– प्रकाश जोशी
ओम्कारच्या जन्मानंतर दोनच महिन्यांनी आम्ही भारतात परतलो. थोडा मोठा झाल्यावर लहानग्या ओम्कारला भेटण्याची आमची अतीव इच्छा होती. नातवाचं निरागस बालपण अनुभवण्यातला असीम आनंद गाठीला बांधायचा होता, हेच आमचं उद्दिष्ट होतं. ओम्कारला आजीआजोबा म्हणून आमची ओळख व्हायला हवी होती. यासाठी आमचा प्रयत्न असणार होता. याच उद्देशाने दीडदोन वर्षांनी पुनश्च परदेश दौरा आखला. सून आणि मुलाबरोबरच दुडदुडत चालणार्या ओम्कारला आम्ही भेटणार होतो.
वीस-बावीस तासांचा दीर्घ प्रवास करून आम्ही ओम्कारच्या घरी पोचलो. आम्ही येण्यापूर्वी ‘आजी-आजोबा’ येण्याची खबर त्याच्या कानापर्यंत त्याच्या आईबाबांनी पोचवली असावी, कारण घरी पोचल्यावर चहा पिताना आम्हाला बघून थोडासा बावरलेला ओम्कार आम्हाला कुतुहलानं दुरून, टेबलाच्या पलीकडून न्याहाळत होता. ‘आजी-आजोबा’ हा काय प्रकार असतो ते जाणून घ्यायची जिज्ञासा त्याच्या बालमनात बहुधा आली असावी. चहाच्या कपाला हात लावून ओम्कारकडे पाहात मी म्हटलं, ‘‘चहा गरम आहे. हाय आहे, हाय. कसा आहे?’’ तशी ओम्कारने ताबडतोब कपाला हात लावण्याची ‘ॲक्शन’ करून हात मागे घेतला. आमच्याशी गट्टी जमण्याची ही नांदी होती.
दुसर्याच दिवसापासून आमच्यातला दुरावा हळूहळू लुप्त पावू लागला, जवळीक वाढू लागली. थोड्याशा अवधीतच माझ्या आणि आजीच्या मांडीवर हक्काने बसण्याइतपत आम्हाला सुखावणारी त्याची मजल गेली. त्यानंतरचा टप्पा अर्थातच फिरायला जाण्याचा झाला. तोदेखील पुढच्या चार-पाच दिवसांतच.
‘‘चला फिरायला जाऊया’’ असं म्हणायचा अवकाश, छोटा ओम्कार माझ्या चपला तातडीनं आणून माझ्यापुढे ठेवायचा. फिरायला जायची त्याच्या मनाने आपणहून केलेली तयारी असायची. फिरायला जायला कधीही तयार असलेला ओम्कार बाहेर जाण्याकरिता सर्व प्रकारचं सहकार्य करायचा. रस्त्यात भेटलेल्या आमच्यासारख्याच पर्यटक पाहुण्यांना ‘हाय’ करणं, ‘शेकहँड’ करणं, ‘बाय बाय’ करणं अशा सर्व गोष्टी आम्ही सांगितल्या की बरहुकूम हौसेने आज्ञाधारकपणे करायचा. बर्यापैकी फिरून झाल्यावर घरी परतायला मात्र त्याची नाराजी असायची. नुसताच नाखूश न होता काहीवेळा आक्रस्ताळेपणा करायचा. याचा एकदोनदा अनुभव आल्यावर मलाही यावर काही उपाय शोधावा असं वाटलं. लहान मुलांकडून आपल्याला अभिप्रेत असलेली एखादी कृती वा वागणं व्हायला पाहिजे असेल तर आपल्याच भाषेत त्याला प्रेमाने समजावून सांगावं. त्याचा अर्थ लहानग्यांना कळो वा न कळो. मात्र अशा संभाषणाचा योग्य तो परिणाम बालमनावर होऊन त्याप्रमाणे मुलांच्या वागण्यात चांगला बदल होऊ शकतो, असं माझ्या वाचनात आलं होतं. याचाच उपयोग करायचा आणि ओम्कारची मानसिक तयारी करायची असं ठरवलं.
आमच्या फिरायला जायच्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या बस स्टॉपवर एक बस उभी असायची. ही बस आमच्या फिरण्याच्या वेळेतच बसथांब्यावरून निघायची. आमचं रस्त्यावर थांबण्याचं ठिकाण हे या बस थांब्याच्या समोरच होतं. ओम्कारच्या आवडीनुसार वा त्याच्या मनाचं समाधान होईपर्यंत आम्ही वेगात जाणारी वाहनं बघत तिथे थांबत असू. बस थांब्यावर पोचल्यावर थांबलेल्या बसकडे बोट दाखवून ‘‘ही बस निघून गेली की आपणही घरी जायला निघायचं हं’’, असं सांगून एक अलिखित ‘ॲग्रीमेंट’ करून ठेवायची पद्धत मी सुरू केली. यानंतर मात्र बस थांब्यावरची बस निघून गेली की ओम्कारबरोबरच्या तोंडी कराराप्रमाणे आम्हीही घरी परतायला निघत असू. त्यानंतर मात्र ओम्कारही आज्ञाधारकपणे कोणतीही गडबड, चिडचीड, खळखळ न करता परतीच्या वाटेवर शांतपणे आमच्याबरोबर जायला निघायचा. पुढे अशाच प्रकारच्या आमच्या संवादाने अनेक प्रसंगांच्या वेळी आमच्या सूचना ओम्कार आज्ञाधारकपणे पाळू लागला.
