ष घालतात.
५) याउलट काही मुले-मुली म्हणतात, आमच्या आई-वडिलांचे आमच्याकडे काहीच लक्ष नसते. हे झाले मुलांचे मत. मी अनेकदा पालकांच्या सभा घेतल्या आहेत. त्यात व्यक्त  होणाऱ्या पालकांच्या तक्रारी अशा- उदा. एका  मुलाची आई मला कळकळीने म्हणाली, सर, काय करू तेच कळत नाही. मी माझ्या मुलावर खूप जोर देऊन पाहिला. तो चिडून म्हणाला, मी अभ्यास करणार नाही. तुला काय करायचे ते कर. यावर माझा प्रश्न- मग तुम्ही काय केले? त्यांचे उत्तर- मग मी अभ्यासाविषयी बोलणेच सोडून दिले. त्यातून काय झाले? -आता तर तो अजिबात अभ्यास करत नाही. म्हणजे या बाईचा लंबक एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाऊन आला.
परंतु दोन्हीही गोष्टी निष्फळ व निरुपयोगी ठरल्या. त्यावर त्या बाईंनी अतिशय केविलवाणे होत मला विचारले, सर, मी कितपत प्रेशर देऊ? हे म्हणजे भर ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हरने मला विचारावे, ‘सर कितना एक्सिलेटर दबाऊ?’ तसे झाले. अरे तू जर जास्त दाब दिलास तर समोरच्याला ठोकशील आणि कमी दाब दिलास तर मागचा तुला ठोकेल. तेव्हा ट्रॅफिकला योग्य असा दाब देण्याची कला तुझ्याकडे नसेल तर तुझा ड्रायव्हर म्हणून काय उपयोग? एखाद्या माणसाला ज्याने कधीच गाडी चालविली नाही व जो कुठल्याही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कधी गेला नाही, त्याच्या हातात जर गाडी चालवायला दिली तर जे काय होईल ते बहुतांश पालकांचे होत असते. उद्या जर सरकारने असा फतवा काढला की ज्या पालकांना मुले व्हावयास हवी असतील त्यांनी कमीत कमी काही परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावयास हवे. ज्यात बालमानसशास्त्र, बालसंगोपन, न्यूट्रिशन आणि पौगंडावस्थेत असलेल्या मुलांच्या समस्यांचे स्वरूप आणि त्याचे निराकरण वगैरे गोष्टींचा अंतर्भाव असेल तर एकही पालक चार ते पाच वर्षांच्या अभ्यासाशिवाय ही परीक्षा पास होणार नाही. अशा तऱ्हेचे कुठलेही क्वालिफिकेशन नसताना एके दिवशी अचानक एखादा पुरुष बाप होतो व स्त्री आई होते. आई-वडिलांना उपजतच आपल्या अपत्यांना सांभाळण्याची व त्यांचे रक्षण करण्याची कला अवगत असते. ती कुठल्याही प्राण्यांमध्ये असतेच. त्याविषयी मी बोलत नाही, पण आजच्या या अत्यंत गुंतागुंतीने भरलेल्या तणावग्रस्त व तथाकथित आधुनिक संस्कृतीत मुलांना वाढविण्यासाठी जे कौशल्य लागते त्याविषयी जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, आजच्या जगात मुलांना वाढविणे म्हणजे त्यांना मानसिक व शारीरिकदृष्टय़ा समर्थ व आत्मनिर्भर करणे आणि भरपूर आत्मविश्वास असलेले एक समृद्ध व्यक्तिमत्त्व निर्माण करणे. परंतु हे करून देण्यामागे एका प्रगल्भ दूरदृष्टीची, वैचारिक व मानसिक पातळीवर खोलवर मनन करण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपल्याला अचानक पालकत्व प्राप्त होते अशा वेळी आपल्या मुलांना कसे वाढवावे, याची  धोरणे आपल्या आई-वडिलांनी आपल्याला वाढविल्याचा जो एकुलता एक अनुभव असतो त्यावर अवलंबून असते. उदा. आपण जर अभ्यास केला नाही तर आपले वडील मारीत वा शिक्षा करीत. हे जर आपल्याला रुचले असेल आणि ह्य़ामुळेच आपली प्रगती झाली असे जर वाटत असेल तर तुम्हीदेखील तेच धोरण वापरता. याउलट जर ते तुम्हाला आवडलेले नसेल तर मी माझ्या मुलावर चुकूनही हात उगारणार नाही, असा निश्चय तुम्ही करता. वास्तविक त्याला शिक्षा करणे वा न करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. थोडक्यात, आपल्या भूतकाळातील घटनांचे जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक निष्कर्ष आपल्या मनात असतात त्याची पुनरावृत्ती आपण मुलांच्या संगोपनासाठी करू लागतो. वास्तविक आपल्या भूतकाळाचा आपल्या पुढच्या पिढीच्या वर्तमानाशी काहीही संबंध नसतो. आज निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आज येथे असलेल्या सर्व घटकांचा साकल्याने विचार करून सुयोग्य कृती करण्यासाठी वर्तमानात असणे आवश्यक असते आणि हे जेव्हा होत नाही तेव्हा पालकांची मुलांविषयी असलेली काळजी व प्रेम याचे रूपांतर दुराग्रह आणि अट्टहासात होताना दिसते. निदान मुलांना तरी ते तसे भासते. त्यामुळेच आजकाल प्रामुख्याने  पालक-पाल्यसंबंधात दिसणारे ताणतणाव व त्याचे काही वेळा अतिशय दुर्दैवी घटनांत रूपांतर झालेले आपण बघतो. आता शिक्षक म्हणून माझे काही अनुभव सांगण्यासारखे आहेत.
एकदा एक नियमित होमवर्क करणारा विद्यार्थी होमवर्क न करता आला. त्याला विचारले आज असे का, तर तो उत्तरला, ‘सर काल आईला बरे नव्हते त्यामुळे ती लवकर झोपली.’ यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरी एक गोष्ट नक्की की हा मुलगा आपल्या गृहपाठासाठी आपल्या आईवर सर्वस्वी अवलंबून असतो. एकदा मध्यरात्री मला एका विद्यार्थ्यांच्या आईचा फोन आला.‘सर काय करू, काही केल्या मला झोप येत नाही. तुमच्याशी बोलावेसे वाटले.’ मी विचारले की तुम्हाला का झोप येत नाही. यावर त्यांचे उत्तर असे की, सर उद्या माझ्या मुलाची परीक्षा आहे पण तो केव्हाच झोपून गेलाय. अशा अवस्थेत मला झोप कशी येईल?
मुलांच्या, पालकांच्या व शिक्षकांच्या या अनुभवातून संबंधित समस्यांची कल्पना यायला हरकत नाही. सर्वात प्रथम आपण त्या आईचे उदाहरण घेऊया. जिला आपल्या मुलाला किती प्रेशराइज करावे हे कळत नाही. सर्वात आधी हे आपल्या लक्षात आले पाहिजे की तिला ठामपणे असे वाटत आहे की तिच्या मुलाचे अभ्यास करणे वा न करणे हे तिच्या दबाव टाकण्यावर वा न टाकण्यावर अवलंबून आहे. या दोन्ही कृतींमधून तर असेही नकळत सूचित करत आली आहे की, या मुलाला जर स्वातंत्र्य दिले तर हा काही करण्याच्या लायकीचा नाही. त्याचा अभ्यास त्याचे भवितव्य त्याच्या आकांक्षा या त्याच्यावरच सोडण्याची तिची तयारी नाही, कारण हा मुलगा स्वत:चे हित कशात आहे याचा सारासार विचार करून त्याप्रमाणे वागू शकेल याची तिला अजिबात खात्री नाही. आता असे होण्याचे कारण काय, तर हा प्रकार त्या मुलाच्या लहानपणापासून सुरू आहे. आपला मुलगा अभ्यास करणार नाही, हे गृहीत धरून एखादी आई जेव्हा आपल्या मुलाला घेऊन त्याच्याबरोबर अभ्यास करू लागते, त्याचे वेळापत्रक स्वत: सांभाळते, त्याच्या गृहपाठाची जबाबदारी स्वत: घेते तेव्हा तिला हे कळत नाही की ती त्याच्या स्वसामर्थ्यांवर असलेल्या विश्वासाचा बळी घेत आहे आणि त्याला परावलंबी करते. स्वत:च्या गोष्टी आपण स्वत:च करू शकत नाही, असा संस्कार न कळतपणे त्याच्यावर होत असतो. एक मानसिकरीत्या दुबळा आत्मविश्वास गमावलेले व्यक्तिमत्त्व आपण निर्माण करीत आहोत तेही त्याच्याविषयी वाटणाऱ्या अतीव काळजीपोटी हे त्या मातेला कळत नाही. यातून निर्माण होणारे मानसिक परावलंबित्व हे शारीरिक दुबळेपणाच्या कित्येक पटीने जास्त धोकादायक असते. कारण आपण अनेक वेळा बघतो की शारीरिकदृष्टय़ा दुबळी असलेल्या व्यक्ती अद्वितीय अशा कौशल्याने आपले व्यंग भरून काढतात आणि  बऱ्याच वेळा सुदृढ माणसापेक्षादेखील अधिक कर्तृत्ववान असतात. एखाद्या माणसाला हात नसतात, तो पायाने पेपर लिहितो. ते चित्र काढतात व बऱ्याच वेळा या गोष्टी ज्यांचे हातपाय धड आहेत अशा लोकांपेक्षादेखील चांगले करून दाखवतात. कारण शारीरिक व्यंग असलेली ही व्यक्ती मानसिक पातळीवर मात्र अतिशय समर्थ असते, पण मानसिक दुबळेपणावर मात