आम्ही परदेशात आल्यानंतर थोड्याच दिवसात ओम्कारला सांभाळतानाचा एक वेगळाच प्रसंग आमच्यावर गुदरला. आमच्या सुनेला व मुलाला काही महत्त्वाच्या कामासाठी तीनचार तासांसाठी बाहेर जायचं होतं. या काळात ओम्कारची देखभाल करण्याची जबाबदारी अर्थातच आमच्यावर आली. कर्मधर्म संयोगाने ओम्कारच्या ‘शी’च्या कार्यक्रमाची वेळही याच काळात होती. अशा वेळच्या सर्व कृत्यांसाठी ओम्कारला मानसिकरीत्या तयार करणं, जुना डायपर काढणं, नवीन डायपर लावणं, सर्व प्रकारची स्वच्छता करणं इत्यादी कामं त्याच्या सहकार्याशिवाय करणं अशक्य होतं. माझी याआधीची क्लृप्ती वापरण्याचं ठरवलं. आजी-आजोबा काय करणार आहेत ते आमच्या वकुबाप्रमाणे आम्ही दोघांनी ओम्कारला समजावून सांगितलं. काय करायला पाहिजे आहे, हे बहुधा त्याच्यापर्यंत पोचलं असावं. कारण ओम्कारने आम्हाला या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक ते सर्व तर्हेचं सहकार्य अत्यंत समंजसपणे आश्चर्य वाटावं इतक्या उत्तम प्रकारे केलं. आमची मनं आनंदाने आणि कौतुकानं भरून गेली.
आम्हाला येऊन एक महिना झाला असेल. ओम्कारच्या ‘शू’चा भाग थोडासा लालसर झाल्याचं लक्षात आलं. बहुदा ती जागा दुखरी झाली असावी. आमच्या सुनेनं ही बाब आम्हाला ओम्कारच्या देखतच सांगितली. ओम्कार आईचं बोलणं लक्षपूर्वक टक लावून ऐकत होता. संसर्ग झाला असावा असं वाटलं. एकदम डॉक्टरकडे जाण्याची पद्धत त्या देशात नव्हती.
माझ्या प्रवासीबॅगेत एक साधसं औषधी क्रीम असल्याचं मला आठवलं. तेच क्रीम लावून बघायचं असं ठरलं. ओम्कारची आंघोळ झाल्यावर त्याला म्हटलं, ‘‘शूच्या ठिकाणी झालेला बाऊ बरा व्हायला हवा ना?’’ या माझ्या प्रश्नावर ओम्कारने मान हलवून होकार दिला. मग पुढे म्हणालो, ‘‘मग आपण हे औषध तिथे लावू या का?’’ या माझ्या बोलण्यावर औषध लावण्यासाठी ओम्कार त्वरित गादीवर लवंडला. ही त्याची औषध लावून घ्यायची तयारी होती. आमचं काम सोपं झालं. पुढे कधी गरज लागली तर लगेच मिळावं म्हणून समोरच्या क्लोझेटमध्येच हे क्रीम मी ठेवून दिलं.
दुसर्या दिवशी आंघोळ झालेला ओम्कार लगेचच माझ्याजवळ आला. हाताला धरून ओढत मला भिंतीतल्या एका कपाटापुढे घेऊन गेला. कपाटावरच्या कप्प्यांकडे हातवारे करून काहीतरी दाखवायचा आणि सांगण्याचा त्याचा प्रयत्न होता. आम्हाला नीटसं काही कळेना. मात्र थोड्याशा प्रयत्नाने त्याला काय पाहिजे आहे ते माझ्या पत्नीच्या, त्याच्या आजीच्या लक्षात आलं. आदल्या दिवशीची औषधाची ट्युब त्याने काढायला लावली आणि कालच्या सारखाच त्वरित क्रीम लावून घेण्यासाठी ओम्कार पलंगावर आडवा झाला. क्रीम लावल्याने शूच्या ठिकाणी झालेलं दुखणं बहुदा बरं झालं असावं. तेच औषध पुन्हा त्याला लावून घ्यायचं होतं. शूच्या दुखर्या जागेवर क्रीम लावणं आणि त्या ठिकाणचं असलेलं दुखणं-खुपणं बरं होणं यातला परस्परसंबंध त्याच्या लक्षात आला असावा. त्याच्या बुद्धीची तल्लखता या प्रसंगातून आम्हाला दिसून आली. त्याच्या वयाचा विचार केला तर हे बरंचसं वेगळं होतं, आमच्यासाठी हे मनस्वी आल्हाददायक होतं.
रात्रीचं जेवण झाल्यावर बर्याचदा आइस्क्रीम खाण्याचा माझा शिरस्ता होता. आइस्क्रीम खायची वेळ मात्र नक्की नसायची. एखादं पुस्तक वाचन सुरू असेल, लॅपटॉपवर काम चालू असेल वा काही कामात असेन तर वेळेवर आइस्क्रीम खाणं व्हायचं नाही. मात्र आइस्क्रीमची वाटी कधीही हातात आली की बाजूच्याच खोलीतल्या ओम्कारला त्याचा सुगावा लागायचा, अन् दुसर्याच क्षणाला ओम्कार चोरपावलाने हळूच आमच्या खोलीत शिरायचा आणि आइस्क्रीमसाठी आमच्या पुढे आ वासून उभा ठाकायचा. आइस्क्रीमसाठी उघडावा लागणारा फ्रीज, त्यानंतर वाटी, चमचे घेतानाचा होणारा आवाज यावर बारकाईने लक्ष असल्याने आमच्या कार्यक्रमाचा सुगावा ओम्कारला बहुदा लागत असावा. शिवाय त्याच्या नकळत आइस्क्रीम खाताना ‘आजीआजोबांना कसं पकडलं,’ याचा विलक्षण आनंद त्याच्या चेहर्यावर ओसंडून वाहायचा. अशा प्रसंगातले त्याच्या डोळ्यातले भाव अत्यंत मिष्कील अन् लोभसवाणे असायचे.
ओम्कारचं सगळंच वागणं, हावभाव मनमोहक अन् लाघवी होते. ओम्कारने आम्हाला आपलंसं केलं होतं, विरघळवून टाकलं होतं. नातवाच्या लडिवाळपणात विरघळून जाण्यातला उत्कट आनंद आम्ही अनुभवत होतो.
एक वर्षाच्या पुढची बाळं चालण्याबरोबरच काका, बाबा, आबा असे काही सोपे शब्द बोलायचा प्रयत्न करायला लागतात. ओम्कारच्या बाबतीत चालण्याची प्रगती जलद होत होती. शिवाय त्याची समजही उत्तम होती. पण बोलण्याच्या बाबतीत मात्र बैलगाडीचा वेगही येत नव्हता. आमच्यासाठी हे अर्थातच काळजीचं कारण होतं.
ओम्कारची नजर, चेहर्यावरचे भाव, देहबोली यातून आम्हाला जे अभिप्रेत आहे ते स्पष्टपणे व्यक्त व्हायचं. त्याचं हास्य तर इतकं मोहक अन् लाघवी होतं की समोरची व्यक्ती तात्काळ विरघळून जावी. बोलण्याच्या बाबतीत ‘डिलेड-स्पीच’ असं काही असल्याचं समजलं. कालांतराने तो आपसूकपणे बोलायला लागेल असं डॉक्टरांचं मत होतं. केवळ डॉक्टरांच्या या निदानामुळेच आम्ही काहीसे निश्चिंत होतो. नजीकच्या काळात ओम्कारची बोलण्याबाबत प्रगती होईल याबद्दल आम्हाला खात्री वाटत होती. यामुळेच आमच्या या खेपेच्या परदेश भेटीत ओम्कारच्या सहवासाचे अत्युच्च आनंदाचे अनेक आल्हाददायक क्षण आम्ही कोणतेही किल्मिष मनात येऊ न देता आनंदाने उपभोगले.
परतीचा दिवस उजाडला. आमच्या परतीच्या प्रवासाला निघण्याची वेळ आणि ओम्कारची दुपारची झोपण्याची वेळ एकच होती. हीच वेळ आमच्यासाठी अगदी योग्य होती. कारण घरून निघताना ओम्कारला रडवेला, हिरमुसला बघणं आम्हाला टाळायचं होतं. आम्ही तिथून निघाल्यावर पुढचे काही दिवस ओम्कार आमची शोधाशोध नक्कीच करणार होता. कारण अल्पकाळासाठी का होईना, पण आमच्यामध्ये छानसे दृढ स्नेहबंध निर्माण झाले होते. एकमेकांना एकमेकांशिवाय चैन न पडू देणारे असे हे स्नेहशील बंध होते. परदेशात आल्यावर आमचा नातू म्हणून ओम्कारने आम्हाला भरभरून अविस्मरणीय आठवणीत चिंब भिजवलं होतं.
जसा नातू अभिप्रेत होता तोच आम्हाला जाणतेपणाने गवसला होता. शब्दावीण आमच्याशी ओम्कार खूप काही बोलला होता. आमच्यामागे त्याचं आमच्यासाठीचं धुंडाळणं मात्र अबोल, मुकं असंच असणार होतं…
pajoshi51@hotmail.com