करणे जवळपास अशक्य आहे. हे जर आपल्याला टाळायचे असेल तर खऱ्या अर्थाने पालकत्व म्हणजे काय आणि सुजाण पालकत्वाचे उद्दिष्ट काय याविषयी सुस्पष्टता मनात असायला हवी. अन्यथा या चुका सहज आणि नकळतपणे होत राहतात. तेव्हा सुजाण पालकत्वाचे उद्दिष्ट एकच आणि ते म्हणजे एक आत्मनिर्भर स्वत:च्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास असणारे, परिस्थितीचा बळी न होता त्यावर मात करणारे सार्वभौम व्यक्तिमत्त्व निर्माण करणे हा आहे. आपल्या मुलांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा, त्याच्या सार्वभौमत्वाचा सन्मान आणि मशागत लहानपणापासून आपण करायला शिकले पाहिजे. आपल्या समोरील व्यक्ती वयाने, मानाने, शरीराने कितीही लहान असली तरीदेखील स्वत:चे हित त्याला कळते. स्वत:च्या विकासासाठी योग्य ते उद्दिष्ट तो ठेवू शकतो आणि ते साध्य करण्यासाठी योग्य ती पावले तो उचलू शकतो, असा विश्वास आपल्या वागण्यातून, आपल्या देहबोलीतून सतत प्रकट झाला पाहिजे. अशा रीतीने आपली मनोभूमिका एकदा स्पष्ट झाली तर त्यातून निर्माण होणारी वर्तणूक ही आपोआपच सुयोग्य दिशेने होते.
आपलाच आपल्या पाल्यावर विश्वास नसेल आणि जर त्याला एखाद्या परीक्षेत कमी मार्क्‍स मिळाले तर आपण रागावतो, हळहळतो. शेजारच्या मुलांशी तुलना करतो आणि त्याच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करतो. याउलट आपला त्याच्या क्षमतेवर विश्वास असेल तर आपली प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी असते. त्याला कमी मार्क्‍स का मिळाले, याने काय चुका केल्या, त्या चुकांमागची कारणे काय, त्याचे निराकरण कसे करता येईल, याविषयी त्याला मार्गदर्शन करू लागतो.
पूर्वी राजेरजवाडय़ांच्या काळात एखादा राजपुत्र जन्माला आला की त्याला बालपणापासूनच सन्मानाने वागविले जात असे. वयाने आणि हुद्दय़ाने एखादी व्यक्ती कितीही छोटी किंवा मोठी असली तरी राजपुत्राशी वागताना तो पुढे या देशाचा राजा होणार आहे, हे गृहीत धरूनच त्याच्याशी व्यवहार केला जात असे. वास्तविक इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीपेक्षा हा राजपुत्र मोठा नसायचा. पण आजूबाजूच्या व्यक्ती, माणसं आपल्या वागण्यातून त्याच्या मनात राजेपण रुजविण्यात यशस्वी होत असत. हाच मुलगा साधारण कुटुंबात जन्माला आला की, त्याला सामान्यत्व गृहीत धरले जाते आणि त्याच्यात सामान्यत्व रुजविण्यात येते. आपल्या कुटुंबात जन्माला आलेले हे मूल मानसिकदृष्टय़ा राजा असला पाहिजे. आपल्या कुटुंबातले वातावरण त्याच्यातला हा राजेपणा रुचेल आणि खुलेल असे असले पाहिजे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
License refused for lack of parking facility The High Court said there is no such rule
पार्किंगची सोय नाही म्हणून परवाना नाकारला, उच्च न्यायालय म्हणाले, असा काही नियम नाही…